घरफिचर्ससारांश‘नाळ भाग २’ बालपणाची निरागस नितळ साद...

‘नाळ भाग २’ बालपणाची निरागस नितळ साद…

Subscribe

लहानपणी एकमेकांना जीवापाड जपणारी भावंडं मोठी झाल्यावर एकमेकांच्या वाईटावर टपून बसलेली असतात. त्यामुळे नाळ चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला पुन्हा एकदा स्वतःच्या अंतरंगात डोकवायला भाग पाडतो आणि पुन्हा एकदा डोळ्यांसमोर निरागस विश्व उभं करून आपण त्यात काही क्षण रमतो.

 – आशिष निनगुरकर

लहानपणी किती सोप्पं असतं ना. कधी भांडलो तरीही पुन्हा एकत्र येतो. एखाद्यावर जीव लावला की तो मनापासून. त्यात काही कमतरता नाही, ना कसलाही स्वार्थ. मोठेपणी अगदी छोट्या छोट्या गोष्टींशी आपण मतभेद उकरून काढतो आणि एकमेकांचा दुस्वास करायला लागतो. किती बदलतो ना आपण? आपल्याही नकळत. असो! हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे ‘नाळ भाग २’. कागदावर स्क्रिप्ट पक्की असली, लेखनावर जास्तीत जास्त मेहनत केली की दर्जेदार सिनेमा कसा तयार होतो याचं सध्याच्या काळातलं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘नाळ भाग २’. पहिला ‘नाळ’ भावभावनांचं उत्तम दर्शन घडविणारा होता. त्याच्या पुढची ही कथा त्याच भावना अधिक तरलतेनं मांडण्याचा प्रयत्न करते.

- Advertisement -

‘नाळ’ चित्रपटाच्या दुसर्‍या भागाची कथा म्हणजे चैत्या सुट्टीला आई-बाबांसोबत गावी जातो. त्या गावात आजूबाजूला चैत्याचे सगळे नातेवाईक राहत असतात. तिथेच त्याची खरी आईसुद्धा असते. त्यामुळे चैत्याला त्या आईबद्दल कायम एक अप्रूप असतं. गावी गेल्यावर चैत्या तिला भेटायला जातो आणि मग त्याला कळतं की आपल्याला एक बहीणही आहे. तिचं नाव चिमी. चिमीला एक भाऊही आहे त्याचं नाव मणी. आता चैत्याला छोट्या चिमीचे लाड करायचे असतात. तिच्याशी खेळायचं असतं, बोलायचं असतं, पण असे अनेक प्रसंग सिनेमात येतात की चैत्या दुःखी होतो, हताश होतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ‘नाळ भाग २’ची खासियत काय असेल तर निसर्गरम्य परिसरात केलेलं शूटिंग आणि लिखाण.

‘नाळ भाग २’ चित्रपट जुन्नरमध्ये चित्रीत झाला आहे. पहिल्यांदाच जुन्नरमधील निसर्गरम्य सौंदर्य मराठी सिनेमात पाहायला मिळालं, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. धबधबे, डोंगरदर्‍या, हिरवागार निसर्ग अशा अनेक गोष्टी पाहून तुम्हाला तुमच्याही गावाची आठवण येईल. याशिवाय लहानपणी मामाच्या गावी गेल्यावर केलेली धम्माल तुम्हाला आठवेल. सिनेमातला क्लायमॅक्स डोळ्यांत पाणी आणतो. दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंक्कटी यांचं दिग्दर्शन ‘नाळ भाग २’ च्या आशय आणि विषयाला न्याय देणारं आहे. छोट्या छोट्या फ्रेम्सचा योग्य विचार सुधाकरने केलाय. याशिवाय जुन्नरच्या हिरव्यागार निसर्गाचा सुरेख वापर सुधाकर यांनी केलाय. त्यामुळे मोठ्या पडद्यावर हा निसर्ग पाहणं ही एक पर्वणी आहे.

- Advertisement -

‘नाळ : भाग दोन’चं म्हणाल तर इथं सगळं चांगल्या रितीनं जमून आलंय. पहिल्या ‘नाळ’मध्ये आपल्या खर्‍या आईच्या एका नजरेसाठी आसुसलेला चैत्या शेवटी काहीसा निराश होतो, मात्र वास्तवाची जाणीव ठेवून पुन्हा आपल्या रोजच्या जीवनात परत येतो. दुसर्‍या भागात तो मोठा झालाय. त्याच्या खर्‍या आईसोबतच त्याचे खरे बाबा, छोटीशी बहीण चिमी आणि गतिमंद मोठा भाऊ मणी यांच्याशी आपली या दुसर्‍या भागात ओळख होते. चैत्या आपल्या आई-बाबांसोबत त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव येथे आलाय. त्याचे खरे बाबा अंजिनाथ (जितेंद्र जोशी) सरपंचपदाच्या निवडणुकीला उभे आहेत. त्यांना मदत करण्यासाठी तसेच आपल्या जमिनीच्या हिस्सेवाटणीचा प्रश्न सोडविण्यासाठी शंकर हे सुमी व चैत्याला घेऊन काही दिवसांसाठी पिंपळगावात दाखल झाले आहेत.

‘नाळ भाग २’ संपूर्णपणे खांद्यावर पेललाय तो सिनेमातल्या बालकलाकरांनी आणि विशेष म्हणजे चिमीच्या भूमिकेत असलेल्या त्रिशा ठोसरने. किती गोड काम केलंय या मुलीने हे तुम्हाला सिनेमात जाणवेल. तिचं बोलणं, तिच्या चेहर्‍यावरचे हावभाव, तिचं रुसणं, भावासाठीची काळजी अशा अनेक भावना त्रिशाने खूप सुंदर साकारल्या आहेत. इतक्या लहान वयात त्रिशाच्या अभिनयातील समज पाहून अवाक् व्हायला होतं. त्रिशाचा अभिनय पुढे अनेक वर्षे सर्वांच्या लक्षात राहील. नाळमध्ये दिसलेला छोटा चैत्या म्हणजेच अभिनेता श्रीनिवास पोकळे दुसर्‍या भागात मोठा झालाय.

श्रीनिवासनेसुद्धा मस्त काम केलंय. बहिणीचं प्रेम मिळवण्यासाठीची तगमग, धडपड श्रीनिवासने मस्त दाखवलीय. आणखी एक विशेष उल्लेख म्हणजे मणी झालेल्या भार्गव जगतापचा. खर्‍या आयुष्यातही दिव्यांग असलेला भार्गव सिनेमात कमाल काम करतो. मुळात या तिघांकडून सुंदर काम करवून घेणार्‍या दिग्दर्शकाचं कौतुक करावं तितकं कमी. याशिवाय नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, जितेंद्र जोशी, दीप्ती देवी अशा कलाकारांनी सहजसुंदर अभिनय केलाय. लहान मुलांचं भावविश्व उलगडणारं ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं संगीत कमाल आहे.

प्रत्येक फ्रेम अन् दृश्याला इथं काहीतरी अर्थ आहे. भावना अगदी प्रभावीपणे पोहचवण्याचं काम दिग्दर्शकानं केलंय. त्यांना कलावंतांनीही तेवढीच उत्तम साथ दिलीय. नागराज, देविका, दीप्ती, जितेंद्र आदींचा प्रश्नच नाही. खरी कमाल केलीय ती बालकलावंतांनी. श्रीनिवास, त्रिशा, भार्गव यांचा अभिनय चित्रपटाचा प्राण आहे. चिमुकल्या त्रिशानं चांगलीच कमाल केलीय. भार्गवनं आपल्या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. इतर सहकलावंत, सहबालकलावंतांनीही आपापल्या भूमिकांचं सोनं केलंय. मोठी माणसं बरेचदा नात्यांत स्वार्थीपणा आणतात, मात्र लहान मुलांचं भावविश्व वेगळं असतं.

हा विरोधाभास चांगल्या पद्धतीनं दिग्दर्शकानं आपल्यापुढे पेश केलाय. एखादी कलाकृती घडवताना ती परिपूर्ण असेलच असं नाही. पहिला ‘नाळ’ कथेच्या दृष्टीनं घट्ट होता. इथं कथा काहीशी सैल सुटते. बर्‍याच गोष्टींत तोच तोपणा दिसतो. काही दृश्यांची लांबण खटकू शकते, मात्र एका चांगल्या कथेपुढे आणि तिच्या सादरीकरणापुढे याकडे किती लक्ष द्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. सातारा, जुन्नर परिसरातील निसर्गरम्य परिसरात झालेलं चित्रीकरण, तेवढीच सुंदर सिनेमॅटोग्राफी मनाला सुखावणारी ठरते. गाणी आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं संगीत चित्रपटाला साजेसं आहे.

नागराज मंजुळे यांनी लिहिलेले संवाद कथेसाठी चपखल आहेत. कसंय ना, नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या मनात वय वाढल्यावर अनेक गोष्टींसाठी स्वार्थ दडलेला असतो. कधी नोकरीचा, कधी पैशांचा, कधी प्रॉपर्टीचा वगैरे. लहानपणी एकमेकांना जीवापाड जपणारी भावंडं मोठी झाल्यावर एकमेकांच्या वाईटावर टपून बसलेली असतात. त्यामुळे ‘नाळ भाग २’ आपल्याला पुन्हा एकदा स्वतःच्या अंतरंगात डोकवायला भाग पाडतो. पुन्हा एकदा डोळ्यांसमोर निरागस विश्व उभं करतो आणि आपण त्यात काही क्षण रमतो. हेच नाळच्या दुसर्‍या भागाचं यश म्हणावं लागेल. म्हणून यंदाच्या दिवाळीत या सिनेमाचा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा.

-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -