घरताज्या घडामोडीतंत्रज्ञानात मराठीचा प्रभाव !

तंत्रज्ञानात मराठीचा प्रभाव !

Subscribe

आज 27 फेब्रुवारी. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णु वामन शिरवाडकर यांचा आज जन्मदिन. हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ मानला जातो. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असून ती लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दहावी आणि देशातील तिसरी भाषा आहे. आजकाल असे म्हटले जाते की, इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे मराठीसारख्या मातृभाषा लोप पावत चालल्या आहेत. परंतु, ह्यात फार तथ्य नाही. मराठी भाषा ही प्राचीन काळापासून तिच्यात योग्य ते बदल करत आली आहे. आणि हा स्वरूपातील बदल म्हणजे लोप म्हणता येणार नाही. नव्याने येत असलेल्या तंत्रज्ञानात मराठी भाषा आपला प्रभाव निर्माण करत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानात मराठीचा वापर:
मराठी ही भाषा लिहिण्यासाठी पूर्वी ‘मोडी’ लिपि वापरली जात असे. आज आपण ही भाषा ‘देवनागरी’ लिपीमध्ये लिहितो. ह्या लिपि लिहिण्यासाठी खूप सुलभ असल्या; तरी संगणकावर मात्र सुरुवातीला ह्या सहजपणे टाइप केल्या जात नव्हत्या. कारण संगणकास रोमन लिपि सोयीस्कर असल्याने त्यावर इंग्लिशसारख्या भाषाच वापरल्या जात असत. पण जसा जसा काळ पुढे गेला, तसे कागदावरचे लिखाण कमी कमी होऊन संगणकाचा वापर वाढला. त्यामुळे मराठी टायपिंगची सोय तर करणे गरजेचे आहे. पण, यात काही समस्या आहेत.

सुरुवातीला मराठी छपाईसाठी ज्या मुद्रा वापरल्या जात असत, त्यांच्या सुसंगती नव्हती. टाइपरायटरवर मराठी किबोर्ड नसतो. मराठीचे फॉन्ट्स हे विकत घ्यावे लागतात आणि ते सहज सर्वांना उपलब्ध होत नाहीत. सी-डॅक या संस्थेने असे फॉन्टस तयार केले आहेत, पण ते मर्यादित संख्येत उपलब्ध आहेत. तसेच, काही संगणकांवर मराठी टायपिंगची सुविधा उपजत आहे. पण जुन्या विंडोजमध्ये ती दिसून येत नाही. त्यामुळे जुन्या विंडोजवर आधारित संगणक वापरणार्‍यांना मराठी टायपिंग सहज करता येत नाही.

- Advertisement -

आणखी एक समस्या म्हणजे, उपलब्ध असणारे देवनागरी किबोर्ड हे हिंदीसाठी बनवलेले असल्याने यांवर काही मराठी अक्षरे टाइप होत नाहीत. पण, या समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अ‍ॅप स्टोअरवर हळूहळू मराठी टायपिंग अ‍ॅप्लिकेशन्स येत आहेत. आधुनिक पद्धतींमध्ये युनिकोडच्या वापरामुळे बर्‍याच प्रमाणात फरक झाला आहे. युनिकोड हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमाणभूत असलेला कॅरॅक्टर सेट आहे. म्हणजेच, यात कोणत्याही एक भाषेची सर्व अक्षरे, चिन्हे यांना विशिष्ट गणिती पद्धतीने अकड्यांमध्ये साठवले जाते. मराठी टायपिंगचे अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. आधुनिक टंकन पद्धतीत युनिकोड आणि किबोर्ड layout यांचा समावेश आहे. ‘कगप’ हा किबोर्ड layout भाषाशास्त्राचा आणि उच्चार पद्धतीचा वापर करून विकसित केलेला आहे. तसेच, ‘देवनागरी इनस्क्रीप्ट’ हाही पर्याय विंडोज आणि लिनक्स प्रणालींवर उपलब्ध केलेला आहे.

त्याचबरोबर, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लिप्यंतर तंत्रज्ञान वापरूनही मराठी टायपिंग केले जाते. यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट इंडिक टूल’, ‘गूगल इनपुट टूल’ यांसारखे सॉफ्टवेअर्स वापरले जातात. लिपिकारसारख्या आणखीही काही अ‍ॅप्सची नावे घेता येतील. मोबाइलवरही मराठी टायपिंगचे बरेच अ‍ॅप्स आहेत. परंतु, त्यातही काही अ‍ॅप्लिकेशन्स पूर्णपणे शुद्ध मराठी टाइप करण्यास सक्षम नाहीत. परंतु, ‘स्वरचक्र मराठी किबोर्ड’ सारखे काही अ‍ॅप्स सर्व अक्षरे टाइप करू शकतात. इतके, की त्यावर संस्कृत अक्षरे टाइप करणेही सहज शक्य होते.

- Advertisement -

युनिकोड ही वर उल्लेख केलेली प्रणाली 0 आणि 1 ने बनलेल्या संख्यांनी साकारली आहे. त्यामुळे तिचा वापर करणे सोपे जाते. ह्या युनिकोडसाठी काही मागण्या झाल्या आहेत. त्या अशा- सरकारकडे अधिकार असलेले साहित्य, म्हणजेच राज्य साहित्य आणि संस्कृति महामंडळ, तसेच राज्य मराठी विकास संस्था, यांच्यातर्फे प्रकाशित ग्रंथ, आणि कोश मराठी लोकांसाठी युनिकोडमध्ये इंटेरनेटवर उपलब्ध व्हावे, अशी काहींची मागणी आहे. त्यानंतर जे साहित्य अधिकारमुक्त आहे, ते सर्व साहित्य मराठी विकिस्रोतसारख्या प्रणालीद्वारे मुक्त व्हावे. आणि मराठी साहित्यिकांनी आपली प्रकाशने, लेखने, काही काळानंतर युनिकोडचा वापर करून इंटरनेटवर उपलब्ध करून द्यावीत.

मराठी भाषेचा करियरमध्ये वाटा:
मराठी भाषेत जरी सर्व व्यवहार चालत नसले, तरी मराठी भाषा तिचे स्थान टिकवून आहे. मराठी भाषेचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये होतो, याबद्दल काही प्रमाणात अनभिज्ञता आढळते. जसे की, तुम्हाला जर मराठीसोबत दुसरी एखादी भाषा चांगल्या प्रकारे अवगत असेल, तर तुम्ही ट्रांसलेटर म्हणून काम करू शकता. भाषांतरण हा एक चांगले उत्पन्न मिळवून देणारा करियरचा पर्याय आहे. त्याच सोबत, मराठी कंटेंट रायटर म्हणूनही तुम्ही काम करू शकता. कंटेंट रायटर्सची गरज अनेक कंपन्या, संस्थांमध्ये भासते. त्यामुळे ह्याही व्यवसायास बरीच मागणी आहे.

तसेच, आजकाल डिजिटल मार्केटिंगकडेही अनेक लोक वळत आहेत. त्यातही तुम्ही मराठीमध्ये कंटेंटच्या सहाय्याने, जाहिरातीच्या सहाय्याने व्यवसायाचा, उत्पादनाचा प्रचार करू शकता. यामुळे, जे लोक इतर भाषा जसे की, इंग्लिश, हिंदीपासून वंचित आहेत, किंवा ह्या भाषा त्यांना फार सवयीच्या नाहीत, अशा लोकांपर्यंत पोहोचण्यास त्यांची बोलीभाषा जास्त प्रभावी ठरते. मराठी ब्लॉगसुद्धा जोरात चालतात. मुळात ही भाषा व्यक्त होण्यासाठी खूप प्रभावी असून तिच्यात शब्दभांडारही मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले आहे. त्यामुळे ब्लॉग रायटिंग हाही पर्याय यामध्ये येतो. मराठी ही महाराष्ट्रीयन लोकांची मातृभाषा असल्याने ती त्यांना इतर कोणत्याही भाषेपेक्षा जास्त जवळची वाटते. त्यामुळे त्या भाषेत जाहिरात करणे येथे जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास सहाय्यक ठरते. सर्वसामान्य मराठी माणूस आधी मराठी भाषेतील व्हिडिओ सर्च करतो. त्यामुळे मराठी भाषेचा व्यवसायाच्या क्षेत्रात मोलाचा वाटा आहे.

तसेच, लॉक-डाऊनपासून शिकवण्याची कामे जशी ऑनलाइन पद्धतीने होऊ लागली, तसे ऑनलाइन मराठी भाषा शिकणार्‍यांचीही संख्या वाढली. परदेशातील विद्यार्थीसुद्धा मराठी ट्यूटर्सची मदत घेऊ मराठी शिकत आहेत. त्यामुळे मराठी ट्यूटरिंग हाही एक पैसे मिळवून देणारा व्यवसाय बनला आहे.

मराठी भाषेत पुरातन काळी खूप ठिकाणी विविध पुरभिलेख लिहिले गेले आहेत. त्यांचा उपयोग महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी होतो. जुन्या मराठी स्क्रिप्ट्स ह्या इतिहास संशोधनात महत्वाची भूमिका बजावतात. ही माहिती संबंधित स्रोतांपासून मिळवण्यासाठी पुरातत्व शास्त्रज्ञांना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यावरील मजकूर आणि त्याचे अर्थ लावणे हे अत्यंत अवघड काम असते. त्यासाठी त्यांचे फोटोझ डिजिटल कॅमेराने घेतले जातात, आणि डाउनलोड केले जातात. त्यानंतर ते इमेज डेटाबेसमध्ये स्टोअर केले जातात. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यामागील हेतू हा असतो, की ते अनाकलनीय मजकूर सर्वसामान्यांना वाचण्यास योग्य असे बनवणे. हे काम पुरातत्व खात्यातील संशोधक, तसेच इपीग्राफिक्स आणि संबंधित विषयांचे संशोधक यांना खूप सहाय्यक ठरते.

मराठी भाषा ही इंटरनेटवरही स्वतःचे स्थान राखून आहे. मराठीमध्ये जवळजवळ सगळ्या विषयांवर माहिती नेटवर सापडते. हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा असूनही मराठी, तेलुगू आणि बंगाली भाषा ह्या इंटेरनेटवर जास्त वापरल्या जात असल्याचे एका संशोधनातून समोर आले होते. आज सगळ्यात जास्त इंग्लिश भाषेचे प्रभुत्व असले, तरी मराठी भाषाही गरजेनुसार बदलत राहते आहे. ही भाषा कायम प्रवाही राहिली आहे आणि इथून पुढेही तंत्रज्ञानाच्या युगानुसार ती वाहत राहणार, याबद्दल शंका नाही!

–तन्मय दीक्षित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -