घर फिचर्स सारांश नसीब से ज्यादा...

नसीब से ज्यादा…

Subscribe

टीव्हीवर एकामागून एक आकडे येत होते. आपला आकडा कधी येतो.. तो येतो की नाही याची प्रतीक्षा करत लोक उभे होते. मग कोणाला हवा असलेला आकडा आला की त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद दिसायचा. कोणाचा आकडा फेल जायचा.. मग त्याच्या चेहर्‍यावर पैसे गमावल्याचं दुःख. मी फार पूर्वी दिवाळी सोडत असली की लॉटरीची तिकिटे घेऊन बघायचो. हो..आपल्या नशिबात जर लॉटरी लागणं असेलच.. तर दहा वीस रुपयाचं तिकीट तर घ्यायला हवं, पण तिकीट घेऊनसुद्धा मला कधी लॉटरी लागली नाही.

– सुनील शिरवाडकर

सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’मध्ये एक प्रसंग आहे. नित्याला जुगाराचा नाद असतो. कुठल्यातरी अड्ड्यावर जाऊन त्यानं पैसे लावलेले असतात. त्याची नोंद असलेली चिठ्ठी तो श्रेयसला दाखवतो. त्या बोटभर चिठ्ठीबद्दल श्रेयस शंका घेतो. त्यावर नितीन म्हणतो..
नाही यश..जुए में कभी ऐसी चालबाजी नहीं होती.
यु गेट युवर पेमेंट इफ द चिट इज आँथेटीक. कोणताही जुगार..जो देशाच्या कानाकोपर्‍यात पसरलेला असतो..तो विश्वासावर चालतो.
खरं आहे हे. जुगाराच्या..म्हणजेच मटक्याच्या अड्ड्यावर जाऊन पैसे लावणे हे आत्ता आत्तापर्यंत चालू होते. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी दूध बाजारात एक मटक्याचा अड्डा होता. एकेकाळी तो गोठा होता. कालांतराने गोठा दुसरीकडे शिफ्ट झाला..आणि त्या गोठ्यात अड्डा सुरू झाला. सकाळपासून तिथे पैसे लावणार्‍यांची गर्दी असे. मुंबई..कल्याण..वरळी..असे बाजार असायचे. सकाळी एक आकडा.. आणि संध्याकाळी एक आकडा जाहीर व्हायचा. त्यालाच ओपनचा..क्लोजचा आकडा म्हणायचे. पैसे लावल्यावर एक बसचं तिकीट असतं त्या साईजची चिठ्ठी मिळायची. अगदी पातळ कागद.. सिनेमाच्या तिकिटीसारखा. त्यावर वाचता येईल इतक्याच सुवाच्य अक्षरात आकडे असत. ती बोटभर चिठ्ठी घडी करून काळजीपूर्वक संध्याकाळपर्यंत जपून ठेवायची. बरेच जण शर्टाची बाही दुमडून त्यात चिठ्ठी ठेवायचे. संध्याकाळी पुन्हा गोठ्यात जाऊन कोणता आकडा आला ते पहायला गर्दी. १ रुपयाला ९ रुपये असा साधारण तिथला दर. चिठ्ठी कितीही घड्या केलेली असो वा चुरगळलेली असो..पण तुमचा आकडा आला आणि कितीही मोठे पेमेंट असले तरी ते तात्काळ मिळायचे. तिथे अविश्वास हा शब्दच नसायचा.
तिथे जाणारा वर्ग वेगळाच होता. सर्वसामान्य पापभिरू माणसं तिथे जायला घाबरायची, पण नशीब अजमावून बघायचं असतंच ना प्रत्येकाला. ती तर माणसाची प्रवृत्ती असते. मग अशी तुमच्या आमच्यासारखी माणसं लॉटरीचं तिकीट घेऊन बघायची. त्यातही दिवाळी बंपर..दसरा सोडत असेल तर तिकीट घेणारचं. कित्येक साधी माणसं राज्य लॉटरीने लक्षाधीश झालीही होती.
महाराष्ट्र राज्य लॉटरी ही सर्वात विश्वसनीय मानली जायची. दर आठवड्यात सोडत असायची. सोंड उंचावलेल्या..आणि त्या सोंडेत माळ धरलेल्या हत्तींचा लोगो सगळ्यांनाच आकर्षित करत होता. कालांतराने पूर्वेकडील काही राज्यांची लॉटरीची तिकिटे आपल्याकडे मिळू लागली. त्यातही लाभलक्ष्मी ही जास्त फेमस झाली. रोजच्या रोज सोडत जाहीर होऊन बक्षिसं मिळत होती. त्यानंतर ऑनलाईन लॉटरी सुरू झाली. ही गोष्ट दहा-वीस वर्षांपूर्वीची. आमच्या इथे मेनरोडवर एक छोटी टपरी होती. लॉटरीची तिकिटे विकणारी. कालांतराने त्याने एक गाळा घेतला. तो माझा मित्रच असल्याने त्या भागात गेलं की भेट होत असे.
तर एकदा त्याच्या दुकानात गेलो. शटर उघडं होतं..पण पडदा लावलेला होता. आत गेलो, तर समोर भिंतीवर टीव्ही. त्याच्या आजुबाजुला अनेक पोस्टर्स. त्यावर लहान मोठ्या आकाराचे अनेक आकडे. बारा-पंधरा जण टीव्हीकडे तोंड करून उभे. टीव्हीवर पण एकामागून एक आकडे येत होते. आपला आकडा कधी येतो..तो येतो की नाही याची प्रतीक्षा करत ते लोक उभे होते.
मग कोणाला हवा असलेला आकडा आला की त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद दिसायचा. कोणाचा आकडा फेल जायचा..मग त्याच्या चेहर्‍यावर पैसे गमावल्याचं दुःख. मी फार पूर्वी दिवाळी सोडत असली की लॉटरीची तिकिटे घेऊन बघायचो. हो..आपल्या नशिबात जर लॉटरी लागणं असेलच..तर दहा-वीस रुपयाचं तिकीट तर घ्यायला हवं, पण तिकीट घेऊनसुद्धा मला कधी लॉटरी लागली नाही.
त्या ऑनलाईन लॉटरीच्या दुकानात उभा होतो. मला पुन्हा एकदा नशीब अजमावेसे वाटले. मी त्या माझ्या मित्राला.. म्हणजे दिनेशला तसं विचारलं. ही लॉटरी कशी खेळतात.. कुठल्या आकड्यावर पैसे लावू वगैरे.
तर त्यानं चक्क नकार दिला. मला हात धरून बाहेर आणलं.. आणि म्हणाला..हे तुझं काम नाही. तू पुन्हा आत येऊ पण नकोस. आपण बाहेर कुठेतरी भेटत जाऊ. त्यानंतर आमच्या भेटी होत राहिल्या..पण त्या दुकानाच्या बाहेर. कधीतरी लॉटरीचं तिकीट घेऊन नशीब अजमावेसे वाटले होते.. नंतरच्या काळात तेही बंद झाले.
महाभारतातील द्युतापासून..तर अलीकडच्या जंगली रमीपर्यंतचा हा प्रवास.
असं म्हटलं जातं की, समय से पहले और नसीब से जादा किसी को कुछ मिलता नहीं, पण त्यात थोडा बदल करून असं म्हणावसं वाटतं की..
समय से पहले नसीब से जादा मेहनत करने से सबकुछ मिलता है.

- Advertisement -

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -