घरफिचर्ससारांशरात्र वैर्‍याची आहे मराठी भाषिका जागरूक राहा...

रात्र वैर्‍याची आहे मराठी भाषिका जागरूक राहा…

Subscribe

इंग्रजीला ज्ञानभाषा संबोधणार्‍यांची संख्या मोठी आहे, तरीही कोणतीही एक भाषा ही ज्ञानभाषा असत नाही. अर्थात जगाशी जोडणारी ती खिडकी आहे हे मान्य केले तरी ती ज्ञानभाषा होण्यासाठी त्या लोकांनी केलेले प्रयत्न दुर्लक्षून चालत नाहीत. मूलत: जोवर कोणतीही भाषा लोकव्यवहाराची, लोकसंवादाची आणि शिक्षणाची भाषा असते तोपर्यंत कोणतीच भाषा मरत नाही. कालपर्यंत घराघरात मराठी आणि गावागावांत मराठी शाळा होत्या. त्यामुळे मराठी भाषेला भूतकाळात मारण्यात इंग्रजी अपयशी ठरली. आज मराठीचा उपयोग कमी होत आहे, पण भाषा लगेच मरेल असे घडणार नाही, मात्र तरीही रात्र वैर्‍याची आहे, म्हणूनच मराठी भाषिकांनी जागरूक राहायला हवे, हेच उद्या २७ फेब्रुवारीला साजर्‍या होणार्‍या मराठी राजभाषा दिनानिमित्त मनावर कोरून ठेवण्याची गरज आहे.

मराठी राजभाषा दिन साजरा होत आहे. इंग्रजांनी १५० वर्षे राज्य करूनही त्यांच्यामुळे मराठी भाषा मरू शकली नाही. जगाचा भाषा इतिहास जाणून घेतला की इंग्रजी भाषेने अनेक स्थानिक भाषा मारल्या असल्याचे समोर येते. आज देशातील एक दशांश लोक मराठी भाषा बोलतात. जगाच्या पाठीवर इंग्रजी राजसत्तेने वसाहती निर्माण केल्या. त्या निर्माण करता करता त्यांनी आपली सत्ता आणि आपलीच भाषा प्रस्थापित केली. भाषेच्या माध्यमातून सत्तेचा कारभार गतिमान केला. स्थानिक लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न झाला. आजही इंग्रजी ही ज्ञानाची भाषा आहे, असे बोलणार्‍यांची संख्या कमी नाही. कोणतीही एक भाषा ही ज्ञानभाषा असत नाही. अर्थात जगाशी जोडणारी ती खिडकी आहे ते मान्य केले तरी ती ज्ञानभाषा होण्यासाठी त्या लोकांनी केलेले प्रयत्न दुर्लक्षून चालत नाही. मूलत: जोवर कोणतीही भाषा लोकव्यवहाराची, लोकसंवादाची आणि शिक्षणाची भाषा असते तोपर्यंत कोणतीच भाषा मरत नाही. कालपर्यंत घराघरात मराठी आणि गावागावांत मराठी शाळा होत्या. त्यामुळे मराठी भाषेला भूतकाळात मारण्यात इंग्रजी अपयशी ठरली. आज मराठीचा उपयोग कमी होत आहे, पण भाषा लगेच मरेल असे घडणार नाही, मात्र तरीही रात्र वैर्‍याची आहे म्हणून सावध राहायला हवेच.

जगाच्या पाठीवर भाषांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक मोठ्या भाषांनी लहान लहान भाषा गिळंकृत केल्या आहेत. १० हजार वर्षांपूर्वी जगातील सर्वच मोठ्या भाषा लोप पावल्याचे अभ्यासक सांगतात. इंग्रजीने तर जगातील अनेक भाषा संपुष्टात आणल्याचा इतिहास आहे. अगदी आयरिश, स्कॉटीश या भाषा इंग्रजी भाषेचा भागच बनल्या आहेत. इंग्रजीप्रमाणे जगात फ्रेंच भाषेनेदेखील अनेक लहान भाषा संपविल्या आहेत. भारतात इंग्रज आले आणि त्यांच्याबरोबर इंग्रजी भाषा आली. इंग्रजी भाषा प्रशासकीय व्यवहाराची, शिक्षणाची बनविण्याचा प्रयत्न झाला. त्यात त्यांना काही प्रमाणात यश आले. त्यानंतर ज्ञानाचे द्वार म्हणून इंग्रजी भाषेचे समर्थन होऊ लागले. ती ज्ञानभाषा ठरविण्याच्या प्रयत्नात भारतीय भाषा आणि इंग्रजी भाषा समर्थक असे गटही पडले. भारतात इंग्रजीमुळे आपल्या स्थानिक भाषा काही संपल्या नाहीत याचे कारण त्या भाषा समाजमनाच्या भाषा होत्या.

- Advertisement -

मराठी भाषेचा विचार केला तर १८५७ मध्ये मोल्सवर्थ यांनी मराठी भाषेच्या शब्दसंपत्तीचा अभ्यास केला तेव्हा मराठीत ६० हजार शब्द होते. त्यानंतर १९३२ मध्ये महाराष्ट्र शब्दकोशाचे आठ खंड प्रकाशित करण्यात आले होते. या खंडात एकूण एक लाख ३० हजार सहाशे सत्तर शब्द असल्याचे नोंदविले गेले, मात्र काळाच्या ओघात आपले लोकव्यवहार, लोप पावत जाणार्‍या ग्रामीण संस्कृतीच्या सोबत अनेक शब्द गमावत गेलो आहोत. त्यामुळे जसा व्यवहार, व्यापार, संस्कृती नव्या युगात संपुष्टात येत जाते, त्याप्रमाणे भाषेतील शब्दसंपत्ती लोप पावत जाते, मात्र ज्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञान आणि संस्कृती स्थिरावते त्या प्रमाणात नवीन शब्दांची भर पडायला हवी असते. त्या प्रमाणात नवीन शब्द मराठी भाषेच्या शब्दकोशात आले नाहीत. अनेकदा मूळच्या इंग्रजी शब्दांचा उपयोग करीत आपली प्रक्रिया सुरू राहते.

अनेकदा आता लोकव्यवहारातही मराठी भाषेतील शब्दांना पर्याय दिलेले इंग्रजी शब्दांचे उपयोजन होत आहे. भाषा ही संवादाचे काम करते, मात्र संवाद होत राहिला तरी त्यामुळे मूळच्या भाषेतील शब्दसंपत्ती आटत जाते. जगातील अनेक भाषांचे स्वरूप मिश्र बनत चालले आहे. अगदी आपण बोलतानादेखील मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दांचा उपयोग करीत मराठी भाषा बोलत असतो. २०१३ मध्ये शब्दकोशातील शब्दसंख्या एक लाख बारा हजार शब्दांची नोंद आहे. म्हणजे ७५ वर्षांत शब्दांची संख्या वाढण्याऐवजी कमी झाली आहे. ते केवळ इंग्रजीचे प्रस्थ वाढले म्हणून नाही तर हळूहळू तंत्रज्ञानाच्या सोबतीने जुने झालेले व प्रवाहाच्या दृष्टीने कालबाह्य झालेले शब्द बोलीतून हद्दपार झाले आहेत इतकेच, मात्र नवतंत्रज्ञानाशी जोडून घेताना आपल्या भाषेतील शब्द वापरण्याकडे अधिक जागरूकता दाखविण्याची गरज आहे.

- Advertisement -

जग आता जवळ आले आहे. त्यातून विचारांची देवाणघेवाण होत आहे. नवनवीन संकल्पनांचा उदय होत आहे. शोध, तंत्रज्ञान,औद्योगिक क्रांती यामुळे जीवन गतिमान होत झाले आहे. त्याचा परिणाम भाषेवर होणे सहाजिक आहे. तोही आपण अनुभवत आहोत, मात्र सध्या त्या गोष्टी स्वीकारताना मूळ इंग्रजी भाषेतील शब्द स्वीकारतो आणि काम सुरू ठेवतो. त्याऐवजी पर्यायी मराठी शब्द देण्याची गरज आहे. जसे अलीकडे हेरिटेज वॉक सुरू झाले, पण त्याला मराठी पर्यायी शब्द देण्याऐवजी आपण इंग्रजी शब्द टाकून संवाद सुरू ठेवला. आपण भाषेची गरज म्हणून विचार करायला हवा. क्रिकेट भारतात आला तेव्हा त्यासाठी लागणारे मराठी शब्द नव्हते, मात्र नवाकाळचे तत्कालीन संपादक खाडिलकर यांनी वृत्त प्रकाशित करताना फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक असे शब्द वापरणे पसंत केले. त्यातून खेळ नवीन होता, पण त्यासाठीच्या शब्दांची मराठीत भर पडत गेली. आज नव्या युगात मराठी भाषेतून शब्द देण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. तसे प्रयत्न झाले तरच मराठी भाषा समृद्ध होत जाईल.

कोणतीही भाषा ठरवून मारली जाण्याची शक्यता फार कमी असते. कोणत्याही भाषेचे मारेकरी स्वभाषेचेच लोक असतात. इंग्रजी माध्यमांतील शाळांची संख्या वाढली. शाळांत मराठी भाषा बोलणारे शिक्षक आहेत. अनेक संकल्पना मातृभाषेत स्पष्ट करून देण्याचा प्रयत्न होतो. मराठी भाषेतील मुले शाळेच्या वेळेतील अध्ययन अध्यापन सोडले तर इतर वेळी मराठीचा उपयोग करीत असतात. त्यामुळे इंग्रजी भाषेचे आक्रमण होऊन मराठी भाषा मेली नाही, मात्र आज सबकुछ इंग्रजी असे झाले तर परिणाम जाणवेल. अजूनही मराठी मेली नाही याचे कारण ती आपल्या व्यवहाराची, लोकव्यवहाराची, संवादाची, लोकपरंपरेची आणि शिक्षणाची भाषा म्हणून कायम राहिली. जगाच्या पाठीवर जोपर्यंत मराठी भाषा बोलणारी माणसं आहेत तोपर्यंत मराठी मरणार नाही. आपल्याकडे आजही कीर्तन, तमाशा, गमती, लोकजागर, गाणी, लोकपंरपरा, नाट्य, सिनेमा, साहित्य हे आहे. त्यातून लोकभाषा उपयोगात आणली जात आहे.

मराठीचा आग्रह धरताना आपण इंग्रजीचा द्वेष करीत आहोत असे नाही. आज जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, उदारीकरणाने जगाच्या पाठीवर राष्ट्राराष्ट्राच्या सीमा गळून पडल्या आहेत. जग जवळ आले आहे. नवनवीन शोध लागत आहेत. जगाला संवादाची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी भाषेची अपरिहार्यता आहे ही बाब लक्षात घेता इंग्रजी ही संवादाची भाषा बनली आहे. त्यामुळे जगभरात जे काही चालले आहे ते जाणून घेण्यासाठी भाषा शिकणे आवश्यक आहे. भाषा शिकणे आवश्यक आहे म्हणून त्याच माध्यमातून शिकले पाहिजे असे मात्र नाही. इंग्रजी माध्यमात शिकूनही इंग्रजी उत्तम येते याची शाश्वती देता येईल काय? उलट मातृभाषेतून शिकलेले विद्यार्थी इतर भाषा अधिक चांगल्या शिकू शकतात. त्यामुळे इंग्रजी भाषा शिकण्याला विरोध असता कामा नये. उलट ज्या वेगाने दरवर्षी इंग्रजी भाषा आपल्या भाषिक विकासाकरिता एक हजार शब्द नवनवीन स्वीकारते. ते शब्दकोषात येतात. त्याप्रमाणे आपणदेखील आपली भाषा विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

इतर भाषा आपल्याला मारक ठरत नसतात. उलट त्या विविध भाषांतील शब्दांचा स्वीकार करीत आपण स्वभाषेचा संवाद सुरू ठेवायला हवा. आजवर आपल्या भाषिक प्रवासात याबाबत दक्षता घेतली गेल्याने मराठी भाषेत नवीन शब्द दाखल झाले आणि भाषा विकसित होत गेली. भाषा मरायची नसेल तर ती अधिक व्यवहाराची भाषा बनण्याची गरज आहे. आपण मराठीतून व्यापार, लोकव्यवहार केल्याने ती आजवर विकसित होत राहिली. तिला जगातील कोणतीच भाषा मारू शकली नाही, मात्र येणार्‍या काळात भाषा धेडगुजरी बनविण्याऐवजी ती अधिक संपन्न करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. भाषेचा उपयोग जसजसा कमी होत जातो तसतशी भाषेची गरज संपत जाते. भाषेची गरज संपली की भाषेचा प्रवास मृत्यूपंथाच्या दिशेने होतो. त्यामुळे माणसांची असलेली संवादाची भूक शमविण्याची शक्ती भाषेने कमवायला हवी. ती शक्ती यावी म्हणून मराठी भाषा उपासकांनी प्रयत्न करायला हवेत. म्हणजे भाषेच्या मृत्यूची चिंता वाटणार नाही.
संदीप वाकचौरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -