गंगेच्या पाण्यावर तरंगणार्‍या प्रेतांचा धर्म कोणता?

कांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला पाहिजे की, कोरोनामुळे देशभर सुरू असलेल्या नरसंहाराची जबाबदारी कुणाची? आता त्यांना धर्माशी देणं घेणं नाही ! गंगानदीत वाहून येणार्‍या लावारिस प्रेतामधली बहुसंख्य प्रेतं दुर्दैवानं हिंदूंची असणार ! पण त्यासाठी भाजपाला काही देणंघेणं नाही. संघालाही काही देणं घेणं नाही. त्या प्रेतांचा, त्यांच्या घरच्या लोकांचा आक्रोश आता भाजपामधील कुणालाही ऐकायला येणार नाही ! वातावरणात भरून गेलेला हा भयाण आक्रोश आता फडणवीस आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना विचारतो आहे, सांगा आता आमचा धर्म कोणता ?

शेकडो प्रेतं गंगेत तरंगत असल्याच्या बातम्या सोशल मीडियामध्ये हल्ली सारख्या नजरेस पडतात. युपी, बिहार या दोन प्रदेशातून ही प्रेतं येतात, हे आता लपून राहिलेलं नाही.

युपीमध्ये स्वतःला योगी म्हणवून घेणारे आदित्यनाथ बिस्ट हे अतिशय उथळ असे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. तर बिहारमध्ये नितीशकुमार सारखे मुख्यमंत्री भाजपा या पक्षाच्या मदतीनं बिहारचा सत्यानाश करायला रात्रंदिवस एक करत आहेत. आदित्यनाथ ही व्यक्ती तर खून, गुंडागर्दी, बलात्कार असल्या गुन्ह्यांना संरक्षण देणारी म्हणून सर्वपरिचित आहे. त्यांचा स्वतःचा रेकॉर्ड तर त्याला पूरक आहे. नितीशकुमार मुळात तसे नव्हते हे खरं असलं तरी आता त्यांनी भाजपचे पाय चाटण्याचा जाहीर करार केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री म्हणून विद्यमान विरोधी पक्षनेते म्हणून भाजपा धर्माचे पालन करण्यात पुढं आहेत. ते बिहारच्या निवडणुकीत प्रचारक होते. अलीकडे बंगालमध्ये देखील पुड्या सोडून आलेत. युपी आणि बिहारमधील वाहून येणारी प्रेतं शेवटी पश्चिम बंगालमध्ये येतात. काही समुद्राला मिळतील. काही मध्येच गिधाडांचे भक्ष्य होतील. पण त्यावर ना मोदी काही बोलत आहेत, ना शहा काही बोलत आहेत, ना फडणवीस बोलत आहेत..!

मागे पहिल्या लॉकडाऊनच्या काळात दोन साधूंची पालघरमध्ये गैरसमजातून हत्या झाली होती. त्यावेळी फडणवीस आणि सहकार्‍यांनी वाटेल तसे आरोप महाराष्ट्र सरकारवर केले. कसलाही धरबंध यांनी ठेवला नव्हता !

हत्या कुणाचीही होवो किंवा विनाकारण जीव कुणाचाही जावो, त्याचा निषेध व्हायलाच हवा. माणूस म्हणून आपल्या संवेदना जिवंत असल्याचा तो पुरावा आहे. पण फडणवीस आणि कंपुला माणसाची जात, धर्म महत्त्वाचा! ते पाहून नंतरच ते आपले उपद्व्याप सुरू करतात.

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुका, त्यात निवडणूक आयोगाची भाजपा धार्जिणी भूमिका, हजारो, लाखो लोकांच्या सभा आणि त्यातून झालेला कोविडचा प्रसार ही खरंच संतापजनक बाब आहे. मोदी, शहा, आदित्यनाथ, फडणवीसांसारखे हेच लोक तब्लिगी जमातीच्या नावावर राजकारण करण्यात अग्रेसर होते. आलेल्या लोकांची कोंडी केली, त्यांना बाहेर जायला परवानगी देण्यात विलंब केला आणि वरून त्यांनाच बदनाम केलं. आणि इकडे मात्र लाखो लोक कुंभमेळ्यात सामील झालेत. मोदींनी त्याचं कौतुक केलं. आदित्यनाथ हे तर अर्धवट विचार करतात. सतत त्यांचे दिवाळखोरीचे चाळे सुरूच असतात. गंगा स्नान काय, कुंभ मेळा काय, आणखी नको ते उपद्व्याप करून कोरोना पसरविण्यात हातभार लावण्यात हे महाशय आघाडीवर होते. ऑक्सिजन मागणार्‍या लोकांवर हे महाशय पोलीस कारवाई करत आहेत. जेलमध्ये टाकत आहेत. लोक तिकडे औषध, उपचार यांच्याविना तडफडून मरत आहेत.

ही जेमतेम दुसरी लाट आहे. महाराष्ट्रात देखील ती धुमाकूळ घालते आहे. तरीही महाविकास आघाडी सरकार बर्‍यापैकी प्रयत्न करत आहे. त्यांचं तसं कौतुकदेखील होत आहे. पण ही दुसरी लाट महाराष्ट्रात तीव्रपणे येण्यासाठी फडणवीस आणि भाजपा प्रामुख्याने जबाबदार आहे. मंदिर उघडा, पंढरपूरची वारी रद्द करू नका, लॉकडाऊन लावू नका, असले संवेदनाहीन उपद्व्याप फडणवीस आणि त्यांच्या पार्टीनं सतत केलेले होते. त्यांच्या ह्या पापामुळे महाराष्ट्रात कोरोना एवढा पसरला, याची आता सार्‍या महाराष्ट्राला कल्पना आहे. महाराष्ट्राचे हे नवे तब्लीगी आहेत.

महाराष्ट्रात आटोक्यात आलेला कोरोना फडणवीस आणि सहकार्‍यांच्या कारवायांमुळे पुन्हा सर्वदूर पसरला आहे. कधीतरी रुळावर येत असलेली महाराष्ट्राची घडी या लोकांनी पार विस्कटून टाकली आहे. हा सारा परिवार विघ्नसंतोषी आहे. देश खड्ड्यात जाऊ द्या, महाराष्ट्राचं काय वाटोळं व्हायचं ते होऊ द्या, पण ठाकरे सरकार बदनाम झालं पाहिजे, हाच यांचा एकमेव अजेंडा ! उद्या सार्‍या महाराष्ट्राचं स्मशान झालं तरी यांना खंत नाही. फक्त त्यांना मुख्यमंत्री करा, म्हणजे बस् ! लगेच ते चारी बाजूंना मोदी आणि स्वतःचे फोटो लाऊन जल्लोष करायला मागेपुढे पाहणार नाहीत!

जाती, धर्माच्या शिवाय या लोकांचं राजकारण चालत नाही. ही अत्यंत किळसवाणी राजकीय जमात आहे. ही सैतानी वृत्ती आहे. खुद्द भाजपचे लोक रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात गुंतलेले आहेत. महाराष्ट्रात तर या बाबतीतला फार मोठा घोटाळा समोर आलेला आहे. हॉस्पिटलवाले लोकांना वेगळंच लुटत आहेत. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. ऑक्सिजन नसल्यामुळे लोक मरत आहेत. पण भाजपामधून कुणीही माई का लाल याचा विरोध करायला पुढे येत नाही. अख्खा पक्ष एव्हढा निर्दयी लोकांनी खचाखच भरलेला असू शकतो, ही कल्पना देखील करवत नाही.

पहिली लाट आली तेव्हा पिएम् केअर्स या संशयास्पद खात्यात पैसे जमा करा म्हणून, नाचून सांगणारे हेच फडणवीस होते. त्यांच्या पक्षातील चंद्रकांत पाटलांसारखे लोकसुद्धा हेच करत होते. त्यांच्या पापामुळे महाराष्ट्रात असंख्य निरपराध लोकांचे जीव गेले आहेत. अनेक कुटुंबे पोरकी झाली आहेत, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. ह्याचा जाब आता कुणाला विचारायचा ? सध्या फडणवीस आणि सहकारी गप्प बसलेली दिसते. कारण लोकांचा रोष त्यांनी अनुभवला आहे. लोकांनी त्यांना पाणउतारा करत हाकलून दिल्याचे व्हिडिओ सर्वत्र फिरत आहेत. त्यांच्या स्वतःच्या पक्षातूनही आता त्यांना ठोकायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता त्यांना बाहेर पडणं कठीण होऊन बसलं आहे.

ते घरात बसून असोत, की आणखी कुठं, लोकांनी त्यांना जाब विचारलाच पाहिजे, की फडणवीसजी, देशभर सुरू असलेल्या नरसंहाराची जबाबदारी कुणाची? आता त्यांना धर्माशी देणं घेणं नाही ! या वाहून येणार्‍या लावारिस प्रेतामधली बहुसंख्य प्रेतं दुर्दैवानं हिंदूंची असणार ! पण त्यासाठी भाजपाला काही देणंघेणं नाही. संघालाही काही देणं घेणं नाही. त्या प्रेतांचा, त्यांच्या घरच्या लोकांचा आक्रोश आता भाजपामधील कुणालाही ऐकायला येणार नाही ! वातावरणात भरून गेलेला हा भयाण आक्रोश आता फडणवीस आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना विचारतो आहे, सांगा आता आमचा धर्म कोणता ?
खरंच, धर्माची नशा चढलेल्या सर्वांनाच हा प्रश्न आहे.. गंगेच्या पाण्यावर तरंगणार्‍या ह्या प्रेतांचा धर्म कोणता ?

–ज्ञानेश वाकुडकर