घरफिचर्ससारांशरिमेकच्या गर्दीत हरवलेला सिनेमा

रिमेकच्या गर्दीत हरवलेला सिनेमा

Subscribe

यावर्षी रिलीज झालेल्या 5 मोठ्या रिमेक सिनेमांना प्रेक्षकांनी नाकारलं

– अनिकेत म्हस्के

जुनं ते सोनं असं आपल्याकडे म्हटलं जातं, पण सध्या त्याच सोन्याची माती करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे, म्युजिक इंडस्ट्रीला एका थराला घेऊन जाणार्‍या टी सीरिजने तर सगळ्या जुन्या गाण्यांना नवीन रूपात आणून त्यांचा बँड वाजवलाच आहे, पण सिनेमांचे निर्माते, दिग्दर्शकदेखिल या कामात मागे नाहीत. वाहत्या गंगेत हात धुण्याचं काम त्यांनीही केलंय, अनेक चांगल्या सिनेमांना नव्या रूपात आणण्याच्या नादात तद्दन फालतू असं काही प्रेक्षकांच्या समोर आणायचं आणि प्रतिसादाची अपेक्षा करायची हे काम त्यांनी सुरू केलंय.
………………..

- Advertisement -

बॉलिवूडमध्ये काही जणांना आटलेलं दूध पुन्हा पुन्हा आटवून त्यावरची मलई खाण्याची सवय लागलीये, पण ते विसरून जातात की, दूध आटवताना त्यात मिठाचा खडा पडला की, ते दूध नासतं. भजी गरम करण्यासाठी पुन्हा तळली तर त्याची चव येते का ? मग एक कलाकृती जी एकदा बनलीय, तिला पुन्हा तसंच बनवणं शक्य आहे का? बॉलिवूडमध्ये सध्या रिमेकचा ऊत आलाय, सिनेमा असो किंवा जुनी गाणी .. सध्या ओरिजिनलपेक्षा यांची संख्या वाढलीये, काही वेळा हे प्रयोग यशस्वी होतात तर बहुतांशवेळा हे प्रयोग सपशेल अयशस्वी ठरतात. 2020 हे वर्ष अनेक गोष्टींसाठी खास होतं, बॉलिवूडमध्येही याच वर्षात अनेक गोष्टी घडल्या, त्याच अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे यावर्षी रिलीज झालेल्या 5 मोठ्या रिमेक सिनेमांना प्रेक्षकांनी नाकारलं. मोठी स्टारकास्ट आणि नावं सिनेमाशी संबंधित असतानाही वाट्याला आलेल्या या अपयशामागे कारणं काय, याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न…

जुनं ते सोनं असं आपल्याकडे म्हटलं जातं, पण सध्या त्याच सोन्याची माती करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे, म्युजिक इंडस्ट्रीला एका थराला घेऊन जाणार्‍या टी सीरिजने तर सगळ्या जुन्या गाण्यांना नवीन रूपात आणून त्यांचा बँड वाजवलाच आहे, पण सिनेमांचे निर्माते, दिग्दर्शकदेखिल या कामात मागे नाहीत. वाहत्या गंगेत हात धुण्याचं काम त्यांनीही केलंय, अनेक चांगल्या सिनेमांना नव्या रूपात आणण्याच्या नादात तद्दन फालतू असं काही प्रेक्षकांच्या समोर आणायचं आणि प्रतिसादाची अपेक्षा करायची हे काम त्यांनी सुरू केलंय. 2020 सालात रिलीज झालेले 5 मोठे रिमेक सिनेमे म्हणजे कुली नंबर वन, लक्ष्मी, दुर्गामती आणि सिक्वल म्हटलं तर सडक 2 आणि लव्ह आज कल 2 हे सिनेमे मोठी स्टारकास्ट आणि प्रोडक्शन हाउसेसची नावं मागे असतानाही यापैकी कुठलाही सिनेमा प्रेक्षकांना भुरळ घालू शकला नाही. रिमेक आणि सिक्वलच्या या अपयशामागे कारणं काय ? रिमेक यशस्वी कसे होतात आणि हे प्रकार यापुढेही सुरू राहतील का याच प्रश्नांचा घेतलेला हा आढावा.

- Advertisement -

आपल्याकडे रिमेक बनविण्यासाठी नेहमी सुपरहिट सिनेमेच निवडले जातात, रिमेक करण्याची आणि त्यातल्या त्यात दाक्षिणात्य सिनेमांचे रिमेक बनविण्याची मोठी परंपरा आहे. असं नाही की, हिंदी सिनेमांच्या प्रेक्षकांनी रिमेक असलेल्या चित्रपटांना नाकारलंय, अनेक रिमेक सिनेमे सुपरहिट झालेत काही सिनेमे तर मूळ सिनेमांपेक्षाही अधिक हिट ठरले होते, सलमानचा तेरे नाम, वॉन्टेड, दबंग… आमिरचा गजनी, अक्षयचा राऊडी राठोड आणि शाहिद कपूरचा कबीर सिंग हे त्या सिनेमांपैकीच काही उदाहरणं, ज्यांनी मूळ सिनेमांपेक्षा जास्त यश मिळवले. ही यादी यापेक्षाही मोठी आहे, कदाचित म्हणूनच असे प्रयोग वारंवार केले जातात. पण गेल्या काही काळात रिमेकचे प्रमाण वाढले आणि दर्जा घसरलाय , सिनेमा म्हणजे एक पॅकेज वाटायला लागलंय. सिनेमा म्हणजे मेसचा जेवणाचा डबा नसतो, ज्यात फिक्स 3 पोळ्या , 2 भाज्या आणि वरण-भात टाकला की, जेवण पूर्ण होतं. कारण सध्या रिमेक बनवताना तेच लक्षात घेतलं जातंय, आधी तर पात्रांना श्रीमंत करायचं, सेट मोठे करायचे, जुन्या गाण्यात रॅप टाकून ते नवीन बनवायचं, एक रडकं गाणं टाकायचं आणि हे सगळं करूनही जागा उरलीच तर मग स्टोरीकडे लक्ष द्यायचं, हा प्रकार सध्या सुरू आहे. पण गाणी आणि पात्राची श्रीमंती सोडून उर्वरित 2 तासांचा हा खेळ कोण सहन करू शकेल? याचा विचार ते करत नाहीत. याचीच फलश्रुती म्हणून आपल्याला कुली नंबर वन आणि सडक 2 सारखे सिनेमे सहन करावे लागतात. जुन्या गाण्याचं नवं रूप, मोठे सेट, थुकरट विनोद या सगळ्यात हरवलेली सिनेमाची मूळ कथा आणि सिंपलीसिटी हिंदी सिनेमांच्या रिमेकच्या अपयशामागे हीच कारणं आहेत, ज्यामुळे असले रिमेक लोकांच्या पचनी पडत नाहीत.

लव्ह आज कल सैफ अली खान आणि दीपिका पादुकोणचा एक असा सिनेमा ज्याला लोकांनी भरभरून प्रेम दिलं, इम्तियाज अलीसारख्या उत्तम दिग्दर्शकाचं काम लोकांना आवडलं, सिनेमातील गाणी आणि अभिनयासाठी हा सिनेमा लोकांच्या मनात होता. लोकांच्या मनात त्याच आठवणी पुन्हा जीवित करण्याच्या उद्देशाने दिग्दर्शक इम्तियाज अली याने नव्या कास्टसह ‘लव्ह आज कल’ सिनेमाचा सिक्वल बनवला. 2009 ते 2020 या 11 वर्षाच्या काळात झालेले बदल बहुधा दिग्दर्शकाने हेरले नाहीत आणि त्याच जुन्या लाईनवर हा सिनेमा बनवला, हा सिनेमा असा होता की पहिल्या भागात काम करणार्‍या सैफ अली खान याने स्वतःची मुलगी सिनेमात नायिका असताना या सिनेमाला ट्रोल केलं होतं. मोजकी गाणी वगळता सिनेमात पाहण्यासारखं काहीच नव्हतं, 2020 मध्ये सुरुवातीला आलेल्या या सिनेमाला मागे पाडलं ते आणखी एका सिक्वलने … महेश भट दिग्दर्शित सुपरहिट सिनेमा सडकचा दुसरा भाग ‘सडक 2’ हा ऑगस्ट महिन्यात आपल्याकडे रिलीज झाला होता, या सिनेमाने रिलीज आधीच ट्रेलरला सर्वाधिक डीसलाईक मिळविण्याचा रेकॉर्ड केला होता. 1.1 इतकं IMDB रेटिंग असलेला हा सिनेमा तद्दन फालतू या प्रकारात मोडणारा होता. संजय दत्त, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर यांसारखे मोठे स्टार्स असतानाही सिनेमाची कमकुवत कथा सिनेमाला वाचवू शकली नाही. सिक्वलच्या या स्पर्धेत तर हिंदी चित्रपटांच्या हाती यावर्षी निराशा लागलीच म्हणून मग चलनी नाण्याचा वापर झाला, साऊथ इंडियन सुपरहिट सिनेमांचे रिमेक करणे आणि ते हिंदीत प्रदर्शित करणे हा तर इकडे धंदा बनलाय म्हणून दोन मोठे साऊथ इंडियन सिनेमांचे रिमेक 2020 यावर्षी देखील रिलीज झाले होते. कंचनाचा रिमेक असलेला अक्षय कुमारचा लक्ष्मी आणि भागामतीचा रिमेक असलेला भूमी पेडणेकर अभिनित दुर्गामती या दोनही सिनेमांकडून प्रेक्षकांसह निर्मात्यांनासुद्धा अपेक्षा होती, पण अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब फुसका निघाला आणि दुर्गामतीची जादूही फार चालू शकली नाही.

क्रिसमसचा मुहूर्त म्हणजे सिनेमावाल्यांसाठी धंद्याचा टाईम असतो, अनेक मोठे सिनेमे याकाळात रिलीज केले जातात. याच मुहूर्तावर डेव्हिड धवनचा सुपरहिट सिनेमा असलेल्या गोविंदाच्या कुली नंबर वन सिनेमाचा रिमेक प्राईमवर रिलीज करण्यात आला. वरुण धवन, सारा आली खानसह राजपाल यादव, परेश रावल, जावेद जाफरी यांसारख्या अनेक कलाकारांना घेऊन बजेट दहापट करून हा सिनेमा बनविण्यात आला होता. पात्रांना श्रीमंत दाखविण्यासाठी तर त्यांची नावंसुद्धा बदलण्यात आली होती, सेठ होशियार चंदचा जेफ्री रोजारियो करण्यात आला, गाण्यांचे बजेट वाढवले, रिमेक केले, काही सीन्स इंग्रजी सिनेमातून चोरले.. गोविंदाची अ‍ॅक्टिंग करताना स्वतःची भूमिका विसरले आणि या सगळ्यातून प्रेक्षकांसमोर उभा राहिला वर्षाचा शेवट खराब करणारा ‘कुली नंबर वन’ सिनेमा कुठलाही सिनेमा यशस्वी होतो तो कथा आणि अभिनय या दोन गोष्टींमुळे मग भलेही तो रिमेक का असेना, पण जर त्यात कथा आणि अभिनय या दोघांना उत्तम दिग्दर्शनाची जोड असेल तर सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडतो. कबीर सिंगपासून ते ‘तेरे नाम’पर्यंत आपण अशी अनेक उदाहरणं पाहत आलोय आणि पाहणारदेखील आहोत. येत्या वर्षात जर्सी सोबतच विक्रम वेधा, डिअर कॉम्रेड सारख्या अनेक सुपरहिट सिनेमांचे हिंदी रिमेक येणार आहेत, काही सिनेमात तर सुपरस्टारदेखील काम करणार आहेत आता अशा सिनेमांना यश कसं मिळेल? हे तर तो सिनेमा आल्यावरच कळेल पण यशस्वी रिमेकसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी जर त्या सिनेमात असतील तर त्याला हिट होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, हे देखील सत्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -