घरफिचर्ससारांशमोफत ऑक्सिजन देणार्‍या सृष्टीचं मूल्य कधी चुकवणार?

मोफत ऑक्सिजन देणार्‍या सृष्टीचं मूल्य कधी चुकवणार?

Subscribe

ऑक्सिजनचं नाव ऐकलं तरी काळजाचा ठोका चुकतो, रुग्णांचा जीव गुदमरतो असं भयावह चित्र सर्वदूर निर्माण झालंय. आजवर जो ऑक्सिजन आपल्या नकळत जगवत आलाय, त्याचं महत्व निदान कोरोना संसर्गाच्या निमित्ताने का असेना मानवाला उमगलंय. मात्र, आजवर शेकडो वर्षांपासून केवळ मानवच नव्हे तर प्रत्येक सजीवाला मोफत ऑक्सिजन पुरवणार्‍या सृष्टीचं मूल्य आपण कधी चुकवणार, हा प्रश्न विचारायची वेळ येऊन ठेपलीय.

ऑक्सिजन सिलिंडर्स, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन हे क्वचितच चर्चेत असलेले शब्द कोरोनाच्या भीषण संसर्गामुळे प्रत्येकाच्या तोंडी रुळले आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचं महत्त्वदेखील उमगलं आणि त्याची किंमतही लक्षात आली. आजवर जी श्वसनयंत्रणा आपोआप व्यक्तीच्या नकळत वर्षानुवर्षे जराही कुरबुर न करता कार्य करत होती. कोरोनामुळे ती बिघडताच अनेकांच्या पायाखालची जमिनच सरकली. आजवर फुकटात मिळत असलेल्या ऑक्सिजनची किंमतच आपण कधी लक्षात घेतली नाही. मात्र, आता जेव्हा ऑक्सिजन तुटवड्यामुळे राज्य सरकारपासून ते हॉस्पिटल प्रशासन, स्थानिक यंत्रणा हादरली तेव्हा कुठे ऑक्सिजनचं महत्व समजू लागलं.

निसर्गात कोणती झाडं असावीत, याच्या निर्णयाचा मक्ता मानवाने घेतल्यापासून सारं चक्र बिघडायला सुरुवात झाली. चकचकीत रस्त्यांच्या दुभाजकांत शोभिवंत झाडं लावून वृक्षारोपणात समाधान मानणार्‍या याच यंत्रणेने रस्ता रुंदीकरणासाठी 50-100 झाडांची कत्तल केलेली असते. दुसरीकडे अनेक वर्षे रस्त्याकडेला जमीन नापिक करणारी निलगिरी, आणि उद्यानांमध्ये पाणी संपवणारी बॉटल पामसारखी जलद गतीने वाढणारी झाडं लावण्याचा उद्योग सुरू होता. आजही सरकारी पातळीवर संख्या आणि हिरवाई दाखवण्यासाठी असे प्रयत्न सुरू आहेत. दुर्दैवाने, या उथळ विचारांमुळे भारतीय झाडांची संख्या झपाट्याने कमी झाली आणि आता ऑक्सिजनचं महत्व पटल्यानंतर पिंपळ, वड, चिंच जवळजवळ हद्दपारच झाल्याचं लक्षात आलं.

- Advertisement -

रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि दुभाजकांत लावल्या जाणार्‍या आकर्षक झाडांमुळे शहराच्या हिरवळीत वाढ होताना दिसत असली तरीदेखील कार्बन डायऑक्साईड शोषणार्‍या झाडांचं प्रमाण यात अत्यंत कमी आहे. विकासाच्या वाटेवर निघालेल्या शहरांमध्ये पर्यावरणाचं संतुलन राखणंदेखील तितकंच गरजेचं आहे. मात्र, ऑक्सिजन सोडणार्‍या आणि कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात शोषून घेणार्‍या झाडांचं प्रमाण कमी असल्यानं भविष्यात प्रदूषणाच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांकडून व्यक्त होते आहे.

इस्त्रायल सरकारने त्यांच्या देशात डोळ्यांना सुखावणार्‍या, सुंदर दिसणार्‍या झाडांऐवजी भरपूर ऑक्सिजन देणार्‍या आणि पक्ष्यांचा रहिवास सुखकर करणार्‍या झाडांची लागवड करत जगात आदर्श निर्माण केला. दुर्दैवाने भारतातील सर्वच शहरांमध्ये याबाबत मात्र मोठा विरोधाभास दिसून येतो. हिरवळीसाठी ओळखल्या जाणार्‍या नागपूर शहरदेखील याला अपवाद नाही. वृक्षारोपणासाठी सरसावणार्‍या संस्था आणि व्यक्तींमध्ये वाढ होत असली तरीही वृक्षलागवडीसाठी कोणत्या झाडांची निवड करावी याची आजही अनेकांना पुरेशी माहिती नाही. कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन देणार्‍या झाडांच्या लागवडीचे गेल्या काही वर्षांत कमी झाले आहे. त्यामुळे शोभिवंत झाडांच्या लागवडीवरच भर दिला जातो आहे. शहरांमध्ये वाहनांची संख्याही भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे प्रदूषणाची पातळी उंचावत आहे. नुसते हरित शहर म्हणून शहरांची ओळख कायम ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने रस्त्याच्या दुतर्फा, दुभाजकांवर वृक्षलागवड केली. त्यामुळे प्रदूषणाचा स्तर जराही कमी झालेला नाही. हे प्रदूषण रोखून पुरेसा ऑक्सिजन मिळवायचा असेल तर कार्बन डायऑक्साईड शोषणारी आणि ऑक्सिजन देणारी झाडे लावणे गरजेचे आहे.

- Advertisement -

सामाजिक वनीकरण मोहिमांमध्ये गेल्या काही वर्षांत सुबाभूळ, लमोहोर, निलगिरी अशी विदेशी झाडे लावण्यावर अधिक भर दिला गेला. मात्र, या झाडांचा पक्षी, कीटक, बुरशी, जमिनीतील जीवाणू यांना काहीएक उपयोग होत नाही. उलट ही झाडे जमिनीतील पाणी शोषून घेतात आणि या पानांचे जमिनीत विघटनही होत नाही. पर्यायाने झाडाखालची जमीन नापिक होते. याउलट वड, पिंपळासारखे देशी वृक्ष इथल्या जैवविविधतेला सहकार्य करतात. पक्षी, प्राणी, कीटके, बुरशी आणि सर्व जीवजंतू यांच्यावर जगतात. पिंपळ 100 टक्के, वड 80 टक्के तर कडूलिंब 75 टक्के कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. गेल्या 68 वर्षांत भारतात सरकारतर्फे वड, पिंपळ, कडूलिंब ही झाडे लावणे पूर्णपणे बंद झाले आहे.

वनस्पतींची ऑक्सिजन फॅक्टरी
सर्व सजीव श्रवनक्रिया करतात. ज्यात प्राणी ऑक्सिजन घेतात आणि कार्बनडाय ऑक्साईड सोडतात. तर, वनस्पती कार्बनडाय ऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. कार्बनडाय ऑक्साईड आणि पाण्याच्या संयोगाने वनस्पती अन्न तयार करतात. या ठिकाणी त्यांना क्लोरोफिल आवश्यक असते आणि ते केवळ प्रकाशाच्या सानिध्यातच मिळते. म्हणून रात्री अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबते आणि झाडं ऑक्सिजन घेतात. चोवीस तास त्यांची ही प्रक्रिया सुरू असते. प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती ऑक्सिजन सोडत असतात. वनस्पतींची ही ऑक्सिजन फॅक्टरी अगदी मोफत आपल्याला ऑक्सिजन देत असते.

वनस्पती आणि सजिवांकडून एकाचवेळी श्वसनाच्या प्रक्रियेत कार्बनडाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणावर वातावरणात सोडला जातो. म्हणून रात्री झाडाखाली झोपू नये, असे सांगितले जाते. अंधश्रद्धेमागेही काही शास्त्रीय कारणे दडलेली असतात.

पिंपळ देतो 24 तास ऑक्सिजन
संस्कृतमध्ये पिंपळाला अश्वथा म्हणतात. प्राचीन काळापासून या झाडाची पूजा केली जाते. गौतम बुद्धांना याच झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाल्याने याला बोधीवृक्षही म्हणतात. अध्यात्माच्या बाजूने विचार करता श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखालीच देह ठेवला. त्यानंतर कलियुगाला सुरुवात झाली. या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास आहे, असे दाखले मिळतात. पिंपळाला सर्व स्तरावर एवढं महत्व असण्याचं कारण म्हणजे ते 24 तास ऑक्सिजन निर्मिती करत असते. वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही पिंपळाचं झाड खूप उपयोगी मानलं जातं. वैज्ञानिकांच्या शोधानुसार हे एकमेव झाड आहे, संपूर्ण दिवस-रात्री ऑक्सिजन देत असतं. या झाडाची सावली उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम राहते. या व्यतिरिक्त या झाडाचे औषधी गुणही भरपूर आहेत.

ही झाडे देतात सर्वाधिक ऑक्सिजन
निसर्गातील सर्वच झाडे दिवसा ऑक्सिजन देतात. मात्र, त्यातही पिंपळ, कडुलिंब, तुळस, वड आणि बांबू ही झाडे इतर झाडांच्या तुलनेत 30 टक्के अधिक ऑक्सिजन देतात. त्यातही वड, तुळस ही झाडं 24 पैकी 20 तासांपेक्षा अधिक ऑक्सिजन देतात. झाडाचं प्रत्येक पान ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असतो. त्यामुळे जेवढी जास्त पानं तेवढा जास्त ऑक्सिजन निर्मित होत असतो. पानांची संख्या आणि त्यांच्या आकारावरही हे प्रमाण अवलंबून असतं.

एक झाड देतं 23 लाखांचा ऑक्सिजन
एक झाड दरवर्षी तब्बल 23 लाख रुपयांचा ऑक्सिजन देतं. तरीही आम्ही आमच्या स्वार्थासाठी बेसुमार वृक्षतोड करतो. अर्थात वृक्ष मानवाला जिवंत ठेवण्याचं कार्य अविरत करत असतात आणि मानव त्यांची कत्तल करण्याचं काम सुरू ठेवतो. एक प्रौढ झाड दिवसाकाठी सरासरी 230 लिटर ऑक्सिजन निर्मिती करतं. एका व्यक्तीला दररोज 550 लिटर ऑक्सिजनची गरज भासते. म्हणजेच प्रत्येकी किमान 3 झाडांची गरज असल्याचं दिसतं.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -