-सुजाता बाबर
स्वच्छ, निरभ्र रात्री आकाश चमचमणार्या अवकाशीय वस्तूंनी भरलेले असते-तारे, मोठे ग्रह आणि आकाशगंगा ते पृथ्वीजवळून उडणार्या लहान लघुग्रहांपर्यंत! हे लघुग्रह सामान्यतः पृथ्वीजवळील वस्तू (निअर अर्थ ऑब्जेक्ट) म्हणून ओळखले जातात आणि ते विविध आकाराचे असतात. काही दहा किलोमीटर किंवा त्याहून मोठ्या आहेत, तर काही फक्त दहा मीटर किंवा त्याहून लहान आहेत.
प्रसंगी पृथ्वीजवळील वस्तू पृथ्वीवर वेगाने धडकतात. कधी कधी हा वेग अंदाजे 16 किलोमीटर प्रतिसेकंद किंवा यापेक्षाही जास्त असतो. या गतीच्या प्रभावामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे आणि त्यावरील कोणत्याही गोष्टीचे सहज नुकसान होते. पृथ्वीवर लहान आघात बरेचदा होत असतात. कारण पृथ्वीच्या जवळील अधिकतर वस्तू लहान आहेत.
‘प्लॅनेटरी डिफेन्स’ नावाचा आंतरराष्ट्रीय समुदायाचा प्रयत्न पृथ्वीजवळील वस्तूंची आणि जवळ येणार्या वस्तूंची यादी करून आणि त्यांचे निरीक्षण करून या अंतराळ घुसखोरांपासून मानवांचे संरक्षण करतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या अवकाशीय संभाव्य धोकादायक वस्तूंशी टक्कर होऊ शकते अशा वस्तूंना पृथ्वीजवळील वस्तू असे मानले जाते.
नासाने डिसेंबर 2013 मध्ये निओवाईज मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेचे प्राथमिक लक्ष्य म्हणजे वाइड-फील्ड इन्फ्रारेड सर्व्हे एक्सप्लोरर या अंतराळ दुर्बिणीचा वापर करून लघुग्रह आणि धूमकेतू यांसारख्या पृथ्वीच्या जवळच्या वस्तूंचा बारकाईने शोध घेणे आणि त्यांची वैशिष्ठ्ये नोंदवणे होते. निओवाईजने पृथ्वीच्या जवळच्या वस्तूंची सूची करण्यासाठी संशोधनासह पृथ्वीच्या संरक्षण प्रयत्नांना हातभार लावला.
निओवाईज ही एक लक्षणीय आणि क्रांतिकारी मोहीम होती. या मोहिमेमुळे पृथ्वीजवळील वस्तूंचे सर्वेक्षण कसे करायचे या प्रक्रियेत क्रांती झाली. एवढेच नाही तर निओवाईज मोहिमेने नासाच्या वाईज मोहिमेमधील अंतराळयान वापरणे सुरू ठेवले. हे यान 2009 ते 2011 पर्यंत कार्यरत राहिले. त्याने केवळ पृथ्वीजवळील वस्तूच नव्हे तर दीर्घिकांसारख्या दूरच्या वस्तू शोधण्यासाठी ऑल-स्काय इन्फ्रारेड सर्वेक्षण केले.
हे अंतराळयान पृथ्वीभोवती उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रदक्षिणा घालत होते, ध्रुवांवरून जात होते आणि ते सूर्य समकालिक कक्षेत होते. इथे ते बराच काळ त्याच दिशेने सूर्य पाहू शकत होते. मध्य अवरक्त श्रेणीमध्ये उत्सर्जित केलेल्या खाणाखुणा शोधून हे यान खगोलशास्त्रीय आणि ग्रहीय वस्तूंचे सर्वेक्षण करू शकले.
मानवाच्या डोळ्यांना दृश्यमान प्रकाश जाणवू शकतो. हा प्रकाश म्हणजे 400 ते 700 नॅनोमीटरदरम्यानचा विद्युत चुंबकीय किरणोत्सर्ग आहे. जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी आकाशातील तार्यांकडे पाहतो तेव्हा आपल्याला त्यांचे दृश्यमान प्रकाश घटक दिसतात, परंतु मध्य अवरक्त प्रकाशात 3 ते 30 मायक्रोमीटरदरम्यान तरंग असतात आणि ते मानवी डोळ्यांना दिसत नाहीत.
गरम झाल्यावर एखादी वस्तू ती उष्णता औष्णिक ऊर्जा किंवा थर्मल एनर्जी स्वरूपात साठवते. जोपर्यंत वस्तू औष्णिकरोधित नसते, तोपर्यंत ती ऊर्जा मध्य अवरक्त श्रेणीमध्ये विद्युत चुंबकीय ऊर्जा स्वरूपात सतत सोडली जाते. ही प्रक्रिया ‘औष्णिक उत्सर्जन’ म्हणून ओळखली जाते. पृथ्वीजवळील वस्तू जेव्हा सूर्यामुळे तापतात तेव्हा अशीच प्रक्रिया घडते. लघुग्रह जितका लहान तितके त्याचे औष्णिक उत्सर्जन कमी होते.
निओवाईज अंतराळयान पृथ्वीजवळील वस्तूंमधून उच्च पातळीच्या संवेदनशीलतेचे औष्णिक उत्सर्जन ओळखू शकते म्हणजे ते लहान लघुग्रह शोधू शकते, परंतु उष्णता उत्सर्जित करणारी लघुग्रह ही एकमेव वस्तू नाही. अंतराळयानाचे सेन्सर इतर स्त्रोतांकडूनही उष्णतेचे उत्सर्जन पकडू शकतात, ज्यामध्ये अंतराळयानाचा स्वतःचादेखील समावेश आहे.
स्वतःच्या उष्णतेचा अडथळा दूर करण्यासाठी वाईज अंतराळयानाची रचना केली गेली होती. यात तत्कालीन अत्याधुनिक घन हायड्रोजन क्रायोजेनिक शीतकरण प्रणाली वापरली होती, ज्यामुळे यान थंड राहू शकले. क्रायोजेनिक टप्प्यात जेव्हा ते सक्रियपणे थंड होत होते तेव्हा अंतराळयान सुमारे उणे 447 अंश फॅरेनहाइट तापमानावर जात होते.
हे तापमान विश्वाच्या तापमानापेक्षा (उणे 454 अंश फॅरेनहाइट) थोडे जास्त होते. क्रायोजेनिक टप्पा 2009 ते 2011 पर्यंत कार्यरत होता. 2011 नंतर ते निष्क्रिय झाले. नासाने निओवीज मोहिमेंतर्गत वाईज अंतराळयान पुन्हा सक्रिय केले आणि पृथ्वीजवळील वस्तू शोधण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले, जे क्रायोजेनिक कूलिंगशिवायदेखील शक्य होते.
क्रायोजेनिक कूलिंग टप्प्यात अंतराळयान तितके थंड ठेवण्याची गरज नव्हती. कारण पृथ्वीजवळील वस्तू वाईज मोहिमेतील लक्ष्य असलेल्या वस्तूंपेक्षा खूपच जवळच्या होत्या. सक्रिय कूलिंग गमावण्याचा यानावर परिणाम झाला. बोर्डवरील चारपैकी दोन लाँग-वेव्ह डिटेक्टर इतके गरम झाले की ते यापुढे कार्य करू शकले नाहीत. यामुळे क्राफ्टची क्षमता मर्यादित झाली.
फेब्रुवारी 2024 पर्यंत निओवाईजने सौरमालेतील सुमारे 44000 विविध वस्तूंच्या 15 लाखांहून अधिक इन्फ्रारेड नोंदी ठेवल्या आहेत. यामध्ये पृथ्वीजवळील वस्तूंचे सुमारे 1600 शोध समाविष्ट आहेत. निओवाईजने पृथ्वीजवळच्या 1800 पेक्षा जास्त वस्तूंचा आकारदेखील सांगितला आहे.
विज्ञान आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी या मोहिमेचे योगदान असूनही ऑगस्ट 2024 मध्ये ते बंद करण्यात आले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश झाल्यावर 1 नोव्हेंबर 2024 रोजी जळून गेले. पृथ्वीजवळील वस्तूंचा शोध घेण्यात निओवाईजच्या योगदानामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवती असलेल्या लघुग्रहांबद्दल अधिक सखोल माहिती मिळाली. शास्त्रज्ञांना अस्पष्ट वस्तू शोधण्यासाठी कोणत्या आव्हानांवर मात करावी लागेल याची कल्पना मिळाली.
निओवाईजला पृथ्वीजवळच्या सर्व वस्तू सापडल्या का? नाही! बहुतेक शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की पृथ्वीजवळ अजूनही लहान वस्तू आहेत, ज्यांना ओळखणे आवश्यक आहे. निओवाईजचा वारसा पुढे नेण्यासाठी नासा ‘निओसर्वेयर’ नावाच्या मोहिमेची योजना आखत आहे. निओसर्वेयर ही पुढील पिढीतील अंतराळ दुर्बीण असेल, जी पृथ्वीजवळील लहान लघुग्रहांचा अधिक तपशीलवार अभ्यास करू शकेल. मुख्यत्वे नासाच्या पृथ्वी संरक्षण प्रयत्नांमध्ये ती योगदान देईल. हे सुमारे 10 मीटर इतक्या लहान पृथ्वीजवळील वस्तूंचा वेध घेईल, परंतु प्रक्षेपणाची प्रतीक्षा 2027 पर्यंत करावी लागेल.