घरफिचर्ससारांशमोरा गोरा अंग लई ले.. मोहे श्याम रंग दई दे...

मोरा गोरा अंग लई ले.. मोहे श्याम रंग दई दे…

Subscribe

बंदिनीची नायिका कल्याणी (नूतन) मनातल्या मनात बिकाशवर (अशोक कुमार) प्रेम करू लागते. एका रात्री स्वयंपाकघरातलं काम आवरून ती काहीतरी गुणगुणत घराच्या अंगणात येते. तिला आपल्या प्रियकराला भेटायला जायची तीव्र ओढ आहे, पण तिचा गोरा रंग चांदण्या रात्री अडथळा ठरतोय. म्हणून ती सावळ्या रंगाची मागणी करते. जेणेकरून रात्रीच्या अंधारात ती कोणाला दिसणार नाही. अतिशय साध्या, सोप्या नि बोलीभाषेत गुलजारने नायिकेच्या अलवार भावना मांडल्या आहेत. त्यातूनच मोरा गोरा अंग लई ले, या गीताची निर्मिती झाली.

‘दो बिघा जमीन’ आणि ‘देवदास’ सारख्या अभिजात चित्रपटांचे दिग्दर्शक बिमल रॉय यांचा ‘बंदिनी’ हा चित्रपट १९६३ मध्ये प्रदर्शित झाला होता. यात नूतन, धर्मेंद्र, अशोक कुमार आणि तरुण बोस प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटाची कथा चारूचंद्र चक्रवर्तीची बंगाली कादंबरी ‘तामसी’वर आधारित होती. पटकथा नबेंदू घोष यांनी, तर संवाद पॉल महेंद्र यांचे होते. या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट छायाचित्रण आणि उत्कृष्ट ध्वनिमुद्रण असे सहा फिल्म फेअर पुरस्कार मिळाले. बिमलदांची ‘सुजाता’ नंतरची ही दुसरी स्त्रीप्रधान कलाकृती. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत खेड्यातल्या सर्वसामान्य स्त्रियांचं योगदान अधोरेखित करणारा हा पहिला चित्रपट असावा. बिमलदांचा हा शेवटचा चित्रपट. याला सचिनदेव बर्मन यांचं संगीत होतं, तर एक गाणं वगळता सर्व गाणी कवी शैलेंद्रची होती. गुलजारने यात ‘मोरा गोरा अंग लई ले…’ हे एकमेव गाणं लिहिलंय. याच गाण्याविषयी जाणून घेऊया.

मोरा गोरा अंग लई ले, मोहे शाम रंग दई दे
छुप जाऊंगी रात ही में, मोहे पी का संग दई दे

- Advertisement -

एक लाज रोके पय्या, एक मोह खींचे बय्या
जाऊ किधर ना जानू, हम को कोई बताई दे

बदरी हटा के चंदा, चुपके से झांके चंदा
तोहे राहू लागे बैरी, मुस्काए जी जलाईके

- Advertisement -

कुछ खो दिया है पायके, कुछ पा लिया गवाईके
कहां ले चला है मनवा, मोहे बावरी बनाईके

चित्रपट तयार होत असताना सचिनदा आणि शैलेंद्र यांच्यात काही कारणास्तव मतभेद झाले. रागाच्या भरात सचिनदा बोलले की, ते आता शैलेंद्रसोबत काम करणार नाही. बिमलदांना चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचं चित्रीकरण करणं खूप गरजेचं झालं होतं. सचिनदा-शैलेंद्र वादामुळे ते अडचणीत आले. त्यांनी सचिनदांची खूप समजूत घालूनही फायदा झाला नाही. त्यांनी ही बाब शैलेंद्र यांना सांगितली. तेदेखील बुचकळ्यात पडले. बिमलदांची ही अडचण कशी सोडवायची याचा विचार करू लागले. त्यावेळी शैलेंद्र ‘बॉम्बे युथ कॉयर’ या संस्थेचे सदस्य होते. गुलजारही या संस्थेचे सभासद होते. या संस्थेच्या प्रमुख किशोर कुमार यांच्या पत्नी रूमादेवी होत्या. गुलजार तेव्हा एका गॅरेजमध्ये काम करायचे. त्यांना लेखक व्हायचं होतं. हे शैलेंद्रना माहीत होतं. त्यांनी गुलजारला बिमलदांना भेटायला सांगितलं. शिवाय त्यांना एक गाणं लिहून हवं असल्याचंही सांगितलं, पण गुलजारची गाणी लिहायची इच्छा नव्हती आणि चित्रपटासाठी लेखन करावंसंही त्यांना वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी शैलेंद्रना नकार दिला, पण शैलेंद्रनी खूप आग्रह केल्यामुळे गुलजार बिमलदांना भेटायला आपला बंगाली मित्र देबूसोबत गेले.

बिमलदांनी गुलजारला वरून खालपर्यंत न्याहाळलं नि देबूकडे पाहत विचारलं की, भद्रलोक कि बैष्णव कोबिता जाने? (यांना वैष्णव कवितेविषयी माहिती आहे का?) यावर देबूने उत्तर दिलं की, गुलजारला बंगाली येतं. या उत्तराने बिमलदा लाजले. त्यांनी चित्रपटातल्या गाण्याचा प्रसंग गुलजारला समजावून सांगितला आणि चाल (धून) ऐकण्यासाठी सचिनदाकडे पाठवलं. त्यांच्याकडून गुलजारने गाण्याची चाल घेतली. एका आठवड्यानंतर गाणं लिहून ते सचिनदांकडे गेले. सचिनदांना गुलजारने लिहिलेलं गाणं आवडलं. मग गुलजारने बिमलदांना गाणं ऐकवू का, अशी विचारणा केली. त्यावर तुला गाता येतं का, असं विचारलं. गुलजारने नाही म्हटल्यावर बिमलदांना गाणं ऐकवायला जाण्यास नकार देत सचिनदा म्हणाले की, अरे, तू कसंही गाऊन दाखवशील आणि म्हणून माझी धून ते नाकारतील. बिमलदांना गाण्याचे शब्द आणि धून दोन्ही गोष्टी पसंत पडल्या. हे गाणं गाण्यासाठी त्यांनी लताची निवड केली. गुलजारला हे जे काही घडलं होतं ते सारं स्वप्नवत वाटत होतं. एका आठवड्यापूर्वी ते एका गॅरेजमध्ये मेकॅनिक होते आणि एकाच आठवड्यात त्यांनी लिहिलेल्या गाण्यामुळे सचिनदा व लतासोबत जोडले गेले. खरंच ही घटना एखाद्या स्वप्नासारखीच होती.

‘बंदिनी’ची नायिका कल्याणी (नूतन) मनातल्या मनात बिकाशवर (अशोक कुमार) प्रेम करू लागते. एका रात्री स्वयंपाकघरातलं काम आवरून ती काहीतरी गुणगुणत घराच्या अंगणात येते. या प्रसंगावर हे गाणं बेतलेलं आहे. गाणं तयार झाल्यावर बिमलदा आणि सचिनदा यांच्यात वाद उद्भवला. बिमलदांच्या मते गाण्याचं चित्रीकरण घरात व्हावं, तर सचिनदांनी आऊट डोअरसाठी इंटरल्यूड तयार केली होती. त्यामुळे हे गाणं घराच्या बाहेर चित्रीत व्हावं असं त्यांचं म्हणणं होतं. बिमलदा म्हणत होते की, अशी व्यक्तिरेखा घराच्या बाहेर येऊन गाणं नाही म्हणू शकत. यावर सचिनदा म्हणाले की, ती जर घराबाहेर जाणार नाही तर बापासमोर कसं काय गाणं म्हणेल? आपला मुद्दा स्पष्ट करताना ते म्हणाले की, तिने बापाकडूनच वैष्णव कविता ऐकलेल्या आहेत, तर मग ती का नाही गाऊ शकणार? ही कविता नाही गाणं आहे, असं यावर सचिनदा उत्तरले. हे ऐकून ते म्हणाले की, मग कविता लिहा. ती कविता गाईल. सचिनदांना हे पटलं नाही. ते म्हणाले की, घरात गाणं गुदमरेल.

बिमलदा म्हणाले की, अंगणात चालेल पण घराबाहेर नको. सचिनदा म्हणाले, असं असेल तर मी गाणंच नाही बनवत. शेवटी दोघेही गाणं अंगणात करायला राजी झाले. ही सगळी पार्श्वभूमी ध्यानात घेऊन गुलजारने हे गाणं लिहिलं. ते शैलेंद्रना खूप आवडलं. कदाचित मलाही इतकं चांगलं लिहिता आलं नसतं, असंही ते म्हणाले. बिमलदा व शैलेंद्रची इच्छा होती की उर्वरित गाणीही गुलजारने लिहावीत, पण सचिनदाने नकार दिला. त्यांचं नि शैलेंद्रचं मनोमीलन झाल्याने बाकीची गाणीही शैलेंद्रच लिहिणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. सचिनदांचा प्रचंड दबदबा असल्याने बिमलदा, शैलेंद्रचा नाईलाज झाला. त्यांना गुलजारसाठी वाईट वाटलं. गुलजार यावर शांत राहिले. आपल्या प्रियकराला भेटायला जायची तीव्र ओढ आहे, पण तिचा गोरा रंग चांदण्या रात्री अडथळा ठरतोय. म्हणून ती सावळ्या रंगाची मागणी करते. जेणेकरून रात्रीच्या अंधारात ती कोणाला दिसणार नाही. अतिशय साध्या, सोप्या नि बोलीभाषेत गुलजारने नायिकेच्या अलवार भावना मांडल्या आहेत. गुलजार-सचिनदांचं हे एकमेव गाणं. पुढे सचिनपुत्र राहुलदेवसोबत गुलजारने खेळलेली श्रवणीय खेळी रसिकांच्या मनात चिरंतन झाली.

–प्रवीण घोडेस्वार 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -