घरफिचर्ससारांशमला लागली कुनाची उचकी

मला लागली कुनाची उचकी

Subscribe

‘पिंजरा’ची कथा कल्पना अनंत माने यांची असते, तर संवाद शंकर पाटील यांचे असतात. व्ही शांतारामांच्या ‘पिंजरा’तली कुठलीही फ्रेम एक स्वतंत्र कलाकृती असते आणि प्रत्येक संवाद हा लेखाचा स्वतंत्र विषय आहे. पडदाभर पसरलेल्या जांभळ्या तांबड्या सूर्यास्ताने व्ही. शांतारामबापूंचा 1972 पासून हा आभाळाचा पिंजरा प्रेक्षकांसाठी उघडला जात आहे. त्यात अडकणार्‍या प्रेक्षकाची पुढचे दोन तास 55 मिनिटं या पिंजर्‍यातून सुटका होत नसते. चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानंतरही मानवी जाणिवांच्या या पिंजर्‍यातली माणसाची घुसमट, तडफड, परवड कायम आहे.

मला लागली कुनाची उचकी

दाजीबा हे वागनं बरं नव्हं

- Advertisement -

आली नार ठुमकत मुरडत

कशी नशिबानं थट्ट आज मांडली

- Advertisement -

मला इश्काची इंगळी डसली

मला बघून गालांत हंसला

देरे कान्हा चोळी अन् लुगडी

नका तोडू पावनं जरा थांबा

तुम्हावर केली मी मर्जी बहाल

सूर्यास्ताच्या कमालीच्या कातरवेळी निळू फुलेंकडून, ग….साजने……ग…अशी विष्णू वाघमारेंच्या पहाडी आवाजातली रानोमाळी पक्ष्यांच्या थव्यांसोबत दूर क्षितीजापर्यंत गेलेली तानहाक कानी पडते आणि चंद्रकला चंद्रमौळीकरीनच्या तमाशा फडातील बैलगाड्यांची रांग बैलांच्या गळ्यातील घुंगरांच्या खळखळ तालात पडद्यावर डावीकडून उजवीकडे सरकत जाते. पिंजरा रिलिज झालेल्या काळात विष्णू वाघमारेंना लोककलावंतांच्या दुनियेत वाघ्या अशी ओळख मिळाली. त्यामुळे आकाशवाणीतल्या पिंजराच्या एलपी रेकॉर्ड प्लेटवरही या गाण्याच्या नोंदीपुढे गायक वाघ्या असाच उल्लेख या गाण्याच्या कलाकाराचा असतो. व्ही. शांताराम यांनी ही अजरामर कलाकृती पिंजरा बनवलेली नाही, ती बनली, मराठीतील सिनेदुनियेचा इतिहास लिहायचा असेल तर तो पिंजरा आणि इतर चित्रपट कलाकृती असाच लिहावा लागेल.

लेखक हेनरीच मन यांची 1905 मध्ये प्रोफेसर वुनरंट ही कादंबरी जर्मन भाषेत प्रसिद्ध केली. त्यावर आधारीत दिग्दर्शक जोसेफ वोन्स्टबर्ग यांनी 1930 मध्ये ‘द ब्लू एन्जल’ चित्रपट जर्मन भाषेत बनवला. यात सर्कशीत काम करणार्‍या महिलेच्या मोह जाळ्यात फसून नायक आपल्या जगण्याची कशी राखरांगोळी करतो. त्याच्या जगण्याची ही राख दारु आणि अंमली पदार्थांच्या धुरात उडून जाते, हे द ब्लू एन्जलचे कथानक होते. व्ही शांताराम यांनी हेच सूत्र घेऊन मराठीत 1972 मध्ये पिंजरा बनवायला घेतला. व्ही शांताराम यांच्या पिंजरात सूडाग्नी, इर्ष्या, द्वेष, राग, मोह, आसक्ती, प्रेम, जिव्हाळा, पश्चाताप, माणसांच्या समवेदनेचा दिलासा, क्षणभंगुरता असे जगण्याचे अनेक पैलू स्पष्ट होतात. शेक्सपियरच्या कॅरेक्टर लॉसवर वोन्स्टबर्ग यांचा द ब्लू एन्जल आधारलेला असावा, या जर्मन सिनेमासारखे कथासूत्र घेऊन त्याचा पिंजरा बनवताना शांतारामबापूंनी त्याला अस्सल मराठी मातीचा रंग, गंध, अर्थ, रांगडेपणा दिला.

पिंजराच्या पडद्यावर कथानकासोबत समांतर जाणार्‍या तीन शोकांतिका उलगडतात, पहिली श्रीधर मास्तरांची असते त्याला क्षणीक वासनेच्या मोहपाशाचे कारण होते, दुसरी चंद्रकलेची शोकांतिका जिला सुडाग्नी कारण असतो, तर चित्रपटात आणखी एक शोकांतिका पुसटशी येते, ही शोकांतिका उलगडत नाही, ती निळू फुले या उपेक्षित तमासगीराची असते, मास्तरची खिल्ली उडवणारा हा तमासगीर बाईच्या नादाला लागून आपल्या सुखी संसारी जगण्याची माती करतो, मात्र हा नादानपणा करणारा इथं आता एकटा मीच नाही, माझ्यासारखी आपल्या जगण्याची परवड करणारा हा मास्तरड्याही आहे…असा समवेदनेचा दिलासा या निळू फुलेंचा सोंगाड्या स्वतःला देत असतो. अधःपतीत ठरलेल्या मास्तराच्या मूर्खपणावर कायम हसणार्‍या सोंगाड्याला मास्तराकडून मुस्काटात पडते, त्यावेळी केवळ, मास्तर…तुम्ही मला मारलंत, मन मेलं आता मास्तर… म्हणत ही दोन ओळीत सोंगाड्याची ही भीषण पश्चातापाची शोकांतिका संपवली जाते.

सरपंचाचा मुलगा बाजीराव आणि चंद्रकला यांच्यात मनातल्या सुडाग्नीची कथाही पिंजर्‍याच्या पडद्यावर येते. गावकुसाबाहेरच्या पालावर थांबलेल्या तमासगिरांना हुसकवून लावल्यावर सुडाग्नीने पेटलेली कलावंतीण चंद्रकला, या मास्तरड्याला तुनतुनं घेऊन बोर्डावर उभं करण्याची आन घेते, ही आन पूर्ण करण्यात तीसुद्धा सुडाग्नीच्या पिंजर्‍यात अखेपर्यंत होरपळून निघते. या चंद्रीच्या मनात आदर्शाचा पाढा वाचणार्‍या पांढरपेशा समाजातील संस्कारी दांभिकतेबाबत राग असावा. या दांभिकतेचा बुरखा, छबीदार छबी, गाण्याच्या सुरुवातीच्या वगातून स्पष्ट होतो. हा गाव लई न्यारा…या गाण्यातून, घरात पोळी अन भायेर नळी.. अशा जगदीश खेबूडकरांच्या शब्दांतून चंद्रकला फाडून काढते. या अर्थाने हा चित्रपट कायम शोषणाचे धनी ठरलेल्या गरीब लोककलावंत आणि शोषण करणार्‍या शिक्षित, संस्काराचा मत्ता मिरवणार्‍या आमिर उमरावांच्या विरोधातील संघर्षाचाही आहे. त्यामुळे पिंजरा अनेकविध अर्थाने वैशिष्ठ्यपूर्ण ठरतो. मराठीतील पहिला रंगित चित्रपट, सुरस लावण्या, अत्याधुनिक कॅमेराचा वापर, स्वतः चित्रपटाच्या नायिका संध्या यांनीच कोरिओग्राफ केलेली गाणी, अशी कित्येक वैशिष्ठ्ये पिंजराची होती.

चित्रपटाच्या फ्रेममधलं पहिलंच गाणं ग..साजणे….या गाण्यात राम कदम, जगदीश खेबूडकर आणि शांतारामबापूंना घाटावरच्या मातीचा रंगगंध असलेल्या लोककलावंताचा खडा आवाज हवा होता. विष्णू वाघमारेंचं हे गाणं चित्रपटात सर्वात शेवटी घेण्यात आलं. शूटिंग सुरू असताना सेटवर राम कदम हार्मोनियमवर रियाज करत होते. त्यावेळी त्यांनी या गाण्याची तान वाजवली. शांतारामबापूंनी ती ऐकली आणि या तानेवर शब्द बसवण्याचा हुकूम जगदीश खेबूडकरांना गेला आणि ग…साजने…प्रत्यक्षात उतरलं. पिंजरातलं हे एकमेव गाणं असं होतं ज्यासाठी खेबूडकरांनी जे पहिल्यांदा लिहिलं तेच रेकॉर्ड झालं. या गाण्यात घाटावरच्या मराठवाड्यातला अस्सल शिवीसारखा बेदरकारपणा हवा होता, खुळखुळ घुंगराच्या…यातल्या च्या वरचा बेदरकार हेल मराठवाड्यातल्या गावरान अस्सल लोक शिवीचा आहे. आजही उपेक्षित असणार्‍या लोककलावंत गायक विष्णू वाघमारे ( वाघ्या) नं या गाण्याला अस्सल न्याय दिला.

तुम्हावर केली मी मर्जी बहाल, ही बैठकीची लावणी होती, त्यासाठी खेबूडकरांनी तब्बल 49 लावण्या लिहून शांतारामबापूंपुढे दिल्या होत्या. मात्र त्यातली एकही बापूंच्या पसंतीस उतरली नाही, अखेर निराश होऊन खेबूडकर घरी निघून गेले, त्यांना झोप येईना, काय लिहावं….या विचारांनी अंथरुणावर पडलेले असतानाच त्यांना पहाटे तीन वाजता, तुम्हावर केली मी मर्जी बहाल…हा मुखडा सुचला, लगोलग त्यांनी बापूंना फोन केला आणि ऐकवलं, आहा..लावणी अशीच हवी, पुढं लिहा, असा निरोप आल्यावर सकाळपर्यंत खेबूडकरांनी ही लावणी कागदावर उतरवली. छबीदार छबी…आणि मला लागली कुणाची उचकी…या लावण्यांसाठीही खेबूडकरांनी जवळपास 30 ते 35 रचना शांतारामबापूंना लिहून दिल्या होत्या. त्यातून छबीदारची निवड झाली.

मराठीतला पहिला रंगित चित्रपट पिंजराच होता. चित्रपटाच्या मुख्य नायकासाठी अभिनेत्री वत्सला देशमुख यांनी डॉ. लागूंचे नाव सुचवलं. डॉक्टरांचं नटसम्राट त्यावेळी मराठी रंगभूमीवर गाजत होतं, देशमुख यांनी नटसम्राट पाहिलं होतं. डॉ. घाणेकर आणि डॉ. लागू या दोन डॉक्टर्सभोवतीच मराठी रंगभूमी फिरत असताना ‘पिंजरा’साठी लागूंची निवड झाली. रंगभूमीवर रमणार्‍या डॉक्टरांसाठी कॅमेर्‍यासमोरचा अभिनयाचा हा पहिलाच प्रयत्न होता. शांतारामबापूंचा असिस्टंट कथानक ऐकवण्यासाठी डॉक्टरांना भेटला. त्यावेळी पिंजराचा विषय तद्दन तमाशापट असल्याचा गैरसमज डॉक्टरांचा असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला नकार दिला. मात्र हा पिंजरा मानवी आसक्तीचा असल्याचं कथानकातून उलगडल्यामुळे त्यांनी होकार देऊन स्क्रीप्ट वाचण्यासाठी मागवून घेतली.

परंतु त्याला शांतारामबापूंकडून नकार मिळाला, शांतारामबापूंनी त्यांच्या चित्रपटांची अगदी हिंदी सिनेमांचीही स्क्रीप्ट त्याआधी कधीही कुणालाही आगाऊ वाचायला दिलेली नव्हती, सेटवरच सीन समजवून शूटिंग पूर्ण करण्याचा त्यांचा शिरस्ता होता. डॉ. लागूंसाठी शांतारामबापूंना कळू न देता हा नियम मोडण्यात आला. डॉ. लागूंना बापूंच्या असिस्टंटकडून स्क्रीप्ट समजून घ्यायला मिळाली, त्यांनी ती वाचली आणि चित्रपटातील मास्तर साकारण्यासाठी होकार दिला. पण अडचण होती. नटसम्राट आणि लागूंची इतर नाटकं महाराष्ट्रभर गाजत होती. दौर्‍यांवर दौरे होत असताना महिन्यातून केवळ दहाच दिवसांच्या तारखा पिंजरासाठी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. त्या वेगवेगळ्या महिन्यांच्या दहा तारखांमध्येच पिंजरा व्ही. शांताराम यांनी पूर्ण केला.

राम कदमांनी नऊ गाण्यांसाठी जवळपास 100 चाली बनवल्या. मला लागली कुणाची उचकी गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान नृत्यांगना माया जाधव रक्तदाब वाढल्याने भोवळ येऊन पडल्या आणि चित्रिकरण थांबवलं गेलं. सेटवरचा खर्च उपयोगात आणण्यासाठी कलाकार रिप्लेस करून शूटिंग सुरू ठेवण्याचा सल्ला शांताराम बापूंना देण्यात आला. मात्र त्यांनी नकार देत माया आल्याशिवाय शूटिंग होणार नसल्याचं सांगून पॅकअप केलं. पुढे माया जाधव बर्‍या झाल्यावर दोन दिवसांनी हे गाणं पूर्ण झालं. पिंजरासाठी जगदीश खेबूडकरांनी एकूण 110 गाणी लिहिली होती. तर जवळपास हरेक गाण्याच्या कोरिओग्राफर चित्रपटाच्या नायिका संध्याच असल्याने काम सोपं झालं होतं. असं म्हटलं जातं की, पिंजरा चित्रपटाची कथा अनंत माने यांचेकडे होती. त्यांनी जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक यांना घेऊन त्यावर चित्रिकरणाचं कामही 1950 च्या दशकात सुरू केलं होतं, पण काही कारणाने हा सिनेमा बनवला गेला नाही. पुढे शांतारामबापूंनी त्यांच्याकडून हक्क विकत घेतले आणि हा सिनेमा पूर्ण केला.

महाराष्ट्रातल्या सिनेमागृहात ऑईल पेंट केलेली हाऊस फुल्लची पक्की पाटी थेटराबाहेर रोवायला भाग पाडणार्‍या पिंजराने जवळपास 80 लाखांचा बिझनेस त्यावेळी केला होता. पुण्यात पिंजराचं पोस्टर तब्बल साडेतीन वर्षे थेटरातून उतरवलं नव्हतं. तर त्याचं जागतिक कलेक्शन एक कोटींच्या घरात त्यावेळी होतं. त्यामुळे हिंदी पडद्याने या सिनेमाची धास्ती घेतली. पिंजरा हिंदीतही बनवण्याचा विचार झाल्यावर…मास्तरांच्या भूमिकेसाठी राजेश खन्ना, दिलीपकुमार अशी तत्कालीन सुपरस्टार्सची नावं चर्चेत आली. मात्र मराठीतला पिंजरा हिंदी भाषेत केवळ डबिंग केला जाईल, अशी ठाम भूमिका व्ही. शांताराम यांनी घेतली आणि हा प्रयत्न थांबला. मानवी जाणिवा, भावभावनांना कुठलीही भाषा नसते, त्यामुळे त्यांचे भाषांतर करता येत नाही. पिंजरा सोन्याचा असो वा लोखंडाचा त्यात अडकलेल्या पाखराच्या शोकांतिकेला त्यामुळे फरक पडत नसतो, म्हणूनच ‘पिंजरा’च्या शोकांतिकेचा विषय वासनेला बळी पडलेल्या हरेक माणसाची शोकांतिका असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -