ओटीटीचा बंपर सेल

लॉकडाऊन काळात ओटीटी माध्यमांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला, कधी नव्हे ते इतके लोक ऑनलाईन कंटेंट पाहू लागले होते. तेव्हा दिवाळीत यांना याचा फायदा होईल, असं चित्र आहे. हॉटस्टार, अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्स या तीनही आघाडीच्या माध्यमांवर दिवाळीत बरेच हिंदी सिनेमे रिलीज करण्यात आले आहेत. नेटफ्लिक्सवर लुडो, प्राईमवर छलांग, हॉटस्टारवर लक्ष्मी यांसारखे सिनेमे दिवाळीच्या काळात रिलीज करण्यात आलेत. त्यांना मिळणारा या काळातील प्रतिसाद हा बोनस सारखा ठरणारा आहे, कारण सिनेमागृह सुरू झाल्यानंतर ही बहुतांश सिनेरसिक हा याच ओटीटीच्या भरवशावर आहे. संपूर्ण फॅमिलीसोबत सिनेमाला जाऊन हजार पंधराशे रुपये खर्च करण्यापेक्षा शंभर दोनशे रुपयात ओटीटीच सबस्क्रिप्शन घेऊन घरीच सिनेमे पाहण्यात लोकं समाधान मानत आहेत. कोरोनाचा फटका प्रत्येक इंडस्ट्रीला बसलाय हे सत्य आहे.

पूर्वी मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की, माणसाला मनोरंजनाची आठवण यायची. हळूहळू मनोरंजन हा आपल्या जीवनाचा भाग बनत गेला आणि मग मूलभूत गरजांसोबत मनोरंजनाच्या माध्यमांनादेखील महत्व प्राप्त झाले. असं असलं तरीही पोट भरल्याशिवाय आपल्याला चैनीची आठवण येत नाही, हे सत्य आहे. कोरोना आला आणि अनेकांच्या उत्पन्नाला ब्रेक लागला, जिथे खायचे वांदे तिथे सिनेमासाठी पैसे खर्च कोण करणार ? अशी स्थिती आहे. भारतात दिवाळी म्हटलं की, सिनेमावाल्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी सुवर्णकाळ असतो, वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारे सिनेमे याच काळात प्रदर्शित होतात.

बॉक्स ऑफिसवर बॉलिवुडच्या मोठ्या सुपरस्टार्सचे सिनेमेसुद्धा याच मुहूर्तावर क्लॅश होतात. सिनेमाच्या रीलिजसाठी दिवाळीची वेळ मिळावी म्हणून इंडस्ट्रीत स्पर्धा रंगते, एकाच दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचे रेकॉर्डस याच दिवसांत बनले जातात. जेव्हा दिवाळी येते तेव्हा प्रेक्षक कथा, अभिनेता किंवा दिग्दर्शक पाहून सिनेमा पाहायला जात नसतो, तो केवळ एन्जॉय करण्यासाठी थिएटरमध्ये येतो. म्हणजे समजा रिव्ह्यू येण्याची वाट पाहून मग जर प्रेक्षक दिवाळीत सिनेमा पाहायला गेले असते, तर भारतात एकाच दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम ठग्स ऑफ हिंदुस्तान सारख्या सिनेमाच्या नावावर असता का ? एका दिवसात या सिनेमाने 50 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला होता, आता ही गोष्ट वेगळी की त्या पन्नासचे शंभर होण्यासाठी त्याला पुढचे 8 दिवस लागले, पण पहिला दिवस मात्र याच सिनेमाचा राहिला.

गेल्या काही वर्षात बॉलीवुडमध्ये हा ट्रेंड बराच गाजला आहे. केवळ सुट्ट्या आहेत आणि एन्जॉय करायचा आहे म्हणून लोक दिवाळीत सिनेमा पाहायला गेल्याने, रावण, सन ऑफ सरदार, क्रिश 3, हॅपी न्यू इयर, प्रेम रतन धन पायोपासून ते मागच्या वर्षीच्या हाऊसफुल 4 पर्यंत अनेक थिल्लर सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. आता विचार करा? हेच सिनेमे जर मे किंवा जूनमध्ये रिलीज झाले असते तर, यांना इतका प्रतिसाद मिळाला असता का? एकंदरीत काय तर दिवाळीमध्ये प्रेक्षक सिनेमागृहांकडे वळतात आणि यामुळेच इंडस्ट्रीची दिवाळी साजरी होते. अगदी जसं दिवाळीत साड्या, फराळ आणि फटाक्यावाल्यांचा बिजनेस होतो, तसाच फिल्म मेकर्सचादेखील मोठा फायदा होत असतो. पण या वर्षी हे चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. कोरोनामुळे जी अवस्था बाजाराची आहे, त्याहीपेक्षा वाईट अवस्था इंडस्ट्रीची झालीय, सिनेमा निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांची ही दिवाळी कशी असणार ? दिवाळीत इतरांप्रमाणे यांचंही दिवाळं निघलंय का? ओटीटीला दिवाळी बोनस मिळणार का? याच प्रश्नांचा घेतलेला हा आढावा.

पुढच्या वर्षी दिवाळीत रिलीज होणार्‍या सिनेमाची नावं याच वर्षी घोषित केली जातात, त्याच हिशोबाने यावर्षी दिवाळीत 2 मोठे सिनेमे रिलीज होणार होते. त्यातील एक सिनेमा हा नुकताच ओटीटीवर रिलीज करण्यात आलाय आणि दुसर्‍याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. जो सिनेमा ओटीटीवर रिलीज केलाय, त्याला मिळालेल्या प्रतिक्रिया पाहता, मल्टिप्लेक्स मालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असेल. अक्षय कुमारसारख्या हमखास यश मिळवून देणार्‍या सुपरस्टारच्या लक्ष्मी सिनेमाला नेटकर्‍यानी चांगलंच धारेवर धरलंय, हॉटस्टार व्हीआयपीसाठी उपलब्ध असणार्‍या या सिनेमाला लोकांचे अतिशय वाईट असे अभिप्राय आलेत. ज्यामुळे रिलीजनंतरच्या दुसर्‍याच दिवशी सिनेमाला मिळणार्‍या प्रतिसादावर परिणाम झाला.

पण विचार करा, जर हाच सिनेमा थिएटरवर प्रदर्शित झाला असता, तर याला मिळणारा प्रतिसाद असाच राहिला असता का? मला विचाराल तर उत्तर आहे नाही. पहिल्या 2/3 दिवसात या सिनेमाला सुट्ट्यांमुळे चांगली ओपनिंग मिळाली असती. 3 दिवसात 100 कोटी केल्यानंतर आलेले रीव्ह्यू आणि प्रतिक्रिया त्यांच्यासाठी एवढ्या महत्वाच्या ठरत नाही. जो व्यवसाय सिनेमाला करायचा असतो त्याची भरपाई तो पहिल्या 3 दिवसात करून घेतो. म्हणून तसं पाहायला गेलं तर दिवाळीत हॉटस्टारवर लक्ष्मीसारखा सिनेमा रिलीज करून निर्मात्यांनी आपली दिवाळी खराब केलीय, जर हाच सिनेमा नॉर्मल दिवाळीत रिलीज झाला असता तर नक्कीच हे आकडे बदललेले असते. सिनेमा ऑनलाईन रिलीज केला तरी नुकसान आणि थिएटरला आताच रिलीज केला तर प्रेक्षक न मिळण्याचा धोका… एवढंच नाही तर सिनेमा पूर्ण बनवून त्याला 2/3 महिन्यासाठी साठवून ठेवला तर पायरसी आणि लीक होण्याचा धोका, अशा मोठ्या चक्रव्यूहात सध्या बॉलीवुडसह संपूर्ण भारतीय सिनेमा इंडस्ट्री अडकलेली आहे.

कोरोनामुळे इंडस्ट्रीचे नुकसान झाले आहे हे मान्य, पण नेमकं किती? आणि ही नुकसान भरपाई करण्यासाठी इंडस्ट्रीला किती काळ लागू शकतो, असे देखील प्रश्न विचारले जात आहेत. दरवर्षी दिवाळीत बोनस लुटणारी ही इंडस्ट्री आज स्वतः मात्र दिवाळखोरीत गेलीय का? आणि गेली असेल तर हिला बाहेर कसे काढायचे ? हा देखील महत्वाचा विषय आहे. देशभरातील अनेक राज्यात सध्या सिनेमागृह सुरू करण्यात आली आहेत, पण कोरोनाच्या धास्तीने म्हणा किंवा बिघडलेल्या बजेटमुळे म्हणा, थिएटरकडे जाणार्‍यांच्या संख्येत घट झालीये. त्यातच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे कॉर्नर सीटच्या हिशोबाने जाणार्‍या जोडप्यांची स्वप्नं आधीच बेचिराख झाली आहेत. तर जुने सिनेमे पाहण्यात कोणालाही इंटरेस्ट नाही, नवीन सिनेमे लवकर थिएटरवर येतील अशीही चिन्हे नाहीत.

अजून एक बाब म्हणजे अशी एक बातमी वाचण्यात आलीय की नाटक आणि सिनेमांच्या तिकिटांचे दर हे वाढू शकतात, चारही बाजूने अशा प्रकारचं संकट असताना त्यात दरवाढ झाली तर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती उद्भवू शकते. थिएटरवर रिलीज करण्यासाठी इंडस्ट्रीकडे सिनेमे नाहीत, असाही काही भाग नाही. सूर्यवंशी, 83 सारखे अनेक सिनेमे चित्रित होऊन बाजूला पडले आहेत, पण रिलीज करण्याचं धाडस सध्या तरी कुणी दाखवेल याची शाश्वती नाही. कोरोनामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी अशा सिनेमांना चांगली ओपनिंग मिळणं गरजेचं आहे, पण सद्य:परिस्थितीत ती ओपनिंग मिळू शकत नसल्याने मोठे सिनेमे लवकर थिएटरवर दिसणार नाहीत. राहिला मुद्दा कमी बजेट सिनेमांचा तर त्यांना ओटीटीवर हमखास यश मिळण्याची हमी असताना ते रिस्क घेतील का हा देखील प्रश्न आहे. म्हणून इंडस्ट्रीचे यावर्षी दिवाळीत दिवाळं निघालय असं म्हणायला काहीही हरकत नसावी.

लॉकडाऊन काळात ओटीटी माध्यमांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला, कधी नव्हे ते इतके लोक ऑनलाईन कंटेंट पाहू लागले होते. तेव्हा दिवाळीत यांना याचा फायदा होईल, असं चित्र आहे. हॉटस्टार, अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्स या तीनही आघाडीच्या माध्यमांवर दिवाळीत बरेच हिंदी सिनेमे रिलीज करण्यात आले आहेत. नेटफ्लिक्सवर लुडो, प्राईमवर छलांग, हॉटस्टारवर लक्ष्मी यांसारखे सिनेमे दिवाळीच्या काळात रिलीज करण्यात आलेत. त्यांना मिळणारा या काळातील प्रतिसाद हा बोनस सारखा ठरणारा आहे, कारण सिनेमागृह सुरू झाल्यानंतर ही बहुतांश सिनेरसिक हा याच ओटीटीच्या भरवशावर आहे. संपूर्ण फॅमिलीसोबत सिनेमाला जाऊन हजार पंधराशे रुपये खर्च करण्यापेक्षा शंभर दोनशे रुपयात ओटीटीच सबस्क्रिप्शन घेऊन घरीच सिनेमे पाहण्यात लोकं समाधान मानत आहेत.

कोरोनाचा फटका प्रत्येक इंडस्ट्रीला बसलाय हे सत्य आहे. हळूहळू का होईना प्रत्येक इंडस्ट्री त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करते आहे, अशावेळी बॉलीवूडला यातून सावरायला किती वेळ लागेल ? तर सिनेमाचं सुरू झालेलं शूटिंग आणि थिएटर्स ओपनिंग पाहता असं वाटतं की येत्या काही महिन्यातच ही इंडस्ट्री पुन्हा सुरळीत होऊ शकते. याला कारण म्हणजे ही इंडस्ट्री आधीपासून फायद्यात असणारी इंडस्ट्री आहे, सोबतच लोकं फार दिवस सिनेमापासून दूर राहू शकत नाही. ओटीटी कितीही लोकप्रिय झाले तरी सिनेमा पाहण्याची खरी फिलिंग ही मात्र फक्त थिएटरमध्येच येऊ शकते. यावर्षी इंडस्ट्रीला झालेलं नुकसान पुढच्या दिवाळीत का होईना भरून निघावं इतकीच अपेक्षा.

– अनिकेत दिगंबर म्हस्के