घरफिचर्ससारांशविवाहसंस्थेचे वास्तव !

विवाहसंस्थेचे वास्तव !

Subscribe

एका संतुलित वैवाहिक रचनेसाठी दोन माणसांची समानता हा निकष ठेवला तर जवळ जवळ ९९ टक्के लग्न आजच मोडायची. कारण आपल्याकडे स्त्रीचं सौंदर्य आणि पुरुषाचं कर्तृत्व हे साजूक तुपात घोळून काढलेले शब्द पारंपरिक विवाहाचे सूत्रच आहे. समानतेची व्याख्या इथेच गंडली म्हणायची. आज स्त्रीयांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपलं कर्तृत्त्व सिद्ध केलंय खरं मात्र हीच बाब तिला लग्नात मान्य आहे का? म्हणजे लग्न ठरवताना जेव्हा एक मुलगी मुलाकडून त्याचं स्वतःच घर असावं, गाडी असावी, तो सेटल्ड असावा अशी अपेक्षा ठेवते तेव्हा तिच्याकडे तिला मुलाकडून अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी आहेत का? या बाबीचा विचार होतच नाही.

गुजरातच्या वडोदरा येथील क्षमा बिंदू नावाच्या २४ वर्षीय तरुणीने नुकताच सोलोगॅमी मॅरेज म्हणजेच स्वविवाह केला. या एकल विवाहावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला ट्रोलदेखील करण्यात आले. काही राजकीय नेत्यांनी तर यामुळे विवाह संस्था धोक्यात येईल अशी धाडसी विधानेदेखील केली. एकूणच हा विषय चांगलाच चघळला गेला आणि प्रत्येकाच्या बोलण्यात एका वाक्याचे साम्य होते ते म्हणजे विवाह हा दोन माणसांचा असतो एकट्याचा नव्हे. खरंतर हे वाक्यच मुळात प्रचंड हास्यास्पद आहे. कारण आपल्या देशात लग्न हे फक्तं दोन माणसात नाही तर दोन कुटुंबात लागते. या तरुणीने विवाहसंस्थेची साचेबद्ध चौकट मोडून नवा पायंडा पाडत प्रस्थापितांना धक्का दिल्याने, आपल्या एकूण विवाहसंस्थेवरदेखील अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. क्षमाच्या विवाहाला निषिद्ध ठरवून विवाहसंस्थेची री ओढणार्‍या तथाकथित परंपरावाद्यांना एक प्रश्न विचारावा वाटतो. यांच्या मते, विवाहाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, मग आंतरजातीय विवाहानंतर ती स्वर्गातली गाठ आहे म्हणतं मुलांना स्वीकारण्याऐवजी ऑनर किलिंग करत आयुष्ये का हिरावून घेतली जातात? म्हणजे स्वर्गातसुद्धा जातीनिहाय लग्नगाठी बांधून मिळतात की काय? विवाह संस्थेचे निकष ठरविताना सगळे आपल्या सोईने कसे वळवायचे यात स्वयंघोषित संस्कृतीरक्षक अत्यंत तरबेज आहेत.

पूर्वीच्या काळी विवाहाची पद्धत मोठी अजब होती. वडीलधारे लग्न ठरवायचे त्यामुळे वर-वधू थेट लग्नातच एकमेकांना पाहू शकत होते. हळूहळू काळ बदलला. कांदेपोह्याला थेट मुलं येऊ लागली. आता तर विविध विवाह नोंदणी कार्यालये आहेत, मेळावे आहेत. मुलगा-मुलगी थेट भेटू शकतात, काहीजण आपला जोडीदार निवडू शकतात. पूर्वीच्या तुलनेत आज जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य आले खरे मात्र त्यात धर्म, जात, गाव, गोत्र, घराणे या चौकटींचे निकष पाळावेत हा अलिखित नियम असतोच असतो. आपल्याकडे विवाह दोन आत्म्यांचे मिलन तेव्हाच ठरतो जेव्हा वरपक्षाकडील आत्मे वधू पक्षावर प्रसन्न झालेले असतात. आजही कांदेपोह्याच्या कार्यक्रमात मुलीला नटवून थटवून लिलावात विकावी अशा पद्धतीने सादर केले जाते. ही आपली विवाहसंस्था ज्यात ओले पाय करून चालून दाखव, नकटी आहे का? सपाट पाऊली तर नाही? पायाच्या अंगठ्याचे बोट त्याच्या शेजारील बोटापेक्षा मोठे तर नाही ना? अशा निरर्थक आणि निर्बुद्ध निकष लावून वधूपरीक्षणाच्या नावाखाली पोरीची शोभा केली जाते. याचप्रमाणे काही मुलांनाही विशेषतः शहरी मध्यमवर्गीय मुलांना शेती किती? गावी घर आहे का? मुलगी शेतात जाणार नसली, तरी जमीन पाहिजे म्हणत वराच्या कर्तृत्वाला संधीच न देणारे पालकसुद्धा आहेतच. थोडक्यात काय तर आपल्या विवाहसंस्थेत मुलगी अधिक प्रमाणात होरपळून निघत असेल, पण मुलांनाही झळ पोहचतेच.

- Advertisement -

करिना कपूर आणि अर्जुन कपूर यांचा ‘की अँड का’ या चित्रपटात विवाहात घराबाहेर काम करणारी जोडीदार घर सांभाळणार्‍या जोडीदारावर स्वामित्व गाजवते याचे सुंदर चित्रण केले आहे. हा चित्रपट याठिकाणी स्वामित्व गाजवताना तुमचं स्त्री अथवा पुरुष असणं महत्त्वाचं नसून हा संघर्ष कमावणारा आणि घर सांभाळणारा या दोघात असल्याचे निदर्शनास आणून देतो. एकटच राहायचं होत तर लग्न करायची काय गरज होती? या प्रश्नावर क्षमाने मला नवरी बनायची हौस होती हे दिलेलं उत्तर फार उथळ वाटत असलं तरी त्यामागे अनेक कंगोरे दडलेले आहेत. सुरुवातीला चाचपडून पाहिलेली नाती, त्यातून अपेक्षित प्रतिसाद न मिळणे आणि त्यानंतर आपल्यावर प्रेम करणं, आनंदी ठेवणं, आपल्याला हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य देणं, गुणदोषांसकट आपला स्वीकार करणं हे आपणच आपल्यासाठी करू शकतो या बाबीचं झालेलं सेल्फ रिअलाईझेशन झाल्यावर तिने स्वतःशी लग्नाचा निर्णय घेतला ही मोठी प्रक्रिया आहे. आपल्या भारतीय समजात लग्न या बाबीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने ती देखील याच्या प्रभावातून सुटू शकली नाही.

अरे त्याला ना मुलगीच मिळाली नाही, तिच्यातच काहीतरी खोटं असेल नाहीतर कधीच लग्न जुळलं असतं. अशी कुजबूज असते ऐच्छिकरित्या अविवाहित राहणार्‍या व्यक्तींबाबतही. शेवटी लादलेल्या विवाहाचे बळी ठरून समोरच्या माणसालाही आपल्यासोबत फरपटत नेण्याने काय हशील होणारं आहे त्यापेक्षा अलिप्त राहिलेलं काय वाईट? संतुलित समाजरचनेसाठी विवाहसंस्था टिकावी असे मत मांडणारा वर्ग संतुलित विवाहासाठी सकस नात्याचीही गरज असते यावर विचार करतो का? कसा करणार कारण क्षणाचे नवरा बायको आणि मरस्तोवर आई-बाप या भूमिका सहजगत्या निभावण्याचे बाळकडू आपली विवाहसंस्था देतेच. इथे तर पायाच कच्चा असल्याचे लक्षात येते. लग्नाळू मुलामुलींना तुम्ही लग्न का करत आहात याचे धड उत्तरही देता येणार नाही अशी वस्तुस्थिती आहे. घरचे म्हटले म्हणून, लोकं नाव ठेवतील म्हणून, माझ्या सर्व मित्रांची लग्न झालीत म्हणून लग्न करतोय अशी तथ्यहीन कारण देणारी माणसं असेपर्यंत तरी या साचेबद्ध विवाहसंस्थेला धक्का लागणार नाही यावर मी ठाम आहे.

- Advertisement -

एका संतुलित वैवाहिक रचनेसाठी दोन माणसांची समानता हा निकष ठेवला तर जवळ जवळ ९९ टक्के लग्न आजच मोडायची. कारण आपल्याकडे स्त्रीचं सौंदर्य आणि पुरुषाचं कर्तृत्व हे साजूक तुपात घोळून काढलेले शब्द पारंपरिक विवाहाचे सूत्रच आहे. समानतेची व्याख्या इथेच गंडली म्हणायची. आज स्त्रीयांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपलं कर्तृत्त्व सिद्ध केलंय खरं मात्र हीच बाब तिला लग्नात मान्य आहे का? म्हणजे लग्न ठरवताना जेव्हा एक मुलगी मुलाकडून त्याचं स्वतःच घर असावं, गाडी असावी, तो सेटल्ड असावा अशी अपेक्षा ठेवते तेव्हा तिच्याकडे तिला मुलाकडून अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी आहेत का? या बाबीचा विचार होतच नाही. मुलाला आपल्यापेक्षा वरचढ पगार हवा, त्याचं कुटुंब आपल्या कुटुंबापेक्षा अधिक प्रतिष्ठित, श्रीमंत हवं ही बाब तिच्या अंगी बालपणापासूनच रुजविलेली जाते. काही पोरी अपवाद असतीलही, मात्र त्या वगळता किती मुली अशा आहेत ज्या त्यांच्यापेक्षा कमी पगार असणार्‍या मुलाशी लग्न करायला तयार होतात. अर्थात त्यांनी व्हावं ही सक्ती नाहीच, पण इथे मुद्दा लग्न ही बाब आत्ममिलनाचा मार्ग नसून व्यवहार आहे हे यातून सिद्ध होतं. मात्र या व्यवहाराला समाजाची मान्यतादेखील यांनी घालून दिलेली बंधनं पाळली तरच मिळते. ताजं उदाहरणं, क्षमाचं लग्न, यांच्या चौकटीत बसत नाही. मात्र तिच्यामुळे सोलोगॅमीचा ट्रेंड येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात याला कारणीभूत सुद्धा आपली लाडकी विवाहसंस्थाच आहे.

ग्रामीण भागात तर अठरा वर्ष पूर्ण होताच कुणाच्या मुलीचं लग्न आधी अशी स्पर्धाच लागते पालकांमध्ये आणि या चढाओढीत जो जिंकला तो गावभर कॉलर ताठ करून हिंडतो. ग्रामीण भागात अजूनही विशीच्या वर मुलगी गेली तर हमखास आता काय म्हातारी झाल्यावर मुलीचं लग्न लावणार म्हणत डिवचलं जातं. यापुढे जाऊन पंचविशी पार झालीच तर मग अर्धी म्हातारी तर झालीचे पोरगी तरी आई बाप लग्न करत नाहीत, पोरीच लफड असेल नाहीतर तिच्या लग्नासाठी पैसे नसतील. असे कयास बांधून त्या मुलीसह तिच्या आईवडिलांची मानसिक शांतता हिरावण्याचे काम सुरू होतं. आयुष्यभर लग्न करून पस्तावले म्हणत नवर्‍याला दूषणं देणार्‍या आजूबाजूच्या काकू, आजी लग्न हेच कसं जीवनाचं अंतिम ध्येय आहे यावर आभाळ हेपलत नको असलेलं व्याख्यान देत असतात. हे झालं पोरींचं दुखणं पोरांची कळ तर याहून न्यारी आणि दयनीय आहे. काही कारणास्तव लग्न जुळत नसेल तर मुली विकत आणून पोराचं लग्न लावून दिलं जात. आयुष्याची गाडी रुळावर येतच असते तेवढ्यात ते विकत आणलेलं चाक घरंगळून जातं. शोधाशोध, पोलीस कंप्लेंट, वाद-विवाद होतात. काही चाकं परत येतात, काही नाहीच. इथेही पुन्हा जगहसाईची भीती म्हणून जाती लपवल्या जातात. लग्नासाठीच जन्म आपुला म्हणत हा एवढा सगळा प्रपंच केला जातो. निष्पत्ती मात्र काहीच नाही.

भारतीय विवाह संस्थेवर टीका करायचा हा उद्देश नाहीच, फक्त आक्षेप या साचेबद्धतेवर आहे. सतत आपल्या दोर्‍या दुसर्‍याच्या हातात देऊन ते सांगतील त्या दिशेने सुसाट धावत सुटण्यावर आहे. जन्म दिला म्हणून मुलांचे जोडीदार निवडण्याचा मालकी हक्क पालक म्हणून माझाच आहे हा भ्रम सोडायला हवा तसाच पाल्यांनीदेखील लोक, समाज, घरदार या चाकोर्‍या सोडून मला काय वाटतं याचा विवेक जागृत ठेवून प्रगल्भतेने विचार करत जोडीदार निवडायला हवा. आयुष्याच्या एका वळणावर हक्काची प्रेमळ साथ, आधाराचा हात प्रत्येकाला हवाच असतो. मात्र त्यासाठी एकदा मला लग्न का करायचंय याचं उत्तर तुमचं तुम्हाला देता आलं पाहिजे. कारण प्रश्न उभ्या आयुष्याचा आहे.

–प्रतिक्षा पाटील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -