-पुष्पा गोटखिंडीकर
एकदा उमाजी आपल्या तीन-चार साथीदारांना घेऊन मामलेदारांच्या घरी गेला. मागच्या दाराने आत जाऊन परसदारी थांबून हाक मारली. ताई, मी आलोय. उमाजीची हाक ऐकताच मामलेदारीणबाई बाहेर आल्या. त्यांनी त्याला कळशीभर पाणी पिण्यासाठी आणून दिले. तेव्हा उमाजी म्हणाला, नुसतच पाणी देणार होय, दोन दिवसांचा उपाशी आहे. हे ऐकून मामलेदारीणबाईंचा जीव कळवळला आणि तिने त्यांना जेवायला वाढले.
जेवता जेवता त्यांच्या गप्पा रंगात आल्या आणि इतक्यात कचेरीतून मधल्या वेळी मामलेदार घरी आले. उमाजीला पाहताच त्यांचा संताप अनावर झाला आणि तू कशाला आला आहेस इथे? काय पाहिजे तुला? असे मामलेदाराने खडसावून विचारताच उमाजी म्हणाला, मी माझ्या बहिणीला भेटायला आलोय. दोन दिवस उपाशी असल्याने ताईकडे जावं, ती जेवायला घालेल. बाकी काही नको आणि आता जेवलो की चाललो बघा.
उमाजी जाताच मामलेदाराचा संताप अनावर झाला आणि हा काय प्रकार आहे, एक दरोडेखोर तुझा भाऊ कसा हे त्यांनी बायकोला खडसावून विचारले. त्यावर ती म्हणाली, उमाजी एक दिवस आपल्याकडे पैसे मागण्यासाठी आला होता. त्या दिवशी त्याच्या टोळीतील एकजण म्हणाला होता, जरा सांभाळून राहा नाहीतर दरोडेखोर ते, डुक धरणारे. काहीही करायला कमी करणार नाहीत ही भीती माझ्या मनात दाटून आली आणि म्हणून एक दिवस तुम्ही कचेरीत गेले असताना मी दोन्ही पोरांना घेऊन जेजुरीला उमाजीकडे गेले आणि त्याला म्हटले उमाजी, मला धर्माची बहीण मान आणि सौभाग्याचे दान दे.
ही मुलं तुझ्या बहिणीची आहेत असं समजून यांचं रक्षण कर. मी सासवडच्या मामलेदाराची बायको आहे. माझ्या कुंकवाचं दान मागायला आले आहे, असं मी त्याला सांगताच तो मला म्हणाला, ताई, काळजी करू नकोस. आजपासून तू माझी धर्माची बहीण झालीस. तुझ्या कुंकवाला कोणी धक्काही लावणार नाही, असं म्हणून त्याने आपल्या साथीदाराला सांगून साडीचोळी आणली. मुलांना कपडे आणले आणि सख्ख्या बहिणीप्रमाणे त्यांनी माझी पाठवणी केली. त्या दिवसापासून तो हे नाते विसरला नाही. इकडे आला की माझी विचारपूस करून जातो.
हे ऐकून मामलेदार विचारात मग्न झाला. उमाजी! रामोशी. क्रूर दरोडेखोर! आणि मानलेली नातीही जपणारा, दयाळू अंत:करणाचा, विशाल हृदयाचा. दोन रूपं. कोणतं खरं? ते की हे? या प्रश्नाचे उत्तर मामलेदार मनामध्ये शोधत राहिला. असा हा उमाजी वरून काटेरी फणसाप्रमाणे वाटणारा तर आतून मात्र गर्याप्रमाणे मऊ मुलायम. अशा या संवेदनशील मनाच्या उमाजीचा जन्म ७ सप्टेंबर १७९१मध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावात रामोजी बेरड समाजातील लक्ष्मीबाई व दादाजी खोमणे या दाम्पत्यापोटी झाला. उमाजीचे वडील दादाजी हे पुरंदर किल्ल्याचे रखवालदार म्हणून काम करीत होते. उमाजींनी वडिलांकडून दांडपट्टा, गोफण चालवणे, तीरकमठा चालवणे, भाला फेकणे, तलवार चालवणे इत्यादी कौशल्ये आत्मसात केली. उमाजी लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने वंशपरंपरेने वतनदारी उमाजीकडे आली.
पुढे इंग्रजांनी भारतामध्ये सत्ता स्थापन करायला सुरुवात केली आणि त्यांनी पुरंदर किल्ल्याची जबाबदारी रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांना दिली. इंग्रजांनी भारतीय समाजावर अनन्वित अत्याचार सुरू केले. यामुळे उमाजी चिडून गेला. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून स्वत:च्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार केला. गनिमी काव्याने इंग्रजांशी झुंज दिली. इंग्रज सरकारचे खजिने लुटून तो पैसा गरिबांना वाटला. तसेच इंग्रजांच्या पुढे पुढे करणार्या जमीनदारांनाही त्याने दरोडे टाकून लुटले आणि तो पैसा भारतीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वापरला.
इंग्रजांच्या अत्याचारामुळे संतप्त झालेल्या उमाजीने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. त्यासाठी अनेक जाती जमातीच्या लोकांना एकत्र केले आणि उठाव केला. इंग्रजांना कोणत्याही प्रकारचे सहाय्य करू नका, त्यांच्या नोकर्या सोडा, त्यांना कोणतेही कर देऊ नका, अशा प्रकारचा जाहीरनामा १६ फेब्रुवारी १८३१ रोजी उमाजीने काढला. यामुळे उमाजी जनतेचे राजे झाले. उमाजीच्या या बेधडक कृत्यांमुळे इंग्रज जेरीस आले आणि त्यांनी त्याला पकडून देणार्यास त्या काळात १० हजार रुपयांचे बक्षीस आणि ४०० बिगा जमीन देण्याचे जाहीर केले.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली गावी बेसावध असताना इंग्रजांनी उमाजीस पकडले आणि त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरून फाशीची शिक्षा सुनावली. फाशी देण्यापूर्वी अखेरची इच्छा काय आहे असे विचारले असता ‘इंग्रजांनो येथून चालते व्हा,’ अशी जोरदार घोषणा त्याने केली. ३ फेब्रुवारी १८३४ रोजी पुण्यातील मामलेदार कचेरीत त्याला फाशी दिली गेली. इंग्रज अधिकारी म्याकिनटॉस म्हणतो, उमाजींना जर वेळीच आवरले नसते तर ते प्रतिशिवाजी ठरले असते. यावरून उमाजींच्या कामाचे मोठेपण आपल्या लक्षात येते. अशा या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आद्य क्रांतिकारकास कोटी कोटी प्रणाम!