– योगेश पटवर्धन
वर्ष बदलते. कॅलेंडर त्याच ठरलेल्या जागी म्हणजे किचनच्या लाकडी दारावर नजरेच्या टप्प्यात उभे राहते. कारण ते एकच दार कायम उघडे असते. दर महिन्याला पान उलटणे हे काम माझे आहे. हे ठरलेलं नाही, पण तसाच सगळ्यांचा समज आहे. जानेवारीच्या पानाला टाचलेला सुईदोरा फेब्रुवारीला पुढे आणणे हेसुद्धा ओघाने आलेच. सणवार, लग्नकार्य, प्रवास याचे नियोजन चहाचा कप हातात धरून तारीख आणि वाराची सांगड घालत करण्याची पद्धत सर्वदूर आहे. आसामच्या मळ्यातील चहाची भुकटी विकणारे स्थानिक, भावी नगरसेवक, बँकेचे संचालक मंडळ, मंदिरांचे विश्वस्त मंडळ, पतसंस्था चालक या सगळ्यांना आपले वर्ष उत्तम जावे याची आस लागते. त्यांचे स्मितहास्य असलेले उग्र फोटो छापलेली कॅलेंडरे मी घरात घेत नाही. त्यांना वर्षभर रोज पाहणे अवघड असते. त्यामुळे वर्षाच्या पहिल्या खर्चाची सुरुवात साळगावकर करतात. 40 वर्षांपूर्वी तीन-चार रुपयांना मिळणारे कालनिर्णय आता 50 रुपयांचे झाले. त्याच्या मागच्या बाजूस असलेल्या राशी भविष्यात रागावर नियंत्रण ठेवा, असा सल्ला हमखास पाहायला मिळतो.
हे नवीन नावाचे काही नसते ना, तर आपले जीवन अगदीच अळणी म्हणजे आजारी व्यक्तीला तिखट नको, मीठ माफक, तेल पुसटसे तसे. चार दिवसांनी मन बंड करते. लोणच्याची नवीन बाटली खुणावू लागते. रोजची गरज असते चार कपड्यांची, पण असतात चाळीस. मोजे, रूमाल, शर्ट, पँट, स्वेटर, आतले न दिसणारे, मिरवण्याचे, हौस म्हणून घेतलेले, थंडीत उपयोगी येतील असे, पूजेचे, दिवाळीचे, बागकामाचे, शिमग्याचे, सासूरवाडीकडून आलेले, ऑफिसचे, स्पोर्ट्स डेचे, कॉन्फरन्सचे, गाण्याच्या बैठकीचे, गोव्याला जाण्याचे, दारावर जाण्याचे, जॉगिंगचे असे बरेच काही. आपल्या घरातील सगळ्यात जास्त जागा कपड्यांनी व्यापली आहे. शहरातील सगळ्यात जास्त दुकाने तयार कपड्यांची आहेत. कापडाची वेगळी, शिलाई करणारे वेगळेच. घरात मशीन घेऊन शिवणकाम करणार्या गृहिणीही अनेक.
प्रत्येक नव्या वस्तूचे सगळ्यांना आकर्षण आहे. बिलकुल नया हैं यह, म्हणत पुणेरी किस्से दर आठवड्याला येत असतात. नवीन दुचाकी, चारचाकी काहीतरी अधिकचे वैशिष्ठ्य दाखवत लॉन्च होतात. गृह प्रकल्प आम्ही अजून काही जास्तीचे देत आहोत म्हणत ग्राहकांना आकर्षित करतात. वृत्तपत्रे नवीन मांडणी करतात. माझी पहिली नोकरी, कामाचा पहिला दिवस, माझी फजिती, पाकीट हरवते तेव्हा, आठवणीतले गाणे, आमचे डॉक्टर, मामाचे गाव, पहिली संक्रांत, गाडीत विसरलेली पिशवी अशी काही सदरे सुरू होतात. घरात फिश टँक असेल तर नवीन रंगाची जोडी मुलांची हौस म्हणून आणली जाते. खाऊगल्लीत नवीन पाणीपुरीची गाडी दिसली की पावले तिकडे वळतात. इतकेच काय चप्पल, बूट यांच्या नवीन डिझाईन दिसल्या की घ्याव्याशा वाटतात. मास्कचेही अनेक प्रकार येऊन गेले. स्टेशनरीच्या दुकानांत पेनचे पन्नास प्रकार पाहायला मिळतात. क्रोकरीच्या दुकानांत कपबशांचे असंख्य नवीन प्रकार. साध्या पाण्याच्या बाटल्यांचे वेगवेगळे आकार, रंग, उंची, हायजिनिक, कॉपर, स्टील. चष्मा फ्रेम… वीस प्रकार, गॉगल चाळीस प्रकारचे, कानातले, गळ्यातले, फॅन्सी दागिने घरातच असंख्य प्रकार, तरीही गाडीत विकायला आले की पाहण्याचा मोह आवरत नाही.
नवीन सिनेमा, नवीन नाटक, नवीन सीरियल हे सगळे आपल्यासाठी तयार होत असते. नवीन सरकारे येतात जातात, पुन्हा येतात. युद्ध नव्याने सुरू होतात, थांबतात. कुणाला तरी उशिराने शहाणपण सुचते. आपण जिंकलो हे जगाने मान्य केले ही खात्री पटली की ते आटोपते घ्यावे असे वाटू लागते. आपण क्रूरकर्मा आहोत हे गोड गोड बोलून सांगायचे म्हणजे उच्च कोटीची राजनीती. तरीही जुन्याचे महत्त्व कमी होत नाही. जुनी शाल, आजोबांची काठी, टोलाचे घड्याळ, शालू, अडकित्ते, बोरमाळ, करवतकाठी धोतर, बाराबंदी, पेन, रिस्ट वॉच, ग्रामोफोन, बजाज सुपर, गालिचे, सोफा सेट, विड्याच्या पानांचा अंडाकृती पितळी डबा आणि इतर असंख्य. अरे, माझ्या आजोबांनी हे घड्याळ 50 वर्षे वापरलंय हे सांगताना मन आजही सुखावते.
आज ज्यांनी पन्नाशी ओलांडली आहे, त्यांनी मागच्या शतकातील शेवटची 25 आणि नव्यातील पहिली साधारण तेवढीच वर्षे अनुभवली आहेत. फ्लाय ओव्हर, एटीएम, चार्जर, रेंज, क्यूआर कोड, ओटीपी, सर्व्हर, आय. एफ. एस. कोड, ओला, उबेर, जेट लॅग, पेटीएम, फेसबुक फ्रेंड, एक्सचेंज ऑफर, प्रीमियम, ईएमआय, पीजे, डीजे अशा असंख्य नवीन कल्पना, शब्द गेल्या शतकाच्या अखेरीस उदयाला आले आणि म्हणता म्हणता आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग झाले. ही नव्याची नवलाई थंडीबरोबर ओसरेल. 365 दिवस कसे संपले ते कळणारसुद्धा नाही. या शतकाने नुकताच तारुण्यात प्रवेश केलाय. त्याचे मनापासून स्वागत.
(लेखक साहित्यिक आहेत)