Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश चलती चेहरे तयार करण्याचे मराठी सिनेमासमोर आव्हान!

चलती चेहरे तयार करण्याचे मराठी सिनेमासमोर आव्हान!

कोरोना आला आणि दुष्काळात तेरावा महिना इंडस्ट्रीला सहन करावा लागतोय.. कोरोनाच्या आधी, कोरोनात आणि लॉकडाऊन हटल्यानंतरची मराठी इंडस्ट्री कशी असणार ? मराठी सिनेमांना पुन्हा प्रेक्षक मिळणार का ? हिंदी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्री सोबत स्पर्धा करण्यासाठी काय नवीन प्रयोग करता येतील ? ओटीटी मध्ये मराठी कंटेंट चे स्थान काय ? याच सध्या भेडसावणार्‍या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या लेखात करणार आहे. काही गोष्टी अनेकांना पटतील असं नाही, पण जे प्रेक्षकांच्या मनात आहे आणि मी अनुभवलं आहे तीच काही निरीक्षण मांडण्याचा प्रयत्न करतोय.

Related Story

- Advertisement -

मराठी फिल्म इंडस्ट्रीला भारतीय फिल्म इंडस्ट्रीची जनक मानले गेले आहे, हिंदी सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ याच मराठी इंडस्ट्रीने रोवली. सुरुवातीपासून ते आजपर्यंत भारतीय सिने जगताला उत्तम कलाकृतींसह उमदा अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक देखील दिले आहेत. पण हिंदी सिनेसृष्टीला भरभरून देणार्‍या या इंडस्ट्रीच्या हाती मात्र सध्या फार काही लागत नाहीये, सुवर्ण इतिहासाच्या आठवणी गिरवताना वर्तमानाबद्दल बोलण्यात तितका रस कुणालाच राहिला नाही. ना सुपरस्टार ना सुपरहिट सिनेमे, ना कलाकारांना फोकस ना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, दोन चार वर्षात एखादा सैराटसारखा सिनेमा येतो, पण त्यानंतर निव्वळ दुष्काळ. आर्ट फिल्म, समाजभान निर्माण करणार्‍या फिल्म्स मराठीत नेहमीच बनत आल्यात आणि त्यांच्या दर्जात सुधारणा देखील होते आहे, पण इंडस्ट्री चालविणार्‍या कमर्शियल फिल्म्सच्या बाबतीत मात्र घोर निराशा हाती लागते.

उत्तम नट नट्या, उत्कृष्ट दिग्दर्शक, दमदार कथा सगळं काही असताना मराठी सिनेमांना प्रेक्षक मिळत नाही हे सत्य आहे, गेल्या काही काळात तर हा प्रतिसाद अधिकच कमी होतो आहे. त्यातच भर म्हणून कोरोना आला आणि दुष्काळात तेरावा महिना इंडस्ट्रीला सहन करावा लागतोय.. कोरोनाच्या आधी, कोरोनात आणि लॉकडाऊन हटल्यानंतरची मराठी इंडस्ट्री कशी असणार ? मराठी सिनेमांना पुन्हा प्रेक्षक मिळणार का ? हिंदी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्री सोबत स्पर्धा करण्यासाठी काय नवीन प्रयोग करता येतील ? ओटीटी मध्ये मराठी कंटेंट चे स्थान काय ? याच सध्या भेडसावणार्‍या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे. काही गोष्टी अनेकांना पटतील असं नाही, पण जे प्रेक्षकांच्या मनात आहे आणि मी अनुभवलं आहे तीच काही निरीक्षणं मांडण्याचा प्रयत्न करतोय.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या आधी मराठी इंडस्ट्रीत दरवर्षी बोटावर मोजण्याइतकेच सिनेमे हिट ठरायचे, उदाहरणादाखल गेल्या 3 वर्षांचा इतिहास पाहिला तर 2019 मध्ये ठाकरे, टकाटक, फत्तेशिकस्त, येरे येरे पैसा 2 हे चार सिनेमे संपूर्ण वर्षभरात चर्चिले गेले, 2018 ला येरे येरे पैसा, आम्ही दोघी, फर्ंजद, आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर, मुळशी पॅटर्न, माऊली, बॉईज 2 आणि नाळ हे सिनेमे चर्चिले गेले. तर 2017 साली ती सध्या काय करते, बॉईज, फास्टर फेणे आणि बबन अशा चार सिनेमांना लोकांनी प्रतिसाद दिला. यात 2020 चा उल्लेख मी मुद्दामहून टाळला कारण यात मार्च पर्यंत केवळ 10 /15 सिनेमे प्रदर्शित झाले होते ज्यात धुरळा आणि केसरी सोडला तर बाकी सिनेमांची नावही मला ठाऊक नाहीत. एकंदरीत काय तर दरवर्षी मराठीत 80 वर सिनेमे बनतात पण त्यापैकी 10 टक्के सिनेमांना देखील अपेक्षित यश मिळत नाही, सिनेमा जर एक व्यवसाय असेल तर त्यात आर्थिक फायदा होणे गरजेचे आहे पण मराठीमध्ये हा फायदा दिसत नाही.

बरं या सर्वात सिनेमांच्या दर्जाचा विचार केला तर तिथं आपण फार मागे नाही आहोत, आपल्याकडे चांगल्या सिनेमांना प्रेक्षक येतो आणि तसे चांगले सिनेमे महिन्याला किमान एक तरी बनतात, मग तरीही प्रेक्षक वर्ग का आकर्षित होत नाही ? याला अनेक कारणं दिली जातात. एक म्हणजे महाराष्ट्रात हिंदी इंडस्ट्री असल्याने आणि त्या इंडस्ट्रीचे प्रमोशन, स्टार्स चे प्रमोशन व्यवस्थित केले जात असल्याने तिथे मराठी वाल्यांना ती जागा मिळत नाही, परिणामी ना मराठी कलाकार आपली छाप सोडू शकतात ना मराठी सिनेमांना तितके थिएटर उपलब्ध होऊ शकतात. आपण मान्य केली नाही तरी इथल्या मराठी सिनेमांची थेट स्पर्धा मुख्य धारेत असणार्‍या एखाद्या हिंदी सिनेमा सोबत असते, या स्पर्धेत नेहमीच हिंदी सिनेमांचे पारडे जड असते याला कारण म्हणजे पब्लिसिटी, कारण हिंदी सिनेमांच्या केवळ बॅनरच्या खर्चात एखादा मराठी सिनेमा तयार होऊन प्रदर्शित होतो. आता अशी अवस्था असताना लॉक डाऊन लागलं आणि ग्राऊंडवर होणारी ही लढाई इंटरनेटवर आली, तिथेही हिंदी आशयचं वरचढ ठरला, कारण तिथं स्पर्धा केवळ हिंदी सोबत नव्हती तर जगातील सर्व भाषेतील आशया सोबत होती. म्हणून कोरोनाच्या काळात मराठी इंडस्ट्रीच्या हाती फार काही लागले नाही.

- Advertisement -

भारतात ओटीटीची सुरुवात लॉकडाऊन मध्ये झाली असं नाही, त्या आधीही 2/3 वर्षांपासून आपल्याकडे हे माध्यम अस्तित्वात होतं, त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळत होता. पण लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनाचा दुसरा कुठला पर्यायच उपलब्ध नसल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. जर 3 वर्षांपासून ही माध्यम अस्तित्वात होती तर मग यावर मराठी कंटेंट का नव्हता ? असाही प्रश्न उपस्थित होतो, याला कारण आहे ओटीटी बद्दलची अनास्था समांतर, काळे धंदे, यांसारख्या मोजक्या सिरीज सोडल्या तर कुठल्याही दुसर्‍या सिरीज तुम्हाला ओटीटी वर पाहायला मिळणार नाहीत. बरं जो चांगला कंटेंट तयार होतो तो खरेदी करायला मोठे ओटीटी प्लॅटफॉर्म तयार देखील होत नाहीत, म्हणजे या ज्या मराठी सिरीज आहेत त्या तुम्हाला फुकट उपलब्ध असलेल्या प्लॅटफॉर्म वर पाहायला मिळतील उदाहरणार्थ बहुतांश कंटेंट हा एम एक्स प्लेयर आणि युट्यूबवर उपलब्ध आहे आणि उरलेला झी 5वर, अमेझॉन नेटफ्लिक्स सारखी माध्यमं तर मराठी कंटेंट घेतही नाहीत. याला कारण म्हणजे त्यांच्या अनुसार मराठी कंटेंट ला प्रेक्षक नाही म्हणून ते अशी रिस्क घेत नाहीत.

पण जर तुम्ही कधी गावाकडच्या गोष्टी, शाळा, समांतर, गोंद्या आला रे, पांडू, वन्स अ इयर यांना मिळणारा प्रतिसाद पाहिला तर लक्षात येईल की हे पूर्ण सत्य नाहीये पण इथेच खरी मेख दडली आहे, मराठी फिल्म्स असो किंवा वेब सिरीज आपल्याला त्या फुकटात बघण्याची सवय लागलीय, इथे आपल्याला म्हणजे मी मध्यमवर्गीय मराठी प्रेक्षकांना म्हणतोय , कारण मराठी सिनेमांचा प्रेक्षक हा तरुण नाहीये, तो आहे गृहिणी आणि प्रौढ मराठी माणूस ..मराठी सिनेमा कौटुंबिक असल्याने ते पाहण्यात तरुणांना रस नाही आणि कुटुंब असलेले तो टीव्हीवर येण्याची वाट पाहतात हे खरं सत्य आहे. हिंदी सिनेमा, तेलुगू सिनेमा किंवा इंग्रजी सिनेमा हिट होतो तो त्यांच्या प्रेक्षकांमुळे जो तरुण वर्ग आहे, पण मराठीचा प्रेक्षक हा तरुण राहिलेला नाही, इथे कौटुंबिक आणि सामजिक विषय हाताळण्याचा नको तितका छंद निर्मात्यांना जडल्याने तरुणांना आकर्षित करणारा ना चेहरा उरलाय ना सिनेमा, जेव्हा जेव्हा मराठी मध्ये तरुणांचे विषय आले तेव्हा तेव्हा सिनेमे हिट झाले हा इतिहास आहे. मग तो दुनियादारी सैराट असो किंवा टाईमपास, बॉईज, टकाटक असो जे तरुणांना हवंय ते तुम्ही दिलं तर ते देखील तुमच्याकडे आकर्षित होतात हे सत्य आहे. जे अजूनही मराठी निर्मात्यांना कळलेलं नाही असं वाटतं. मराठी इंडस्ट्रीत पुन्हा प्राण फुंकायचे असतील तर असे प्रयोग करणे गरजेचे आहे.

थिएटर सुरू होऊन 8 महिने होत आली तरी कुठलाही मोठा हिंदी सिनेमा प्रदर्शित करण्यात आला नाही, लोक सिनेमा पाहायला बाहेर पडतील का ? हीच चिंता बॉलीवुड मधील बड्या लोकांना सतावत होती म्हणून त्यांनी पडून असलेले सिनेमे प्रदर्शित करण्याची रिस्क घेतली नाही. मराठी मध्येही असे काही सिनेमे तयार आहेत अशी बातमी मध्यंतरी ऐकण्यात आली, पण जी चूक हिंदी इंडस्ट्रीने केली तीच मराठी वाल्यांनी देखील केली. मागच्या महिन्यात साऊथ मध्ये मास्टर नावाचा एक बिग बजेट सिनेमा रिलीज करण्यात आला ज्याची प्रोपर मार्केटिंग देखील निर्मात्यांनी केली आणि कोरोनाच्या काळातही हा सिनेमा सुपरहिट ठरला, केवळ तीन दिवसात या सिनेमाने 100 कोटींची कमाई केली. कुठलाच स्पर्धक नसल्याचा फायदा या सिनेमाला मिळाला आणि अजूनही हा सिनेमा थिएटर मध्ये सुरू आहे, पण याउलट मराठी मध्ये कुठलाही मोठा सिनेमा मागच्या काही काळात रिलीज करण्यात आला नाही, जे रिलीज झाले ते का झाले, असा प्रश्न आहे. या काळात झी 5 वर प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव यांचा एक सिनेमा आला होता पण त्याला तितका प्रतिसाद मिळाला नाही, प्रथमेश परब याचा अजून एक सिनेमा सध्या थिएटर वर आहे, ओह माय घोस्ट नावाचा पण त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

मराठीत गेल्या काही काळात काही नावं नक्कीच चांगलं काम करताय पण त्यांना तितके चांगले सिनेमे मिळताना दिसत नाही. मराठी सिनेमांना प्रतिसाद तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्याकडे एक चेहरा असेल आणि हेच काही चेहरे निर्माण करण्याचं काम येणार्‍या काळात इंडस्ट्रीला करायचं आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्यामधील हे चेहरे निर्माण होतील, ओम भूतकर हे त्यापैकी एक नाव नाळ असो किंवा मुळशी पॅटर्न प्रत्येक सिनेमात आपल्या वेगळ्या भूमिकांनी त्याने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे ,त्याला अजून काही चांगले सिनेमे मिळाले तर नक्कीच तो एक चेहरा बनू शकतो. नागराज मंजुळे, प्रवीण तरडे यांच्या सोबतच दिगपाल लांजेकर, उमेश कुलकर्णी, समीर विध्वंस, आलोक राजवाडे यांची नावं देखील चर्चेत पुढे आली पाहिजेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना योग्य ते फुटेज मिळालं पाहिजे, अन्यथा काही दिवसांनी हेच नवीन अभिनेते, दिग्दर्शक कुठंतरी चला हवा येऊ द्या मध्ये हीही करताना दिसतील नाही तर एखाद्या मराठी सिरियलमध्ये फालतू रोल करताना दिसतील. कोरोनाने जितकी संकटं मराठी इंडस्ट्रीवर आणली तितक्याच संधीही येणार्‍या काळात निर्माण होतील, आता या संधींचा वापर मराठी फिल्म इंडस्ट्री कशी करेल ?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

- Advertisement -