स्वरसुरावटींचा हिंदी पडदा

ग.दि. माडगुळकर लिखित आणि विजय भट दिग्दर्शित गूंज उठी शहनाईमध्ये दोन नायिका होत्या...अमिता आणि अनिता...मात्र या चित्रपटाची खरी नायिका सनईच होती, उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी हे सनई सूर छेडले होते. संगीत होतं वसंत देसाईंचं याच सिनेमात अब्दुल हलीम जाफर खान यांच्या सितार आणि बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईतली जुगलबंदी पडद्यावर रंगली होती. माणसांचं होणारं नैतिक अधःपतन हा विषय गूंज उठी...मध्ये मांडला होता. त्यातही शेक्सपिअरच्या लेखनातील वुमन, वेल्थ, वाईन अशी कारणं त्यात राजेंद्र कुमारच्या नैतिक अधःपतनास कारण होती. सनईच्या सुरावटींचा कथानकाच्या मागणीनुसार केलेला वापर हे या गूंज उठी शहनाईच्या यशाचं कारण होतं. कथानक आणि गाण्यांमुळे गूंज उठी...ला तिकिटबारीवर मोठं यश मिळालं. सनईस्वरसम्राट भारतरत्न उस्ताद बिस्मिला खान यांच्या जयंतीनिमित्त वाद्यप्रभावाखाली असलेल्या हिंदी पडद्यावरच्या या आठवणी...

गूंज उठी शहनाईमध्ये, जीवन में पिया तेरा साथ रहे…तेरी शहनाई बोले…तेरे सूर, मेरे गीत..अशी एकूण एक श्रवणीय गाणी होती. चित्रपटाच्या कथानकातील उपेक्षीत नायक राजेंद्र कुमारांनी साकारला होता. या काळातील पडद्यावरचे नायकही बंड करण्यापेक्षा जास्त सोशीक होते. राजेंद्र कुमार यांनी सनई वाजवणार्‍या बेसहारा किशन या नायकाची भूमिका याच सोशीकपणातून रंगवली. हा तो काळ होता, ज्यावेळी नायकाला प्रेक्षकांकडून सहानुभूतीची, बिचारेपणाची अपेक्षा नायकाच्या बंडाच्या तुलनेत अधिक होती, सनई, बासरीच्या स्वरांनी पडद्यावरील या सहानुभूतीचे प्रमाण गुणाकारपद्धतीने थेट दुपट-तिपटीने वाढत होते.

राजेंद्र कुमारमधल्या या सोसलेपणाची वेदना गूंज उठी मध्ये सनईने समोर आणली त्यानंतर दहा वर्षांनी गीत रिलिज झाला, त्यात नायक राजेंद्र कुमारच होता. मात्र सनईची जागा बासरीच्या स्वरांनी घेतली होती. गीतमध्येही बासरीने नायिकेची जागा घेतली होती. आजा तुझको पुकारे मेरे गीत रे..जिसके सपने हमें रोज आते रहे…या गाण्यातील वाद्यसंघात बासरी प्रमुख नायिका होती. बासरी वाजवणा-या नायकांची प्रतिमा कृष्णाशी जोडली जात असल्याने आणि नायिकेला राधा किंवा मीरेच्या प्रतिमेत पाहिले जात असल्याने हिंदी पडद्यावर बासरीचे स्वर संवादांची जागा घेऊ लागले. गीतमधल्या राजेंद्र कुमारपासून ते सुभाष घईच्या ऐंशीच्या दशकातल्या हिरोपर्यंत अशा कित्येक चित्रपटात बासरीने नायिकेची जागा घेतली होती.

मुरलिया समझकर, मुझे तुम उठा लो
बस इक बार होंठों से अपने, लगा लो न
कोई सुर तो जागे,
कोई सुर तो जागे, मेरी धड़कनों में
के मैं अपनी सर्गम से रूठी हुई हूँ
तुम्हे देखती हूँ तो लगता है ऐसे
के जैसे युगों से तुम्हे जानती हूँ…

नायकाच्या ओठांजवळ असलेली त्याची मुरलिया ही तत्कालीन चित्रपटाची नायिकाच होती….नक्श लायलपुरींच्या शब्दातून, तुम्हारे लिए च्या या गाण्यातून हे स्पष्ट करण्यात आलं..यात जयदेवचं संगीत आणि लता मंगेशकरांचा स्वर होता. राम तेरी गंगा मैलीमध्ये राज कपूर आणि रविंद्र जैन यांनीही बासरीच्या स्वरांना हिमालयाच्या पर्वतरांगेत नेऊन बसवलं. विधु विनोद चोप्राच्या परिंदामध्ये सुरेश ऑबेरॉयने वाजवलेली उभी बासरी गूढ आणि भीतीदायक वाटते. डेव्हीडच्या धवनच्या जुडवा मध्ये मुकेश ऋषीची बासरी सुरेशच्या तुलनेत समोर येत नाही. इतर वेळी बासरीच्या सुरावटी या पडद्यावरील प्रेमाची नायिकेला घातलेली सादच असते.

इक मुरली, इक पायल
इक पगली इक घायल

इक राधा इक मीरा, या गाण्यात कृष्णावर समान प्रेम करणा-या मीरा आणि राधेच्या कृष्णाप्रती असलेल्या समर्पणातील फरक सांगण्याचा प्रयत्न रविंद्र जैनांनी यशस्वी केला. त्यानंतर पुढे राजकुमार, ऋषी कपूर, जितेंद्र, मिथुन, जॅकी, गोविंदा अशा सर्वच कलाकारांनी मुरली वाजवणारा नायक हिंदी पडद्यावर रंगवला.

नागीन मध्ये पहिल्यांदा बिन वाजवली गेली. ती आजपर्यंतच्या एकूणच प्रत्येक नागपटात वाजतेच आहे. राजकुमार कोहलीचा नागीन पुढे नगिना, नागमणी, निगाहें आदी सर्पपटांची ही यादी वाढत गेली आणि बीन वाजवल्याची गाणीही.

अमिताभ आणि जयाच्या शोलीच्या लव्हस्टोरीतील विरह संवाद जयच्या माऊथ ऑर्गननेच मांडला जातो. (जयदेव) अमिताभने (राधा) जयासाठी पकडून दिलेलं मेंढरू या एका प्रसंगातील, आपको बहुत तंग कर रहा था, या केवळ एका वाक्याच्या पलिकडे या दोघांमध्ये संवाद होत नाही. हा अबोल संवाद केवळ जयच्या माऊथ ऑर्गनमधूनच समोर येतो. शोलेनंतर माऊथ आर्गनची विक्री देशभरात वाढली होती. मात्र त्याही आधी… है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा… म्हणत माऊथ ऑर्गन देव आनंदने पडद्यावर वाजवला, तर आवारा हुं… म्हणत माऊथ ऑर्गनची साथ राज कपूरने केली.

किसिके मुसकुराहटो पे हो निसार…म्हणत श्री 420 मध्ये राजने पुन्हा मुखबाजा वाजवला. शोले मध्ये अमिताभचा माऊथ ऑर्गन आणि पंचमच्या संगीत दिग्दर्शनाखाली असलेलं शीर्षक संगीतातील गिटार महत्वाचं होतं. शोलेचा माऊथ ऑर्गन वाजवणार्‍या भानू गुप्तांना वाहतूक पोलिसांनी मुंबईच्या रस्त्यावर लायसन नसताना वाहन चालवताना हटकलं होतं. शोलेचा माऊथ ऑर्गन मीच वाजवला होता. असं संगीतल्यावर पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडलं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तर शहारुखच्या कभी हा कभी ना मध्ये त्याने वाजवलेल्या माऊथ ऑर्गन महत्वाचा ठरला. त्यातील डॉन गोगा कपूरचं भूतकाळातल्या प्रेमविरह वेदनेचा ब्लॅक कॉमेडी किंवा शहारुखला नायिका आनाने आणलेला माउथ ऑर्गन चित्रपटाचा टर्निंग पॉइंट होता.

बार बार देखो म्हणत ताली हो…पासून शम्मी कपूर आणि विश्वजीतपासून राजेश खन्नापर्यंत 70, 80 च्या दशकात सर्वच नाईकांनी गिटार हातात धरलं. मिथुनने डिस्को डान्सर आणि ऋषी कपूरने कर्जमध्ये गिटारची साथ केली. 70, 80 च्या दशकात गिटारने तरुणाईला वेड लावलं होतं. महेश भटचा आशिकी हा त्याचाच नव्वदच्या दशकातला परिणाम होता.

पडद्यावरचा पियानो हा लेखाचा स्वतंत्र विषय होऊ शकेल. प्यार दिवाना होता है (राजेश खन्ना, कटी पतंग), भारी दुनिया में आखीर (मनोज कुमार, दो बदन), इंनतहा हो गई (अमिताभ, शराबी), धिरे धिरे मचल ऐ दिले बेकरार (अनुपमा), दिल के झरोके में (तिसरी मंझील), आमिर खान (मन), शाहरुख (दिलवाले दुल्हनीयाँ ले जाऐंगे) आजपर्यंत अशी खोर्‍याने ओढता येतील इतकी गाणी पियानोवर वाजवली गेली. नायिकेच्या विरहवेदनेत बुडालेला नायकाचं प्रतिनिधीत्व हिंदी पडद्यावर पियानोनं केलं होतं.

हिंदी पडद्याच्या स्टारपासून सुपरस्टारपर्यंतच्या प्रवासात या पियानोचा मोठा वाटा आहे. राजकुमार संतोषीच्या घायलमध्ये नायकाकडून अमरिश पुरीला 24 तासात मारण्याची धमकी मिळाल्यावर खलनायक अमरीश पुरीतल्या बलवंत रायने वाजवलेल्या चित्रपटातील पियानोचे स्वर भेसूर, भीतीदायक वाटतात, त्याला तेवढ्याच भीतीदायक गिटारची साथ नदीम श्रवणने दिली होती. तर जुन्या अंदाजमधील अशोक कुमार, नर्गिस आणि सुनील दत्तची छबी असलेले पियानोजवळील कृष्ण धवल पोस्टर आजही हिंदी पडद्यावरील क्लासिक पोस्टर मानले जाते.

सुभाष घईच्या मेरी जंगमध्ये पियानो, हिरो मध्ये बासरी आणि कर्ज हिट होण्यात गिटारचा मोठा वाटा होता. ही वाद्ये या चित्रपटांमध्ये नायकाच्या जागीच समातंर बसवली होती. गायक, दिगदर्शिका सोबतच या सर्वच वाद्यांनी पडद्यावरच्या हिरोला हिरो केलं, 7 दशकं उलटूले तरीही हिंदी पडद्यावरच्या वाद्यांचे हे स्वर ताल अजूनही एव्हरग्रीन आहेत.