घरफिचर्ससारांशपीक नियोजनाकडे दुर्लक्ष

पीक नियोजनाकडे दुर्लक्ष

Subscribe

जगातील इतर अनेक देशांच्या तुलनेने फार मोठा भूभाग भारताला प्राप्त झालेला आहे. त्यापैकी बर्‍याच मोठ्या जमिनीवर शेती केली जाते. स्वातंत्र्योत्तर कालावधीत भारतीय शेतीने प्रगती केलेली असली तरीदेखील काळाची पावले ओळखून या प्रगतीचा वेग वाढवणे गरजेचे आहे. हव्या त्या वेगाने शेती क्षेत्राचा विकास होण्यात अनेक अडचणी येतात. त्यातील महत्त्वाची आणि परिणामकारक अशी ठरणारी अडचण म्हणजे शेती क्षेत्रातील नियोजनाचा किंवा पीक नियोजनाचा अभाव होय.

-प्रा. डॉ. कृष्णा शहाणे

सर्वप्रथम नियोजन याचा अर्थ म्हणजे कोणत्याही कृतीची पूर्वतयारी करणे होय. म्हणजेच आगामी कालावधीत कोणत्याही गोष्टीची अगोदर तयारी करणे होय. भारतीय शेतकरी पिके घेताना पीक नियोजन करताना दिसून येत नाहीत. बाजारामध्ये आगामी कालावधीत कोणत्या शेती उत्पादनांना चांगला भाव मिळेल किंवा कोणत्या उत्पादनांना असणारा भाव कमी होईल याचा पूर्वअंदाज घेणे महत्त्वाचे असते. सर्वच शेतकरी अशा प्रकारे कोणतेही नियोजन करताना सामान्यपणे दिसून येत नाहीत. यासाठी कारणीभूत ठरतो तो शेतकर्‍यांचा अशिक्षितपणा किंवा अल्पशिक्षितपणा.

- Advertisement -

पीक नियोजनाचा सर्वाधिक फायदा म्हणजे आगामी कालावधीत कृषी उत्पादनाच्या होणार्‍या अतिजास्त किंवा अतिकमी किमतीमुळे होणारे नुकसान टाळता येणे शक्य होते. एखाद्या हंगामात एखाद्या विशिष्ट पिकाचे उत्पादन हाती आल्यावर त्यावेळी बाजारपेठेत त्या वस्तूला अथवा उत्पादनाला मागणी कशी राहील आणि बाजारभाव कसा असेल याचा साधा अंदाज करून आपण त्या वस्तूचे किंवा पिकाचे उत्पादन किती घ्यायचे याचा निर्णय शेतकर्‍यांना घेता येतो.

त्या अंदाजानुसार शेतकर्‍यांना विशिष्ट पिकाचे उत्पादन घ्यायचे किंवा नाही किंवा किती प्रमाणावर घ्यायचे त्याचा निर्णय घेणे म्हणजे पीक नियोजन करणे होय. तसेच कोणत्या पिकाचे उत्पादन घ्यायचे? उदा. गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ, डाळी, तेलबिया, कापूस, भाजीपाला, फळभाज्या, फळे यांसारखी अनेक पिके घेता येतात. त्यापैकी कोणती पिके आर्थिकदृष्ठ्या फायदेशीर ठरतील याचा अंदाज करणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

टोमॅटो, कांदा या पिकाच्या बाबतीत एकदम मोठ्या प्रमाणावर किंवा एकदम कमी प्रमाणावर झालेल्या उत्पादनामुळे या पिकांचे भाव अतिकमी किंवा अतिजास्त प्रमाणावर कायमच असल्याचे दिसून येतात. तसेच इतर पिकांच्याही बाबतीत अनेक प्रकारच्या मालाची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण होते. तसेच मालास प्रभावी मागणी न आल्यामुळे माल पडून राहणे असे प्रकार वरचेवर होत राहतात. त्यातून शेतकर्‍यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होत नाही.

पीक नियोजन करणे आवश्यक आहे हे शेतकर्‍यांना कळत असले तरीही मोठ्या प्रमाणावर नियोजन केले जात नाही. कारण कुठलाही नवीन प्रकार करण्यास किंवा बदल करण्यास मानवाचा नकार असतो. शेतकरी काय आणि इतर नागरिक काय याचा सामान्यपणे बदलास कुणाचाही विरोधच असतो. कुठलाही बदल करून नुकसान झाले तर विनाकारण कोण त्रास करून घेणार? हा मानवी नियम असल्याने पीक रचनेत फार मोठे बदल करण्यास शेतकरी उदासीन असतात.

तसेच असा बदल केल्यास त्यासाठी वापरावी लागणारी नवीन आणि विशिष्ट बियाणे, कीटकनाशके, खते, मशागतीसाठी वापरावी लागणारी खास पद्धत इ. म्हणजेच अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा हा प्रकार ठरतो. पीक रचनेत बदल केल्यास निसर्गाकडून कितपत साथ मिळेल, हा प्रश्न असतो. नैसर्गिक परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घेणे आवश्यक असते. पिकाला दिला जाणारा पाणीपुरवठा किती प्रमाणावर करायचा, अशा सर्व गोष्टींचा निर्णय हा अतिशय धाडसाने घ्यावा लागतो. तसेच नियोजनबद्ध रीतीने पीक रचनेत बदल घडवून आर्थिक प्राप्तीत वाढ करता येऊ शकते.

पीक रचनेत बदल करून पीक नियोजन करण्याचे काम स्वत: शेतकरी, शेतकरी संघटना, सामाजिक संघटना, शासन या विविध घटकांकडून करता येऊ शकते. उदा. शेतकर्‍यांनी आपल्या प्रचंड अनुभवाचा वापर करून जमिनीचा दर्जा, पाण्याची उपलब्धता, आगामी हंगामातील बाजारभाव याचा अंदाज करून एखाद्या विशिष्ट पिकाचे उत्पादन कमी किंवा जास्त घ्यावे हे निश्चित करता येते. तसेच शेतकर्‍यांनी नियोजनपूर्वक व्यावसायिक शेती करण्याचे निश्चित करावे म्हणजेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहापलीकडे जाऊन व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेणे आवश्यक आहे.

यासाठी नियोजन केल्यास फायदेशीर ठरते. पिकाच्या आयुष्य कालावधीत येणार्‍या सर्व संकटांचा आगाऊ विचार करून त्यावर काय उपाय करावा किंवा एखाद्या गोष्टीवर काय पर्याय वापरावा हे अगोदरच निश्चित करून ठेवावे. उदा. पिकांवरील रोग, किडी, पाण्याची उपलब्धता, मजुरांची अडचण, पिकाचे संभाव्य नुकसान इ. संदर्भात आगाऊ व्यवस्था करून ठेवावी. शासनाने हंगामाच्या अगोदर किमान आधार किमती जाहीर कराव्यात. ज्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर व्हावेसे शासनाला वाटत असेल त्यांच्या आधार किमती या जास्त ठरवाव्यात.

शासनाच्या दृष्टिकोनातून जी पिके महत्त्वाची आहेत त्या पिकांच्या मशागतीसाठी शेतकर्‍यांना प्राधान्याने मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा करावा. अशा वेळी कर्जाच्या उपलब्धतेमुळे त्या पिकाच्या उत्पादनात वाढ होईल. तसेच शासकीय पातळीवर कृषी सल्ला केंद्राचा विकास होणे आवश्यक आहे. त्यातून पिकाच्या आयुष्य कालावधीत विविध टप्प्यांवर पेरणीपासून मळणीपर्यंत आणि बाजारपेठेच्या दिल्या जाणार्‍या माहितीपर्यंत अशा सर्वच माहितीचा समावेश असावा. अशा रीतीने नियोजनाचा अंगीकार केला तर अतिजास्त आणि अतिकमी उत्पादनामुळे होणारे नुकसान टळेल आणि शेतकरी व देश आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करेल यात शंका नाही.

-(लेखक कृषी क्षेत्राचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -