घरफिचर्ससारांशराष्ट्रवादीच्या घडयाळाचं अचूक टायमिंग

राष्ट्रवादीच्या घडयाळाचं अचूक टायमिंग

Subscribe

महाविकास आघाडी या तीन पायांच्या सरकारला काल 28 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालं. आज पडेल, उद्या पडेल असं म्हणत म्हणत सरकारने पहिलं वर्ष तरी यशस्वीपणे पूर्ण केलंय. या सरकारची स्थापना होण्यामध्ये महत्वाची भूमिका होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. 24 ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार येणार आणि पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे वाटत होते. मात्र राजकारणाची चक्रे अशी फिरली की एका महिन्यातच भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. राष्ट्रवादीने अशाप्रकारे सत्ता स्थापन करण्याचा अयशस्वी प्रयोग 2014 च्या निवडणुकीनंतर देखील केला होता. मात्र तेव्हा तो अयशस्वी ठरला. सत्तेत राहण्याची सवय असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचं अचूक टायमिंग साधण्याची कला चांगलीच अवगत आहे. विरोधी पक्ष ते सत्ताधारी पक्ष अशा स्थित्यंतराचा राष्ट्रवादी पक्षाचा हा घेतलेला आढावा...

पाच वर्ष विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने या काळात संघटनेच्यादृष्टीने अनेक वाईट बदल पाहिले. 15 वर्षे सत्तेत असताना ज्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा कोंडाळा वरिष्ठ नेत्यांच्या अवतीभोवती दिसत होता, तो अचानक गायब झाला. भाजप युतीच्या माध्यमातून पुढची दहाएक वर्षे सत्तेतून हलत नाही, असा सर्वांचाच कयास होता. त्यामुळे वार्‍याची दिशा ओळखून अनेकांनी उगवत्या सूर्याला नमन केले. काँग्रेस-राष्ट्रवादीतून अनेक मोठमोठे चेहरे भाजपात डेरेदाखल झाले. विशेषतः 2019 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने चमत्कारिक असेच म्हणावे लागेल. या वर्षात अनेक नेत्यांच्या करियरला ब्रेक लागला. तर काहींना चक्क लॉटरी लागली. ‘हार कर भी जीतनेवाले को बाजीगर कहते है’, हा शाहरुख खानचा डॉयलॉग राष्ट्रवादीला अक्षरशः लागू पडला.

2019 च्या सुरुवातीपासूनच भाजपने राज्यात महाभरती सुरू केली. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि वंचितमधून मोठ्या प्रमाणावर नेते, कार्यकर्ते भाजपवासी होऊ लागले होते. राष्ट्रवादीला तर महागळती लागली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील 9 विद्यमान आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. संदीप नाईक, पांडुरंग बरोरा, अवधूत तटकरे, वैभव पिचड, जयदत्त क्षीरसागर, राणा जगजितसिंह पाटील, दिलीप सोपल, शिवेंद्रराजे भोसले आणि भास्कर जाधव या आमदारांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. यापैकी केवळ चार आमदारांना आपली जागा राखता आली. बाकी आमदारांना पराभवाचे तोंड पहावे लागले. जे विजयी झाले ते जिंकूनही हरले. कारण पुन्हा विरोधात बसण्याची त्यांच्यावर दुर्दैवी वेळ आली. तर खासदार उदयनराजे भोसले यांनादेखील पराभव सहन करावा लागला. आमदारांसोबत अनेक महत्वाच्या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. जसे की, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार अशोक धात्रक, मुंबई प्रदेश अध्यक्ष सचिन अहिर यांनीही पक्ष सोडला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पदाधिकारी पक्ष सोडत होते. पक्षाला एकप्रकारची मरगळ आलेली असताना दुसर्‍या बाजूला सत्ताधार्‍यांकडून चौकशीच्या फेर्‍यात पक्षाला अडकविण्याचा प्रयत्न केला जात होता.

- Advertisement -

भाजपप्रणित केंद्र सरकारने ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाचा सुडासाठी वापर केला, असा आरोप विरोधकांकडून सातत्याना होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी ईडीने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना चौकशीच्या फेर्‍यात ओढण्याचा प्रयत्न केला. त्याआधी ईडीनेच राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते छगन भुजबळ यांना दोन वर्षे तुरुंगात डांबले होते. राज्य शिखर बँक कर्जवाटप घोटाळा प्रकरणात अजित पवार आणि शरद पवार यांना नोटीस पाठवली.

ईडीच्या नोटीशीमुळे निवडणुकीचा नूर बदलला

सप्टेंबर 2019 मध्ये शरद पवारांना ईडीने नोटीस पाठवली. राज्य सहकारी शिखर बँकेशी सुतराम संबंध नसताना शरद पवार यांना नोटीस पाठविण्यात आली होती. त्यांची लवकरच चौकशी होणार असल्याची अफवा पसरवली गेली. राजकारणात मुरलेले आणि संकटाचेही संधीत रुंपातर करणार्‍या शरद पवारांनी या संधीचे सोने केले. संबंध नसतानाही मला नोटीस का पाठवली? असा प्रश्न विचारत शरद पवार यांनी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाण्याची भूमिका घेतली. ज्यादिवशी शरद पवार चौकशीसाठी जाणार होते, त्यादिवसी राष्ट्रवादीने राज्यभर आंदोलने केली. राज्याच्या कानाकोपर्‍यातून मुंबईत अनेक कार्यकर्ते दाखल झाले. प्रकरण आपल्या अंगाशी येईल, हे ताडून ईडीचे अधिकारीच स्वतःहून शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आणि कोणतीही चौकशी होणार नाही असे सांगू लागले. महागळतीमुळे बेजार झालेल्या राष्ट्रवादीत एकच चैतन्य पसरले. कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पवारांनी चांगलाच बार भरला.

- Advertisement -

अजित पवारांचे बंड

शरद पवारांनी भरलेला बार हा काही तासांतच फुसका ठरवण्याचे काम पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केले. राष्ट्रीय पातळीवर पवारांचा बोलबोला होत असताना अजित पवारांनी आपल्या आमदारकीचा गुपचूप राजीनामा देऊन टाकला. राजीनाम्यानंतर अजित पवार अज्ञातस्थळी निघून गेले. त्यामुळे पवारांनी ईडीला काडी लावल्याची बातमी क्षणाधार्त फिरली आणि अजित पवारांची नाराजी, या बातमीने खळबळ उडवून दिली. तब्बल दोन दिवस अजित पवार नॉट रिचेबल होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत अश्रू ढाळले. माझ्यामुळे पवारांना या वयात चौकशीला सामोरे जावे लागत असल्याची भावना बोलून दाखवली आणि पक्षाने तिकीट दिले तरच निवडणूक लढविणार अशी घोषणा केली. निवडणुकीआधी आणि निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांचे दोन अवसानघात राष्ट्रवादीला चांगलेच शेकतील असे वाटत होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने दोन्हीही वेळा अजित पवारांचे बंड थोपवण्यात आले.

पावसातल्या सभेने चमत्कार केला

अजित पवारांचे नाराजीनाट्य संपल्यानंतर विधानसभा निवडणुकांचा प्रचार खर्‍याअर्थाने सुरू झाला होता. एका बाजूला तत्कालीन मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपर्‍यात प्रचार करत होते. तर दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीतील शरद पवार नावाचा 80 वर्षांचा तरुण दिवसाला तीन-तीन सभा घेत होता. सोलापूरमधील पहिल्याच सभेत पवारांनी पक्ष सोडून गेलेल्यांना फैलावर घेतलं. जे गेलेत त्यांच्याकडे बघायला आलोय, असे वाक्य उच्चारताच तरुण चांगलेच चेकाळले. युवा कार्यकर्त्यांचे हे चेकाळणे राज्यभर पसरविण्यासाठी राष्ट्रवादीने पवारांची प्रत्येक सभा फेसबुकवर लाईव्ह केली होती. पवारांच्या प्रत्येक सभेला तरुणांचा तुफान प्रतिसाद मिळत होता. तर दुसर्‍याबाजूला शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी या जोडगोळीने प्रचारात रंगत आणली होती. पवारांनी सेट केलेलं नॅरेटिव्ह घेऊन इतर नेत्यांनीही त्याच प्रकारे प्रचाराचा टेम्पो कायम ठेवला होता.

प्रचार शिगेला पोहोचला असताना पवारांच्या सातार्‍यातील सभेने एक मोठा पल्ला गाठला. राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभेत निवडून आलेल्या उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली. शरद पवारांचे विश्वासू सहकारी श्रीनिवास पाटील ज्यांनी याआधी सातारा लोकसभा जिंकली होती, त्यांना मैदानात उतरविण्यात आले होते. त्यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत भरपावसात पवारांनी भाषण ठोकले. या वयातही पवार मैदान सोडत नाहीयेत, याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची सहानुभूती पवारांच्या बाजूने उभी राहिली. त्याचे परिणाम निवडणुकीतही दिसले आणि 2014 साली 44 आमदार असलेली राष्ट्रवादी यावेळी 54 आमदारांवर जाऊन पोहोचली.

मुख्यमंत्री होण्याची ‘हीच ती वेळ’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु, हा शब्द उद्धव ठाकरेंनी दिला होता. हा शब्द खरा करण्याची हीच ती वेळ असल्याची जाणीव मातोश्रीला झाली. तर 2014 साली भाजपला शब्द देऊन केलेली चूक राष्ट्रवादीने यावेळी सुधारली. निकालानंतर आम्ही सर्वात मोठा विरोधी पक्ष या नात्याने विरोधात बसू असे ठामपणे राष्ट्रवादीचे सर्व नेते सांगत होते. त्यामुळे भाजपला अदृश्य हातांची मदत मिळाली नाही. याचा फायदा घेत शिवसेनेने आपले दबावतंत्र कायम ठेवले. यातून राष्ट्रवादीने सत्तेचं टायमिंग जुळवलं आणि वाहत्या गंगेत आपले हात धुवून घेतले. कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं अशी आघाडी महाराष्ट्रात जन्माला आली. या आघाडीमुळे देशभरातील भाजपतेर पक्षांना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा जणू फॉर्म्युलाच मिळाला. शंभरहून अधिक आमदार, स्वपक्षाचे राज्यपाल आणि केंद्रात सत्ता असूनही राज्यात भाजपला सत्तेचा सोपान गाठता आला नाही. फडणवीस यांची ताठर भूमिका, मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसलेली शिवसेना आणि महत्त्वाकांक्षाहीन झालेला काँग्रेस पक्ष… अशी राष्ट्रवादीसाठी पोषक असलेली परिस्थिती निर्माण झालेली होती. याचा फायदा घेतला नाही तर ते पवार कसले. शरद पवारांनी आपले फासे योग्य पद्धतीने टाकत भाजपला चितपट केले.

पवारांनी जुळवून आणलेल्या या सरकारचे प्रणेते, निर्माते, आधारकर्ते सर्व काही शरद पवार आहेत. एका वर्षात सरकारवर जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा पवार पुढे सरसावले. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील झालेले हल्ले असो किंवा तीनही पक्षात समन्वयाची भूमिका साधणे असो… शरद पवारांनी पहिल्या वर्षात तरी तीनही पक्षांना फेव्हिकॉलच्या जोडप्रमाणे जोडून ठेवलंय. पाच वर्षे हे सरकार टीकणारच असे तीनही पक्षांचे नेते वारंवार सांगत असले तरी राजकारणात काहीही निश्चित नसतं. मात्र एक वर्ष सत्तेचा बुस्टर मिळाल्यामुळे उद्या हे सरकार जरी पडले तरी पुढची चार वर्षे विरोधी बाकांवर बसून राज्यात धुमाकूळ घालण्याचा डोस राष्ट्रवादीला नक्कीच मिळाला आहे.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -