घरफिचर्ससारांशजगण्याचे जड झाले ओझे !

जगण्याचे जड झाले ओझे !

Subscribe

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB)काही दिवसांपूर्वी 2020 साली घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली. गेल्या वर्षी देशात 22,372 गृहिणींनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. याचाच अर्थ दिवसाला 61 महिला स्वत:ला संपवत आहेत. म्हणजेच देशात 25 मिनिटांला एक महिला आत्महत्या करत आहे. यानुसार 2020 मध्ये भारतात एकूण 153,052 आत्महत्यांची नोंद करण्याची आली. यात 14.6 टक्के गृहिणी होत्या. दरम्यान, देशात महिलांचा आत्महत्येचा आकडा वाढत असल्याने 1997 पासूनच NCRB या आत्महत्येच्या घटनांचा डाटा गोळा करत आहे. तेव्हापासून देशात दरवर्षी 20 हजाराहून अधिक महिला आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे. या महामारीने प्रत्येकाचं आयुष्य ढवळून निघालंय. कोणाचं जवळंच माणूस गेलं तर कोणाची नोकरी गेली तर कोणाचं घरदार गेलं. पण याहून सगळ्यात भयंकर जर काही झालं असेल तर आधीच गर्दीत हरवत चाललेल्या नातेसंबंधात ज्या उरल्या सुरल्या संवेदना होत्या त्या या महामारीत पार गोठून गेल्या आहेत. त्याचा विशेष परिणाम हा जगभरातील महिला वर्गावर झाला असला तरी त्याची विशेष झळ ही भारतीय नारीच्या मानसिकतेला बसली आहे. यामुळे कोरोना काळात इतर देशांतील महिलांच्या संख्येच्या तुलनेत सर्वाधिक आत्महत्या या भारतीय महिलांनी केल्याचं भयानक सत्य समोर आलं आहे.

विशेष म्हणजे आत्महत्या करणार्‍या या सर्व महिला विवाहित आहेत. दर 25 मिनिटांला एक विवाहित महिला अशी त्यांच्या आत्महत्यांची नोंद केली जात आहे. यातील बहुतेक आत्महत्या या घरगुती हिंसाचारातून झाल्या आहेत. ही देशासाठीच नाही तर समाजासाठीही चिंतेची बाब आहे. आत्महत्या करणार्‍या मातांची वाढती संख्या मेंदू सुन्न करणारी आहे. यामुळे महिलांसाठी सुरक्षित वातावरण देणारी विवाह संस्था भारतीय महिलांच्या मुळावर उठली आहे का, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB)काही दिवसांपूर्वी 2020 साली घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली. गेल्या वर्षी देशात 22,372 गृहिणींनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. याचाच अर्थ दिवसाला 61 महिला स्वत:ला संपवत आहेत. म्हणजेच देशात 25 मिनिटांला एक महिला आत्महत्या करत आहे. यानुसार 2020 मध्ये भारतात एकूण 153,052 आत्महत्यांची नोंद करण्याची आली. यात 14.6 टक्के गृहिणी होत्या. दरम्यान, देशात महिलांचा आत्महत्येचा आकडा वाढत असल्याने 1997 पासूनच NCRB या आत्महत्येच्या घटनांचा डाटा गोळा करत आहे. तेव्हापासून देशात दरवर्षी 20 हजाराहून अधिक महिला आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे.

आत्महत्या करणार्‍या बहुतेक महिलांना मुलंदेखील आहेत. तर यातील काहींची मुलं अंगावर पिणारी तान्ही बाळं आहेत. मग असं असताना या महिलांच्या मनात आत्महत्या करताना एकदाही आपल्या मागे लेकरांचं काय होणार असा विचार कसा आला नसेल असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. तर या प्रश्नाचं उत्तर नुकतेच सरलेल्या 2021 मध्ये सापडलं. कारण 2021 च्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत अनेक महिलांनी मुलांना ठार मारुन आत्महत्या केल्या तर काहींनी एकाचवेळी स्वत:बरोबर मुलांचही आयुष्य संपवलं. एकीकडे कोरोना महामारी आणि घरात कधीही न संपणारा जाच यात अनेक महिलांचे मानसिक खच्चीकरण झाले. यातूनच त्यांनी जीवन संपवल्याचे तपासातही उघड झाले आहे.

- Advertisement -

थोडं अजून मागे वळून बघितलं तर जगातील महिला म्हणा किंवा भारतीय महिलांचं आत्महत्या करणं म्हणा ही तशी काही नवीन घटना नाहीये. पण भारतातील विवाहित महिलांमधील आत्महत्येचा कल हा समाजावर दूरगामी परिणाम करणारा आहे. याच पार्श्वभूमीवर हॉवर्ड टी एच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने भारतीय महिलांच्या या मनोवस्थेचा अभ्यास केला. त्यात आत्महत्या करणार्‍या जगभरातील महिलांपैकी 36 टक्के महिला या एकट्या भारतात असल्याचं निदर्शनास आलं.

2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्या वैद्यकीय जर्नल लॅसेंटमध्ये आत्महत्या करणार्‍यांमध्ये 15 ते 29 या वयोगटातील तरुणींचे, महिलांचे आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले होते. म्हणजेच फक्त 2020 च नाही तर 2018 मध्येही जगात आत्महत्या करण्यात भारतीय महिलाचं पुढे असल्याचे समोर आले होते. एकीकडे कोरोना महामारीच्या काळात जरी महिलांच्या आत्महत्या वाढल्या असल्या तरी त्याआधीही भारतीय विवाहित महिलांना जगण्यापेक्षा मरणंच जवळंच वाटत होतं हेदेखील या निमित्ताने अधोरेखीत झालं आहे. यातील बर्‍याच जणींच्या आत्महत्यांचा थेट संबंध हा घरगुती हिंसाचाराबरोबर आहे. यातील अनेक महिला या नोकरदार आहेत तर काहीजणी शेतकरीही आहेत.

प्रत्येक महिलेचे आत्महत्येचे कारण थोड्याफार फरकाने जरी वेगवेगळे असले तरी त्याचे मूळ हे घरातच आहे. हार्वर्ड टी .एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने केलेल्या सर्वेक्षणातही भारतीय समाजाच्या दुटप्पीपणावर बोट ठेवण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार भारतीय समाज एकीकडे महिला सक्षमीकरणावर, महिलांच्या समान हक्कांवर बाता मारत असला तरी प्रत्यक्षात मात्र महिलांना समाजात महत्व दिले जात नाही. यामुळे विवाहित भारतीय महिलांना आजही स्वत:च्या अस्तित्वासाठी बाहेरही आणि घरातही झगडावे लागत आहे. यात सुशिक्षित महिलांबरोबरच उच्चशिक्षित आणि निरक्षर महिलांचाही समावेश असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर आत्महत्या करणार्‍या महिलांमध्ये याच वर्गातील महिला आहेत. ही देखील खेदाची गोष्ट आहे.

भारतीय महिला सर्वच क्षेत्रात जरी पुढे जात असल्या तरी आजही भारतीय समाजात महिलांचे पुरुषांच्या पुढे जाणे लोकांना पचनी पडत नाही. यातूनच वादविवाद, कुटुंबात भांडणतंटे होत आहेत. तर अशाच प्रकारच्या दुय्यम वतर्णुकीचा सामना अनेक महिलांना कामाच्या ठिकाणीही करावा लागत आहे. महिला असल्याने घरातही तिच्याकडूनच त्यागाची अपेक्षा ठेवण्यात येते तर कामाच्या ठिकाणी तिच्यात गुणवत्ता असूनही केवळ महिला असल्याने पुरुष सहकार्‍याकडून वारंवार तिला डिवचले जाते. तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवली जाते. तिचं मानसिक खच्चीकरण अगदी व्यवस्थित केलं जातं. या दुहेरी मानसिक छळात लैंगिक छळही अंतर्भूत आहेच. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत प्रत्येकीत असतेच असे नाही, शिवाय तिला या लढाईत घरातल्यांचा किती पाठिंबा मिळेल तेही सांगता येत नाही.

यामुळे त्याच घुसमटीत अनेकजणींनी आपलं आयुष्य संपवलं, तर दुसरीकडे आजही समाजात अशिक्षितच नाही तर सुशिक्षित कुटुंबातही हुंड्यासाठी महिलांचा छळ होतोय. त्याला कंटाळूनही अनेकजणींनी पोराबाळांसकट आयुष्य संपवत आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात भारतीय महिलांना याच मानसिक आणि शारिरीक अत्याचाराचा सर्वाधिक सामना करावा लागला. शेवटी असहाय्य झाल्याने यातील अनेकजणींनी आयुष्य संपवले. तर काहीजणींना आपल्यानंतर मुलांचा सांभाळ कोण करेल या काळजीने इतके ग्रासलं की त्यांनी स्वत:बरोबरच मुलांनाही संपवलं. नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील भारतीय महिलांना वर्क फ्रॉम होम काळात सामोरे जावे लागणार्‍या ताणावर चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात महिला व मुलांवरील अत्याचाराची नोंद घेत चिंता व्यक्त केली होती.

एकंदर पाहता आज ना उद्या कोरोना महामारीचा अंत होणार हे नक्की आहे. पण भारतीय महिलांच्या पाचवीला पूजलेली ही असमानतेची महामारी केव्हा संपेल हे तूर्तास सांगणे तरी कठीण आहे. खरं तर महिला सक्षमीकरण, महिलांचे कायदे, स्त्री-पुरुष समानता ही आजची गरज जरी असली तरी समाजाची महिलांप्रती असलेली मानसिकता बदलणे हे सर्वात जास्त गरजेचे आहे. नाहीतर महिलांसाठी करण्यात आलेले कायदे, सुरक्षा या फक्त दिखाव्यापुरत्या कागदावर राहतील आणि हा कायदा करणार्‍यांच्या घरातील गृहलक्ष्मी मात्र कधी विष प्राशन करुन, कधी गच्चीवरून उडी मारून तर कधी छातीशी लेकराला कवटाळून विहिरीत उड्या मारून आयुष्य संपवत राहील.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -