द्रविड गुरुजी! सचिन, सुनीलला जमले नाही, ते राहुलने करून दाखवले!

सचिनच्या आधीचा भारताचा मोठा फलंदाज आणि नंतर समीक्षक म्हणून गावस्करने आपल्या नावाची अमिट छाप पाडली असली तरी त्याला प्रशिक्षक म्हणून एक काडी इकडची तिकडे करता आली नाही. उत्तम समीक्षा करणे ही एक चांगली बाजू असली तरी स्वतःला झोकून देऊन कोळशामधून हिरे शोधणे ही कधीही महान गोष्ट ठरते. म्हणूनच जे सचिनला कधी जमले नाही, सुनीलनेसुद्धा या वाटेवरून जायचे टाळले, अशा अनवट वाटेवरून जात द्रविडचा प्रवास एका मोठ्या प्रशिक्षकपदाच्या महामार्गावरून पुढे जात आहे. आणि मला वाटते क्रिकेटच्या इतिहासात या ‘द वॉल’चे नाव एक जाणता प्रशिक्षक म्हणून कायम राहील. गोपीचंद बँडमिंटनमध्ये जसे ऑलिम्पिक विजेते खेळाडू घडवत आहे, तेच काम आता द्रविड क्रिकेटमध्ये करतोय.

Master Dravid

डॉन ब्रॅडमननंतर जगातला सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरने आपल्या प्रतिभेने क्रिकेट जगतावर आपल्या देवदत्त प्रतिभेची अशी काही छाप टाकली की हा खेळाडू फक्त क्रिकेटसाठीच जन्माला आला होता, हे सर्व जगाला प्रकर्षाने दिसले. गंमत म्हणजे हे नव्याने आता सांगण्याचीसुद्धा गरज नाही. कारण तनमनाने तो फक्त फलंदाज होता. अर्जुनाला बाण मारताना फक्त लक्ष्य दिसायचे, तसाच सचिनला गोलंदाजांच्या हातून सुटलेला चेंडू दिसायचा. त्याच्या धावा, त्याचे विक्रम हाच या लक्ष्याचे संचित आहे. आज तो निवृत्त झाला तरी भारतीय जनमानसाच्या काळजात अजूनही स्थान मिळवून आहे. क्रिकेट हा भारताचा धर्म मानला जात असला तर सचिन हा कोट्यवधी भारतीयांचा देव आहे. या देवाच्या छायेत एक अस्सल क्रिकेटपटू झाकोळला गेला आणि त्याचे नाव राहुल शरद द्रविड. सचिन मराठी आणि राहुलसुद्धा मराठी. एक देव आणि दुसरा गंधर्व. पण, देव आपले अवतारकार्य संपवून मानवी शरीर धारण करत असताना गंधर्व मात्र आपल्या अभिजात गुणांनी आजसुद्धा प्रकाशमान ठरलाय…एक दिग्गज फलंदाजाच्या पलीकडे सचिनच्या क्रिकेट गुणांचा शोध घेतला तर तो कर्णधार म्हणून अजिबात यशस्वी ठरला तर नाहीच, पण निवृत्तीनंतर त्याच्यातला गुणी प्रशिक्षकसुद्धा समोर आला नाही. एक मोठा खेळाडू मोठा प्रशिक्षक होतोच असे नाही. त्यामुळे सचिनला तसा दोषसुद्धा देता येत नाही. सुनील गावस्करलासुद्धा ते कधी जमले नाही. सरकारने त्याला जागा देऊनही ती अनेक वर्षे पडून होती. शेवटी ती सरकारला काढून घ्यावी लागली. सचिनच्या आधीचा भारताचा मोठा फलंदाज आणि नंतर समीक्षक म्हणून गावस्करने आपल्या नावाची अमिट छाप पाडली असली तरी त्याला प्रशिक्षक म्हणून एक काडी इकडची तिकडे करता आली नाही. उत्तम समीक्षा करणे ही एक चांगली बाजू असली तरी स्वतःला झोकून देऊन कोळशामधून हिरे शोधणे ही कधीही महान गोष्ट ठरते. म्हणूनच जे सचिनला कधी जमले नाही, सुनीलनेसुद्धा या वाटेवरून जायचे टाळले, अशा अनवट वाटेवरून जात द्रविडचा प्रवास एका मोठ्या प्रशिक्षकपदाच्या महामार्गावरून पुढे जात आहे. आणि मला वाटते क्रिकेटच्या इतिहासात या ‘द वॉल’चे नाव एक जाणता प्रशिक्षक म्हणून कायम राहील. गोपीचंद बँडमिंटनमध्ये जसे ऑलिम्पिक विजेते खेळाडू घडवत आहे, तेच काम आता द्रविड क्रिकेटमध्ये करतोय.

सचिनच नव्हे तर सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग अशा आपल्या समकालीन दादा फलंदाजांच्या छायेत राहुल झाकोळला गेला होता… झाकोळला गेला म्हणजे काय तर या तिघांसारखी आक्रमकता त्याच्या फलंदाजीत नव्हती. गॅलरीला आक्रमक फलंदाज लागतात. चौकार, षटकारांची बरसात करणारे. ते व्यावसायिक सिनेमासारखे आहे. सलमान, शाहरुखचा सिनेमा लागला की दे दणादण पैसा वसूल करणारे. पण, नासिरउद्दीन आणि इरफानसुद्धा मोठ्या पडद्यावर येतात तेव्हा बावनकशी सोन्याने आपण प्रभावित होतो, तसाच राहुलचा प्रकार आहे. राहुल हा एका आज्ञाधारी मुलासारखा फलंदाज होता. आपल्याला दिलेला अभ्यास चोख करणारा. यामुळेच दिग्गज फलंदाज धारातीर्थी पडत असताना हा एखाद्या अभेद्य भिंतीसारखा उभा असायचा…आज तो सुनील, सचिन, सौरव आणि सेहवाग या सर्वांच्या पुढे आहे का, याची खोल मुळे त्या अतिशय शिस्तीच्या अशा फलंदाजाच्या मातीतून वर आलेल्या गुणवान प्रशिक्षकरुपी झाडात आहे. तो नवा भारत घडवण्यासाठी पुढे निघालाय… विराट कोहलीच्या भारतीय संघाची ताकद कशात आहे? असा प्रश्न विचारला जातो तेव्हा राखीव खेळाडूंची फळी या उत्तरात येते. ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यात विराटसह भारताचे प्रमुख खेळाडू जायबंदी होऊन संघाबाहेर गेले असताना आणि स्वतः विराट मायदेशी परतला असताना अजिंक्य रहाणेच्या युवा संघाने अशक्य अशी कामगिरी केली. विशेष म्हणजे पहिल्या कसोटीत 36 धावांत खेळ खल्लास झाल्यानंतर टीम इंडिया मानसिकरित्या खचली असताना अजिंक्यने युवा खेळाडूंना सोबत घेत कांगारूंवर बाजी मारली त्यामागचा एक दृष्य-अदृष्य हात होता द्रविडचा. भारतीय ‘अ’ संघ, 19 वर्षांखालील भारतीय संघ आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अशा खेळाडू घडवण्याच्या शाळेचे द्रविड गुरुजी आहेत. गुरुजींच्या या शाळेत ऋषभ पंत, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, कमलेश नागरकोट्टी, शिवम मावी असे खेळाडू घडले. या आणि आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत धडे गिरवत असलेल्या अनेक युवा खेळाडूंचे मूळ प्रशिक्षक वेगळे असले तरी या सर्वांना आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून मानसिक आणि शारीरिकदृष्ठ्या तयार करताना जो खोलात जाऊन विचार करणारा मार्गदर्शक लागतो ते द्रविड गुरुजी आहेत.

2012 मध्ये खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर द्रविड आयपीएलमध्ये राजस्थानकडून दोनवेळा खेळला. दिल्ली संघाचा तो मेंटॉरसुद्धा होता. पण त्यानंतर मात्र त्याने आपले पूर्ण लक्ष प्रशिक्षपदाकडे वळवले. 2015 मध्ये भारतीय ‘अ’ संघाने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांशी दोन हात करताना जेतेपद मिळवले त्यावेळी द्रविड मागे उभा होता. 2016 च्या 19 वर्षांखालील संघाचा तो कोच होता, पण पंत आणि टीमला जेतेपद काही मिळाले नाही. पंतचा संघ उपविजेता ठरला. 2018 ला जे पंतला जमले नाही ते द्रविड गुरुजीने पृथ्वी शॉच्या टीम इंडियाकडून करून घेतले. भारत जगज्जेता ठरला. 2019 पासून आता द्रविड पूर्ण वेळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची सूत्र सांभाळत आहे. विशेष म्हणजे भारतीय संघ जुलै महिन्यात होणार्‍या श्रीलंका दौर्‍यासाठी सज्ज होत असताना राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती देण्यात आली. याअगोदर 2014 साली इंग्लंड दौर्‍यावर द्रविड भारतीय संघाचा फलंदाज कोच म्हणून गेला होता. आता त्यानंतर जवळपास 7 वर्षांनी भारताच्या सिनिअर संघाबरोबर विदेशातल्या दौर्‍यावर द्रविड जाणार आहे. इंडियाची एक टीम विराट कोहलीच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौर्‍यावर असताना दुसर्‍या बाजूला युवा खेळाडूंची फलटण श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे आणि याच संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी द्रविडकडे देण्यात आली आहे. टीम इंडिया इंग्लंड दौर्‍यावर असेल, त्यामुळे बराचसा कोचिंग स्टाफ इंग्लंडमध्ये असणार आहे. अशावेळी श्रीलंकेत नवोदित खेळाडूंना द्रविडकडून मार्गदर्शन मिळेल ही भविष्याचा वेध घेणारी मोठी गोष्ट आहे. कारण द्रविडने यापूर्वी जवळपास सर्व ‘भारत अ’ साठी खेळलेल्या खेळाडूंबरोबर काम केले आहे. त्यामुळे द्रविडच्या मार्गदर्शनाचा युवा खेळाडूंना अतिरिक्त फायदा होईल, असे बीसीसीआयला वाटते आणि हे वाटणे म्हणजे भारताची बी टीम सज्ज असल्याची साक्ष पटते.

कांगारूंचा अ‍ॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग आणि मायकल क्लार्कचा संघ जगज्जेता संघ का ठरला? याचे कारण म्हणजे त्यांची ‘ए’ टीमबरोबर सज्ज असलेली ‘बी’ टीम. कधीही आणि कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची त्यांच्यात ताकद होती. प्रत्येक खेळाडूला पर्याय होते. हा नाही तर तो आणि तो नाही आणखी दुसरा… असे एकाला एक खेळाडू तयार असल्याने कधी त्यांना कसली उणीव जाणवली नाही. आज टीम इंडिया त्याच दिशेने पुढे जात आहे. विशेष म्हणजे या नव्या भारताचे ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूंनी कौतुक केले आहे. रवी शास्त्री कोहलीच्या संघाला उभा करत असताना त्याला मागून रसद पुरवण्याचे काम द्रविड करत आहे. द्रविड सांगतोही, ‘भारतीय ‘अ’ संघ तयार करताना देशातील उगवत्या प्रतिभावान खेळाडूंना अधिकाधिक संधी देणे हे काम आम्ही करतो. रोटेशन करतो. यामधून नव्या दमाच्या खेळाडूंची ताकद लक्षात येते. राष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावण्यासाठी पुढे येत असतात त्यांना देशात, परदेशात संधी देऊन तयार केले जाते. सर्व खेळाडूंचे बेसिक पक्के असते, गरज असते ती मानसिकरित्या खेळाडूंना तयार करण्याची. ते या अनुभवातून मिळते’. द्रविड एवढेच करून थांबत नाही तर कोहलीच्या टीममधील खेळाडू जेव्हा फॉर्म हरवून बसतात, बेसिक विसरतात, अनफिट होतात, मानसिकरित्या खचतात तेव्हा त्यांच्याकडून हे सारे धडे नव्याने गिरवून घेण्याचे काम तो करत असतो…

अर्जुन तयार होत असतात, फक्त ते तयार करण्याची दृष्टी असणारे द्रोणाचार्य पाहिजेत. तो मोठा अवकाश द्रविड गुरुजींच्या नजरेत दिसतो… म्हणून आज सुनील, सचिन, सौरव आणि सेहवाग या सर्वांच्या राहुल एक पाऊल पुढे आहे. शाब्बास द्रविड!