घरफिचर्ससारांशभ्रमंतीचं वर्तुळ अपूर्ण आहे

भ्रमंतीचं वर्तुळ अपूर्ण आहे

Subscribe

उपनगरात घाटकोपर पश्चिमेस निसर्गतः अर्धवळसा घेतलेल्या खंडोबा डोंगराच्या दक्षिण पायथ्याशी बर्वेनगर वसलेय. या नगरावर आपल्या आदर्शवत उपक्रमांनी एक संस्था वर्षानुवर्षे राज्य करीत होती. अक्षरशः लोक या संस्थेच्या उपक्रमांची-आवाहनांची वाट पहात. कारण विवेकी मनाची ती भावनिक-वैचारिक भूक होती. ‘मी या संस्थेचा सदस्य आहे’, हे सांगायला माझा मलाच गौरव वाटे असे माझ्या आयुष्यातील अविभाज्य भावपूर्ण संघटन म्हणजे ‘नाट्यपराग’ ही संस्था होय.

समाजाचा आत्मा व्यक्तिसापेक्ष की समूह सापेक्ष? मला हा प्रश्न अस्वस्थ करतो. अलीकडेच काही वर्षांपूर्वीपर्यंत समाजजीवनाचा प्रवाह सामूहिक एकजिनसी असायचा. कार्य असो वा एखाद्या घटनेवर प्रतिसाद असो तो सामूहिक व्यक्त व्हायचा. समाजाचे सामूहिक प्रतिबिंब दिसायला तेव्हा संस्था-मंडळे मोलाचे योगदान पार पाडत. एखादी संस्था त्या त्या विभागाचा चेहरा-आरसा असे. हे, आज सांगूनही कळणार नाही इतक्या तुटक अंतरावर समाज येऊन थांबल्याचे प्रकर्षाने जाणवतं.

ऐन तारुण्यात मला अशा संस्था पाहता अनुभवता आल्यात. त्यांच्या कार्य-दिशादर्शनातून समाजाच्या प्रगतीचे बीज रोवले जात होते. व्यक्ती घटकाच्या विचारांची एक धाटणी तयार होत होती. माझं सद्भाग्य की, मला अशा संस्थेचा परिसस्पर्श झाला जिथे माझ्या आयुष्यातील योग्य वळणावर युवामन संस्कारित झाले. उपनगरात घाटकोपर पश्चिमेस निसर्गतः अर्धवळसा घेतलेल्या खंडोबा डोंगराच्या दक्षिण पायथ्याशी बर्वेनगर वसलेय. या नगरावर आपल्या आदर्शवत उपक्रमांनी एक संस्था वर्षानुवर्षे राज्य करीत होती. अक्षरशः लोक या संस्थेच्या उपक्रमांची-आवाहनांची वाट पहात. कारण विवेकी मनाची ती भावनिक-वैचारिक भूक होती. ‘मी या संस्थेचा सदस्य आहे’, हे सांगायला माझा मलाच गौरव वाटे असे माझ्या आयुष्यातील अविभाज्य भावपूर्ण संघटन म्हणजे ‘नाट्यपराग’ ही संस्था होय.

- Advertisement -

मी राहायचो, त्या चाळवस्ती समाजाची जीवन जगण्याची एक सामान्य पद्धत होती. दिवस उजाडतो तो मावळण्यासाठीच पोटासाठीच जगायचंय, म्हणून नोकरीसाठी शिकायचं आणि ती मिळाली की दोनाचे चार-सहा करून पिढी पुढे सारायची. त्यापलीकडील आयुष्याचा तसा गंध नव्हता. किंबहुना आयुष्य म्हणजे काय हे कळणारे माझे वयही नव्हते आणि घडवू शकणारे वातावरणही नव्हते. 8वी-10 वीत असताना ‘नाट्यपराग’ संस्था नावाचा एक दबदबा मनावर होता. वर्ष 11वी अखेर माझा चुलतबंधू संतोष मला या संस्थेच्या वास्तूत घेऊन गेला होता.

वास्तू म्हणजे काय तर, अदमासे पंधरा बाय अठराची अर्ध पत्र्याची शेड. थोडाबहुत परिसर अन शेजारी हनुमान मंदिर. त्या दिवशी दिसलेल्या त्या अनोळखी प्रसन्न चेहर्‍याना नाव ओळख करून देतानाही मला दडपण जाणवत होती. दडपण होते वयाचे, परिस्थितीचे, राहत होतो त्या सभोवतालच्या वातावरणाचे आणि काहीच कळत नसल्याचे.

- Advertisement -

त्या प्रसन्न वास्तू वातावरणात वावरणारे सर्व तरुण हसत खेळत गप्पा गोष्टी करीत झाडू मारण्यापासून ते उपक्रम सजविण्यापर्यंतच्या एकापेक्षा एक भन्नाट कल्पकतेपर्यंत कार्यरत असत. गुणी-बुद्धिमान युवा तरुणांचा सहवास ज्या वास्तूत सक्रिय होता, तिथून काहीनाकाही ज्ञान मिळत असल्याचा मला दिवसागणिक प्रत्यय येत होता. संस्था-संघटन, उपक्रम व्यवस्थापनाचे रीतसर पाठ मिळू लागलेत. जीवन हा घटनाप्रवाह होय. त्यात एक अनुक्रम-शिस्त हवीच. निसर्गाची आणि नियतीची ती रीत जाणून घेणे आणि ओळखून जगणे यालाच तर ज्ञान म्हणतो ना ?

एकापेक्षा एक झपाटून काम करणारी ही गुणवान तरुण मंडळी आपापले शिक्षण, नोकरी, व्यवसायक्षेत्र सांभाळून संस्था चालवत होते. ना पदाची हौस ना मोठेपणा. ना फोटोची हौस, ना प्रसिद्धीचा हव्यास. समाजाची गरज ओळखून उपक्रमांचे नेटके आयोजन ठरे. प्रत्येक जण आपापल्या परीने विचारांचे, श्रमाचे, प्रसंगी आर्थिक पदरमोड करे. त्यामुळे उपक्रमाचे ठरविलेले इप्सित शतप्रतिशत यशस्वी ठरे.

शुद्ध-सरळ विचार आणि त्याला अनुसरून घडणारा आचार होता. व्यक्तिमत्वाची विविधता, अभिरुचीची भिन्नता होती. वृत्तीतील सहिष्णुता व उदारता या तत्वांचा स्वीकार हीच संस्थेची खरी आचारसंहिता होती. यामुळेच एकापेक्षा एक यशस्वी उपक्रम आणि जीवाचं रान करून उपक्रम यशस्वी करणारे गुणी सभासद हे संस्थेचे अस्सल शंभर नंबरी भांडवल होते. त्याकाळी दादरला अमर हिंद मंडळाची व्याख्यानमाला तशी उपनगरात नाट्यपराग संस्थेची ‘विवेक व्याख्यानमाला’ सर्वश्रुत होती.

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत गरीब गरजू मुलींचे ‘शैक्षणिक पालकत्व’ संस्थेने स्वीकारले होते. गरीब गरजू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ‘पुस्तक पेढी’ उपक्रम होता. 10वी, 12 वी पुढे काय ? तसेच ‘व्यवसाय मार्गदर्शन’ भरवले जायचे. स्वस्त वही विक्री उपक्रम, विनामूल्य आरोग्य संपदा शिबीर, केव्हा रक्तदान-रक्तगट चिकित्सा शिबिराबरोबर ‘मरणोत्तर नेत्रदान सप्ताह’ आयोजित व्हायचा. महत्वपूर्ण विषयावर बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धाही घेतली जायची. हुंडाबळी विषयावर प्रदर्शने-व्याख्याने,26 जानेवारीस नेरे पनवेल येथील कुष्ठधामात ‘श्रमदान’ तर 15 ऑगस्टला नेरळ जवळच्या आदिवासी पाड्यात ‘श्रम संस्कार’ शिबिर होई. तिथल्या वस्तीत जीवनापयोगी वस्तूंचे-औषध-कपड्यांचे-शालापयोगी वस्तूंचे वाटप होई.

राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, वृक्षारोपण-वृक्ष संवर्धन, अक्षर जत्रा, रंगभूमी दिन, सुंदर स्वाक्षरी स्पर्धा, शालांतर्गत वक्तृत्व-शुद्धलेखन स्पर्धा, एकपात्री-एकांकिका अभिनय स्पर्धा, समाजात ठळकपणे घडणार्‍या घडामोडींवर आधारित व्याख्याने-चर्चा सत्रे, बालवाडी, संगीत विद्यालय इतकेच काय, तर लोकांना आपल्या विभागाची प्रगती करणारा सक्षम नगरसेवक, आमदार हवा असतो, त्यासाठी सर्व उमेदवारांना एका व्यासपीठावर आणून लोकांसमोर बोलावयास भाग पाडणारा ‘सर्व पक्षीय प्रबोधन सभा’ हा अभिनव उपक्रम संस्था आयोजित करी. कोणताही पक्ष किंवा उमेदवाराला या सभेचे दडपण असे कारण लोकांसमोर मर्यादा उघड होत. अशा एक ना अनेक दर्जेदार उपक्रमांचे सातत्यपूर्ण आणि यशस्वी आयोजन माझ्या या संस्थेकडून होत असे. संस्थेची वास्तू माणूस म्हणून घडण्याचे अविरतपणे संस्कार करीत होती. तळमळ, कळकळ, प्रांजलपणा या जीवनमूल्यांची पायाभरणी होत होती.

अवघ्या चारेक वर्षांत चाळ संस्कृतीतून आलेला मी संस्थेच्या व्याख्यान मालेसाठी बांद्रा साहित्य सहवासमध्ये जाऊन दिग्गज साहित्यिकांच्या दरवाजावरची बेल वाजवायचे साहस करू लागलो होतो. शांता शेळके, अरुण साधू, गंगाधर गाडगीळ अशा अनेकांसमोर संस्थेचा परिचय मांडून व्याख्यान देण्यासाठीचे विनंती आग्रह आणि त्याहून पुढे म्हणजे मानधन किती द्यायचे हे सुद्धा विचारण्याची हिंमत करू लागलो. नाट्यपराग संस्थेने माझ्यासारखे अगदी समाजाच्या सर्वतोपरी खालून वर येऊ इच्छिणारे कार्यकर्ते घडवलेत. समाजभान आणि बांधिलकी शिकविली.

जबाबदारीचे कर्तव्य कळावयास नवख्या तरुणांकडे पदाभार सोपवून आणि स्वतः पद-प्रतिष्ठेपासून अलिप्त राहून उपक्रमासाठी जीवतोड मेहनत घेऊन संस्थेचा खर्‍या अर्थाने आधारस्तंभ असणारे कार्यकर्ते फक्त आणि फक्त नाट्यपराग संस्थेकडेच मी पाहिलेत. सर्वस्वी सुनील सावंत, तुषार पावसकर, संजय चव्हाण, अरुण सावंत, हेमंत आंबोकर, सूर्यकांत म्हसकर, सुनील परब, नागेश सावंत, गिरीष राणे, दिवाकर प्रभू, राजन जगताप, शिरीष कोरगावकर, माधवी महाजन, मेघा बालंखे कितींची म्हणून नावे घेऊ?

संस्थेस अनेक पुरस्कारही लाभलेत, पण त्याहून महत्वाचा पुरस्कार होता तो संस्थेचा गुणी सभासद. संस्थेच्या उपक्रमांचा वेग आणि पसारा असा की काही नवोदित संस्था नाट्यपराग संस्थेचे कार्य कामकाज जाणून घ्यावयास उत्सुक असायच्या. पुढे काही वर्षांनी गिर्यारोहण या क्षेत्रात मी अधिक सक्रिय झाल्यानंतर या संस्थेच्या उपक्रमात सहभागी होता येत नव्हते. संपर्क दुरावला जात होता. पण संस्थेची ती पवित्र वास्तू आणि सहकारी हृदयात होते अन शेवटच्या श्वासापर्यंत ते असतील. संस्थेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वावर, गुणात्मक बळावर माझी वेगळ्या क्षेत्रात स्वतंत्र वाटचाल सुरू झाली होती. ज्या संस्थेने ज्यांच्या व्याख्यानाचे वेड लावले होते, ते बाबासाहेब पुरंदरे, प्रा.शिवाजीराव भोसले, बाळासाहेब ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहवास आणि मार्गदर्शन मिळावयाचे भाग्य मला पुढे लाभले.

ज्या संस्थेच्या गिरिदुर्ग भ्रमंतीमधून गडकोटांचे दर्‍या खोर्‍यांचे वेड लागले होते तिथून सुरू झालेला प्रवासभारतातील सर्वोच्च गिर्यारोहण प्रशिक्षण देणार्‍या ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनीअरिंग’ या डिफेन्स मिनिस्टरी संचालित संस्थेत मी प्रशिक्षक म्हणून रुजू होण्यापर्यंत झाला होता.

नाट्यपराग संस्थेने दिलेल्या नेतृत्वाच्या मार्गदर्शक बळावरच पुढे मी भारतीय नेव्ही, इंडियन एक्सप्रेस, न्यू इंडिया एन्श्युरन्स कंपनी, अस्थमा अँड ब्राँकायटीस, ओनीडा आदी कंपन्या-समूहांना प्रशिक्षण देऊ लागलो होतो. मान-मानधन-प्रसिद्धी अमर्याद लाभू लागली होती. पण या सर्वांच्या मुळाशी होते ते नाट्यपराग संस्थेच्या अठरा बाय पंधरा फूट वास्तूत मिळालेले संस्कारधन. आज संस्थांचे बाजारीकरण झाल्याचे पाहून वाईट वाटतेय. टीव्हीवरच्या चॅनेल्सनी जेव्हा लोकमनाचा पूर्णतः कब्जा केला, तिथून माणूस समूहापासून तुटला, आत्मकेंद्रित झाला. शिवाय लोकांना जगावयाच्या बाबी अनुदानात आपसुक मिळाल्यावर सेवा करून घ्यावयास असाही वर्ग तरी कसा उरेल ?

संस्था संघटनांची जागा आज कार्पोरेट एनजीओंनी घेतली. पूर्वी समाजाभिमुख इव्हेंट आणि त्यासाठी पैशांची चणचण भासे. आत्ता पैशांसाठीच इव्हेंट हे सूत्रं ठरल्याने संस्था संघटना मालकीच्या होऊ लागल्याचे दृश्य दिसू लागलेय. कार्पोरेट क्षेत्रातील येस आर येस फंडातून कमिशनवर पैसा उपलब्ध होतोय म्हटल्यावर आजकाल सत्वहीन संस्था मंडळांचे अमाप पीक येऊ लागलेय. एकेकाळी संघटनांतून दिसणारे युवा शक्तीचे बळ आज राजकीय पक्ष नेत्यांच्या दारात घुटमळत घुसमटून जाऊ लागल्याचे विदारक चित्रं सर्वत्र दिसतेय.

धर्मादायुक्त कार्यालयात चौकशी केल्यास कळते किती खासगी संस्था दिवसा गणिक उभ्या राहातायत. तिथेही आवश्यक असलेले प्रपोजल फिज घेऊन तयार करून देणारे उपलब्ध असल्याने प्रश्नच मिटला. काही महाभाग तर असे मी पाहिलेत की संस्था फक्त त्यांच्या कुटुंबापुरत्या मर्यादित. या प्रायव्हेट लिमिटेड संस्थेत सबकुछ नवरा-बायको-पोरंटोरं, मेहुणा इथपर्यंत मजल गेलीय.

पूर्वी संस्था म्हणजे सहकार्‍यांच्या भावविश्वाचे एक कुटुंब असायचे. आज एक कुटुंब म्हणजे संस्था इतकी वैचारिक निर्लज्ज अधोगती पहावयास मिळतेय. थातुरमातुर उपक्रमांचे भंपक स्टंट्स करायचे. आपली पदासहित नावं, फोटोज कसे येतील याची योग्य व्यवस्था करायची आणि ओळखीचा फायदा घेत वर्तमानपत्रात बातम्या छापून आणायच्या. बस्स यावर फाईल्स फोल्डर तयार करून उद्या पुरस्कारासाठी किंवा टेंडरसाठी शिवाय आर्थिक सहकार्यासाठी त्या पाठविण्याची तरतूद करून ठेवायची. अरेरे अशा निर्लज्ज सदोष मानसिकतेमुळेच सामूहिक संस्था संघटनांचे अस्तित्व संपत समाजाचे अपरिमित नुकसान होत असल्याचे पाहावे लागतेय. संस्थात्मक जीवनरीत विकसित होण्याऐवजी संस्थांची रचनात्मकता संपून विघटन होणे, हे दुर्दैव होय.

समाज ही एक रचना-व्यवस्था असते. माणसा-माणसांमधील संबंधांचा तो आकृतिबंध. सामाजिक बांधिलकी म्हणजे आपल्या सामाजिक संदर्भाचे व त्यातील आपल्या भूमिकेचे आकलन. समाजाकडून हवे ते घेणे, ते ऋण समजून आपण काही देणे आणि ते देता यावे यासाठी संस्थांच्या समर्पित भावनेतून सक्रिय होणे महत्वाचे.

या पार्श्वभूमीवर 44 वर्षांच्या अथक प्रवासात ‘नाट्यपराग’ आजही कार्यरत आहे. व्यक्ती-समाज-घडविणार्‍या ‘नाट्यपराग’ सारख्या सत्वशील संस्थांची आज समाजास-राष्ट्रास नितांत गरज आहे.

‘नाट्यपराग’ संस्था म्हणजे सामाजिक पुरुषार्थ अर्थात लोकमनाचा सर्वोच्च आविष्कार होय !

‘चालणं-बहरणं अविरत आहे,
भ्रमंतीचं वर्तुळ अपूर्ण आहे’

–रामेश्वर सावंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -