घरफिचर्ससारांशप्रेरणादायी माऊली !

प्रेरणादायी माऊली !

Subscribe

कष्टकरी, निरक्षर पण स्वाभिमानी आणि संस्कारक्षम कुटुंब घडवणारी एक आई डॉ. मुरहरी केळे यांनी ‘नानी’ या चरित्रग्रंथाच्या रूपाने समाजासमोर आणली आहे. एका वेगळ्या प्रकारची नानी म्हणजे हा ग्रंथ आहे. अनेकजण आपल्या आईवडिलांना वेगवेगळ्या नावाने हाक मारतात. केळे कुटुंब मात्र आपल्या आईला ‘नानी’ आणि वडिलांना ‘काका’ म्हणून हाक मारतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील केळेवाडी या गावातील वारकरी संप्रदायातील सोपान (काका)आणि सोनाबाई (नानी )धनगर समाजातील अत्यंत आर्थिकदृष्टीने गरीब कुटुंब. ‘जगी ऐसा बाप व्हावा’ हे २०११ साली ह.भ.प.सोपान काका यांचं जीवन चरित्र डॉ. मुरहरी केळे यांनी लिहिलं आणि ते साहित्यिक म्हणून नावारूपाला आले.

विशाल हृदय,आकाशाएवढं काळीज, आभाळाएवढी माया, करुणेचा महासागर, प्रेमाचा झरा म्हणजे आई. आई या शब्दासाठी आणि नात्यासाठी शब्दसाठा संपतो. कोणत्याही आईचं कर्तृत्व एका पानात, कवितेत किंवा एका ग्रंथात खरं तर मावणारच नाही, एवढी मोठी फक्त दोनच अक्षर. आईविषयी जगात अनेक कथा, कविता, कादंबर्‍या अनेकांनी लिहिलेल्या आहेत, त्यातून एकच सिद्ध होतं आईची उंची, व्याप्ती मोजता येत नाही. आई! किती उपमा देऊ तुला, तुझ्यासाठी माझा शब्दकोश संपला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आईचं रूप वेगवेगळं असलं तरी ती जेव्हा अपार काबाडकष्ट करून ऊन, पाऊस, वारा, वादळ झेलत, हिमालयासारखी कुटुंबाची सावली बनते, कुणी वाकड्या नजरेने आपल्या पिल्लांकडं बघताच वाघिणीसारखी तुटून पडते, कुटुंबावर संस्कार करते, तेव्हा ती समाजाची तद्वतच जगण्याची प्रेरणा ठरते.

कष्टकरी, निरक्षर पण स्वाभिमानी आणि संस्कारक्षम कुटुंब घडवणारी एक आई डॉ.मुरहरी केळे यांनी ‘नानी’ या चरित्रग्रंथाच्या रूपाने समाजासमोर आणली आहे. एका वेगळ्या प्रकारची नानी म्हणजे हा ग्रंथ आहे. अनेकजण आपल्या आईवडिलांना वेगवेगळ्या नावाने हाक मारतात. केळे कुटुंब मात्र आपल्या आईला ‘नानी’ आणि वडिलांना ‘काका’ म्हणून हाक मारतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील केळेवाडी या गावातील वारकरी संप्रदायातील सोपान (काका)आणि सोनाबाई (नानी )धनगर समाजातील अत्यंत आर्थिकदृष्टीने गरीब कुटुंब. ‘जगी ऐसा बाप व्हावा’ हे २०११ साली ह.भ.प.सोपान काका यांचं जीवन चरित्र डॉ. मुरहरी केळे यांनी लिहिलं आणि ते साहित्यिक म्हणून नावारूपाला आले. परंतु त्यांची महत्वाची ओळख म्हणजे ते अभियांत्रिकी क्षेत्रातील पदव्युत्तर, याच क्षेत्रातील अनेक पदव्या संपादित केल्या असून ते पीएचडी आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत महाराष्ट्राचे संचालक आहेत.

- Advertisement -

‘जगी ऐसा बाप व्हावा’ आणि ‘नानी’ वाचताना डोळ्याच्या पापण्या आपोआपच ओल्या होतात. डॉ.मुरहरी केळे आणि केळे परिवार म्हणजे ही एक जीवन संघर्ष यात्राच आहे. वारकरी पंथातील काकांनी आकाशाला गवसणी घातली; तर नानी पृथ्वीवरील झर्‍याप्रमाणे निर्मळ जीवन जगली. कितीही संकटे आली तरी न डगमगता अखंड प्रेमाचा वर्षाव करत राहिली. काकांनी अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, अज्ञान, अप्रगतीवर आघात करून वादळी ज्ञानबुद्धीने अपार कष्टाने गावागावात ज्ञानदीप लावला. त्या दिव्याची वात झाली नानी. अतोनात कष्ट केले, अपमान सहन केला, पण स्वाभिमानाला धक्का न लावता ती दिव्यासारखी जळत राहिली. तीन पिढ्यांना उजेड देण्याचं काम केलं. त्यामुळेच काकांच्या ज्ञानाचा प्रकाश समाजापर्यंत पोहचू शकला.

खरं तर आई हे एक अद्भूत रसायनाचं असतं. नानी हे असच अद्भूत, अद्वितीय रसायन आहे. तिला समजून घेण्यासाठी तिच्या पोटी जन्म मिळाला हे मी माझं परमभाग्य समजतो, असे डॉ. मुरहरी आनंदाने मानतात. आईविषयी कवी यशवंत, माधव ज्युलियन, लक्ष्मीकांत तांबोळी, फ.मु.शिंदे, श्रीरंग जोशी, ग्रेस, वामन निंबाळकर, ना.धो.महानोर, दया पवार, नारायण सुर्वे इत्यादींनी अनेक कविता केल्या आहेत. त्याचप्रमाणे मॅक्झिन गॉर्की, साने गुरुजी, उत्तम कांबळे या अनेक लेखकांनी आई समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक आईमध्ये मायेचा ओलावा, प्रेम, समर्पण, त्याग इ.सारख्या गुणांचा समुच्चय असतो. आई हे एकमेव असे न्यायालय आहे की जेथे तुमच्या चुकांना क्षमा असते व सुधारण्याला संधी दिली जाते. आई जवळच फक्त स्वार्थ नसतो. संत तुकाराम महाराज म्हणतात,

- Advertisement -

ऐसी कळवळ्याची जाती ।करी लाभावीण प्रीती ॥

‘नानी’ या पुस्तकाला मातीचा सुगंध आहे, कारण तिने केलेल्या अपार कष्टामुळे तयार झालेल्या घामाच्या थेंबाची शाई करून हे पुस्तक तयार झाले आहे. यात आईच्या प्रेमाचा गोडवा आहे, कारल्यासारखे कडू प्रसंग आहेत, राग आहे, शांतता,हास्य,करुणा, धाडस आहे,भीती आहे. अगदी नवरसांनी युक्त अशा विविध प्रसंगांनी ओतप्रोत भरलेली स्त्री जीवनाची सत्य कहाणी आहे. आयुष्यरूपी ग्रंथातील स्मृतीची पाने चालताना, नानी नावाची संस्था कशी नावारूपाला आली, तिने काय सोसलं, काय भोगलं, किती कष्ट सोसले, किती मान आणि अपमान सहन केले,गरिबीमुळे तिने गुराढोरांसारखे केलेले काबाडकष्ट याचं वर्णन वाचताना आपली आई आपल्यासमोर केव्हा उभी राहते हे कळत नाही.

सामाजिक रूढी परंपरा, रितिरिवाज आजही स्त्रीस्वातंत्र नाकारतो. पुरोगामीत्व स्वीकारलेलेसुद्धा प्रतिगामीसारखेच वागतात. सासर आणि माहेर दोन्हीकडून जेव्हा नानीला हाकलून दिलं, तेव्हा नानी मात्र मन घट्ट करून आत्महत्या हे टोकाचं पाऊल उचलते. आत्महत्येसाठी विहिरीत उडी मारणार तेवढ्यात, विहिरीच्या बाहेर ठेवलेली लहान सुमित्रा रडते. तेव्हा मात्र तिच्यातील आई पुन्हा जागृत होते आणि जगण्याचा निर्धार करते.

‘नानी’ हे वेगळेच रसायन यासाठी आहे, कारण की ती शेतात राबते,रोजगार हमीवर काम करते, बाराबलुतेदारांची सर्वच कामे करते. ज्या शेतात ती काम करते तेच शेत जेव्हा मुरहरी केळे विकत घेतो. त्या शेताची ती मालकीण होते, तेव्हा तिचा आनंद गगणात मावत नाही. कारण शेतमजुरी करणारी शेताची मालकीण होते. डॉ. मुरहरी केळेनी आई वडिलांचे सर्व अर्थांनी पांग फेडले. नानी काकांची पुण्याई व स्वतःचे कर्तृत्व यांच्या जोरावर डॉ. केळे शिकले-सवरले, पुढे गेले, उच्चपदस्थ अधिकारी झाले. आयुष्यात नानींनी जी कामे केले त्यांचे सूक्ष्म विश्लेषणात्मक वर्णन डॉ. केळे यांनी केले आहे. धनगर, भटके-विमुक्त, गृहिणी, अन्नपूर्णा, पशुपालक, शेतकरी, श्रमिक अशा विविध भूमिका नानीने पार पाडल्या आहेत.

नानी या जीवनचरित्र ग्रंथाला प्रख्यात साहित्यिक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी अप्रतिम अशीच प्रस्तावना लिहिली आहे. आपल्या प्रस्तावनेत ते लिहतात, ‘माझ्या मते डॉ. केळे यांनी ‘पारमार्थिक संसार’ आणि ‘सांसारिक परमार्थ’ या दोन शब्दप्रयोगांची निमिर्ती करून मराठी भाषेत मोलाची भर टाकली आहे. ही निर्मिती शब्दांची कसरत नसून त्यांनी त्यांच्या काका-नानींच्या घेतलेल्या अनुभवातून ती शक्य झाली आहे. काका आणि मुरहरी यांच्या जीवन प्रवासात एक महत्त्वाचा फरक आहे. काकांची वाटचाल परमार्थाच्या पथावर होती, तर मुरहरीने लौकिकाचा मार्ग पत्करला. काका परमार्थाचे पांथस्थ होऊ शकले, कारण त्यांच्या लौकिकाची बाजू नानींनी भक्कमपणे सांभाळली होती हे आहे.

अंतिमतः प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हाच बोध या दोघांच्या चरित्रातून घ्यायचा आहे. हे एक प्रकारचे बोधचरित्रच आहे. अशी महत्वपूर्ण प्रस्तावना डॉ.सदानंद मोरे यांनी लिहिल्याने पुस्तकाची उंची खूपच वाढली आहे. डॉ.मुरहरी केळे यांनी लिहिलेलं ‘नानी’ हे जीवन चरित्र समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. कारण त्यांनी या जीवन चरित्रात काबाडकष्ट करणारी आई, हिमालयासारखी माया करणारी आई, संकटावर मात करून पुढे जायला शिकवणारी वास्तवातली आई उभी केली आहे. या पुस्तकाची भाषा अत्यंत साधी सोपी सहज समजणारी आहे. बळी खैरे आणि श्रीरंग अंभोरे यांच्या रेखाचित्रांमुळे संदर्भ सहज स्पष्ट होतात. मुखपृष्ठावरील चित्र आकर्षित करून घेतं. गावगाड्याच्या रगाड्यातील कष्टकरी स्त्रियांचं पिढ्यानपिढ्याचं जिणं आणि तिच्या वेदना,समाजातील संवेदनशील घटकांपर्यंत पोचल्या तरी या पुस्तकाचं सार्थक झालं असं म्हणता येईल.

  • प्रदीप जाधव 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -