घरफिचर्ससारांशआदिशक्तीचा जागर : दार उघड बये दार ..!

आदिशक्तीचा जागर : दार उघड बये दार ..!

Subscribe

मातृपूजा, देवीपूजा हा आपल्या उज्ज्वल आणि समृद्ध परंपरेचा वारसा आहे. स्त्री शक्तीच्या गौरवाचे आणि त्यांच्या प्रती असलेल्या श्रद्धेचे हे महत्वाचे प्रतीक आहे. मातृरुपात या शक्तीला पाहिले जाते. तिचे भक्तवत्सल आणि दुष्टसंहारक ही दोन्ही रूपे मोठी विलोभनीय आहेत. सुष्टाचे रक्षण आणि दुष्टाचे निर्दालन करण्यासाठी या जगन्मातेने अनेक रूपे घेऊन दुष्ट प्रवृत्तीपासून या भूमीचे रक्षण केले आहे. म्हणूनच तिच्या या दुर्गारुपाचा नेहमीच उदोकार होत आला आहे. म्हणूनच तिचा हा अनादी अनंत महिमा अगाध आहे. तिच्या या तारक रुपामुळेच प्राचीन काळापासून या आदिशक्तीचे महिमान आणि तिची आराधना चालू आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये अनेक रूढी, परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. आपल्या जीवनपद्धतीचे, उपासनेचे व भक्तिभावाचे प्रतिबिंब या परंपरामधून दिसते. अशीच प्राचीन काळापासून म्हणजेच रामायणाच्याही आधीपासून भारतवर्षामध्ये मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धाभावाने जोपासली जाणारी परंपरा म्हणजे नवरात्र उत्सव होय. आपल्या जीवनपद्धतीमुळे जी संस्कृती निर्माण झाली तिलाच आपण भारतीय संस्कृती म्हणतो. संस्कृती म्हणजे आपली विविक्षित अशी जीवनपद्धती होय. म्हणूनच संस्कृतीने अवघ्या मानवी जीवनालाच कवेत घेतलेले असते; नव्हे जीवनप्रवाहाबरोबरच संस्कृतीचीही वाटचाल होत असते. म्हणूनच तिचे रूप एकाच वेळी जसे स्थिर भासते तसेच ते नित्यनूतनही असते. कालाय तस्मे नमः या उक्तीप्रमाणे तिला बदलावे लागते.

इथे ताठरता चालत नाही. त्यामुळेच ज्या संस्कृतीमध्ये ही लवचिकता नसते तिला अनेक प्रकारच्या संघर्षाला सामोरे जावे लागते. असे असले तरी काही परंपरा मात्र नेहमीच स्थिरीभूत असतात. लोकमानसामध्ये त्या कायमच्या घर करून असतात, म्हणूनच त्या नेहमीच श्रद्धेय असतात. अशा परंपराचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे संक्रमित होत जातो. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही; कारण अशा परंपरा आपल्या, जीवनपद्धतीचाच अविभाज्य घटक बनतात. अशीच सर्वमान्य परंपरा म्हणजे नवरात्रोत्सव होय. हा उत्सव म्हणजे आदिशक्ती, आद्यजननी, जगन्माता शक्तीरुपाची उपासना! या शक्तीरुपाची उपासना देवीच्या उपासनेतून केली जाते. जेव्हा मातृसत्ताक कुटुंबपद्धती होती तेव्हापासून या शक्तीरुपाची पूजा होत आली आहे.

- Advertisement -

मातृपूजा, देवीपूजा हा आपल्या उज्ज्वल आणि समृद्ध परंपरेचा वारसा आहे. स्त्री शक्तीच्या गौरवाचे आणि त्यांच्या प्रती असलेल्या श्रद्धेचे हे महत्वाचे प्रतीक आहे. मातृरुपात या शक्तीला पाहिले जाते. तिचे भक्तवत्सल आणि दुष्टसंहारक ही दोन्ही रूपे मोठी विलोभनीय आहेत. सुष्टाचे रक्षण आणि दुष्टाचे निर्दालन करण्यासाठी या जगन्मातेने अनेक रूपे घेऊन दुष्ट प्रवृत्तीपासून या भूमीचे रक्षण केले आहे. म्हणूनच तिच्या या दुर्गारुपाचा नेहमीच उदोकार होत आला आहे. म्हणूनच तिचा हा अनादी अनंत महिमा अगाध आहे.

तिच्या या तारक रुपामुळेच प्राचीन काळापासून या आदिशक्तीचे महिमान आणि तिची आराधना चालू आहे. स्वामी विवेकानंदाचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनीही या शक्तीची उपासना केल्याचा आधुनिक संदर्भ आहे. तर रामायणामध्ये लंकापती रावणवधाच्या आधी प्रभू श्रीरामचंद्राने नऊ दिवस नवरात्र उपासना करून या शक्तीरुपाचा आशीर्वाद घेऊनच दहाव्या दिवशी रावणवध केला. हा दिवस म्हणजे अश्विन शुद्ध दशमी होय. या दिवसापासून हा दिन दसरा किवा विजयादशमी म्हणून भारतभर साजरा केला जातो. नऊ दिवसाच्या व्रताची समाप्ती या दिवशी होते. तसेच नऊ दिवस युद्ध करून याच दिवशी देवीने महिषासुराचा वध केला.

- Advertisement -

या आख्यायिकेबरोबरच महाभारतातही पांडवाविषयी या दिनाचा संदर्भ येतो. या दिवशी शस्त्रपूजा केली जाते. तसेच सीमोलंघन करून शमीपूजन आणि अपराजिता पूजनही केले जाते. हा सण विजयाचे प्रतीक असल्याने या उत्सवास पुराणकाळात आणि राजेशाहीत विशेष महत्व प्राप्त झाले. राजमान्यतेबरोबरच समाजमान्यताही या दिनाला मिळाली. त्यामुळेच सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रामायण, महाभारतादी महाकाव्याचा अनुषंग या सणास लाभल्यानेही या दिनाचे मोठे औत्सुक्य आहे.

तसे पाहिले तर रामायण, महाभारताच्या पूर्व काळातही हा उत्सव साजरा होत होता आणि त्याचा अनुषंग हा कृषीसंस्कृतीशी आहे. त्यामुळे हा एक प्रकारे सृजनशक्तीचाच लोकोत्सव आहे. या सृजनशक्तीची प्रतिकात्मक पूजा या विधिद्वारे मोठ्या उत्साहाने केली जाते. स्त्री ही विश्वनिर्मितीचे केंद्र असून सर्जनाची अलौकिक यातुशक्ती तिच्याठायी असते. तसेच भूमीचेही आहे म्हणून या दोन्ही शक्तीची म्हणजेच पृथ्वीतत्वाची आणि स्त्रीशक्तीची एकत्रितच उपासना या काळात केली जाते. त्यामुळे या परंपरेकडे कृषिनिष्ठ विचारातूनही पाहता येते. कारण याच कालावधीमध्ये पावसाळ्यात पेरलेले पीकपाणी घरी येऊन अन्नधान्याची समृद्धी होत असते.

नवरात्रातही घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडीलावर नऊ धान्याची पेरणी करून दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे अंकुर देवी-देवतांना वाहतात. या सर्व घटना कृषीसंकृतीच्या प्रतीक आहेत. अजूनही गावोगावी याच प्रकारची प्रथा पाळली जाते. या दिवशी ग्रामीण भागात बाजरीच्या कणसांचे तोरण मंदिरात बांधले जाते. तसेच शमी -आपट्याच्या पानाबरोबरच या काळातील धान्याची कणसेही देवांना अर्पण केली जातात. अशाप्रकारे प्रारंभीचा हा कृषिविषयक उत्सव नंतरपौराणिक व इतिहासकाळात राजेशाहीत राजकीय स्वरूपाचा झाला. याचाच प्रभाव आधुनिक काळातील राजकारणावर पडून विविध पक्षाचे दसरा मेळावे होऊ लागले याची प्रेरणा आपल्या इतिहासात आहे.

इतिहासकाळात दसर्‍याच्या सीमोल्लंघनाला मोठे सैनिकी स्वरूप आले. सीमोलंघनानंतर पावसाळा संपला की पुढील मोहिमांचे बेत आखले जाऊ लागले. दसर्‍याच्या दिवशी जेव्हा राजदरबार भरे तेव्हा कर्तबगार सरदारांचा, सैनिकांचा गौरव केला जाई. त्यांना नजराणा, पदव्या बहाल केल्या जात. तसेच काही मोहिमा,स्वार्‍या याच शुभमुहर्तावर काढल्या जात. उदा. इ.स.१६३९ चा दसरा साजरा करून श्री. शहाजी राजांनी मातोश्री जिजाबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमवेत बंगलोरला प्रयाण केले. इ.स.१६५६ साली दसर्‍याच्या दिवशी मोहीम करून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुपे काबीज केले. बंकापुरावर स्वारी याच दिवशी केली तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी बर्‍हाणपूरच्या स्वारीचे प्रस्थान याच दिवशी केले. म्हणूनच ऐतिहासिक दृष्टीनेही दसर्‍याच्या सणास मोठे महत्व आहे. अशा विविध परिमाणांनी मंडित झालेला हा सण विलक्षण आनंददायी आणि सर्वांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लीत करणारा आहे.

या सर्व रूढी परंपरांचा आदिबंध स्त्रीतत्वाशी, सर्जनाशी आणि विजयाशी जोडलेला आहे. जेव्हा-जेव्हा या सृजनसृष्टीचा समतोल बिघडणार्‍या घटना घडतात; मग त्या नैसर्गिक असोत की मानवनिर्मित तेव्हा-तेव्हा या विश्वनियंत्या आदिशक्तीला हाक दिली जाते. तिचा जयजयकार आणि उदोकार केला जातो. म्हणूनच संत एकनाथांनी या आईला ‘नमो निर्गुण निराकार । आदि मुळमाया तू आकार । महालक्ष्मी तू साचार । करिसी दुष्टांचा संहार । आकार सारुनी निराकार काय बैसलीस बया । असे म्हणून दार उघड बया दार उघड’ अशी साद घातली आणि पुढे आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने अवघा महाराष्ट्र भयमुक्त झाला. सर्व असुरी शक्तीचे निर्दालन छत्रपती शिवबाच्या पराक्रमाने केले आणि संत एकनाथांची ही आकांक्षा शिवकाळात पूर्ण झाली.

–डॉ. अशोक लिंबेकर 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -