घरफिचर्ससारांशनव्वदोत्तर पिढीचे नाटक

नव्वदोत्तर पिढीचे नाटक

Subscribe

जेव्हा आपण नव्वदनंतरच्या नाटकाचा विचार करतो तेव्हा हा काळ आणि या काळातील लिहिते नाटककार खरंच त्यांच्या काळाचे प्रश्न मांडण्यात यशस्वी झाले आहेत का? तर याचे उत्तर सकारात्मक द्यावे लागते. ह्या काळातील नाटक आपल्या काळाशी रिअ‍ॅक्ट होण्यात यशस्वी झाले आहे. सतीश आळेकर, चं. प्र. देशपांडे, शाम मनोहर, जयंत पवार, प्रेमानंद गज्वी, मकरंद साठे, विद्यासागर अध्यापक, दीपक करंजीकर, संतोष पवार, केदार जाधव, मनस्विनी लता, दत्ता पाटील, हिमांशु स्मार्त ही महत्त्वाचे नाटककार आहेत. ज्यांनी प्रयोगशीलतेबरोबरच काळ अवकाशाच्या अनेक शक्यता आपल्या नाट्यकृतीतून आजमावल्या. ह्या काळाचे नाटक नेमके कसे होते हे सांगताना प्रयोगशील नाट्य कलावंत अतुल पेठे लिहितात, आमच्या पिढीने, म्हणजे एका अर्थाने नव्वदोत्तरी पिढीने, एका वेगळ्याच बदलाचा कालखंड अनुभवला आहे.

1991 साली मराठीत जागतिकीकरणाची संकल्पना अस्तित्त्वात आली. औद्योगिकीकरण, उदारीकरण, शहरीकरण ह्या प्रक्रियांना झालेला प्रारंभ यातून नव मध्यमवर्ग आणि नव चंगळवादी समाजाचा झालेला उदय, नव्याने उदयाला आलेला सेवा उद्योग आणि ह्या सेवा उद्योगावर केंद्रित केलेले लक्ष याने कृषीव्यवस्था पुरती उद्धस्त झाली. गावगाड्याचे अस्तित्व संपुष्टात यायला लागले. खेडी शहर व निमशहर या उंबरठ्यावर उभी आहेत. भूमाफियांनी केवळ जमीनच नाही नातीव्यवस्था पोखरत नेली आहे. ह्या नव्याकाळाने संवादाची गरज कमी केली. संवादासाठी नवी व्यवस्था उभी करण्याबरोबरच तिचे खासगीपण आबधित ठेवले. आर्कुट, फेसबुक आणि पुढे इतर समाजमाध्यमांनी जी ह्या काळाला स्पेस उपलब्ध करून दिली याने वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याकडे, स्वत:ची स्पेस शोधण्याकडे कल वाढत गेला. कमालीची विखंडीत अवस्था आणि टोकाचा व्यक्तिवाद ही नव्वद नंतरच्या एकूण समाजव्यवस्थेची मनोवस्था बनली आहे. ही विखंडी अवस्था आणि टोकाचा व्यक्तिवाद नजरेत ह्या काळाच्या नाटकाचा विचार करावा लागतो. नव्वदनंतरचा काळ हा केवळ नाट्यलेखनासाठी नव्हे तर थिएटर करणार्‍या प्रत्येकासाठी अनेक पातळीवर आव्हानात्मक होता. या सर्वांच्या परिणामातून नव्वदोत्तर पिढीचे नाटक उभारीस आले आहे.

जेव्हा आपण नव्वदनंतरच्या नाटकाचा विचार करतो तेव्हा हा काळ आणि या काळातील लिहिते नाटककार खरंच त्यांच्या काळाचे प्रश्न मांडण्यात यशस्वी झाले आहेत का? तर याचे उत्तर सकारात्मक द्यावे लागते. ह्या काळातील नाटक आपल्या काळाशी रिअ‍ॅक्ट होण्यात यशस्वी झाले आहे. सतीश आळेकर, चं. प्र. देशपांडे, शाम मनोहर, जयंत पवार, प्रेमानंद गज्वी, मकरंद साठे, विद्यासागर अध्यापक, दीपक करंजीकर, संतोष पवार, केदार जाधव, मनस्विनी लता, दत्ता पाटील, हिमांशु स्मार्त ही महत्त्वाचे नाटककार आहेत. ज्यांनी प्रयोगशीलतेबरोबरच काळ अवकाशाच्या अनेक शक्यता आपल्या नाट्यकृतीतून आजमावल्या. ह्या काळाचे नाटक नेमके कसे होते हे सांगताना प्रयोगशील नाट्य कलावंत अतुल पेठे लिहितात, आमच्या पिढीने, म्हणजे एका अर्थाने नव्वदोत्तरी पिढीने, एका वेगळ्याच बदलाचा कालखंड अनुभवला आहे.

- Advertisement -

आम्ही कानेटकर, तेंडुलकर, आळेकर, एलकुंचवार बघत वाढलो आणि नव्वदीनंतर जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, संगणक, इंटरनेट, चॅनल्स, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, मोबाईल फोन आणि बाजारीकरण अशा अनेक कारणांमुळे तुकडे पडलेल्या काळात नाटककर्ते (करते) झालो ! झपाट्याने बदलत चाललेल्या समाजात नाटक नावाची गोष्ट करत राहण्याचे आमच्यापुढे कमालीचे आव्हान होते. हे बदलत जाणारे जग आधीच्या सार्‍या बदलांपेक्षा अगदी निराळे, गुंतागुंतीचे आणि अनाकलनीय होते. अशा वातावरणात मराठी नाटक करणारा आणि पाहणारा समाज हा नुसता बदललेला नाही, तर तो आतआतून तुटलेलाही आहे, हे अनुभवयाला येत होते. ही रंगकर्मी अतुल पेठे यांची नव्वदोत्तर रंगभूमीविषयीची प्रतिक्रिया विचारात घेवूनच मी माझे विवेचन केले आहे.

1990 पूर्वी नाटकासाठी एक मनोभूमिका तयार झालेली होती. याचा फायदा नाट्यकर्मीना झालाच, पण त्यांनी तयार झालेल्या वातावरणात नाटकाचा अवकाश विस्तारत नेल्याचे दिसते. 1990 नंतर केवळ नाटक नव्हे तर संपूर्ण साहित्यव्यवहार बदलतो आहे. नाटक लिहिणे आणि बसवणे ही मोठी प्रक्रिया आहे. इतका वेळ आणि त्यासाठी आवश्यक असणारा संयमाचा अभाव हा ह्या काळाचा महिमा आहे. नव्वदोत्तर रंगभूमी ही अनेकार्थाने बदलेली रंगभूमी होती. केवळ नाटकाचे अंक कमी झाले नाही तर सलग नाट्यानुभव देणारे दीर्घांक आकाराला आले. या काळातील प्रेक्षकाच्या हातात दूरदर्शन, मोबाईल यासारख्या घरबसल्या सहजगत्या मनोरंजनाची साधने उपलब्ध झाली. त्यामुळे दोन घटका मनोरंजन म्हणून नाटकाकडे वळणार्‍यांची संख्या कमी झाली. आज तर अशी स्थिती आहे की, चांगल्या अभिरुचीचा प्रेक्षक क्वचितच आढळतो आहे. 1980 पूर्वी ज्याप्रकारचा प्रेक्षक अस्तित्वात होता तो आता नाही.

- Advertisement -

मोबाईलमध्ये होत गेलेल्या क्रांतीने चित्रपट आणि नाटक पाहण्यासाठी थिएटरकडे वळणारा प्रेक्षक हा नगण्य उरला आहे. अनेकांना चित्रपट आणि नाटक ही नुसती डोक्याला कटकट वाटू लागली आहे. म्हणजे थोडक्यात नव्वदोत्तर रंगभूमीच्या एकूण विचारात प्रेक्षकाला कमालीचे महत्त्व आले आहे. मनोरंजन साधनांची सहजगत्या उपलब्धी आणि त्यांची स्वताई यामुळे नाटक पहाणं आणि करणं ही बाब सामन्याच्या हातातून सुटून जाऊन ती शहरी आणि निमशहरी लोकांचा कलाप्रकार झाला आहे. आज राज्य नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने नाटक करणारा एक वर्ग महाराष्ट्राच्या खेडोपाडी अस्तित्वात आहे ही जमेची बाजू. पण यातीलही काही मंडळीची नाटक म्हणजे आचरट विनोदी लेखन ही धारणा झालेली आहे. याबरोबरच कोणता तरी फुटकळ सामाजिक प्रश्न घेऊन गळे काढत बसणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. केवळ हौस म्हणून राज्य नाट्यस्पर्धेपुरतं नाटक करायचं आणि मोकळ व्हायचं याने नाटक ह्या कलाप्रकाराच्या वाढीला हातभार लागण्याऐवजी अशा मंडळीकडून हानी अधिक होऊ लागली आहे.

नाटक हा एक वाङ्मयप्रकार आणि प्रयोगरूप कलाप्रकार म्हणून सातत्याने बदलताना, आशयाच्या आणि सादरीकरणाच्या नव्या शक्यताना आजमावत काळाला अधिकाधिक सुसंगत होण्याचा प्रयत्न करतो आहे. या कालखंडात काय डेंजर वारा सुटलाय, मित्र, गांधी विरुद्ध गांधी, सत्यशोधक, चाहूल, देहभाग, युटर्न, डॉक्टर तुम्हीसुद्धा, ते पुढे गेले, ढोल ताशे, चारचौघी, सिगारेट्स, चौक अशी काही महत्वाची नाटके रंगभूमीवर येऊन गेली. ज्यांनी नाटकाच्या आशय आणि विषयाला पडलेल्या मर्यादांवर मात तर केलीच, पण काळ आणि अवकाशाच्या अनेक शक्यता आजमावून पाहिल्या. याबाबत महानिर्वाण, महापूर, चौक नाटके विशेष महत्त्वाची वाटतात. एकूणच नव्वदोत्तर नाटकात चरित्रात्मक, निखळ मनोरंजनात्मक, व्यावसायिक, गंभीर सामाजिक प्रश्नांची मांडणी करणारी, प्रयोगशील आणि पुन:र्जीवित नाटके काही प्रवृत्ती अधोरेखित करता येतात. इतक्या वर्षानंतरही ह्याही काळात एकूण नाटक ह्या कलाप्रकारावरील व्यावसायिक रंगभूमीची पकड ढिल्ली झालेली नाही हे मान्यच करावे लागते.

दोन घटका करमणूक हे सूत्र नजरेसमोर ठेवून प्रेक्षकधार्जिणे विषय मांडण्यात ह्या प्रवाहाने जास्त स्वारस्य दाखविले. आणि ते दाखविणे स्वाभाविक होतेही. खेडोपाडी टेलीव्हिजनने आणि चित्रपटाने काबीज केलेल्या प्रेक्षकाला आपल्याकडे खेचण्यातून आणि व्यावसायिक गणिते साध्य करण्यातून मराठी रंगभूमीवर काही प्रयोग केले गेले आहेत. ज्यांना खरं तर व्यावसायिक प्रयोग म्हणून पुढे काय घडले किंवा मागे काय घडले असेल ही प्रेक्षकाची उत्सुकता स्वाभाविक आहे. हीच उत्सुकता कॅश करण्यातून एका नाटकाच्या नावाचे दुसरे भाग आले. पुन्हा सही रे सही, ऑल दि बेस्ट – 2, एका लग्नाची पुढची गोष्ट ही त्याची काही प्रतिनिधीक नावे. एक भाग यशस्वी झाल्यावर त्याचा पुढील भाग बनविणे ही हिंदी चित्रपटातील रोहित शेट्टीप्रवृत्ती मराठी नाटकाशी निगडित असण्यार्‍या सर्वच घटकांनी स्वीकारलेली दिसते. याने नाटकाचा कितपत फायदा झाला. हा येणारा काळ ठरवेल. पण खपतंय ते विकणं ही वृत्ती चित्रपटाला चालू शकेल, पण नाटकाची मात्र यामुळे हानीच अधिक होईल. अधिक काळ प्रेक्षकधार्जिणे होऊन त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळत बसल्याने आपण त्यांना वास्तवापासून दूर तर नेत नाही ना याचाही विचार होणे गरजेचे वाटते.

त्या त्या काळाचे म्हणून काही प्रश्न असतात आणि हे प्रश्न अनेकांच्या जिव्हाळ्याचे असतात. एकूण समाज रचनेत असणारे प्रश्न आणि ह्या प्रश्नांशी निगडित असणारा वर्ग यातूनही काही प्रश्न घेवून मराठीत काही नाटके आली आणि ती कमालीची लोकप्रिय झाली. नटसम्राट, संध्याछाया, तरुण तुर्क म्हातारे अर्क अशी नोंदविण्यासारखी अनेक नाटके आहेत. या नाटकाचे विषय हे समाजातील विशिष्ट गटाशी संबधित होते जे त्या त्या काळातील महत्त्वाचे घटक होते. अलीकडील के दिल अभी भरा नही (शेखर ढवळीकर), साखर खाल्लेला माणूस (विद्यासागर अध्यापक ), सिगारेट्स (मनस्विनी लता), परफेक्ट मिसमॅच (हिमांशु स्मार्त) ही नाटके म्हणजे आपल्या काळाशी रिअ‍ॅक्ट होण्याचा प्रयत्न वाटतो.

लोकोत्तर व्यक्तीच्या विचार आणि कार्याच्या प्रचारासाठी, त्यातील वेगळेपणाची दखल घेण्यातून गांधी-आंबेडकर, टिळक आणि आगरकर, गांधी विरुद्ध गांधी अशी नाटके येऊन गेलीत. अलिकडील समाजस्वास्थ, सत्यशोधक, हवे पंख नवे ही चरित्रात्मक प्रभावळीत मोडणारी तीन नाटके आहेत. ज्यांनी अनुक्रमे र. धो. कर्वे, म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याची मांडणी केली. ह्या नाटकांचे स्वरूप चरित्रात्मक असल्यामुळे रंगमंचीय अवकाशाच्या मर्यादा व नाटकांचे चरित्रात्मक स्वरूप ह्यामुळे मांडणीला जरी मर्यादा असल्या तरी अतुल पेठे यांनी समाजस्वास्थ आणि सत्यशोधकच्या निमित्ताने केलेले प्रयोग आणि मेहनत ही निश्चितच मोठी होती. व्यावसायिकतेने प्राबल्य असलेल्या काळात असे चौकटी बाहेरचे विषय मांडणीसाठी वेगळे धारिष्ट आवश्यक असते. जे अतुल पेठे आणि प्रेमानंद गज्वी यांनी वेळोवेळी दाखविले आहे. पण काही लोकोत्तर व्यक्तींचे कार्य नाट्यरूपाने जरी लोकांपर्यंत पोहचले असले तरी इतर लोकोत्तर व्यक्तींचे कार्य नाट्यात्म रुपात प्रेक्षकांच्यापर्यंत पोहचविण्याची संधी असतानाही त्याकडे सोयीने दुर्लक्ष केलेले दिसते.

मराठी रंगभूमीचे जसे ह्या विषयांकडे दुर्लक्ष झाले आहे तसे काही मूलभूत प्रश्नांना भिडण्याऐवजी अनेकदा अनेक गंभीर विषय घाईघाईने मांडून त्यातील गांभीर्य दुर्लक्षून ह्युमरला प्राधान्याने दिलेले दिसते. संतोष पवार, जनादेन लवंगारे हे त्यातील काही उदाहरणादाखल नाटककार. आला मोठा शहाणा, गेला उडत, खळ-खट्याक यासारखी नाटकेही वर्तमान परिस्थिती कॅश करण्याचा प्रयत्न असतात. प्रश्न संपला की अशी नाटकेही संपून जातात. उलट काहींनी तंत्राच्या मर्यादा असतानाही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे नाटक म्हणजे तात्कालिकतेच्या पलिकडे जाऊन समकालाला भीडू पाहणे, वैचारिक आंदोलन उत्पन्न करण्याचा एक सकस प्रयत्न होता. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपूर्वीही काही नाटककारांनी व्यावसायिकतेचे जोखड झुगारून देऊन नाटके केली आहेत. शफाअत खान, चं.प्र. देशपांडे, जयंत पवार ही त्यापैकी काही प्रातिनिधिक नावे.

मागे म्हटल्याप्रमाणे, नाटक ह्या कलाप्रकारावरील व्यावसायिक रंगभूमीची पकड ढिल्ली झालेली नाही शिवाय ती ढिल्ली होऊच नये ह्याकरिता नवनव्या अटकळी शोधल्या जातात. पुनरुज्जीवित नाटकही त्यापैकीच एक अटकळ. मराठी नाट्य इतिहासात जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन करण्याची दीर्घ परंपरा आढळते. रंगभूमी ज्या ज्या वेळेला संकटात आली आहे त्या त्या वेळेस असे प्रयोग आरंभिले गेलेत. त्या त्या काळातील नाटककारांना मिळालेली लोकप्रियता, जुन्या काळाविषयीचे स्वप्नरंजन, वर्तमानकालीन नाटकाबाबत प्रेक्षकांची असमाधानीवृत्ती या सर्वांचा फायदा उठविण्याच्या हेतूने, याबरोबरच त्या त्या काळातील सामाजिक घटीते यामुळे जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन केलं जातंय. सुनील बर्वे यांनी राबविलेला हर्बेरियमचा प्रयोग, चंद्रकांत कुलकर्णी यांनी महेश एलकुंचवार यांच्या वाडा चिरेबंदीचे पुनरुज्जीवन याबरोबरच ती फुलराणी, वर्‍हाड चाललंय लंडनला, हसवाफसवी, अलबत्या गलबत्या, शांतेचं कार्ट चालू आहे ही नाटके पुनरुज्जीवीत झाली. हे प्रयोग या नाटकापासून दूर गेलेल्या प्रेक्षकाला पुन्हा नाटकाकडे खेचून आणण्याच्या प्रयत्नाचे भाग होते.

या काळात काही नाटककारांनी चारचौघात चर्चिल्या न जाणार्‍या विषयावर नाट्यलेखन केले. हा नव्वदोत्तर रंगभूमीचा महत्वाचा पैलू मानवा लागेल. यापूर्वी यळकोट, बुद्धीबळ आणि झब्बू या नाटकातून लैंगिक विषयाची चर्चा झाली नाही, असे नाही मात्र एक चावट संध्याकाळ, अग्रेसिव्ह ही नाटके मध्ये विशिष्ट टूम कॅश करण्याचा प्रयत्न वाटतात. पेपरमध्ये उत्ताण जाहिराती छापण्यापर्यंत गेलेली मजल आणि पुन्हा हे सर्व व्यक्ती स्वातंत्र्य, अभिनव प्रयोग ह्या नावाखाली त्या प्रयोगाचे समर्थन करणे याने नाट्यवाढीस फलदायी वातावरण कितीपत निर्माण होईल हा येणारा काळच सांगेल.

– बळवंत मगदूम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -