गुरु

Subscribe

‘रे काय झाला, गप सो बसलंय. होताला सगळा बरा…’ गुरुचे हे शब्द मला नेहमीच आश्वासक वाटत आले. कोकणात आज गावागावांनी वाडीवाडीवर मंडळे आहेत, पण सर्व गावाला एका छताखाली घेणारी मंडळे तशी संख्येने खूप कमी आहेत. शिरोडकर हायस्कूल असो की दादरच्या वीर कोतवाल मैदानात तीन एक महिन्यांनी रविवारी संध्याकाळी जमणारी माणसे ही वाडीनुसार एकत्र येणारी असतात. ही सारी माणसे पोटापाण्यासाठी पार नालासोपारा, अंबरनाथ- बदलापूरला खोल्या घेऊन राहत असली तरी मनाने सतत आपल्या मूळ गावात फिरत असतात… मातीशी जुळलेली त्यांची नाळ इतकी घट्ट असते की गणपती, शिमगा, जत्रा तर सोडाच, पण छोट्या छोट्या गोष्टीत त्यांचे मन आपल्या गावात, घरी, दारी, बागेत, गाईच्या गोठ्यात धाव घेत असते…जणू कृ. रा. निकुंब यांची ही कविता तनमनाने गावाला ओढ घेत असते… ‘घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात…’ या ओळी फक्त माहेरवाशणीच्या नाहीत, तर त्या मातीमाय, निसर्गाच्या सुद्धा आहेत.

मातीच्या खोल गर्भात घट्ट रुतलेल्या मुळांच्यादेखील आहेत. म्हणूनच कवी याच कवितेत समेवर येताना सांगतात- ‘आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला, माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला’ तेव्हा ही माऊली माय माती होऊन जाते. गुरू असाच होता. आपल्या मातीची, माणसांची प्रचंड ओढ असलेला… आज या माझ्या काकाला, नव्हे मित्राला अकाली काळाने ओढून नेला असला तरी तो माझ्या समोर देवदत्त म्हणून उभा आहे… हे लिहिताना माझे डोळे भरून आलेत… तो या जगात नाही, हे माझ्या मनाला अजूनही पटत नाही. त्याच्या मुलीने नेहाने त्याला अग्नी दिला तेव्हा एक आनंदाचे झाड क्षितिजाच्या पार गेल्यासारखे दिसले… पण, गुरू आज शरीराने नसला तरी तो निर्मळ मनाने सतत सोबत असेल. जगी जे जे सुंदर, चांगले असेल त्यात गुरू असेल…

- Advertisement -

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात आज शेकडोनी गावची मंडळे आहेत. पण, ही वाडीची मंडळे असून ती आपापल्या समाजात, जाती पातीत विभागली गेलीत. मराठा, कुणबी, भंडारी आणि इतर अठराशे साठ जाती पातीत. एकत्र गाव म्हणून त्याचा मोठा विचार झालेला नाही. अपवाद असतील, पण, ती संख्या मोठी नाही आणि मला वाटते कोकणच्या विकासाची वाट अडवण्यात हाच जो ठळकपणे दिसत नसला तरी मोठा असा अडसर आहे. कारण आधी गाव म्हणून तुम्ही एक झाला नाही तर तुमचा दबाब गट तयार होत नाही. हाच दबाव मग तुम्हाला विकासाच्या वाटेवर घेऊन जातो. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवणारा असतो. मुंबई आणि गावातील माणसे एकत्र येऊन काही तरी नवीन जन्माला घालू शकतात. किमान पाणी, रस्ते, पुरेशी वीज, शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जतन यात काम करू शकतात. वरचा असो की खालचा कोकण या देवभूमीला दुहीचा शाप आहे.

जगात जे अति सुंदर आहे, ते शापित आहे का? असा विचार होतो तेव्हा ही दुही कदाचित जन्म घेत असावी. ‘तो काय माका शिकयतलो’ या दुराग्रही भूमिकेतून कोकणातील माणसे एक होत नाहीत. हाच दुरावा मग विकासाच्या वाटेतील धोंड म्हणून उभा राहतो. माझ्या घरापलीकडे, माझ्या वाडीपलीकडे एक मोठा गाव आहे, त्याची काही गरज असते, हा विचार सर्वांना एकत्र आणण्यात कमी पडतो. कोकणातल्या माणसांच्या गरजा कमी आहेत, तो आपले हातपाय बघून अंथरूण पसरतो, तो आत्महत्या करत नाही, आहे त्याच्यात समाधान मानतो. मला वाटते ही मिथके झाली… आपणच आपली पाठ थोपटण्याचा हा प्रकार आहे. मुळात आपण आपल्या रक्ताच्या नात्यातली माणसे आधी समजून घेत नाही. सामोपचाराने, एकत्र बसून मार्ग निघेल यावर त्यांचा विश्वास नाही. जमिनीच्या दोन चार जागांसाठी, चार पाच झाडांसाठी आयुष्यभर कोर्ट कचेर्‍या करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आणि जीव मारून ठेवलेला पैसा आहे, पण सामंजस्य भूमिका नाही.

- Advertisement -

भावा भावामध्ये वाद आहेत, काका पुतण्याचे पटत नाही. यातून मग घर एक होत नाही. शेजार मोठा होत नाही. वाडी आकसते आणि गाव तर एक होण्याचे आणखी दूर जाते. जातीपातीच्या, हाणामारीच्या टोकाच्या हिंसेपासून कोकण दूर असला तरी गाव म्हणून एक होण्यात अजूनही आपण खूप कमी पडतोय. आणि हे कमी पडतोय म्हणून कोकणाचा राज्यकर्त्यांवर दबाब पडत नाही. दबाब पडत नाही म्हणून मग राज्यकर्ते निष्क्रीय होतात. पाच वर्षांनी लोक आपल्याला निवडून देणार आहेत, असा निलाजरेपणा त्यांच्यात येतो. राज्य सरकारची अनेक अधिवेशनांची मी बातमीदारी केली आहे. कोकणाचे प्रश्न, विकास, या भागाला नक्की काय गरज आहे याचा विचार करून कधीच काही या अधिवेशनात नवीन जन्माला आलेले नाही. आधी काँग्रेस आघाडीने चुना लावला, नंतर भाजप शिवसेनेने फार काही दिवे लावलेले नाहीत. याचे मुख्य कारण आपण गाव, जिल्हा म्हणून एक होत नाही. आपला दबाव त्यांच्यावर नाही. कोकण आणि विदर्भाच्या अविकसितपणाची मुळे फक्त राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षपणात नाही तर या प्रदेशातील माणसांच्या अल्पसंतुष्टपणात दिसतात. ‘इतक्या करून जावचा खुय आसा’ असे जेव्हा कुणी म्हणते तेव्हा आपल्या अपयशाचा आपणच वाचलेला तो पाढा असतो.

हेच राज्यकर्ते मग कोकणाच्या माथी विनाशकारी जैतापूर आणि नाणार प्रकल्प मारायला धजावतात. त्यांना या मातीची काय गरज आहे, हे दिसेनासे होते. शेवटी सत्यजीत चव्हाणसारखा एक युवक जन्माला यावा लागतो. जो घरादाराची पर्वा न करता जैतापूर आणि नाणारच्या लोकांना एकत्र आणतो. या प्रकल्पांचा विनाशकारीपणा नीट समजावून सांगू शकतो. पण, सत्यजीतसारख्या युवकाची तडफड ही मला खूप कमी पडल्यासारखी वाटते. कारण एक गाव म्हणून आपण कमी पडत आहोत. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे गुरुला एक गाव म्हणून एक असण्याची ती आस होती आणि ती त्याने माझ्या मनात रुजवली. गेल्या पंधरा एक वर्षात आमच्या हातून खूप काही मोठे काम झाले नाही, पण छोटी छोटी कामे करत गावाला बांधून ठेवण्याचा विचार खूप आनंदाचा होता, मुळात एकमेकांबद्दल आदराचा होता, काही तर करत राहिले पाहिजे अशा निर्मळ विचारांचा होता…

गुरुची घरची खूप गरीब परिस्थिती. तशी कोकणच्या प्रत्येक घरात पाचवीला पुजलेला असल्यासारखीच. पण, ही गरीबी दुसर्‍याचा दुस्वास, राग करण्यात कधीच नव्हती. गुरू आणि त्याची बहीण प्रेमा यांना समोर बघितल्यावर मन कितीही निराश असले तरी प्रसन्न होत असे. कारण दिसायला ही माणसे जितकी देखणी तेवढीच मनानेसुद्धा सुंदर… मुख्य म्हणजे निकोप विचार, सतत दुसर्‍याचे आधी चांगले झाले पाहिजे ही भावना. गावात मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर मुंबईत पोटापाण्यासाठी गेलेला गुरू सतत मनाने वेंगुर्ल्याशी स्वतःला बांधून घेऊन होता. त्याला जातपात, देवदेव, गावकरशाही, माणसा माणसांमधील दुरावा मान्य नव्हता. हेच विचार त्याने नकळत माझ्यात पेरले. यातून मग आमच्या वेंगुर्ले गावच्या मंडळाचा जन्म झाला. गेली पंधरा एक वर्षे सोबत काम करताना तो मला कधीच काका वाटला नाही. आमच्या वयात दहा बारा वर्षांचे अंतर असताना देखील तो मला मित्रासारखा होता.

कारण ही मैत्री त्याने जन्माला घातली होती. खांद्यावर हात टाकून हसर्‍या चेहर्‍याने तो बोलायला लागला की जगतातील सर्वात सुंदर आनंदी झाडाचा जन्म व्हायचा. आपण त्या मायेची सावली देणार्‍या झाडावर बसलेल्या पक्षासारखे होऊन जायचो. मी कॉलेजला असताना आणि नोकरीला लागल्यानंतर त्याच्या ऑफिसला जायची एक धमाल असायची. ‘इलय, थांब’, म्हणत तो बँकेतील आपल्या जोडीदारांना सांगून बाहेर पडणार आणि मग एक अर्ध्या तासाच्या भेटीत वेंगुर्ले फिरवून आणायचा. गाव, माणसे नीट समजावून सांगायचा. तो गावाबद्दल माझ्या मनात विचारांची पेरणी करत असायचा. ही वाडी, ती वाडी, जातपातपलीकडची माणूसपणाची भावना, देवळे, समुद्र, कॅम्प, मानसी खाडी, बंदर, मासे, आंबे असा जगातील सर्वात सुंदर गाव वेंगुर्ले माझ्या मनात रुजवायचा. हे रुजवातीचे त्याने माझ्या मनावर केलेले निसर्ग संस्कार होते. एका हसर्‍या झाडाने केलेले…

हेच हसरे झाड गेल्या काही दिवसात शांत होत गेल्यासारखे झाले. आधी त्याला कोरोना झाल्याचे निदान झाले. पण, यातून तो सहीसलामत बाहेर पडेल असे वाटत होते. पण, कोरोना गेल्यानंतर त्याला न्यूमोनिया झाला आणि त्याला श्वास घ्यायला अडचण यायला लागली. हॉस्पिटलमध्ये असताना तो जेव्हा बोलत होता तेव्हा त्याने धाप लागत असतानादेखील आपल्या जवळच्या माणसांना फोन केले. मुख्य म्हणजे गावाला फोन करून सर्वांना त्याने एकत्र राहा, घर-गाव म्हणून चांगले मोठे विचार करा… असे प्रत्येकाशी बोलला. माझ्याशीसुद्धा तो बोलला. ‘रे माझा काय खरा वाटना नाय. मी जगान आसा काय दिसना नाय.’ मी मग त्याला त्याच्या आनंदघन शब्दात सांगितले… ‘रे बरो होतलय तू लौकर. आपल्याक गावच्यासाठी अजून खूप काम करूचा आसा’. मात्र मी त्याला बघायला गेलो तेव्हा ऑक्सिजन लावलेला निपचित पडलेला गुरू बघून अंगावर काटा उभा राहिला. मी त्याला असे कधीच बघितले नव्हते. त्याचा लांब जाणारा प्रवास सुरू झाला होता.

श्वास कोंडत असताना त्याचे डोळे उघडे होते… त्याने मला बघितले आणि हात वर केला. त्याला काही तरी सांगायचे होते. पण, त्याला बोलता येत नव्हते… त्याच्या मुलीने नेहाने, पुतण्या मनोजने त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण, शेवटी ही धडपड अपुरी पडली… याच काळात एका मध्यरात्री तो गेला. मनोजने मला फोन केला… पण मी झोपलो होतो… आणि गुरू दूर प्रवासाला निघून गेला होता… सकाळी मनोजचा मेसेज होता, ‘गुरू काका गेले’. डोळे भरून आले. मीसुद्धा अश्रूंना मोकळी वाट करून दिली. पण, गुरू पुन्हा एकदा समोर आनंद झाड बनून उभा होता- ‘रे काय झाला. होताला सगळा बरा’. आज या जगात गुरू नसला तरी निराशा, दुःखाचे क्षण जेव्हा केव्हा आयुष्यात येतील तेव्हा माझ्यासमोर गुरू असेल… आनंदयात्री होऊन !

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -