घरफिचर्ससारांशधोरणांचा बोलबाला...समस्यांचा चक्रव्यूह

धोरणांचा बोलबाला…समस्यांचा चक्रव्यूह

Subscribe

आजचा युवक अनेक समस्यांच्या चक्रव्यूहात अडकला आहे. मागच्या आठवड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या तालुक्याच्या ठिकाणी प्रगतीशील साहित्य संमेलन पार पडले. यावेळी रामप्रसाद वाव्हळ यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. तो असा की, भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. माझ्या पिढीसमोर जगण्याचा प्रश्न उभा आहे. मात्र आम्हाला धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वेगळ्याच पद्धतीने मार्गदर्शन होत आहे. एकीकडे ज्यांना सर्व सुविधा मिळत आहेत ते परदेशात जाऊन आपलं करिअर घडवत आहेत. जे तुमच्या आणि आमच्यासारखे आहेत ते मंदिर बांधण्यासाठी, जयंती साजरी करण्यासाठी, रांगोळी स्पर्धा घेण्यासाठी वर्गणी जमा करत आहेत.

या आठवड्यात 21 वर्षीय हरनाज संधूला 2021 चा मिस युनिव्हर्स हा किताब मिळाला. तब्बल 21 वर्षानंतर भारताला हा पुरस्कार मिळाला हे विशेष. त्यासाठी तिचे अभिनंदन… सध्या सोशल मीडियावर हरनाजची चर्चा सुरू आहे. विशेष चर्चा सुरू आहे तिने शेवटच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराची. अनेकांच्या फेसबुक स्टोरी तसेच व्हॉट्सअ‍ॅप इंस्टाग्राम स्टेटसवर तिने उत्तर दिलेला तो छोटासा व्हिडीओ पाहायला मिळाला. परीक्षकांनी प्रश्न विचारला होता की, तरुणाईवर अनेक प्रकारचा दबाव येतो त्यांना कसे सामोरे गेले पाहिजे.

त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल..? त्यावेळी हरनाजने दिलखुलासपणे स्मित हास्य करत आणि आत्मविश्वासाने उत्तर दिले की, आजच्या तरुणाईवर सर्वात मोठा दबाव आहे तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे, तुम्ही अद्वितीय आहात हे जाणून घेणे आणि हेच तुम्हाला सुंदर बनवते. इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणार्‍या अधिक महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलूया. हे सर्व आपण समजून घेणे आवश्यक आहे. बाहेर या, स्वतःसाठी बोला कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात, तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे उभी आहे. तिच्या या उत्तराने हजारो प्रेक्षकांची मने जिंकली आणि टाळ्यांच्या प्रतिसादासह तिचे स्वागत केले.

- Advertisement -

हरनाज संधूने दिलेल्या उत्तरामध्ये खूप गोष्टी सामावल्या आहेत. आज भारतातील तरुणाई अनेक गोष्टींबद्दल मनात न्यूनगंड बाळगून आहे. मला हे जमेल का.? मी हे करू शकेन का..? मी हे केले तर मला लोक काय म्हणतील..? मी हे काम केलेच तर मला यश मिळेल का..? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या गदारोळात आजचा युवक आपले आयुष्य व्यतीत करत आहे. आयुष्य जगत असताना त्यासोबत डील करणे शिकावे लागणार आहे. प्रत्येक गोष्टीला सामोरे जात असताना स्वतःमधल्या आत्मविश्वासाला आणि स्वतःला ओळखणे तितकेच महत्वाचे आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला नकारात्मकतेकडे घेऊन जाऊ शकतात. पण आपल्यामध्ये जर सकारात्मक विचार असेल तर मोठ्यातल्या मोठ्या संकटांवरदेखील आपण मात करू शकतो. ईथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

ती म्हणजे संधूने हेच उत्तर का दिले. याची एक दुसरी बाजूदेखील आहे ती समजून घ्यावी लागणार आहे. त्या कारणांची चर्चा झाली पाहिजे. प्रत्येकवेळी युवकांना अ‍ॅडजस्टमेंट करावी लागत आहे. त्या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण..? तर सरकारची ध्येय धोरणे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युवकांना समोर ठेवून युवा धोरण ठरवले जाते. पण ते युवा धोरण राबवत असताना प्रत्यक्ष युवकांना त्याचा फायदा होत आहे का..? हे कधीही पाहिले जात नाही. जे धोरण राबवतात त्यांच्या जवळच्या लोकांना त्याचा फायदा होतो एवढेच काय ते सत्य… याचे एक उदाहरण देणे मला गरजेचे वाटते. आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत पंतप्रधान युवा लेखक योजना नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाकडून घोषित करण्यात आली. त्याद्वारे देशभरातून 75 युवा लेखकांची निवड करून स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले किंवा एखादे स्थळ असेल त्याला घेऊन त्याबद्दल कथा लिहायची होती. त्यासाठी प्रत्येक युवा लेखकांना दीडलाख रुपयांपर्यंतची मदतदेखील मिळणार होती.

- Advertisement -

माझ्या संपर्कातील दहा ते पंधरा युवकांनी लेखनाचा आराखडा पाठवला. पण त्यांना कोणत्याही प्रकारे पोचपावती मिळाली नाही. वेळोवेळी नियमांमध्ये बदल करून मुलाखत घेण्यात येईल, तुम्हाला संपर्क करण्यात येईल असे संकेतस्थळावर घोषित केले जाई. प्रत्यक्षात मात्र यापैकी कुणाचीही निवड झाली नाही. जी यादी समोर आली ती कोणत्या आधारावर अंतिम आहे हेदेखील कळवले नाही. याचाच अर्थ युवकांना प्रेरणा देण्यासाठी राबवलेली योजना प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे युवकांमध्ये सरकारी योजनांबद्दल उदासीनता पाहायला मिळते. हेच स्किल इंडिया, स्टार्ट अप इंडिया तसेच या अंतर्गत दिल्या जाणार्‍या मुद्रा योजनेबद्दलही पाहायला मिळते. कोट्यावधी रुपये जाहिरातींवर खर्च केले जातात. पण ज्यावेळी युवक बँकेमध्ये मुद्रा लोन घ्यायला जातात त्यावेळी बँक मॅनेजर किंवा दलाल त्यांची अवहेलना करतात. महत्प्रयासाने जर कर्ज मंजूर झालेच तर त्यामध्ये देखील ज्याचा त्याचा हिस्सा द्यावा लागतो ही शोकांतिका…

आजच्या युवकांना प्रत्येक पायरीवर संघर्ष करावा लागत आहे. मग ते कोणतेही क्षेत्र असो. इथे आणखी एक उदाहरण मला द्यावेसे वाटते ते म्हणजे प्रिन्स जयबिर सिंग या विद्यार्थ्याचे. आयआयटी बॉम्बेमध्ये त्याचा बीटेकसाठी प्रवेश निश्चित झाला. या संस्थेची फी भरत असताना ती ऑनलाईन पद्धतीने भरायची होती. पण प्रिन्सकडे कोणत्याही ऑनलाइन साधनांची व्यवस्था नव्हती. यामुळे त्याची फी भरणे राहून गेले. या कारणामुळे बॉम्बे आयआयटीने त्याचा प्रवेश नाकारला. ज्यावेळी तो न्यायालयात दाद मागण्यासाठी गेला. त्यावेळी न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला की, कोणताही विद्यार्थी पूर्ण न्यायापासून वंचित राहू शकत नाही.

संस्थेने त्याचा प्रवेश निश्चित करावा आणि त्याची भरपाई द्यावी. वाचताना, ऐकताना ही गोष्ट फार छोटी वाटते. पण डिजिटल इंडियाच्या नावाखाली आपण सोशल जस्टीसमध्ये किती मागासलेले आहोत हे याठिकाणी दिसते. जगातील नामवंत संस्थांच्या यादीत येणार्‍या बॉम्बे आयआयटीने असा दुजाभाव करणे ही लज्जास्पद गोष्ट आहे. जर त्या विद्यार्थ्याने न्यायालयात धाव घेतली नसती तर त्याच्या करिअरचा प्रश्न समोर उभा राहिला असता, हे कळू नये एवढे आपण दुधखुळे झालो आहोत का..? असे अनेक प्रिन्स आहेत जे सोशल जस्टिसच्या अभावी त्यांच्या हक्कापासून कोसो दूर राहतात. ही या विषयाची दुसरी आणि तितकीच महत्वाची बाजू आहे.

युवक अनेक समस्यांच्या चक्रव्यूहात अडकला आहे. मागच्या आठवड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या तालुक्याच्या ठिकाणी प्रगतीशील साहित्य संमेलन पार पडले. साहित्य संमेलनात एका परिसंवादात युवक आणि सांस्कृतिक दहशतवाद हा विषय होता. या विषयावर आपले मत व्यक्त करत असताना रामप्रसाद वाव्हळ यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो असा की, भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. माझ्या पिढीसमोर जगण्याचा प्रश्न उभा आहे. मात्र आम्हाला धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वेगळ्याच पद्धतीने मार्गदर्शन होत आहे. एकीकडे ज्यांना सर्व सुविधा मिळत आहेत ते परदेशात जाऊन आपलं करिअर घडवत आहेत.

जे तुमच्या आणि आमच्या सारखे आहेत ते मंदिर बांधण्यासाठी, जयंती साजरी करण्यासाठी, रांगोळी स्पर्धा घेण्यासाठी वर्गणी जमा करत आहेत. एकूणच लादलेली संस्कृती टिकवत आहेत. हे जळजळीत सत्य रामप्रसाद यांनी मांडले. खरेतर भारतात युवकांची संख्या जास्त असतानादेखील त्यांच्यासाठी पाहिजे तसा अजेंडा तयार केला जात नाही. परिणामी पहिले पाढे पंचावन्न याप्रमाणे राजकारणीसुद्धा टाळुवरचे लोणी खाण्यात व्यस्त आहेत. दीड जीबीचा डाटा संपवणार्‍या आणि तीस सेकंदाच्या रीलमध्ये गुंग असणार्‍या आजच्या पिढीने जर स्वतःची ताकद ओळखली नाही, आणि आजच्या परिस्थितीवर भाष्य केले नाही किंवा डोळेझाक केली. तर येणारा काळ अंधकारमय असेल हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -