-वर्षा तिडके
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करणे ही मानवाच्या भावनिक, सांस्कृतिक आणि सामाजिक आयुष्यातील एक महत्त्वाची बाब आहे. हे फक्त एक वार्षिक संकेत नसून जीवनातील नवनवीन अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देणारा सोहळा आहे. विविध देशांमध्ये नववर्षाचे स्वागत करण्याच्या पद्धती भिन्न असल्या तरी या सर्व प्रथा आणि परंपरांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे आशा, आनंद आणि उत्सवाचा उत्साह.
सरत्या वर्षाचा आढावा घेताना आपण आपल्या जीवनातील चांगल्या, वाईट घटनांचा विचार करतो. कधी यशस्वी क्षणांची आठवण काढत त्याचा आनंद घेतो, तर कधी एखाद्या अपयशाला पाठीशी घालून नव्याने सुरुवात करण्याचा निर्धार करतो. नवीन वर्ष हे केवळ कॅलेंडर बदलण्याचे नाव नाही, तर आत्मपरीक्षण, आत्मविश्वास वाढवणे आणि स्वतःला सुधारण्यासाठीची संधी आहे. नवीन संकल्प, नवीन अपेक्षा आणि सकारात्मक विचारांची बीजे इथे रोवली जातात.
जगभरात नववर्ष साजरे करण्याच्या पद्धतींचा अभ्यास करताना लक्षात येते की, या परंपरांमध्ये सामाजिक, धार्मिक, आणि सांस्कृतिक विविधतेचा सुंदर संगम आहे. खरे तर भारत हा विविध संस्कृती आणि धर्मांचा देश असल्यामुळे येथे नववर्ष साजरे करण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत.
शहरांमध्ये आधुनिक पद्धतीने पार्ट्या, संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमांनी स्वागत केले जाते, तर ग्रामीण भागात पारंपरिक पूजाअर्चा आणि धार्मिक विधींचा भाग महत्त्वाचा असतो. भारतातील सर्वच प्रमुख मंदिरांमध्ये नववर्षानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी असते. तसे पाहिले तर इंग्रजी नववर्षाला हिंदू धर्माप्रमाणे कोणतेही महत्त्व नाही. परंतु नववर्ष हे नवचैतन्य देणारे ठरावे या आध्यात्मिक हेतूने मंदिरांकडे वळण्याचे प्रमाण वाढले.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गुढीपाडव्याला नववर्ष साजरे केले जाते, तसेच थायलंडमध्ये सॉन्क्रान उत्सव साजरा केला जातो. थायलंडमध्ये पारंपरिक नववर्ष लुनार कॅलेंडरनुसार एप्रिल महिन्यात साजरे केले जाते. सॉन्क्रान म्हणजे थाई नववर्षाचा मुख्य सण, आणि तो पाण्याच्या उत्सवासाठी जगभर ओळखला जातो. सॉन्क्रान हा संक्रमण या संस्कृत शब्दावरून घेतलेला आहे, जो सूर्य एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश करतो, त्या संक्रमणाचा अर्थ लावतो. थायलंडमध्ये हा सण जुन्या वर्षाचा निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो.
पाण्याला शुद्धतेचे आणि नवी ऊर्जा देण्याचे प्रतीक मानले जाते, म्हणून सॉन्क्रान उत्सवात पाण्याचा वापर हा सणाच्या मुख्य विधींमध्ये समाविष्ट आहे. सॉन्क्रान हा तीन दिवसांचा मोठा सोहळा असतो. प्रत्येक दिवशी ठराविक पारंपरिक विधी, आनंदोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. हा उत्सव थायलंडच्या शहरी आणि ग्रामीण भागात समान उत्साहाने साजरा केला जातो. सॉन्क्रानची सर्वात खास आणि वैशिष्ठ्यपूर्ण गोष्ट म्हणजे पाण्याची लढाई. थायलंडच्या रस्त्यांवर हजारो लोक पाणी टाकण्यासाठी एकत्र येतात. लोक बकेट, वॉटर गन, पाण्याच्या पिशव्या वापरून एकमेकांवर पाणी उडवतात.
हा प्रकार सर्वांमध्ये एक निखळ आनंद आणि उत्साह निर्माण करतो. पाण्याच्या वापरामुळे जुने दु:ख धुवून टाकल्याचा आणि नवी ऊर्जा निर्माण झाल्याचा अनुभव लोकांना मिळतो. सॉन्क्रानच्या निमित्ताने लोक बुद्ध मंदिरांमध्ये जाऊन प्रार्थना करतात आणि बुद्ध मूर्तींवर पवित्र जल अर्पण करतात. हा विधी पवित्रता आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी केला जातो. याशिवाय, लोक घरात आणि सार्वजनिक ठिकाणी वयोवृद्ध लोकांचे आशीर्वाद घेतात. सॉन्क्रान उत्सवात लोक मंदिरांच्या आवारात रेतीचे छोटे स्तूप (चुडी) बांधतात. हा विधी पवित्र मानला जातो आणि चांगल्या भविष्याची कामना व्यक्त करण्याचा भाग आहे.
अमेरिकेत नववर्षाचे स्वागत अत्यंत जोशपूर्ण वातावरणात केले जाते. टाइम्स स्क्वेअर, न्यूयॉर्क येथील बॉल ड्रॉप हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. मध्यरात्री १२ वाजता हा चमकदार बॉल हजारो लोकांच्या साक्षीने खाली येतो आणि नववर्षाच्या शुभारंभाचा सिग्नल मिळतो. याशिवाय लोक घरांमध्ये मित्रमंडळींसोबत पार्टी करतात, फटाक्यांची आतषबाजी करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात.
जपानी नववर्ष, ज्याला शोगात्सू म्हटले जाते, पारंपरिक रितीरिवाजांनी साजरे केले जाते. जपानमध्ये टेंपलमध्ये मोठ्या घंटांचा आवाज हा नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो. १०८ वेळा वाजवलेल्या या घंटांचा उद्देश मानवी दुर्गुणांपासून मुक्ती मिळवणे हा असतो. लोक घर स्वच्छ करून सजवतात, पारंपरिक ओसेची भोजन तयार करतात आणि कदोमात्सू या वनस्पतींच्या सजावटीने प्रवेशद्वार सजवतात.
स्पेनमधील १२ द्राक्षांची प्रथा ही जगातील सर्वात हटके आणि आशयपूर्ण नववर्ष साजरे करण्याच्या पद्धतींपैकी एक आहे. येथे नववर्ष साजरे करताना मध्यरात्रीच्या ठिक १२ वाजता लोक १२ द्राक्षे खातात. ही प्रथा लास उव्हास दे ला सुएर्ते (The Grapes of Good Luck) या नावाने ओळखली जाते. प्रत्येक द्राक्ष एका महिन्याचे प्रतीक मानले जाते, आणि प्रत्येक द्राक्ष खाण्याचा अर्थ त्या महिन्यासाठी शुभेच्छा आणि समृद्धी प्राप्त होणे, असा घेतला जातो.
१२ द्राक्षांच्या प्रथेचा उगम १९०९ साली झाला. त्यावेळी अन्नधान्याचे अधिक उत्पादन झाल्याने अलिकांते येथील शेतकर्यांनी द्राक्ष विक्रीला चालना देण्यासाठी ही अनोखी पद्धत सुरू केली. ती लोकांमध्ये लोकप्रिय झाली आणि कालांतराने संपूर्ण देशात प्रचलित झाली. प्रत्येक द्राक्ष खाण्यासाठी घड्याळाच्या प्रत्येक ठोक्याशी जुळवून घ्यावे लागते, ज्यामुळे एक वेगळाच आनंददायी ताण निर्माण होतो.
द्राक्षांची प्रथा कुटुंबांसाठी एकत्र येण्याचा, मजा करण्याचा आणि एकमेकांना शुभेच्छा देण्याचा साधा, पण परिणामकारक मार्ग आहे. सांस्कृतिक वैशिष्ठ्य या पद्धतीमुळे स्पेनचे सांस्कृतिक वैविध्य आणि त्यांचा सण साजरा करण्याचा अनोखा दृष्टिकोन दिसून येतो. स्पेनमध्ये आता मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः माद्रिदच्या प्रसिद्ध पुएर्ता डेल सोल चौकात हा सण मोठ्या थाटात साजरा केला जातो. हजारो लोक येथे जमून घड्याळाच्या ठोक्यांसह द्राक्ष खाण्याचा विधी साजरा करतात. यासोबत फटाक्यांची आतषबाजी, संगीत आणि आनंदोत्सव सुरू असतो.
ब्राझीलमध्ये समुद्रकिनार्यावर नववर्ष साजरे करण्याची परंपरा आहे. लोक पांढर्या कपड्यात सजून देवी यमाजाला फुले अर्पण करतात. ही प्रथा शांततेचे प्रतीक मानली जाते. या व्यतिरिक्त, आतषबाजीचे भव्य प्रदर्शन आणि जल्लोषपूर्ण पार्ट्या नववर्षाचे महत्त्व अधोरेखित करतात.
चिनी नववर्ष, ज्याला स्प्रिंग फेस्टिव्हल म्हटले जाते, हा लुनर कॅलेंडरनुसार साजरा केला जातो. संपूर्ण चीन सजावट, नृत्य आणि पारंपरिक भोजनांनी गजबजलेला असतो. लाल पाकिटे (होंगबाओ) देणे ही समृद्धी आणि शुभेच्छा देण्याची परंपरा आहे. तसेच, वाघ, ड्रॅगन नृत्य आणि फटाक्यांचा गडगडाट हा या उत्सवाचा अविभाज्य भाग आहे.
इटलीत लोक नववर्षाच्या स्वागतासाठी लाल रंगाचे कपडे परिधान करतात, ज्याला सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. लोक जुन्या वस्तू टाकून देतात, ज्याचा अर्थ जुन्या नकारात्मक गोष्टींना निरोप देऊन नव्या गोष्टी स्वीकारणे असा घेतला जातो. मध्यरात्री स्पार्कलिंग वाईन आणि पानेटोन केकचा आनंद घेतला जातो.
रशियामध्ये नववर्ष हा कुटुंबीयांसोबत साजरा केला जाणारा प्रसंग असतो. या काळात देड मोरोझ (ग्रँडफादर फ्रॉस्ट) आणि त्याची सहकारी स्नोमेडेन मुलांना भेटवस्तू देतात. हा उत्सव ख्रिसमस आणि नववर्ष यांचा सुंदर संगम असतो. तसेच, लोक मध्यरात्री वाईनसह टोस्ट करतात आणि एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतात. ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचे स्वागत सिडनी हार्बर ब्रिजवरील फटाक्यांच्या भव्य प्रदर्शनाने केले जाते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोक समुद्रकिनार्यावर पार्ट्या करतात, कुटुंबांसोबत आनंद साजरा करतात आणि बार्बेक्यूचा आनंद घेतात.
प्रत्येक परंपरेचा उद्देश आनंद, नवी उमेद आणि चांगल्या भविष्याची आशा जागृत करणे आहे. आतषबाजी हा आनंद आणि उत्साहाचा प्रतीक आहे, तर मंदिरात पूजा, दान आणि स्वच्छता या सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणार्या क्रिया मानल्या जातात. फळे खाणे, पाण्याचा खेळ आणि संगीताच्या साथीने नृत्य करणे ही सर्व प्रकारे माणसाला एकत्र येऊन सण साजरा करण्याचे निमित्त देतात. त्यामुळे सण भारतीय आहे की परदेशी, याचा फार विचार करण्यापेक्षा या सणातून लोक कसे एकत्रित येतील, भारतातील एकात्मता यातून कशी टिकून राहील आणि त्यातून देशाची प्रगती कशी होईल, हे बघणे महत्त्वाचे ठरते.
-(लेखिका सामाजिक अभ्यासक आहेत.)