घरफिचर्ससारांशआठवणीतला शिरा

आठवणीतला शिरा

Subscribe

मला आवडतो तसा शिरा उडप्यांच्या हॉटेलमध्ये मिळतो. तो मऊ पण किंचित चिकट असतो. त्यात थोडी हळदही घातलेली असते. त्याचबरोबर त्यात काजू , बेदाणे..आदी सुका मेवाही भरपूर घातलेला असतो. पूर्वी आमच्या गावाकडे नदीकाठी फकीरांची वस्ती येत असे. ते लोक दुपारच्या जेवणासाठी जाड पोळ्या, बटाट्यांच्या मोठ्या फोडींची तर्रीदार भाजी आणि तूप निथळणारा जाडसर रव्याचा थुलथुलीत शिरा करत. शिरा करताना रवाही खरपूस भाजत आणि दमदार हाताने तूप घालून शिरा घोटत. त्यांच्या जेवणाच्या वेळी तिथे जरा घोटाळले की त्यांच्यापैकी कोणीतरी विचारेच, हलवा पावोगे? की आम्ही बसलोच लगेच समोर..की मग निम्मी पत्रावळ भरून जाईल एवढा तूपाळ खडा शिरा ते वाढत. तिथे चमचे वगैरे काही नसल्याने हाताची बोटेही तुपाने भरून जात.

आठवणीतला शिरा, असे म्हणायचे कारण म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून मी सुक्या खोबर्‍याचा किस पेरलेला बशीभर शिरा खाल्लेलाच नाही. हल्ली डाएटच्या नावाखाली नाश्त्यासाठी शिरा बनत नाही आणि साध्या रव्याच्या शिर्‍याला… सत्यनारायणाच्या पूजेशिवाय इतर सण आणि शुभकार्यांसाठी केल्या जाणार्‍या गोड पदार्थांमध्ये (डेझर्ट मध्ये) स्थान नाही. सत्यनारायणाचा शिरा म्हणजे… सव्वा पट मापाने घेतलेले सर्व जिन्नस. रवा, दूध, तूप, साखर आणि केळे. आणि त्यांचे ते अफलातून मिश्रण करून बनलेला.

लहानपणी कोणाच्याही घरी सत्यनारायणाला गेले की तिथे ठेवलेला पातेलेभर शिरा जादूने नाहीसा करुन आपल्या घरी घेऊन जावा, असे मला वाटत असे. (कारण आमच्या घरी सत्यनारायण करत नसत) मी तसे बिनदिक्कत बोलूनही दाखवत असल्यामुळे मला प्रसादाच्या शिर्‍याचे एकाऐवजी चार पाच द्रोण मिळत. अर्थातच प्रत्येक घरी तो शिरा तसाच जमत असे, मात्र मुळीच नाही. माझा शिरा…म्हणजे एकदम भारी, असे अभिमानाने सांगणार्‍या बर्‍याच गृहिणी नको एवढे तूप घालून आणि रवा जरा जास्त भाजून बोटातून झिरपेल असा मोकळा मोकळा शिरा करतात. पण मला शिरा आवडतो तो एकेक रवा फुललेला तरीही मऊसर आणि दुलदुलीत असा. अनेक सुगरणी शिर्‍यामध्ये केळ्यांप्रमाणे आंबा, सफरचंद, संत्री, अंजीर आणि सीताफळ गर यापैकी कोणतीही फळे घालतात.

- Advertisement -

मला आवडतो तसा शिरा उडप्यांच्या हॉटेलमध्ये मिळतो. तो मऊ पण किंचित चिकट असतो. त्यात थोडी हळदही घातलेली असते. त्याचबरोबर त्यात काजू , बेदाणे..आदी सुका मेवाही भरपूर घातलेला असतो. पूर्वी आमच्या गावाकडे नदीकाठी फकीरांची वस्ती येत असे. ते लोक दुपारच्या जेवणासाठी जाड पोळ्या, बटाट्यांच्या मोठ्या फोडींची तर्रीदार भाजी आणि तूप निथळणारा जाडसर रव्याचा थुलथुलीत शिरा करत. शिरा करताना रवाही खरपूस भाजत आणि दमदार हाताने तूप घालून शिरा घोटत. त्यांच्या जेवणाच्या वेळी तिथे जरा घोटाळले की त्यांच्यापैकी कोणीतरी विचारेच, हलवा पावोगे? की आम्ही बसलोच लगेच समोर..की मग निम्मी पत्रावळ भरून जाईल एवढा तूपाळ खडा शिरा ते वाढत. तिथे चमचे वगैरे काही नसल्याने हाताची बोटेही तुपाने भरून जात.

आमच्या लहानपणी कोल्हापूरकडच्या अनेक लग्नांमध्ये आदल्या दिवशीचे, विशेषत: हळदीचे जेवण म्हणजे शिरा पुरीचे असे. तो शिराही नेहमीच्या रंगाचा नसून किंचित पिवळ्या रंगाचा आणि गूळ घातलेला असे. मला त्या शिर्‍याचीही अधून मधून आठवण होते. शिरा करण्याच्या दोन पद्धती, यापैकी एकात रवा थोड्याशा तुपात भाजून घेतात आणि त्यात उकळलेले अर्धे दूध आणि पाणी टाकून शिजवून घेतात आणि वाफ आल्यानंतर त्यात साखर/गूळ घालतात आणि दुसर्‍या पाणी उकळताना त्यात गूळ, साखर, वेलदोडा पूड आणि तूप घालतात आणि त्या तुपात खरपूस भाजलेला रवा, साखर घातलेल्या उकळत्या पाण्यात घालतात. त्यानंतर मग तो खूप घोटतात. कर्नाटकात विशेषत: म्हैसूर प्रांतात रवा केसरी नावाचा शिरा असाच बनतो आणि मला तो अर्थातच खूप खूपच आवडतो.

- Advertisement -

आताच्या काळात आपला रव्याचा शिरा लग्नकार्यासाठी केल्या जाणार्‍या गोड पदार्थांच्या यादीमधून नाहीसा झालेला असला तरीही त्याची जागा, पायनापल म्हणजे अननसाचे तुकडे घातलेल्या शिर्‍याने घेतलेली आहे. त्याचबरोबर तूप आणि पाकात पोहणार्‍या मुगाच्या शिर्‍यानेही महत्वाचे स्थान पटकावले आहे. अगोदरच्या काळात मूग डाळ भिजवून, वाटून तुपात लालसर होईपर्यंत आणि आपले हात भरून येईपर्यंत भाजावी लागत असे, पण अलिकडे मायक्रोवेव्हने ते काम चांगलेच सोपे केलेले आहे. पण जातीच्या खवैय्यांना मायक्रोवेव्ह आणि कढईत भाजलेल्या शिर्‍याच्या चवीतला फरक लगेच कळतो. मुगाच्या शिर्‍यामध्ये अख्ख्या सालीसकट हिरव्या मुगाच्या डाळीचा शिरा जोधपूरला खाल्ला होता. त्या शिर्‍याचा एक घास घेताच..डोळे आपोआप मिटले जातात आणि वा…वा.. असं मंत्र जप शिरा संपेपर्यंत विनासायास चालू राहतो.

या हिरव्या मुगासारखाच ओल्या हरभर्‍यांचाही ..चांदीचा वर्ख घातलेला शिरा बनवला जातो. त्यात थोडा खवाही घालतात. त्या चवीसारखी स्वर्गीय चव फारच थोड्या पदार्थांना असते. चिखलदरा भागातल्या कोरकूंकडे गोड पदार्थ म्हणून ‘रानमूगाचा लचका’ म्हणजे खूपच मऊ शिरा करतात. तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात सीमेवरच्या भागात तूर, हरभरा आणि मूग असा मिश्र किंवा प्रत्येक कडधान्याचा वेगवेगळा शिरा करतात. प्रत्येक शिर्‍याची चव अर्थातच वेगळी असते. त्या शिर्‍यांचे एक वैशिष्ठ्य म्हणजे तो शिरा पाकात करतात आणि त्यात चारोळ्या घातलेल्या असतात. फक्त चारोळ्यांचाही शिरा करतात. विशेषत: अशक्तपणा आला असेल तर रोज एक चमचा चारोळीचा शिरा खातात. भारताच्या उत्तरेकडच्या जवळ जवळ सर्व भागात कणिक आणि बदामाचा शिरा करतात. जसजसे उत्तरेकडे जाऊ तसतसे त्या शिर्‍यात बदामाचे प्रमाण अधिक होत जाते. बदाम आणि पिस्त्याचा शिरा चवीला उत्तम असला तरी तो खाल्ल्यावर ताणून द्यायला चांगलाच वेळ हवा.

आमच्या आईची खासियत म्हणजे उपवासासाठी चालणारा ‘बटाट्याचा शिरा’. तो शिरा अक्षरश: तोंडात विरघळतो. पण का कोण जाणे तो शिरा कितीही चवदार असला तरी जास्त खाताच येत नाही. कच्ची केळी आणि रताळी उकडूनही उपासाचा शिरा करतात. पण ते दोन्ही प्रकार चवीला ठीक असले तरी त्यात शिर्‍याची मजा नसते. मी खूप खूप वर्षांपूर्वी वैष्णवदेवीचे दर्शन घेऊन जिन्यांनी उतरून खाली आल्यावर एका पंजाब लंगरमध्ये दलियाचा शिरा आणि बटाट्यासारख्या दिसणार्‍या पण चवीने पूर्ण वेगळ्या चवीची फ्रेंच फ्राईजसारखी लांबट आकाराची भजी खाल्ली होती. पण लक्षात राहिला तो शिराच कारण पुढे अमरनाथला जाताना आणि परततानाही तसा शिरा अनेकदा खायला मिळाला होता. साखर आणि गुळाच्या ऐवजी खजूर आणि जरदाळूचे तुकडे घातलेला शिरा उर्फ हलवा एका बोहरी मैत्रिणीकडे खाल्ला होता. साखर वर्ज्य असणार्‍यांनी त्याचा जरूर प्रयोग करावा.

वायनाडच्या एका खेड्यात अतिशय भूक लागली म्हणून नाईलाजाने खाल्लेल्या तांदळाच्या रव्याच्या नारळाच्या दुधात केलेल्या शिर्‍याची चवही अतिशय सुंदर होती. आपल्याकडे राळ्याच्या रव्याचा गूळ घालून शिरा करतात, तसाच तो दिसत होता, पण त्यात तुपात तळलेल्या लवंगा आणि काजू यांची नुसती रेलचेल होती. एकदा गंमत म्हणून मी नाचणीचा रवा काढून शिरा केला होता. तोही खरोखरच छान लागतो. आमच्याकडच्या अनेक जत्रांमध्ये गोड जेवणासाठी सोजी, रव्याची जाड लापशी म्हणजे खरे तर किंचित पातळ असा शिराच करतात. त्यात तुळशीची पाने घातलेली असतात. तो खाल्ल्यावर पोटात काहीतरी शांत शांत वाटतं. काही लोकांकडे विनाकारणच शिर्‍याच्याच बशीत कैरी किंवा लिंबाच्या लोणच्याची फोड देतात. शिर्‍यातले सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे पांढरा शिरा आणि किंचित मीठ घातलेला अगोड शिरा.

अजून एक आश्चर्य म्हणजे अनेक बायकांना म्हणे इतका सोपा शिरा बनवताच येत नाही. चांगला शिरा बनण्यासाठी, अगोदर तुपात काजू, बदाम आणि बेदाण्याचे काप तळून घ्यायचे. केळी किंवा इतर फळांच्या फोडी घालायच्या असल्यास त्याही तशाच तळून घ्यायच्या. मग त्या फोडी, सुका मेवा बाजूला काढून घेऊन त्याच तुपात रवा चांगला भाजला आणि त्यामध्ये आपल्या कल्पनेपेक्षा थोडे जास्त उकळते पाणी आणि किंचितसं दूध घातलं की रव्याचा कण आणि कण फुलतो. त्यावर झाकण घालून दणदणीत वाफा आणल्या की पुरेसे तूप घालायचे आणि मग साखर किंवा गूळ, परत त्यावर थोडे तूप, वेलदोडा पूड, असल्यास केशर घातले की शिरा अजिबात बिघडत नाही.

शिर्‍याचा इतिहास म्हणे खूप जुना आहे. कोणी म्हणतात की हा शिरा मुघल आक्रमणाबरोबर भारतात आला. शहाजहानच्या ऐका बेगमेने साखरेच्या पाकातल्या गुलाबाच्या पाकळ्या वापरून बदामाचा हलवा रांधल्याचे उल्लेख आपण वाचलेले असतात. शिरा आणि हलवा यातला एक महत्वाचा फरक म्हणजे हलव्यासाठी वापरला जाणारा रवा, वाटलेले हरभरे आदी डाळी खूप भाजलेल्या असतात आणि म्हणून तूप सुटलेला हलवा जरा सैलसर दिसतो. काही का असेना…या पावसाळ्यात आपण शिरा आणि हलवा दोन्हीचाही मनसोक्त आस्वाद घ्यावा आणि भरजरी हलव्याच्या नादात आपल्या साध्यासुध्या शिर्‍याला विस्मरणात जाऊ देऊ नये, कारण शिर्‍यामध्ये पोट, मन शांत करणारी, उत्साहवर्धक आणि ऊर्जादायक अशी पोषणमूल्ये असतात.

–मंजुषा देशपांडे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -