घरफिचर्ससारांशपाळी माझा सन्मान...

पाळी माझा सन्मान…

Subscribe

मासिक पाळी येणे हे प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्त्वाचे असते. पाळी आली तरच गर्भधारणा होऊ शकते. एका नवीन अंकुराला ती जन्म देऊ शकते. म्हणून पाळी येणे हे महत्त्वाचे असते. मासिक पाळीत विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. त्यासाठी सुती पातळ कॉटनचे कापड किंवा सॅनिटरी पॅड वापरले जावेत. किमान दिवसातून दोनदा ते बदलले गेले पाहिजेत, म्हणजे त्वचेसंबंधी व्याधी उत्पन्न होत नाहीत. या सर्व बाबींची माहिती किशोर मेळावे घेऊन दिली तर मुलींना नक्कीच मदत होऊन धीर मिळू शकतो. पाळी हा विटाळ नसून स्त्रीचा सन्मान आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.

— माधुरी पाटील

घेई उंच भरारी, नाही तू अबला
सावित्रीची लेक, आहे तू सबला

- Advertisement -

गगनी उंच भरारी घेणारी आजची रणरागिनी ही खरंच सुरक्षित आहे का हो, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण महिलांना आजही कुठेतरी कायमस्वरूपी असुरक्षितता जाणवत आहे. त्याची कारणेही अनेक आहेत. त्याच कारणांचा शोध व उलगडा आज करूया. सर्वात प्रथम आजची किशोरी म्हणजेच उद्याची महिला जर सुरक्षित नसेल तर ती कुठेतरी कमी पडते किंबहुना तिला असुरक्षित वाटणार्‍या अनेक गोष्टी तिच्या जवळपास घिरट्या घालतात.

त्यातील एक समस्या म्हणजे मासिक पाळी. मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिला समजून घेऊन धीर देणे खूप गरजेचे असते. सुरुवातीला मासिक पाळी येण्याचा कालावधी हा इयत्ता ८ वी ते १० वी म्हणजेच १४ ते १६ वर्षे वयात मुलींना मासिक पाळी येत होती, पण आता मुलींना वयाच्या १४ ते १५ च्या दरम्यान पाळी येणे सुरू होते. शाळेतदेखील किशोरवयीन मुलींची स्वतंत्र नोंदवही असायला हवी. त्यात वर्गनिहाय मुलींची नोंद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पाळी येणार्‍या मुलींच्या नोंदवहीत साधारण असे मुद्दे असावेत, पाळी कधी आली, किती दिवसात आली, प्रत्येक महिन्याला येते का? त्याच तारखेला येते का? नियमितपणे येते का? वरील सार्‍या गोष्टी लक्षात घेऊन नोंद झाली पाहिजे.

- Advertisement -

जेव्हा मुलीला पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिला त्याविषयी काहीही माहिती नसते. त्यात ती पूर्णपणे अनभिज्ञ असते. नवीन काहीतरी आपल्यासोबत झाले आहे याची तिला भीती वाटते. आपल्याला काहीतरी लागले असेल म्हणून रक्तस्राव होत आहे असे प्रथम वाटते. आपल्या कपड्यांना डाग पडले म्हणूनदेखील घाबरून जाते. तिची समस्या ती कुणासोबतही शेअर करीत नाही. अशा वेळी तिला धीर देणारी व समजून घेऊन त्यावर उपाय सांगणारी जवळची व्यक्ती तिच्यासोबत असायला हवी.

पाळी येणे यासाठी खूप ठिकाणी कावळा शिवणे असादेखील शब्दप्रयोग वापरला जातो. कावळा शिवला की तिने चार दिवस बाजूला एका पोत्यावर बसायचे. तिथेच जेवायचे व तिथेच झोपायचे हा नियम पूर्वी स्त्रियांवर लादला जायचा. या चार दिवसांत तिने घरातील कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही, देवपूजा करायची नाही, कुठेही बाहेर शुभकार्यात जायचे नाही अशी अनेक बंधने तिच्यावर लादली जायची, पण खरंतर त्या चार दिवसांत तिच्या शरीरातील मासिक पाळीचा स्राव बाहेर पडल्याने शरीराला थकवा जाणवतो आणि म्हणूनच तिला विश्रांती मिळाली पाहिजे हाच एक हेतू त्या चार दिवस बाजूला बसण्याचा होता. जुन्या काळी पाळीचा वेगळाच अर्थ लावून नको नको ती बंधने तिच्यावर लादली जायची.

आजही खेड्यातील मुलींना पाळीविषयी पुरेशी माहिती नसल्याने बरेचदा मुली पाळी आली की शाळा सोडून देतात. इच्छा असूनदेखील भीतीपोटी अथवा पुरेशी माहिती नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. घरात जर अशिक्षित पालक असतील तर ते सहजपणे बोलून जातात, आता तुझं लग्नाचं वय झालं, तू उपवर झाली, तू मोठी झालीस, तुला स्वत:ला जपायला हवं. इतकेच नाही तर खूप कमी वयात बरेचदा तिचे लग्न लावले जाते. सरकारने बालविवाह कायदादेखील तयार केला, पण तरीही त्याला न जुमानता अनेक ठिकाणी बालविवाह केले जात आहेत. पाळी येणे हा प्रत्येक मुलीसाठी सन्मानाचा भाग आहे. तिला त्या काळात सन्मानाने वागणूक दिली गेली पाहिजे. तिचा घरात व समाजातदेखील आदर झाला पाहिजे.

जग जरी एकविसाव्या शतकात गेले तरी अजून आपल्या देशात अंधश्रद्धा संपलेली नाही. त्यातच मुलीला पाळी आली की त्या दिवसापासून तिच्यावर जास्त प्रमाणात लक्ष दिले जाते. तिला मुक्तपणे वावरू दिले जात नाही. अनेक बंधने तिच्यावर लादली जातात. जास्त वेळ घराबाहेर न जाणे अर्थात वेळेच्या आत घरात येणे, या सार्‍यामुळे तिचे कुठेतरी खच्चीकरण केले जाते. एका बाजूला स्वसंरक्षणासाठी धडे दिले जातात व दुसरीकडे तिला बिनधास्त वावरण्यास बंदी आणली जाते. तेव्हा स्त्रियांसाठी कायदे आले, पण त्याचे पालन कुठेतरी कमी दिसून येते. यामुळे अजूनही स्त्री कुठेतरी सबला कमी पण अबला जास्त असल्याचे दिसून येते.

आणि म्हणूनच या गोष्टी कुठेतरी थांबवण्यासाठी किंवा त्यावर आळा घालण्यासाठी शाळेतच किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शनाची गरज आहे. पाळी आल्यावर घेतली जाणारी काळजी, पाळी म्हणजे नेमके काय? सॅनिटरी पॅड कसे वापरावेत, या विषयांवर नियमितपणे चर्चासत्र घेतली जावीत. मासिक पाळी येणे हे प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्त्वाचे असते. पाळी आली तरच गर्भधारणा होऊ शकते. एका नवीन अंकुराला ती जन्म देऊ शकते. म्हणून पाळी येणे हे महत्त्वाचे असते. मासिक पाळीत विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. त्यासाठी सुती पातळ कॉटनचे कापड किंवा सॅनिटरी पॅड वापरले जावेत.

किमान दिवसातून दोनदा ते बदलले गेले पाहिजेत, म्हणजे त्वचेसंबंधी व्याधी उत्पन्न होत नाहीत. या सर्व बाबींची माहिती किशोर मेळावे घेऊन दिली तर मुलींना नक्कीच मदत होऊन धीर मिळू शकतो. ही माहिती मिळाली तर मुलींच्या बर्‍याच प्रमाणात समस्या दूर होतील. मासिक पाळीत मुलींच्या चेहर्‍यावर पुरळ येतात, थकवा जाणवतो हेसुद्धा माहीत असणे गरजेचे असते, जेणेकरून तिला अर्धवट शाळा सोडावी लागणार नाही किंवा कमी वयात लग्न करून संसाराचा गाडा ओढावा लागणार नाही. पाळी येणे हा जीवनातला महत्त्वाचा टप्पा आहे. पाळी हा प्रत्येक स्त्रीचा अवमान नसून सन्मान आहे.

-(लेखिका इगतपुरी येथे प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -