Homeफिचर्ससारांशMukkam Post Bombilwaadi : धमाल नाट्यप्रेमी विनोदवीरांचा पत्ता... मु.पो.बोंबिलवाडी

Mukkam Post Bombilwaadi : धमाल नाट्यप्रेमी विनोदवीरांचा पत्ता… मु.पो.बोंबिलवाडी

Subscribe

हिटलर आणि चर्चिल या प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तिरेखांची विनोदी बाजू मांडणार्‍या ‘मु.पो. बोंबिलवाडी’ हा चित्रपट हास्यवीरांचा नवा पत्ता म्हणावा लागेल. परेशनं नाटक तसंच न ठेवता त्यात सिनेमाच्या माध्यमात योग्य ते बदल केले आहेत. या चित्रपटावर टाकलेला हा दृष्टीक्षेप.....

– आशिष निनगुरकर

मराठी प्रेक्षकांना नाटकांचं खूप वेड आहे. मराठी नाटकांविषयी प्रेक्षकांची ही ओढ पाहून काही निर्माते नाटकांवर आधारित चित्रपट बनवत आहेत. काही महिन्यांपूर्वीच ‘अलीबाबा आणि चाळिशीतले चोर’ हा सिनेमा येऊन गेला, जो याच नावाच्या नाटकावर आधारित होता. २६ वर्षांपूर्वीच, परेश मोकाशी यांनी ‘मु.पो. बोंबिलवाडी’ हे नाटक सादर केले होते. ‘मु.पो. बोंबिलवाडी’ या नाटकानं प्रेक्षकांचे अफाट मनोरंजन केलं आहे.

स्वातंत्र्यापूर्वीचा कालखंड, जगात वाजलेले युद्धाचे पडघम, वाढत चाललेली युद्धाची भीषणता अशा नैराश्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या विषयाला हाताशी घेऊनच एक नवीन विनोदी चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या सेवेसाठी सादर झाला आहे. त्यामुळे चित्रपटात हास्याची मात्रा अनेक पटींनी वाढली आहे. ‘मु.पो. बोंबिलवाडी’ या चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळी यांची असून दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे. मूळ नाटक ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ मधून गीतांजली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, वैभव मांगले या कसलेल्या कलाकारांनी आपली छाप सोडली होती.

चित्रपटाची कथा घडते १९४२ मध्ये. गोष्ट आहे ‘बोंबिलवाडी’ नामक एका गावाची आणि या गावातील नाटकवेड्या लोकांची. जगाच्या पाठीवर सुरू झालेले दुसरे विश्वयुद्ध थांबायचे नाव घेत नाही आहे. भारतामध्ये गांधीजींच्या ‘चले जाव’ आंदोलनाचे वारे वाहात आहेत. बोंबिलवाडी या सगळ्यापासून दूर कशी राहील? इंग्रजांच्या गुलामगिरीविरोधात दंड थोपटून, इथली तरुण पिढी उभी राहिली आहे. त्यांना पळवून लावण्याचे नाना प्रकार ते करू पाहात आहेत.

अशातच या बोंबिलवाडीमध्ये अवतरतात, अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि विन्स्टन चर्चिल! त्यांच्या येण्यामुळे गावात एक वेगळीच धमाल उडते. खरा हिटलर कोण, हे साध्य करण्यात गावकर्‍यांची उडणारी धमाल आणि गावात चर्चिल, हिटलर यांच्या येण्यामुळे उडालेला गोंधळ, अधिकच रंजकता वाढवणारा आहे. मुळात नाटकाचे माध्यमांतर चित्रपटात करीत असताना तांत्रिक, लिखाण, सादरीकरणाच्या बाबतीत घ्यावी लागणारी काळजी, राष्ट्रीय पुरस्कारविजेते दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी घेतली आहे.

चित्रपटात अनेक ठिकाणी त्यांच्या खास शैलीतील विनोद सखोल संदेश देऊन जातात. चित्रपटात एका प्रसंगात हिटलर आणि चर्चिल यांच्यात समुद्र किनारी भांडण होताना दिसते. त्यात अगदी ते लहान मुलांसारखे भांडताना दाखवले आहेत. जगातील दोन मोठ्या देशांचे मुख्य प्रतिनिधी असे अगदी पोरकटपणे भांडताना दाखवण्याचा परेश मोकाशी यांचा दृष्टिकोन एक वेगळीच संकल्पना या दोन व्यक्तींच्या बाबतीत प्रेक्षकांसमोर मांडून जाते.

याशिवाय, नाटकवेडे कुटुंब चित्रपटाच्या कथानकात अधिकच रंजकता वाढवताना दिसते. चित्रपटाचे कथानक, सादरीकरण, लिखाण या जमेच्या बाजू नक्कीच आहेत. पण, चित्रपटात अभिनेते प्रशांत दामले यांनी साकारलेला हिटलर, चित्रपटाची उंची अधिक वाढवणारा आहे. मराठी रंगभूमी आपल्या अभिनयाने समृद्ध करणार्‍या प्रशांत दामले यांनी हिटलरचा अनोखा अंदाज प्रेक्षकांसमोर आणला आहे.

व्यक्तिरेखा साकारत असताना, त्यातले बारकावे, त्यातली शक्तिस्थाने, अचूकपणे हेरत ती सक्षमपणे लोकांसमोर मांडण्यात प्रशांत दामले यशस्वी झाले आहेत. विनोदाची स्वतःची वेगळी शैली जपत, नवनवीन प्रयोग करणारे प्रशांत दामले लोकांच्या पसंतीस उतरतील यात शंका नाही. चित्रपट यशस्वी होण्यासाठी सहकलाकारांची मजबूत फळी तेवढीच आवश्यक असते. बोंबिलवाडीच्या या जत्रेतील सहकलाकारसुद्धा तितकीच अविस्मरणीय कामगिरी बजावताना दिसून येतात.

वैभव मांगले आणि गीतांजली कुलकर्णी हे ‘मु.पो. बोंबिलवाडी’ या नाटकात देखील असल्यामुळे, चित्रपटातील त्यांचा वावर अधिक सोपा झाला आहे, याची प्रचिती बर्‍याच प्रसंगांत चित्रपट प्रेक्षकांना देतो. याशिवाय, आनंद इंगळे यांनी साकारलेल्या चर्चिलमुळे ’चर्चिल असाही असू शकतो?’ हा प्रश्न वारंवार प्रेक्षकांना सतावणार यात शंका नाही. शिवाय, सुनील अभ्यंकर, राजेश मापुस्कर, प्रणव रावराणे, गीतांजली कुलकर्णी, मनमीत पेम, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर व दीप्ती लेले आदींनी त्यांच्या भूमिकांमधून धमाल उडवून दिली आहे.

सर्वांनी अभिनयाची एक वेगळी छाप सोडली आहे. हास्यवीरांची ही आश्वासक फळी चित्रपटात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. नाट्यवेड्या मंडळींची उडालेली तारांबळ बघताना निखळपणे आणि अगदी सहज केलेली विनोदनिर्मिती दर्शकांना सुखावणारी आहे. एकामागून एक प्रसंग इतक्या सफाईदारपणे दिग्दर्शकाने मांडले आहेत, की त्यातील मनोरंजकता कमी न होता, वाढतच जाते. नाटकाच्या प्रयोगाला मिळालेली कलाटणी, हिटलर आणि चर्चिल यांच्यातली भांडणे गंमतशीर आहेत.

नाटकाचे माध्यमांतर चित्रपटात करण्यासाठी लिखाण, दिग्दर्शन, कलाकार यांसोबतच उत्कृष्ट निर्मात्यांचीदेखील साथ हवी असते. काळाचा संपूर्ण पट उभा करण्यात, त्यातले बारकावे टिपत ते प्रेक्षकांसमोर मांडण्यात, चित्रपटाच्या टीमने मेहनत घेतली आहेे, त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे. ‘विवेक फिल्म्स’ने ‘मु.पो. बोंबिलवाडी’च्या निमित्ताने पहिल्यांदाच सिनेक्षेत्रात पाऊल ठेवले असूनदेखील चित्रपटनिर्मितीचे आव्हान त्यांनी लीलया पेलल्याचे दिसून येत आहे. कलाकृतीचे माध्यमांतर चित्रपटात करताना चित्रपटाच्या अनुषंगाने आवश्यक तंत्राला योग्य तो न्याय देण्यात दिग्दर्शक-लेखक-निर्माते यांना यश आले आहे, असे आवर्जून नमूद करावेसे वाटते.

बोंबिलवाडीचे काल्पनिकपण आजही प्रेक्षकांना जोडणारे जग उभे करण्यात चित्रपटाची टीम यशस्वी झाली आहे. काळाचा संदर्भ अगदी अचूक रेखाटत केलेले कलादिग्दर्शन आणि त्यासाठी लागणारी योग्य ती वातावरणनिर्मिती करण्यात परेश मोकाशींना यश आले आहे. वेशभूषा, केशभूषा यांचेदेखील विशेष कौतुक करावेसे वाटते. १९४२चा काळ उभारण्यात या दोन्ही बाजूंची जबाबदारी फार महत्त्वाची असते. तसेच, पार्श्वसंगीतानेही त्या काळाशी प्रेक्षकांना जोडण्यात केलेले परिश्रम हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत.

चित्रपटाची निर्मिती करताना वेगवेगळ्या आयामांचा विचार करत, त्या बारकाव्यांवर काम करत एक आगळा-वेगळा चित्रपट ‘मु.पो. बोंबिलवाडी’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या समोर ठेवण्यात आला आहे. युद्धाच्या मधोमध हास्यकल्लोळ करणारी बोंबिलवाडीची ही टोळी, युद्ध आणि समाजाच्या जगण्यावर मार्मिकपणे भाष्य करून जाते. स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय आणि ते मिळवण्यासाठी सुरू असलेला वाद, अत्यंत खुबीने चितारला आहे. काळ कुठलाही असला, तरी त्यातले वास्तव जुने होत नाही, हेच या चित्रपटाचे वेगळेपण आहे.

मुळात मुक्काम पोस्ट बोंबीलवाडीची कथाच भन्नाट आहे. अशी कॉमेडी हल्ली सहसा पाहायला भेटत नाही. सध्या फार्सीकल गोष्टीवर सिनेमे बनत नाही त्यामुळे प्रेक्षकांनी ही संधी सोडता कामा नये. नाटकाच्या काही मर्यादा असतात, त्यामुळे कथा फुलवताना काही गोष्टी दाखवता येत नाहीत. मात्र चित्रपटात जास्त मोठ्या कॅनव्हासवर त्या गोष्टी दाखवून विनोदाची एक वेगळी उंची गाठता येते म्हणून नाटकापेक्षा चित्रपटात जास्त कॉमेडी असणार हे पक्के आहे.

परेश मोकाशी यांनी नाटक जसेच्या तसे न उचलता त्यात काही परिणामकारक बदल केलेत जेणेकरून चित्रपट पाहताना आणखी मजा येईल. एकूणच मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा नक्की बघण्यासारखा आहे. २०२५ या वर्षाची सुरुवात ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’च्या निमित्ताने अगदी दिमाखात झाली आहे, आपणही रसिकप्रेक्षक म्हणून त्याचा आनंद घेऊया.

-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)