कुठून मिळते पक्ष्यांना एवढे बळ !

काही आठवड्यांपूर्वी आपण पक्षी स्थलांतर व त्यांचे उड्डाण महामार्ग जाणून घेतले होते. ती वस्तुस्थिती जरी असली तरीही कित्येक काल्पनिक प्रश्न सतत आपल्याला येतच असतील. हे प्रश्न बहुदा आपणास आश्चर्यचकित करत असावेत. एवढासा जीव इतक्या दूरवर स्थलांतर कसा करत असेल? महामार्ग वैगेरे ठीक आहे, परंतु स्थलांतरासाठी लागणारे बळ येते कुठून? पक्षी स्थलांतराविषयीच्या आधीच्या लेखाचा हा पुढील भाग समजावा. थोडंसं टेकनिकल होईल, पण स्पष्टीकरणात्मक दिलेल्या चित्रांच्या साहाय्याने समजण्यास थोडे सोप्पे होईल अशी अशा करतो. या रविवारी काहीतरी नवीन जाणून घेऊया! रविवार हा असतोच यासाठी.

आधीच्या ‘पक्षी जाय दिगंतरा’ लेखाचा ‘सारांश’ द्यायचा झाला तर, प्रजननक्षेत्र व खाद्य मिळवण्याच्या जागेमधले हे स्थलांतर सहजगत्या केलेले नसून एका उचित नियमांच्या संचाचे अनुसरण करून केलेला प्रवास असतो. प्रजनन क्षेत्रामध्ये खाद्यस्रोतात आढळलेल्या कमतरतेमुळे त्यांस हा अत्यंत धैर्याचा आणि कमालीचा प्रवास करावा लागतो. उड्डाण क्षमतेच्या उत्क्रांतीचा विचार करता, पक्षी हे पृथ्वीतलावर आढळणार्‍या काही यशस्वी प्रजातींपैकी एक. परंतु, या अविश्वसनीय प्रवासासाठी त्यांस नक्की काय सक्षम बनवते?

पक्ष्यांची उत्क्रांती कोट्यानुकोटी वर्षांपासून होत आलेली आहे व कालांतराने, त्यांच्या शरीराने उडण्याची कला अत्यंत चलाखीने आत्मसाद करून घेतलेली आहे. त्यांच्या शरीराचा प्रत्येक घटक उड्डाण क्षमतेला चालना देणारा व परिपूर्ण बनवणारा भाग आहे. शारीरिक वस्तुमान घटवण्याकरिता त्यांची हाडे पोकळ विकसित झालेली असून सांधे नैसर्गिकरित्या एकरूप झालेले आहेत (छायाचित्र 1). उदाहरण: पंखाची हाडे, बोटांच्या व मनगटाच्या हाडापासून एकत्रित होऊन बनलेली आहेत व ओटीपोटाचे हाडही बाह्य अंगाशी एकत्रित झाले आहे. गळ्याभोवतीचे हाड, एका हाडात विकसित आहे.

माणसाच्या हाडांपेक्षा अधिक सरळ व सलग. हा भाग उड्डाणादरम्यान हवेचा प्रवाह फुफुसापर्यंत नियंत्रित करून त्यांस श्वास घेण्यास मदत करतो. एखाद्या फांदीवरून उडताना किंवा बसताना आलेल्या तणावामुळे पायांची हाडेही कणखर असतात. अचानक हल्ला करणार्‍या शिकारी पक्षी किंवा प्राण्यापासून बचाव करण्यासाठी ही कणखरता मोलाची ठरते. पक्षांच्या सांगाड्याचा विकास त्यांच्या श्वसन प्रक्रियेमुळे झाला आहे असे समजले तरी हरकत नाही.

उड्डाणादरम्यान स्थिरता सुसंगत ठेवण्याकरिता जास्तीत जास्त वजन पंखाखाली संत्रीप्त झालेले असते व त्यांच्या संपूर्ण वजनाचा 30 टक्के भाग हा पंखांच्या स्नायूने व्यापलेला असतो (छायाचित्र 2 व 3). हे स्नायू फक्त स्थिरतेसाठी नसून ते स्वतः ऊर्जेचे स्रोत देखील आहेत. स्नायूंच्या कामाला हातभार लावण्यासाठी विशिष्ट पिसांची ही सोबतच उत्क्रांती झालेली आहे. या पिसांना फ्लेक फेदरसुद्धा म्हणतात (छायाचित्र 4). पण फक्त शरीररचना महत्वाची नाही, सोबत श्वसन संस्था ही प्रबळ हवी. पक्षांची फुफुसे माणसासारखी आखडत किंवा विस्तृत होत नाहीत आणि म्हणूनच ती उड्डाणाकरिता महत्वाची असतात.

जर फुफुसे निष्क्रिय राहतात तर शरीरात हवेचा प्रवाह कसा होतो? पंखांच्या स्नायूंचे हे आणखी एक काम! पंखाच्या हालचालीने फुफ्फुसात स्थित हवेच्या पिशव्यांमध्ये हवेचा प्रवाह होतो. माणसाला जसा एकदा श्वास घ्यावा लागतो, तसेच उड्डाणादरम्यान संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी पक्ष्याला दोनदा श्वास घ्यावा लागतो. ही क्रिया स्थलांतरासारख्या मोठ्या प्रवासासाठी महत्वाची असते. पक्षी व पक्षीशास्त्र हा किती किचकट विषय आहे हे त्यांची मनुष्याशी तुलना केल्यावरच समजते. मनुष्य प्रत्येक क्रिया एका विशिष्ट अवयवाने करत असून मेंदू शरीराला एकत्रितपणे चालना देण्याचे काम करतो. परंतु पक्ष्यांचे तसे नाही. दोनीही अर्धभाग स्वतंत्रपणे काम करू शकतात. उदाहरण: शिकारी, उडण्याची कला इत्यादी जगण्याच्या दृष्टीने महत्वाची, निर्णायक व शिकण्याची कामे डावीकडचा भाग करतो.

इतक्या तपशीलवार माहितीमध्ये पक्षांच्या डोळ्यांना आपण कसे विसरू शकतो? मनुष्याच्या वर्तुळाकार डोळ्याच्या तुलनेने पक्ष्यांचे डोळे अधिक चपटे व अंडाकृती असतात. याचाच अर्थ कमी जागेत जास्तीत जास्त दृष्टीविषयक माहिती ग्रहण करणारे. स्थलांतरा दरम्यान सूर्य, तारे व पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रासोबत भौगोलिक प्रदेश व नकाशे लक्षात ठेवण्यासाठी हे महत्वाचे काम करतात. इतकेच नव्हे तर धूळ व कचरा बाजूस करून डोळे नेहमी ओले व स्वच्च ठेवण्याकरिता एक विशेष पडदाही त्यांस लाभला आहे. हा पडदा एखाद्या काच साफ करणार्‍या वायपर सारखे काम करतो (छायाचित्र 5). मनुष्यापेक्षा कितीतरी अधिक रंग पक्षी पाहू शकतात. आपण तीन रंगांच्या संयोजनाने कित्येक रंग पाहू शकतो, तर पक्षी चार रंगांच्या संयोजनाने किती रंग पाहू शकत असावेत? प्रत्येक पक्ष्याच्या डोळ्यांची जागा वेगळी आहे, हे निरखून पाहिल्यावरच कळेल.

शिकारी पक्ष्यांना लागणार्‍या एकाग्रतेसाठी व लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांच्या डोळ्यांचे प्रस्थापना पुढील बाजूस आहे, तसेच कबुतरासारख्या शिकार होणार्‍या पक्ष्याचे डोळे बाजूस प्रस्थापित आहेत जेणेकरून त्यांना शिकारी पक्ष्यांपासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त जागा पाहता येईल. कुठल्याही प्रकारचा धोका ओळखण्यासाठी कानालगतची पिसे इतर पिसांपेक्षा पातळ असतात. यामुळे आवाज सहज पोहोचू शकतो. ही पिसे उड्डाणादरम्यान हवेचा आवाजही कमी करण्यास मदत करतात. आधुनिक तंत्रज्ञानाने आपण पक्ष्यांचे बोल तर कैद करू शकतो मात्र आवाज ऐकण्याच्या क्षमतेत आपण पक्षांची स्पर्धाही करू शकत नाही.

मनुष्य निव्वळ उडण्याचे स्वप्न पाहू शकतो, परंतु वर्षानुवर्षाच्या उत्क्रांतीनंतर पक्ष्यांना हे अवगत झाले आहे.