Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश आजीची गोधडी आणि तिच्या लोककथा

आजीची गोधडी आणि तिच्या लोककथा

Related Story

- Advertisement -

काहीवेळा निरुद्देशाने आपण घर आवरत असतो. प्रत्येकवेळी सण किंवा घरात एखादे कार्य असेल तर ठीक आहे पण कित्येकवेळा घरातल्या नको असलेल्या वस्तू काढून टाकाव्यात अशा उद्देशाने बसलो की अनेक गोष्टी पुन्हा आठवणीत येतात. त्यांच्या मागची कथा पुन्हा सुरू होते. त्या कधी घेतल्या, का घेतल्या, की कोणी दिल्या, कोणत्या प्रसंगी दिल्या याच्या आठवणी जागृत होतात, त्याचबरोबर त्या माणसाची आठवण देखील मनाला व्याकूळ करून जाते.

त्यादिवशी काही अशाच कारणाने बेडच्या आतील सामान नीट लावून नको ते सामान काढण्यासाठी सुरुवात केली, एकेक सामान काढून ते पुन्हा नीट ठेवत असताना काही जुन्या अगदी चाळीस वर्षांपूर्वीच्या म्हणजे आई बाबांच्या संसाराच्या सुरुवातीची भांडी हाती लागली, त्यावर कुणा काका, आत्या, मावशीची नावं होती, काळाच्या ओघात ती भांडी जुनी झाली आणि त्यांनी बेडच्या आतील कोपरा पकडला. काही चादरी नीट प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवल्या होत्या, त्यावरची धूळ झटकून त्या पुन्हा ठेवणार, इतक्यात त्या चादरींच्या तळाशी नीट घडी करून ठेवलेली गोधडी दिसली, ती गोधडी उचलली, इतके दिवस त्या कपड्यांच्या तळाशी असलेली तो गोधडी नाकाजवळ नेली आणि लहानपणीच्या त्या आठवणी पुन्हा जमा झाल्या.

- Advertisement -

माझ्या बाबांची आई. तिला सगळे ताई म्हणायचे, ताईआजी मी चार महिन्यांचा असतानाच वारली. पण तिची उणीव कधीच भासली नाही, कारण बाबांची मोठी काकी जिला सगळे माई म्हणायचे तिने आजीची उणीव सगळी भरून काढली. माझ्या लहानपणापासून आजी म्हणजे माईआजी हेच समीकरण मला ठाऊक होतं. ही गोधडी देखील माईआजीने शिवली होती. गावी खळ्यात झोपताना ही गोधडी माझ्या अंगावर असायची. अनेक कपड्याचे तुकडे एकत्र करून त्यांची कणी एकत्र करून अतिशय सुबकतेने बनवलेली गोधडी उन्हाळ्याच्या दिवसात असो, पावसाच्या दिवसात असो किंवा थंडीच्या दिवसात असो, ही गोधडी माझ्या अंगावर असायची, त्या थंडीच्या दिवसात किती उबदार वाटायची ती गोधडी! गेली कित्येक वर्ष बेडच्या आत दडून बसलेली ती गोधडी आताही किती उबदार वाटत होती. अगदी आजीच्या हात फिरत होता अशी जाणीव वाटावी इतकी ती उबदार .

आजीने ती थरथरत्या हाताने कदाचित विणली असेल, सोबतीला थोरली काकी बसली असेल, नाहीतर संतोषाची आई, अगदीच नाही तर समोरच्या परसवातून वासंती तोरस्करीन ही गोधडी विणायला नक्की आली असेल. घरातली ही कामे ह्या माय भागिंनींनी हात लावल्याशिवाय कधी पूर्ण झालीच नाहीत. आजीच्या आठवणीबरोबर ह्या सगळ्यांच्या आठवणी, आपल्या कष्टाने रखरखीत झालेल्या हातांनी ह्या मायींनी ही गोधडी विणली असेल.

- Advertisement -

ही गोधडी अंगावर घेऊन आजी डोक्यावर तेल घालत बसायची आणि तिच्या नाहीतर कोणाच्या तोंडून कळत नकळत लोकगीते बाहेर पडायची. आजूबाजूला पडलेले भाऊ देखील त्या लोकगीताच्या रुंजीत झोपायचे. मला लोकगीतं ऐकवा, कथा ऐकवा, पण लवकर झोप लागायची नाही तरी आजी प्रयत्न करायची. आजीच्या लोकगीतांना एक पारंपरिक संदर्भ होता. माझ्या डोक्याचे तेल लावून झालं की आजी मला थापटायची आणि मग…

रुणुझुणु घुंगुरवाळा
कोणी दिल्यान हाती बाबूच्या
गावच्या मध्या सुतारान
त्याका लाल लाल गोंडा
बाबू आसा माझो गुणाचो
माझ्या थोरल्या लेकाचो
त्याका नाय झोप येयत
अरे वरच्या चंद्रा
मिट लवकर आता
रुणुझुणु घुंगुरवाळा
बापूस त्याचो चाकरमानी
आवस दमली तरव्याची
बाबू झोप रे लवकरी …..

आजीच्या, थोरल्या काकीच्या लोकगीतातला बाबू फार शहाणा होता. त्याला हट्ट कसला तो माहीत नव्हता, पण माईआजीचा बाबू हट्टी होता, असल्या लोकगीताला तो जुमानत नव्हता. गाणी ऐकून झोपी जाईल एवढा तो सरळ नव्हता. गोधडी सरळ करून अंगावर घालताना आजी वासंती बग गे कसो बाबू झोपत नाय. त्यावर थोरली काकी झोप रे नाय तर बटबटीत डोळ्याचो संकासूर येतलो…झोप आता त्या बटबटीत डोळ्याच्या संकासूराला आम्ही भितो होय? …..काही केल्या मी झोपत नसे. आजीचा उपाय संपला की मग थोरली काकी थांब, बबनाक पत्र धाडतंय आणि सांगतंय बाबुक हुंबयक घेवन जा. काकीची धमकी पोकळ आहे हे मला कळायचं. झोपताना आजीने अंगावर घातलेली गोधडी हळूहळू खाली यायची तशी आजी पुन्हा नीट करून अंगावर घालत असे. मी आजीला म्हणायचो आजी कशाक व्हई गोधडी अंगावर? त्यावर आजी लोककथा सांगायची त्यात आजीच्या गोधडीचं महत्व असायचं. आजी गोष्ट सांगायला सुरुवात करे. कोकणातल्या गावात सुनेला माहेरी पाठवायला कोणी जवळचा दीर किंवा घरातला गडी माणूस सोबतीला जायचा, पण कोणा एका गावात दीर, गडी माणूस पाठवायच्या ऐवजी वाघाला पाठवायचे. मला आतापर्यंत वाघ म्हणजे हिंस्त्र पशु तो कोणा माहेरवाशिणीला सोबत कसा करेल हा प्रश्न नेहमीच पडायचा पण आजी ह्याची उत्तरे द्यायची कधी तसदी घ्यायची नाही तरी तिची गोष्ट चालू असायची.

ती पुढे सांगायची. माहेरी जाताना माहेरवाशीण खालच्या वाटेने आणि वाघ वरच्या वाटेने जायचा. असाच एकदा कोणा माहेरवाशिनीला माहेरहून बोलावणे आले म्हणून आपल्या तान्ह्यामुलीला घेऊन ती निघाली, बरोबर मुलीच्या कपड्याबरोबर तिने सासूने विणलेली गोधडी घेतली, त्या गोधडीत तिने मुलीला गुंडाळले. रानातून कोणी वाघाला वर्दी दिली तसा सोबती म्हणून वाघ आला. घराच्या खळ्यात वाघ आला तशी ती माहेरवाशीण माहेरच्या वाटेने निघाली, खूप अंतर चालल्यावर साहजिकच माहेरवाशिणीला तहान लागली, म्हणून वाघाला उद्देशून बाबा वाघोबा, कुठे पाण्याची सोय असेल तर सांग बाबा तहान लागली आहे. त्यावर वाघ म्हणजे काय जंगल पायाखाली टाकलेला, त्याने खालच्या वाटेला कुठे नदी आहे ते दाखवलं आणि आपण वाटेवर उभा राहिला. माहेरवाशीण पोर वाघाने दाखवलेल्या दिशेने गेली खरी. पण नदीला उतरायची वाट अरुंद, त्यात दोन्ही बाजूला मोठे खडक होते. माहेरवाशीण खाली उतरली तसा वरचा एक खडक घरंगळत खाली आला आणि ती माहेरवाशीण पोर त्या धक्क्याने दुसर्‍या दगडाला आपटली. त्या धक्क्याबरोबर हातातलं लहान पोर दूर फेकल गेलं. माहेरवाशीनीचं डोकं त्या दगडाला आपटलं आणि ती गतप्राण झाली.

इकडे गोधडीत लपेटलेली पोर रडून रडून हैराण झाली. वाघ इकडे वाट बघतो. त्याने पोरीचं रडणं ऐकलं आणि नदीच्या दिशेने धावला. बघतो तर माहेरवाशीण मरण पावलेली. पोरगी लांब कुठे पडलेली. आत ह्या माहेरवाशिणीच्या घरी कुठल्या तोंडाने जाणार याचा विचार करत त्या दगडावर डोकं आपटून वाघाने जीव दिला.

आजीच्या ह्या लोककथा किती वेगळ्या होत्या. वाघासारख्या हिंस्त्रपशुला तिने माणसाळावलं होतं. त्याला माहेरवाशिणीच्या दिराची किंवा भावाची भूमिका दिली होती. आपलं कर्तव्य नीट पार पाडलं नाही म्हणून जीव देणारा भाऊ वाघाच्या रूपाने इथल्या जुन्या माणसांनी रंगवला होता. इकडे माहेरी पोरगी अजून नाही आली म्हणून घरातले तिच्या शोधात निघाले तेव्हा नदीच्या काठून पोरीच्या रडण्याचा आवाज आला. माहेरचे लोक तिकडे गेले तेव्हा वाघाचं डोकं फुटून तो आणि माहेरवाशीण पोर नदीच्या जवळ मरून पडलेली दिसली. पण लहान पोर मात्र आजीच्या गोधडीत सुरक्षित होती. गोधडीच्या रूपाने तिने आपल्या नातीभोवती जणू कवचकुंडले घातली होती.

रात्री कधीतरी आजीची गोष्ट संपायची. माझा डोळा लागायचा.सकाळी अंगावर आजीची गोधडी नीट पांघरलेली असायची. आमच्या पिढीतल्या कितीतरी आज्यांनी अशा गोधड्या नातवांवर घातल्या होत्या. ह्या सगळ्यांना लोककथेचा आंधार होता पण त्यांना जिवंतपणा होता तो प्रेमाचा, आपुलकीचा. कितीतरी वर्षांनी आजीची गोधडी हाती लागली. तशी आजीच्या कथेची आठवण झाली. हल्ली एसीत झोपताना बेडवरच्या चादरीला गोधडी शोभत नाही. त्या चादरीला शोभेल अशी गँचिंग ब्लंकेट हवी असते. रात्री झोपताना नेटफ्लिक्सवरच्या वेबसिरीज बघताना आजीची कथा कशी आठवणार ? ….तरी कधीतरी गोधडी जवळ येते आणि स्मृतीगंधाचा पाऊस पडतो आणि त्या स्मृतीत आजीची गोधडी हवीहवीशी वाटते.

 

- Advertisement -