घरफिचर्ससारांशस्वच्छतेचा निर्धार !

स्वच्छतेचा निर्धार !

Subscribe

पूर्वा, हिमेश, रिताली, वैष्णवी, तन्मय, हिमांशू, विजय या सगळ्यांसोबत बोलत असताना त्यांच्यामध्ये असणारी बदलाची ऊर्जा मला प्रचंड भावली... त्यांनी स्वतःच एक ब्रीदवाक्यदेखील ठरवलं आहे. ते म्हणजे ‘Action speaks louder than words’. आपल्या कृतीतून, कामातून आपण इतरांना संदेश देऊ शकतो ही त्यांची जिद्द सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. हे सगळेजण म्हणतात की, परदेशात गेल्यानंतर आपण तिथे कशी स्वच्छता आहे, तिथले लोक कसे प्रयत्न करतात, किंवा पर्यावरण रक्षणासाठी ग्रेटा थनबर्ग कसे प्रयत्न करते याबद्दल खूप गप्पा मारतो. पण भारतात परत आल्यानंतर मात्र पाण्याची बाटली रिकामी झाली की प्रवासात सहजपणे खिडकीतून बाहेर फेकून देतो.

मागच्या आठवड्यात काही कामानिमित्त पुणे शहरात जाण्याचा योग आला. सकाळी सकाळी पुण्यात पोहोचल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन सहज म्हणून सिंबॉयोसिस महाविद्यालयाच्या बाजूच्या टेकडीवर फिरायला गेलो. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, आरोग्य जपण्यासाठी प्रदूषणमुक्त वातावरणात राहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अगदी स्वच्छ हवा घेण्यासाठी या टेकडीवर लहान मोठ्यापासून सगळेजण फिरत होते. कुणी एखाद्या दगडावर बसून प्राणायाम करत होते, तर काही जण चटई अंथरूण योगा करत होते. तर काही तरुण धावण्याचा सराव करत होते. बहुदा पोलीस भरतीच्या तयारीसाठी…
टेकडीवर फेरफटका मारत असताना मला वेगवेगळ्या अंतरावर 19-20 वर्षाचे काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दिसले.

काट्यांच्या, झाडाझुडपांमध्ये हातामध्ये एक कागदी पिशवी घेऊन फिरणारे हे विद्यार्थी माझे कुतूहल वाढवत होते. मला जिकडे जायचे होते तो बेत रद्द करून मी त्यांच्या दिशेने गेलो आणि एका दगडावर बसलो. ते नेमकं काय करत आहेत हे बघू लागलो. सुरुवातीला मला वाटले की, महाविद्यालयाच्या प्रोजेक्टसाठी हे विद्यार्थी काही वस्तू जमा करत असतील, किंवा सॅम्पल जमा करत असतील. ते आठ ते दहा विद्यार्थी छोट्या छोट्या वस्तू उचलून स्वतः जवळच्या कागदी पिशवीत टाकत होते. मला मोह आवरला नाही मी तसाच उठलो आणि एका विद्यार्थिनी जवळ गेलो. तिला हाय-हॅलो केल्यानंतर मी विचारलं.. तुम्ही सगळेजण नेमकं काय करत आहात…? त्यावेळी हातात ग्लोज घातलेली आणि एका हातात पिशवी धरत पूर्वा नावाची तरुणी सांगत होती की, आम्ही या टेकडीवर जमा झालेला लहानातला लहान कचरा वेचून या टेकडीला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा संकल्प केला आहे. आम्ही प्रत्येक रविवारी सकाळी सहा वाजता येऊन, दुपारी एक वाजेपर्यंत कचरा वेचण्याचे काम करतो. त्यानंतर हा घनकचरा वेगवेगळा करून कोणत्या कामासाठी वापरता येईल याचा विचार करतो. त्यानंतर मी तिला एक प्रश्न आवर्जून विचारला की, तुला हे सर्व करण्याची प्रेरणा कुठून मिळाली..? त्यावेळी ती स्मित हास्य करत सांगत होती.

- Advertisement -

मला अगदी लहान असल्यापासून कचरा दिसला की तिथे राहू वाटत नाही, आणि आजूबाजूला जर प्लास्टिक असेल, घनकचरा असेल तर ते प्लास्टिक आणि कचरा पावसाच्या पाण्यामुळे नदीत वाहत जातो. हाच कचरा नदी नाल्यांमध्ये अडकून दुर्गंधी निर्माण होऊन आपलं आरोग्य धोक्यात येतं. विविध आजार जडतात. नदीत वाहून गेलेला कचरा छोट्या छोट्या कणांमध्ये रूपांतरित होऊन तेच पाणी कोणत्या ना कोणत्या भागात पिण्यासाठी वापरलं जातं. त्यातूनही मोठ्या प्रमाणात आजार होण्याची दाट शक्यता असते. एवढेच नाही तर काही प्रकारचे प्लास्टिक कधीच नष्ट होत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं. एकूणच जीवसृष्टीसाठी हे सर्व हानीकारक आहे. मुळात कचरा दिसला की मला तो उचलण्याची प्रेरणा मिळते. आणि इतरांना सांगत बसण्यापेक्षा आपण स्वतः कृती केली तर त्यातून आपल्यालादेखील समाधान मिळतं. या समस्या जाणून आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आणि प्रत्येकांना दोन-दोन सदस्य जोडायला सांगितले. सुरुवातीला आम्ही दोघी मैत्रिणी येत असू. आता आम्ही आठ ते दहा मित्र मैत्रिणी या टेकडीवरचा कचरा वेचून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी येतो.

पूर्वा, हिमेश, रिताली, वैष्णवी, तन्मय, हिमांशू, विजय या सगळ्यांसोबत बोलत असताना त्यांच्यामध्ये असणारी बदलाची ऊर्जा मला प्रचंड भावली… त्यांनी स्वतःच एक ब्रीदवाक्य देखील ठरवलं आहे. ते म्हणजे ‘Action speaks louder than words’. आपल्या कृतीतून, कामातून आपण इतरांना संदेश देऊ शकतो ही त्यांची जिद्द सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. हे सगळेजण म्हणतात की, परदेशात गेल्यानंतर आपण तिथे कशी स्वच्छता आहे, तिथले लोक कसे प्रयत्न करतात, किंवा पर्यावरण रक्षणासाठी ग्रेटा थनबर्ग कसे प्रयत्न करते याबद्दल खूप गप्पा मारतो. पण भारतात परत आल्यानंतर मात्र पाण्याची बाटली रिकामी झाली की प्रवासात सहजपणे खिडकीतून बाहेर फेकून देतो. तीच बाटली जर आपण कचराकुंडीत टाकली तर लोकांनासुद्धा मोठा संदेश जाऊ शकतो हे आपण गृहीत धरत नाही.

- Advertisement -

पृथ्वीवर आज मोठ्या प्रमाणात घनकचरा वाढत आहे. त्याची योग्यपणे विल्हेवाट लावली नाही तर एक दिवस आपण आपल्या शहरात राहण्यायोग्य वातावरण पाऊच शकणार नाही. या कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावणं ही काळाची गरज आहे. कोणत्या कचर्‍यापासून कसे प्रदूषण होते हे आपण प्रत्येक वेळी आणि वारंवार ऐकत असतो, वाचत असतो. फक्त कृती मात्र करत नाही. म्हणून मला पूर्वा जे काम करत आहे ते अतिशय महत्त्वाचे वाटते. सोशल मीडियाद्वारे तिने तयार केलेला ग्रुप एखाद्या चांगल्या कामासाठीदेखील वापरला जाऊ शकतो हा आणखी एक महत्त्वाचा संदेश ती आजच्या तरुणाईला देऊ इच्छित आहे. तिच्या हाकेला तिचे मित्र धावून आले आणि प्रत्येक जण आपापल्या परीने पुण्यातील वेगवेगळ्या भागात काम करण्याचा संकल्प करत आहेत. हा संकल्प जर प्रत्येक शहरातील युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी केला तर शहरे नंदनवन होतील. स्वच्छ हवा आणि प्रदूषण मुक्त शहरामध्ये नवी पिढी राहू इच्छिते. या साठी गरज आहे आपल्या सकारात्मक विचारांची आणि त्यांना प्रोत्साहित करण्याची.

पर्यावरण रक्षणासाठी वेगवेगळे कायदे केले जातात. किंवा प्लास्टिक किती जाडीचे असावे यासाठी देखील आपल्याकडे कायदा आहे. पण कायद्याला कोणीच जुमानताना दिसत नाही. मुळात आपल्या स्वयंपाक घरापासून ते बाहेर वापरात येणार्‍या ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत. त्यामध्ये किमान 70 टक्के प्लास्टिकच्या वस्तू असतात. आपण एकदा एखादी वस्तू वापरली की ती फेकून देतो. पण हे मात्र विसरून जातो की, प्लास्टीकचे आयुष्य खूप मोठे आहे त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. जर आपण रिड्युस-रियुज-रिसायकल या त्रिसूत्रीचा वापर केला तर कचरा कमी होऊ शकतो. किंवा कचर्‍याच्या प्रकारानुसार जर इतर उद्योगांमध्ये त्याचा वापर करता आला तर त्यातून रोजगारसुद्धा मिळू शकतो.

गरज आहे आपल्या सकारात्मक विचारांची आणि स्वच्छतेचे धडे न गिरवता कृतीत उतरविण्याची…. अन्यथा आजुबाजूचे वातावरण प्रदूषित होऊन मानवाच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छ सुंदर आणि समृद्ध वातावरणासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे प्रदूषण मुक्त परिसर… शाळा महाविद्यालयातील तरुणांना जर प्रदूषणाची समस्या समजावून सांगितली तर त्यांच्याकडून यासाठी सकारात्मक पावले उचलली जाऊ शकतात. अलीकडे महात्मा गांधीजीं आणि संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त जिथे कचरा नाही, तिथे कचरा टाकून, फक्त फोटो काढण्या पुरते स्वच्छतेचे इव्हेंट पार पाडले जातात. मला वाटतं असे फोटो पुरते इव्हेंट बाजूला ठेवून स्वच्छतेचा ट्रेंड युवकांनी राबवला पाहिजे. परवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना पूर्व आणि तिच्या टीमचे हे काम विद्यार्थ्यांना सांगितले. त्या वेळी आम्हीसुद्धा असे काम करू असे विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -