संघर्ष साथी!

संघर्षाच्या लढाईत हारजीत होत असते; पण म्हणून खचून जायचे नसते. तुमचा हेतू उदात्त हेतूचा असला की हातून खूप मोठे काम होते. तसेच इस्वलकर यांच्या हातून झाले. आधी बंद पडलेल्या गिरण्या तर सुरू झाल्या, त्याशिवाय 20 हजारपेक्षा अधिक गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना हक्काची घरे मिळाली. आणखी बर्‍याच जणांना घरे मिळणार आहेत. शिवाय गिरण्यांच्या चाळीत राहणार्‍या सहा हजारपेक्षा अधिक कामगार आणि दुकानदारांना त्यांचा हक्काचा आसरा मिळाला. याशिवाय कामगारांच्या नव्या पिढीला नोकर्‍याही मिळवून देण्यात संघर्ष समितीला यश आले. कुठलाही राजकीय पाठिंबा नसताना, हाती पैसा नसताना अगदी विपरीत काळाचा समर्थपणे मुकाबला संघर्ष समितीला करता आला तो एका साध्या सरळ माणसाच्या प्रामाणिक निष्ठेमुळे.अहंकाराचा भेदाभेद मोडून माणूस म्हणून आपण सर्व एकत्र आलो तर किती मोठे काम होऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दत्ता इस्वलकर होय!

गिरणी कामगारांचा 1982 चा संप डोळ्यासमोर उभा राहिला की आजही अंगावर सरसरून काटा उभा राहतो. कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचे भोग मी स्वतः अनुभवले आहेत. आम्ही आणि आमच्या आजूबाजूची कुटुंबे मरत नव्हती म्हणून जगत होती, इतकेच. या ‘अधांतर’ काळात हजारो गिरणी कामगारांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. ज्यांना गावचा आधार होता ते तिकडे निघून गेले. पण, ज्यांना मुंबईशिवाय दुसरा आसरा नव्हता आणि आजूबाजूला मदतीचा हात देणारे कोणी नव्हते, असे कामगार उघड्यावर पडले. त्यांची मुले गुंडांच्या टोळ्यात सामील होऊन, काहीजण नशेत लोळून लयाला गेले. गिरणगावात आजूबाजूला इतकी भयाण परिस्थिती होती की नागडा उघड्याला काय मदत करणार? हातावर मोजणारी कुटुंबे या वादळात टिकली; पण ते टिकलेपणा मुंबईच्या एका गिरणगाव संस्कृतीचा अस्त होता. येथूनच खर्‍या अर्थाने कामगारांची, श्रमिकांची मुंबई संपली… आणि ‘फिनिक्सच्या राखेतून मोर उठला’! आडवी मुंबई उभी झाली…या राखेत एक अंश गिरणी कामगारांचा ‘देव’ असलेल्या दत्ता सामंत यांचा होता.

या माणसाचा संप, त्याची ताकद संपवून राज्यकर्ते आणि गिरणी मालक यांना गुंडांच्या मदतीने सोन्याची कोंबडी असलेली गिरण्यांची जमीन बळकवायची होती आणि तसेच झाले. दत्ता सामंत यांचा माफियांनी बळी घेतला. पण, मोठा दत्ता गेल्यानंतर याच राखेतून छोटा दत्ता उठला. ज्याने निस्तेज झालेल्या लढाईत प्राण फुंकले. गिरणी कामगारांची थकीत देणी असो की बंद पडलेल्या गिरणी पुन्हा सुरू करणे असो तसेच हक्काची घरे मिळवून देणे असो की कामगारांच्या मुलांना नोकर्‍या मिळवून देणे असो, अशी प्रचंड कामे करून दत्ता इस्वलकर यांनी आपला देह ठेवला. ज्यांचा कोणी आधार नव्हता, त्यांच्या पुढे अंधार होता, अशा गिरणी कामगारांचा तारणहार होऊन ते या जगातून निघून गेले. कदाचित याच मोठ्या कामासाठी त्यांचा जन्म झाला होता.

इस्वलकर हे राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते. समाजवादी विचारांचे संस्कार असलेला हा माणूस म्हणजे जणू साने गुरुजी यांच्या धडपडणार्‍या मुलांपैकी एक. जणू दुसरे साथी एस.एम.जोशी. कारण संघर्ष चळवळीत मी नाही जेव्हा ‘आपण’ होतो तेव्हाच अशा आंदोलनाचा वटवृक्ष होतो. तोच इस्वलकर यांनी करून दाखवला. या वटवृक्षाच्या छायेत संपातून शिल्लक राहिलेल्या, पिचलेल्या कामगारांना भाकर तुकडा खाता आला. डोक्यावर हक्काचे घर मिळाले. कामगारांच्या पुढच्या पिढीला अंधारातून उजेडाकडे जाता आले; पण, हा लढा सोपा नव्हता. मुख्य म्हणजे समाजवादी, कम्युनिस्ट, शिवसेना अशा सर्व विचारांच्या लोकांना एकत्र करून इस्वलकर यांनी गिरणी कामगार संघर्ष समितीचा लढा उभारला. हा एक कामगार आंदोलनातील मोठा प्रयोगच म्हणायला हवा. अतिशय साधी राहणी, कुठेही मीपणा नाही, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आपुलकीचे नाते, बस- ट्रेनमधून प्रवास आणि शेवटपर्यंत छोट्या घरात राहिलेला हा माणूस म्हणूनच ‘आपला’ माणूस वाटत राहिला!

1987 ते 89 या दोन न्यू ग्रेट, मॉर्डन, स्वान (तीन युनिट), रघुवंशी, कमला, श्रीनिवास या गिरण्या बंद करून वीस हजारपेक्षा अधिक कामगारांचे संसार रस्त्यावर आले. मालक जमीन विक्रीची मागणी करू लागले. यातील विरोधाभास बघा : पूर्वी कामगार आपल्या मागण्यांसाठी संप करत. मात्र, जमीन विक्रीची परवानगी द्यावी, या मागणीसाठी गिरणी मालकांनी संप केला. देशातील ही पहिली घटना असावी. आधीच 1982 च्या दीर्घकाळ चाललेल्या संपाने कामगार होरपळून गेले होते. त्यात मालकांनी गिरण्या बंद करून कामगारांची कोंडी केली होती आणि सरकारचे धोरण हे मालकधार्जिणे होते. शिवाय कामगार संघटना गिरणी कामगारांचे नेतृत्व करण्यास पुढे सरसावत नव्हत्या. मुख्य म्हणजे कायदे अपुरे असल्याने न्यायालयातही दाद मिळेल, याची खात्री नव्हती. अशी चारी बाजूंनी कोंडी झाली असताना इस्वलकर यांनी अंधारात दिवा पेटवला!

इस्वलकर स्वतः मॉर्डन मिलमध्ये कामाला होते. आपले गिरणी कामगार बंधूंमधील संघटक हेरून त्यांनी संघटना बांधण्याच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली. दिनकर कडव, बाळ नर, विठ्ठल घाग, प्रवीण घाग, राजाराम वर्मा, वसंत महाडिक, मनोहर देसाई अशा कार्यकर्त्यांना एकत्र केले आणि 1989 रोजी गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली. मीना मेनन, गायत्री सिंग यांचे पाठबळ तसेच डाव्या आणि समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते, संघटक तसेच पत्रकार भक्कमपणे उभे राहिल्याने समितीचा लढा प्रभावी झाला. कामगारांनीच कामगारांची ‘आपली’ संघटना सुरू करून नवा इतिहास सुरू केला असताना दुसर्‍या बाजूला ही संघटना व्यापक करण्याचा प्रयत्न इस्वलकरांनी केला. यामुळेच नाट्य, सिनेमा, साहित्य, संस्कृती या क्षेत्रातील मान्यवर केवळ गिरणी कामगारांसोबत उभे राहिले नाहीत, तर रस्त्यावरही उतरले हे विशेष. समितीची आंदोलनेही अनोखी होती. गिरणी कामगारांच्या मुलांनी सरकारला पत्र लिहिणं, मुलांचा मोर्चा काढणं या प्रकारांनी सरकारवर दबाव यायचा.

यात सगळ्यात कडी केली ती चड्डी-बनियन मोर्चाने. ‘1942-चले जाव’ चळवळीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव मुंबईत आले होते. त्यावेळी गिरणी कामगार संघर्ष समितीने ‘चड्डी बनियन’ मोर्चा आयोजित केला. आम्ही बापूंचे खरे वारसदार आहोत, त्यांचंच अनुकरण करत चड्डी-बनियन मोर्चा काढतोय, असं सांगत कामगार रस्त्यावर उतरले. पोलिसांनी लाठीमार केला. माध्यमांनीही याची दखल घेतली. सरकारची तर गोची झाली. मात्र, श्रीराम मिलच्या प्रकरणात इस्वलकर आणि त्यांच्या साथींचा एकप्रकारे प्रकरणात पराभव झाला. तो प्रसंग सांगताना इस्वलकर यांचे डोळे पाणावलेले बघितलेले आहेत. बेमुदत उपोषणानंतर कामगारांना त्यांचे हक्क मिळणार, हे निश्चित होते. मात्र, मालकाने दाखवलेल्या पाच लाखांच्या अमिषाला बळी पडून कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. इस्वलकर, गायत्री सिंग या आपल्या सहकार्‍यांना काही न कळवता हा निर्णय घेतला गेला होता.

समितीची सततची आंदोलने, मंत्र्यांना घेराव, उपोषणे, निदर्शने, मंत्रालयावर अचानक हल्लाबोल अशा एक ना अनेक मार्गाने गिरणी कामगार संघर्ष समितीने सरकार आणि गिरणी मालकांना आपल्या मागण्यांचा सतत विचार करायला भाग पाडले. यामुळे स्वान, रघुवंशी, न्यू ग्रेट, कमला, द मॉर्डन या मिल पुन्हा सुरू झाल्या. याचबरोबर गिरण्यांच्या चाळीतील रहिवाशांना संरक्षण मिळवून देण्यात इस्वलकर आणि त्यांचे सहकारी यशस्वी ठरले. मात्र, आणखी एका लढ्यात समितीला हादरा बसला; पण, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दगाबाजी केल्याने कामगारांना आपल्या हक्कावर पाणी सोडावे लागले.

या दगाफटक्यात फक्त विलासरावच सामील नव्हते तर केंद्र सरकार आणि गिरणी मालक यांचाही हात होता. 1991 च्या कायद्यानुसार गिरण्या बंद केल्यास एक तृतीयांश जमीन म्हाडाला मिळणार होती. त्यापैकी अर्धी जमीन गिरणी कामगारांना घरासाठी देण्याची तरतूद 2003 च्या कायद्यामध्ये सरकारने केली होती. या कायद्यानुसार अंदाजे 600 एकरपैकी 200 एकर जमीन मिळणार होती. म्हाडाला मिळणार्‍या 200 एकरपैकी 100 एकर जमीन गिरणी कामगारांना मिळणार असल्याने बहुतांशी कामगारांना घरे मिळणार असे सुखवाह चित्र असताना गिरणी मालकांना अधिक जमीन मिळावी म्हणून विलासराव देशमुख यांच्या सरकारने मागील दरवाजाने यात बदल केला. याविरोधात हायकोर्टाचे दरवाजे ठोठावून न्याय मिळवला खरा; पण सुप्रीम कोर्टात दिलासा मिळाला नाही. यासाठी देशातील नामवंत वकील सरकारने कामाला लावले होते, यावरून जमिनींचे मोल किती होते याचा अंदाज येऊ शकतो.

संघर्षाच्या लढाईत हारजीत होत असते; पण म्हणून खचून जायचे नसते. तुमचा हेतू उदात्त हेतूचा असला की हातून खूप मोठे काम होते. तसेच इस्वलकर यांच्या हातून झाले. आधी बंद पडलेल्या गिरण्या तर सुरू झाल्या, त्याशिवाय 20 हजारपेक्षा अधिक गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना हक्काची घरे मिळाली. आणखी बर्‍याच जणांना घरे मिळणार आहेत. शिवाय गिरण्यांच्या चाळीत राहणार्‍या सहा हजारपेक्षा अधिक कामगार आणि दुकानदारांना त्यांचा हक्काचा आसरा मिळाला. याशिवाय कामगारांच्या नव्या पिढीला नोकर्‍याही मिळवून देण्यात संघर्ष समितीला यश आले. कुठलाही राजकीय पाठिंबा नसताना, हाती पैसा नसताना अगदी विपरीत काळाचा समर्थपणे मुकाबला संघर्ष समितीला करता आला तो एका साध्या सरळ माणसाच्या प्रामाणिक निष्ठेमुळे.

अहंकाराचा भेदाभेद मोडून माणूस म्हणून आपण सर्व एकत्र आलो तर किती मोठे काम होऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दत्ता इस्वलकर होय! कधीमधी कधी त्यांना भेटण्याचा योग आला तर तेच हलकेसे हास्य… विचारपूस आणि गिरणी कामगारांबद्दल आणखी खूप काही करण्याची दुर्दम्य इच्छा त्यांच्या बोलण्यातून दिसून येई. आजारपणाने गेल्या दीड वर्षात त्यांच्या हालचालींवर बंधने आली तरी आपल्याला आता बसून चालणार नाही, हे सतत ते आपल्या सहकार्‍यांशी बोलत असत. एका गिरणी कामगाराचा तो श्वास होता… गिरणी कामगार संघर्ष समितीचे सरचिटणीस प्रवीण घाग यांच्यासह प्रवीण येरुणकर, राजन दळवी, भरत शेलार, विठ्ठल सावंत, वैशाली गिरकर, भावना पिळणकर, कल्याणी जाधव, दीपाली धुळ, मोहिनी कदम, वर्षा बाबरेकर, वैशाली गायकवाड, छाया बोराटे, सुमन सातपुते, गीता साळुंखे आणि विजया मंत्री हे सारे साथी इस्वलकर यांनी उभारलेले काम नक्की पूर्णत्वास नेतील आणि हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल…!