घरफिचर्ससारांशनदीच्या लेकी

नदीच्या लेकी

Subscribe

आमच्या घरात नदीच्या पाच लेकी. चार बहिणी. ज्या वाघूरच्या कुशीत वाढल्या म्हणून त्या वाघूरच्या लेकी. आमची माय साक्षात नदीमाय. तिचं नाव कमल. माहेर : जामनेर तालुक्यातलं नवीदाभाडी. कमळासारखीच ही चिखलात उगवून आलेली. गरिबीची दलदल जन्मतः मिळाली. पिढ्यान्पिढ्या गावगाड्याच्या तळात रुतलेली ही नादारी काळोख्या रात्रीसारखी पाचवीला पुजलेली. शाळेची पायरी चढण्याआधीच तिला दुसर्‍याच्या बांधावर जावं लागलं. लेखणी हाती धरायच्या वयात तिच्या हाती विळा-खुरपं आलं. दोन वेळच्या दोन घासांसाठी तिला दुसर्‍यांच्या घरची भांडी घासावी लागली.

नदी जशी निर्मळ. नितळ. प्रवाही. काठावरल्या जीवांना निरपेक्षपणे सर्वस्व देणारी. तशीच बाई. नदीच्या डोहाइतकंच बाईचं मन अथांग आहे. या दोघी वाहत्या आहेत तोवर ही माती आणि मातीतल्या माणसांत चैतन्य आहे. नदी डोंगराची लेक म्हणून ती गिरीजा. मातीत पाय रोवून संकटांशी आजन्म झुंज देत राहणं हे बाळकडू नद्यांना जन्मतःच मिळालेलं असतं. नदीकाठी नांदणार्‍या बाया या तिच्या लेकी. ज्यांच्या गावी नदीकाठ त्यांच्या ठायी सुख अमाप. गंगा, यमुना, सरस्वती, इंद्रायणी, क्षिप्रा, कालिंदी, सिपना, तिश्ता, गोदावरी, कावेरी, शरयु मुलींना दिलेली अशी कितीतरी नावं नद्यांच्या ऋणातूनच तर आलेली आहेत. नद्या सुजलित आहेत तोवर पृथ्वी सुफलित आहे. नदीच्या या लेकी लढाऊ असतात. संकटाशी दोन हात करत बिनघोर जगणं हे नदीकडूनच त्यांना मिळालेलं असतं. सासरी नांदायला गेलेल्या लेकी माहेरच्या नदीचं नाव चालवतात. तिच्या तत्वांशी इमान राखतात. त्या अन्याय सहन करीत नाहीत. त्या अपराजिता आहेत. त्यांना शरण जात लोकं म्हणतात, माय-बाई-वं तिच्या नांदी लागू नहीं, तिच्या रक्तात वाघूरचं पानीय.

आमच्या घरात नदीच्या पाच लेकी. चार बहिणी. ज्या वाघूरच्या कुशीत वाढल्या म्हणून त्या वाघूरच्या लेकी. आमची माय साक्षात नदीमाय. तिचं नाव कमल. माहेर : जामनेर तालुक्यातलं नवीदाभाडी. कमळासारखीच ही चिखलात उगवून आलेली. गरिबीची दलदल जन्मतः मिळाली. पिढ्यान्पिढ्या गावगाड्याच्या तळात रुतलेली ही नादारी काळोख्या रात्रीसारखी पाचवीला पुजलेली. शाळेची पायरी चढण्याआधीच तिला दुसर्‍याच्या बांधावर जावं लागलं. लेखणी हाती धरायच्या वयात तिच्या हाती विळा-खुरपं आलं. दोन वेळच्या दोन घासांसाठी तिला दुसर्‍यांच्या घरची भांडी घासावी लागली. स्वप्नातही पोटभर जेऊ शकत नाही इतकं दारिद्य्र तिनं अनुभवलं. भोगलं. तिला बालपणच नव्हतं मिळालं म्हणून मैत्रिणीही नव्हत्या; पण मन हलकं करायला तिला एक हक्काची जागा होती. ती सूर नदी. तिच्याशी ती बोलायची. आपल्या मनातलं सांगायची. ही नदी रोज तिच्या स्वप्नात यायची. दुथडी भरून वाहायची. सूर जुळले होते तिच्याशी. राबत राहणं… वाहत राहणं हाच दोघींचा स्वभावधर्म. पाराखालच्या दगडावर धुणं धुतल्यावर भुर्कीच्या डोहात डुबकी मारून नदीकाठच्या मेहंदीचा झाडपाला ती आठवणींने न्यायची. एक दिवस तिचे हात पिवळे झाले. मेहंदी मात्र फारशी रंगली नाही. आगीतून उठावं आणि फुफाट्यात पडावं तशी तिची गत झाली. मजुराची लेक मजुराच्या घरी आली. पुन्हा एका घनगर्द काळोखात ती बुडाली. हळद फिटली नाही तोवर तिला वावरात जावं लागलं. दोन्हीकडे तिची सारखीच हेळसांड झाली. मागील पानावरून पुढे सुरू…

- Advertisement -

सासरला माहेरी जोडणारा एक धागा होता नदी. तिथं सूर नदी होती. इथं वाघूर. ही सूर नदी याच वाघूरची लेक. वाघूरमधून सूरचं पाणी वाहत येतं ही गोष्टही तिला खूप सुखावणारी होती. तिने वाघूरबद्दल खूप ऐकलं होतं. आता तर तिच्या सोबतच आयुष्य काढायचंय हेही सुखदायी. अजिंठ्याच्या डोंगरातून उगम पावणार्‍या सूर, खडकी, सोनद, सुकी आणि वाघूर या नद्याभगिनी. या सार्‍यांना स्वतःमध्ये सामावून घेत वाघूर पुढे तापीत विलीन होते. सोयगाव तालुक्यातल्या सावळदबाराच्या जाईचा देव हे सूर नदीचं उगमस्थान. कापूसवाडी, रांजणी, वाघारी, वाडी, नवीदाभाडी, गंगापुरी ही तिच्या काठावर वसलेली गावं. सूर-कांग-वाघूर असा त्रिवेणी संगम गंगापुरीजवळ आहे. हे तीर्थोदक वाघूर आपल्या प्रवाहात घेऊन वाहतेय अनंत काळापासून. आमचं घर नदीच्या दिशेने गावाच्या शेवटी. सकाळी सूर्यनारायण आणि वाघूरचं दर्शन सोबतच होई. पिण्याचं पाणी नदीवरून भरून आणावं लागे. वाड्यातल्या बायांसोबत ती रामप्रहारी नदीवर जायची. डोक्यावर हंडा त्यावर कळशी काखेत पत्र्याचा टीप घेऊन ती भराभर तीन ते चार खेपा करायची. पहाट झाली की नदीकाठ गजबजून जायचा. बाह्मण डोह, कुणब पांथा, महारपांथा, चांभार खिडकी, ढोकी असे गावातल्या जातींचे पाणवठे ठरलेले होते. कोळी लोकांची ठरलेली जागा म्हणजे ढोकी. इथेच त्या त्या जातीच्या लोकांची म्हसनवट. सरण पेटत असलं तरी बायांना पाणी भरणे, धुणं धुणे चुकायचं नाही. सुगीच्या दिवसात बायांची खूप घाई व्हायची. नदीवरची कामं उरकवून घरची कामं करून रानात कापणी, मळणी, वेचणीची उधळ्याची कामं असली की मायची फार धांदल उडायची; पण नदीची भेट झाली नाही असा एकही दिवस नव्हता. मुली मोठ्या होत होत्या तसतसं तिची कामं हलकी होत गेली.

आमच्याकडे होळी शिमग्याला आणि दसर्‍यात नवमीला भाऊबंदकीचे देव असत. तेव्हा पंधरा-तीन वारांपासून घरातल्या कामांना वेग येई. सारवणं-पोतारणं झालं की घरातल्या झावरी नदीवर धुवायला न्यावे लागत. या दिवसांत नदीवर अख्खं गाव अवतरलेलं असायचं. लोकं बैलगाड्या जुंपून लेकरं-बाळं सोबत घेऊन यायचे. माय आम्हा भावंडांकडे झावरीचं गोठडे बांधून द्यायची. दगडावर ताबा मिळेस्तोवर मासे-खेकडे धरायचो. मग एकेक करून मायनं धुतलेल्या झावरी पिळून रेतीत वाळत घालायचो. वाघूर दुमदुमून निघायची. त्यात तिच्या काठावर या रंगीबेरंगी झावरींनी तिचं रूप खुलायचं. झावरी सुकायला वेळ लागे. एरवी वावरात सोबत काम करणार्‍या बाया मग एकत्र नदीकाठी न्याहारी करायच्या. आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकींना सांगायच्या. नदीत पोहत मनमुराद आनंद लुटायच्या. ऊन कलू लागले की सुकलेल्या झावरींच्या घड्या करून आपापले गाठोडे बांधून घराकडे निघायचे. थकूनभागून घरी आलो की मग माय चूल पेटवायची. भाकरी थापून झाल्या की त्याच तव्यावर ठेचा करून खेकडे- मासोळ्याची चटणी बनवायची. पोटभरून जेवून मी झोपी जायचो दिवसभर नदीवर केलेली धम्माल पुन्हा स्वप्नात पहात.

- Advertisement -

इतकं राबूनही घरात पैसा टिकत नसे. शुक्रवारी मालकाकडून मजुरी मिळालीच तर माय नशिराबादला बाजारी जायची. गावातल्या चक्कीवाल्यांनी दळणाचे दर आठ आण्यांनी वाढवले तर माय नदीकाठच्या जोगलखेड्याला दळण घेऊन जायची. घेमेल्यावर घेमेले. त्यात कळण्याचं, ज्वारीच्या भाकरीचं पीठ. नदीच्या काठाकाठाने आम्हाला सोबत घेऊन ती चार मैल अंतर अनवाणी पावलांनीच झपाझप कापायची. दोन पैसे वाचावे म्हणून. पुरसानात सापडलेल्या तुटक्या चपलांना चिंध्या बांधून खूप दिवस वापरायची. उन्हाळ्यात ती रानात सरवा करायची. कधी हरभर्‍याचे घाटे, कधी ज्वारीचे दाणे, तर कधी उडीदाच्या जुनाट शेंगा गरीतून वेचायची. मातीसहित पोतडीत बांधलेलं हे मट्यारं ती थेट नदीवर घेऊन जायची. ऊन लागून कधी नदीवरच पडून राहायची. पण तिच्या या ढोर मेहनतीमुळे कुटुंबाला वर्षभराचा दाळदाणा मिळायचा. नदीकाठी वडिलोपार्जित खारवनातलं शेत होतं. त्याला खतपाणी माल-मटरेल वेळेवर मिळेना. तरी मायच्या जिवावर त्यातून पोतं भरून तुरी व्हायच्या. पावसाळ्यात मजुरीची कामं आटोपली की या वावरात माय कधी बहिणींना घेऊन तर कधी एकटी राबवायची. पाऊस आला तरी वाफ मोडेपर्यंत ती तण खुरपायची. अचानक नदीला पूर आल्यामुळे ती पार अडकून पडायची. पुलावरून किती पाणी वाहतंय याचा अंदाज ती घ्यायची. पूर मोठा असला की इतर मजूर बायांसोबत नदीकाठी ती रात्र काढायची. पुलावरून गुडघाभर वाहता पूर तिने खूपदा पार केला. मनोमन नदीचा जप करत.

बाबा गावातली गुरं राखायचे. हे काम मायच्या मदतीशिवाय शक्य नव्हतं. बहिणी तर घरची गुरं राखण्यासाठी शाळेला दांड्या मारत. येईल ते काम करण्याची धमक त्यांना जन्मजातच मिळाली होती. शेतमजुरीची सर्व कामं तर त्या बालपणीच शिकल्या. याशिवाय रानातून मोळ्या-गवर्‍या आणणे, वावराला काट्यांचा गराडा घालणे, धान्याची पोती उचलणं अशी मेहनतीची कामं तर नदीत धार दाबून मासे धरणे, पुरात पोहणे, मधमाश्यांचे पोळे झाडणे यात तर पुरुषालाही लाजवतील इतक्या होत्या. बहिणींना पाहुणे पहायला यायचे तेव्हा तर त्या रानात सरपण जमवायला किंवा गुरं राखायला गेलेल्या असायच्या. त्यांना शोधायला नदीकाठ पालथा घालावा लागे. चारही बहिणींचे हात पिवळे झाले. यांच्याही मेहंदीचा रंग फिका. मजुराच्या लेकी मजुराच्याच घरी गेल्या. चौघींना नदीकाठचं सासर मिळालं हाच सुखाचा समान धागा. मायकडून मिळालेलं सोसण्याचं बळ आणि वाघूरकडून प्रवाहीपण घेत वाटेला आलेल्या दुःखाशी त्या शर्तीनं झुंजत आहेत. त्या लढत राहोत अशाच नेटानं. त्यांच्यात नदी संचारत राहो आजन्म. त्या वाहत्या राहो. सुखानं नांदो नदीच्या लेकी.

नामदेव कोळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -