Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश समृध्द ‘भावसरगम.’

समृध्द ‘भावसरगम.’

Subscribe

हृदयनाथ मंगेशकर यांची ‘भावसरगम’ ही मैफिल त्यांच्यातल्या संगीत कलाकाराची त्या दृष्टीने मेजवानी ठरत आलेली आहे. माझ्यासारख्या कित्येक रसिकांनी त्यांच्या ह्या ‘भावसरगम’चा अगणित वेळा आस्वाद घेतलेला आहे. त्यांच्या ह्या कार्यक्रमात ते गाण्याबद्दलचे अनेक किस्से सांगतात. गाण्यातल्या छोट्यामोठ्या जागा उलगडून दाखवतात आणि मग गाणं सादर करतात. त्यामुळे ‘भावसरगम’ ऐकायला जाणं ही आमच्यासारख्यांसाठी कायम एक अनोखी पर्वणी राहिली. चिं. त्र्यं. खानोलकर म्हणजे आरती प्रभू यांच्याविषयीच्या तर अनेक आठवणी ते जागवतात.

हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत म्हणजे संगीत ह्या कलेतल्या कल्पना-संकल्पनांची श्रीमंती आणि काठोकाठ समृध्दी. त्यांच्या गाण्यांतून ह्या श्रीमंती आणि समृध्दीचा अनुभव संगीत ऐकणारी मंडळी वर्षानुवर्षं घेत आली आहेत. त्यांच्या प्रत्येक गाण्याबाबत कायम एक वेगळा विचार व्यक्त झालेला आहे. हृदयनाथ मंगेशकरांच्या बाबतीत गाणं करण्याची प्रक्रिया ही कवी-गीतकाराकडून शब्द आले आणि त्याला त्यांच्याकडून बघता बघता चाल लागली ही इतकी साधी आणि अशी साचेबध्द कधीच राहिलेली नाही. ‘गणराज रंगी नाचतो’ ह्या शब्दावर गाणं करताना त्यांनी तबला, मृदंग, बासरी ह्यासारखी निवडक, पण फक्त आणि फक्त भारतीय वाद्यंच वापरली. ‘रूणुझुणू रूणुझुणू रे भ्रमरा’ ह्या ज्ञानेश्वरांच्या रचनेला चाल लावताना त्यांनी भ्रमराची गुणगुण संपूर्ण गाण्यात ठेवली.

हृदयनाथ मंगेशकर हे संगीतकार-गायक असले तरी ते मुळातले साहित्याचे, संतसाहित्याचे, कवितेचे गाढे अभ्यासक आहेत. साहजिकच, त्यांच्या गाण्यातलं शब्दाचं प्रयोजन हे वरवरचं किंवा निसरडं नसतं. तीच गोष्ट त्यांच्या संगीतातल्या, गाण्यातल्या सुरांची. कोणत्या गाण्याला कोणता सूर ह्यामागेही नेहमीच त्यांचं असं एक पक्कं गणित राहिलेलं आहे.

- Advertisement -

त्यांची ‘भावसरगम’ ही मैफिल तर त्यांच्यातल्या संगीत कलाकाराची त्या दृष्टीने मेजवानी ठरत आलेली आहे. माझ्यासारख्या कित्येक रसिकांनी त्यांच्या ह्या ‘भावसरगम’चा अगणित वेळा आस्वाद घेतलेला आहे. त्यांच्या ह्या कार्यक्रमात ते गाण्याबद्दलचे अनेक किस्से सांगतात. गाण्यातल्या छोट्यामोठ्या जागा उलगडून दाखवतात आणि मग गाणं सादर करतात. त्यामुळे ‘भावसरगम’ ऐकायला जाणं ही आमच्यासारख्यांसाठी कायम एक अनोखी पर्वणी राहिली.

एकदा ह्याच ‘भावसरगम’मध्ये चिं.त्र्यं.खानोलकर म्हणजे कविवर्य आरती प्रभू ह्या गहनगहिर्‍या व्यक्तिमत्वाबद्दल ते खूप काही सांगत होते. त्यांच्या ‘ये रे घना, ये रे घना’बद्दल सांगताना त्यांनी आरती प्रभूंनी वापरलेल्या त्यातल्या अळुमाळू ह्या शब्दाबद्दल त्यांनी सांगितलं. नंतर ‘नको नको म्हणताना, नको नको म्हणताना, मनमोर भरराना’ ह्या ओळीतली ‘मनमोर भरराना’ हे किती अनोखे शब्द आणि किती अनोखी कल्पना आहे ह्याबद्दल ते बोलून गेले…आणि बोलता बोलता त्यांनी आरती प्रभूंचा एक वेगळाच किस्सा सांगितला.

- Advertisement -

ते म्हणाले, ‘आरती प्रभू हा एक असा व्यक्तीविशेष होता की त्याच्याकडे शब्द तेच असायचे, पण त्या शब्दांतला भाव त्या शब्दांपेक्षा अतिशय वेगळा असायचा. ते गाण्यात लिहिताना लिहायचे, नको नको किती म्हणू….आणि त्याच्या पुढची ओळ त्याच्याही पुढची आणि त्याच्याहीपेक्षा वेगळी असायची, जी वाचताना चकित करून जायची. ती असायची, वाजणार दूर वेणू…तर असे हे माझे कविमित्र अचानक एकदा माझ्याकडे आले. माझ्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी त्यांच्या खिशातून एक चिठोरं काढलं आणि माझ्या हाती सोपवलं. त्या चिठोर्‍यावर शब्द होते – ती येते आणिक जाते, येताना कधी कळ्या आणते, अन् जाताना फुले मागते. त्यांनी ते चिठोरं माझ्या हाती सोपवलं म्हणजे त्यांनी ते शब्द माझ्या हाती सोपवले आणि ते तिथून निघून गेले.’

पुढे ह्याच ओघात त्यांनी आरती प्रभूंच्या शब्दकळेतली आणखी एक कला सांगितली. ते म्हणाले, ‘एकदा मी आणि आरती प्रभू असेच चाललो होतो. चालत चालत जाण्याचा तो तसा लांबचा पल्लाच होता आणि रस्त्याने थोडंसं ऊनही होतं. चालता चालता थोडं थांबावं म्हणून आम्ही एका झाडाखाली थांबलो. त्या डेरेदार झाडाखाली थांबलो असताना आमच्या थोड्याशा गप्पाटप्पा सुरू झाल्या. त्या गप्पामध्ये आम्ही गर्क असताना त्या डेरेदार झाडावर पक्ष्यांचा थवा आला आणि काही काळ विसावला. बघता बघता त्या पक्ष्यांचा कलकलाट सुरू झाला. मी सहज वर पाहिलं तर तो बर्‍याच हिरव्यागार पोपटांचा थवा होता. मी आरती प्रभूंना म्हटलं, हे पोपट फारच कलकलाट करताहेत बुवा!…मी फारच तक्रार केली तशी आरती प्रभूंनीही मान उंचावली, थोडी तिरकी केली आणि झाडाच्या शेंड्याकडे नजर टाकली तर त्यांच्याही लक्षात आलं की तो पोपटाचा थवा आहे आणि तो कलकलाट पोपटांचा आहे. मग माझ्याकडे पहात ते म्हणाले, बाळ, तो कलकलाट नाही, तो शुकशुकाट आहे. मी म्हणत असलेल्या पोपटांच्या कलकलाटाला हे शुकशुकाट का म्हणताहेत हे माझ्या लक्षात आलं. संस्कृत भाषेमध्ये पोपटाला शुक म्हणतात आणि त्या अर्थाने आरती प्रभू शुकशुकाट म्हणत होते. त्यांनी त्या झाडाखाली वापरलेला शुकशुकाट हा शब्द नीरव शांतता ह्या अर्थाने नव्हता. आरती प्रभूंमध्ये भाषेचा किमयागार दडलेला होता आणि शुकशुकाट ह्या शब्दाचा त्यांनी वापर करताना मला त्यांच्यात तो दिसला होता.’

त्याच कार्यक्रमात त्यांनी आरती प्रभू आणि ना.धों. महानोर ह्या दोन कवींच्या कविता एकत्र करून केलेल्या गाण्याचा एक मजेशीर किस्सा सांगितला. ते म्हणाले, मी ‘जैत रे जैत’ ह्या सिनेमातलं ‘मी रात टाकली, मी कात टाकली’ हे गाणं करत होतो. त्यातली ‘मी रात टाकली, मी कात टाकली’ ही पहिली ओळ गायली गेली आणि नायडू नावाचे एक वादक कोणत्या तरी वादकाचं काही तरी चुकलं म्हणून च् च् च् च् च् असा आवाज करत चुकचुकले. गाण्यातल्या त्या पहिल्या ओळीनंतर त्यांचं ते चुकचुकणं मला गाण्यात काही वेगळंच वाटलं. म्हणूनच त्या गाण्यात ‘मी रात टाकली, मी कात टाकली’ ह्या पहिल्या ओळीनंतर नायडूंनाच तो च् च् च् च् च् असा आवाज करायला लावला आणि गाण्यात एक वेगळीच बहार आली. आज ते माझ्या ह्या कार्यक्रमात मला साथ करत आहेत. पण आज त्यांची ओळख करून देताना मी इतकंच म्हणेन की ज्या हजारो नायिकांना ज्या एका महान पार्श्वगायिकेने आपला आवाज दिला त्या महान पार्श्वगायिकेला नायडूंनी आवाज दिला.’
…तर सांगायचं म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांचा ‘भावसरगम’ आम्हाला गाण्याबरोबर अशा किश्शांनीही समृध्द करून जायचा!

 

- Advertisment -