घरफिचर्ससारांशमनी हाईस्ट...बेला चाओ

मनी हाईस्ट…बेला चाओ

Subscribe

मनी हाईस्टचा विषय तिच्या नावातच दडलेला आहे. एका दरोड्याची ही गोष्ट. फक्त हा दरोडा कुठलाही छोटा मोठा दरोडा नसून याची सुरुवात होते रॉयल मिंट ऑफ स्पेनमधून, स्पेनमधील ही अशी एक जागा आहे जिथे चलन छापले जाते. दरोडेखोरांची एक टोळी या रॉयल मिंटमध्ये घुसते आणि काही लोकांचे अपहरण करून हा 11 दिवसांचा दरोडा सुरू होतो. पहिल्या 2 सीझनमध्ये ही पहिली चोरी होते आणि उरलेल्या 3 सीझनमध्ये बँक ऑफ स्पेनमधील सोन्याची चोरी होते.

सिनेमा, सिरीज असो किंवा एखादी अन्य कलाकृती प्रेक्षकांना ती आवडते म्हणजे नक्की काय? सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो, असं आपण अनेकदा ऐकलं असेल पण घर करून गेला म्हणजे नक्की काय? सिनेमा प्रदर्शित झाला त्याने खूप पैसे मिळविले म्हणजे तो प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतो असे नाही. सिनेमा असो अथवा वेब सिरीज त्यातील पात्रांशी जेव्हा प्रेक्षक जोडला जातो, जेव्हा प्रेक्षक पात्रांवर प्रेम करतो, जेव्हा त्यांच्यासाठी त्या पात्राची प्रत्येक गोष्ट महत्वपूर्ण ठरायला लागते, तेव्हा खर्‍या अर्थाने सिनेमा किंवा वेब सिरीज हिट ठरली असं आपण म्हणू शकतो. कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक घटना घडल्या, जेव्हा भारतात सिनेमागृहे बंद होती तेव्हाच टेलिव्हिजन आणि ओटीटी माध्यमांवर प्रेक्षकांनी गर्दी केली.

एकीकडे दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत पुनः प्रसारित झाल्या, तर दुसरीकडे अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉटस्टारवर विदेशी कंटेंट पाहण्यासाठी भारतीय लोकांनी गर्दी केली. दरम्यानच्या काळातच एका वेबसिरीजने भारतासह जगभरात धुमाकूळ घातला, ती वेबसिरीज ना अमेरिकन होती ना ब्रिटिश पण तरीही भारतीय आणि संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांना ती आवडली, तिची क्रेज निर्माण झाली. एका रात्रीत टेलिव्हिजनचे ते कलाकार जगप्रसिद्ध बनले, सेकंदाला हजारो चाहते सोशल मीडियावर वाढू लागले आणि लॉकडाऊनमध्ये त्याच वेबसिरीजने सगळे रेकॉर्ड्स मोडीत काढले.

- Advertisement -

मूळ स्पॅनिश असलेल्या या वेबसिरीजचे नाव होते ला कासा दि पापेल जिला संपूर्ण जगभरात मनी हाईस्ट नावाने ओळखलं गेलं, काही दिवसांपूर्वीच या वेबसिरीजचा शेवटचा म्हणजेच पाचव्या सीझनचा दुसरा भाग नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. 2017 साली प्रदर्शित झालेली ही सिरीज भारतात गाजली ती पहिल्या लॉकडाऊनच्या काळात म्हणजे एप्रिल 2020 मध्ये, याला कारणही तसेच होता, याचदरम्यान सिरीजचा चौथा सिझन प्रदर्शित झाला होता. भारतातील प्रेक्षकांनी जेव्हा सिरीजचे पहिले 2 सिझन पाहिले तेव्हाच त्यांना याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि म्हणून सीरिजला प्रचंड प्रतिसाद मिळाला. असंही हिंसा, गुन्हेगारी, चोरी यांसारख्या विषयात काहीसा अधिक रस असणार्‍या भारतीय प्रेक्षकांना ही सिरीज आवडण्यामागे काही विशेष कारणं होती. पहिलं म्हणजे यात असलेले डिटेलिंग, दुसरं म्हणजे कथा आणि तिसरं म्हणजे यातील पात्रं आणि त्यांचा जबरदस्त अभिनय.

मनी हाईस्टचा विषय तिच्या नावातच दडलेला आहे. एका दरोड्याची ही गोष्ट. फक्त हा दरोडा कुठलाही छोटा मोठा दरोडा नसून याची सुरुवात होते रॉयल मिंट ऑफ स्पेनमधून, स्पेनमधील ही अशी एक जागा आहे जिथे चलन छापले जाते. दरोडेखोरांची एक टोळी या रॉयल मिंटमध्ये घुसते आणि काही लोकांचे अपहरण करून हा 11 दिवसांचा दरोडा सुरू होतो. पहिल्या 2 सीझनमध्ये ही पहिली चोरी होते आणि उरलेल्या 3 सीझनमध्ये बँक ऑफ स्पेनमधील सोन्याची चोरी होते. एकूण 5 सीझन आणि सरासरी तासभर अवधीचे 41 एपिसोड्स असलेली ही सिरीज का पाहावी? जर फक्त 2 चोर्‍याच आपल्याला बघायच्या असतील तर मग त्यासाठी आपल्या जीवनातील 41 तास? कशासाठी द्यायचे असा प्रश्न अनेकांना पडला असेलही, पण मनी हाईस्ट केवळ एका दरोड्याची गोष्ट नाहीये.

- Advertisement -

इथे एका चोरीदरम्यान समांतर अनेक कथा सुरू असतात पोलीस यंत्रणा, माध्यमं, दरोडेखोर त्यांच्या पूर्व कथा दाखविल्या आहेत. सिझनची सुरुवात जिथून होते तो काळ 2008च्या दरम्यानचा आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या काळात एक व्यक्ती चोरांना एकत्र आणतो आणि जिथे देशाचं चलन छापलं जातं, अशा ठिकाणी चोरीची योजना तयार करतो. ही चोरी करताना हा मुख्य सूत्रधार थेट सहभाग न घेता, आपल्या साथीदारांना बाहेर राहून मदत करतो आणि पोलीस यंत्रणांशी निगोसिएशन करण्याचं काम करतोय, ही चोरी करताना चोरट्यांकडे स्पेनमधील जनतेने कनवाळू नजरेने पाहावं हा प्रोफेसरचा उद्देश आहे. दाली मास्क, अंगभर लाल कपडे आणि बेला चाओ गाणं गाणारी ही मंडळी चोर न वाटता प्रस्थापितांविरुद्ध आणि व्यवस्थेविरुद्ध लढणारे योद्धे वाटावेत, त्यांना सहानुभूती मिळावी. हेच या चोरीचा सूत्रधार असलेल्या प्रोफेसरचे उद्दिष्ट आहे.

सिनेमा आणि वेबसिरीज या दोघांमधला बेसिक फरक आहे कालावधीचा, जिथे सिनेमाला दोन अडीच तासांची मर्यादा असते तिथे सीरिजला ही मर्यादा नसल्याने डिटेलिंग करता येते. मनी हाईस्टबद्दल सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे यात केलेली डिटेलिंग, चोरीच्या प्रत्येक घटनेसाठी असलेला प्लॅन बी असो किंवा चोरीत सामील झालेल्या पात्रांची बॅक स्टोरी, डिटेलिंग नसती तर कदाचित ही सिरीज इतकी गाजलीच नसती. प्रेक्षक चोरीसारख्या घटना तोपर्यंतच पाहतो जोवर त्याला त्या कथेत तथ्यं दिसायला लागतात, सर्वांना माहितीये की, ही चोरीची घटना काल्पनिक आहे, पण ती घटना काल्पनिक वाटत नाही. हे या सीरिजच्या दिग्दर्शक आणि लेखकांचं कौशल्य आहे. यात प्रत्येक गोष्टीसाठी तथ्य दिलं आहे, कारण त्यांनाही माहिती होते की, ज्या क्षणाला लॉजिक हरवतं त्याच क्षणाला प्रेक्षकांची कथेशी असलेली नाळदेखील तुटून जाते.

मनी हाईस्ट सीरिजचे एकूण 41 एपिसोड्स आहेत ज्यात शेवटचे 5 एपिसोड्स सोडले तर कुठेही हे लॉजिक हरवत नाही. म्हणून प्रेक्षक पूर्णवेळ कथेशी जोडलेला असतो. दुसरी जमेची बाजू म्हणजे यातील कलाकारांचा दमदार अभिनय प्रोफेसरची भूमिका करणारा अल्वारो मोर्टे तर उत्तमच आहे, पण प्रोफेसर सोबतच टोकियो, बर्लिन, रकेल, एलिसिया यांसारखी काही पात्रदेखील कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील अशी आहेत. सिरीजमध्ये बेला चाओसोबत अनेक गाणीदेखील आहेत, जी कथेत कुठेही अडथळा न बनता त्या प्रवाहाबरोबर जातात. विशेषतः अ‍ॅक्शन सीन्स दरम्यान बॅकग्राउंडला चालणारी गाणी, ऐकायला चांगली वाटतात.

मनी हाईस्टच्या शेवटच्या सिझनबद्दल आणि एकूणच या कथेच्या शेवटाबद्दल अनेक चाहत्यांमध्ये निराशा आहे. अनेकांना कथेचा हा शेवट अपेक्षित नव्हता तर काहींना हा शेवट आवडला नाही. पण भावनिक करणार्‍या या शेवटापेक्षा निर्मात्यांसाठी महत्वाचा होता तो त्यांचा भविष्यातील प्रोजेक्ट. 2023 साली बर्लिन नावाची नवीन सिरीज येणार असे निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते, त्याच सिरीजसाठीचा प्लॉट तयार करण्यासाठी या भागाचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. मनी हाईस्टचा हा शेवटचा भाग थ्रिलपेक्षा जास्त भावनिक होतो, इथं अ‍ॅक्शन कमी आणि इमोशन्स जास्त दिसतात, अनेकवेळा अनेकांचे मनपरिवर्तन होते, तरीही जो शेवट या चोरीचा दाखवलाय तो बेला चाओ म्हणावा असा तर नक्की आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -