बाइटवेडा!

Subscribe

शहराचं सोडा, हल्ली म्हणे गावखेड्यातसुद्धा कोंबडा आरवणं बंद झालं आहे. आरवताना नुसती चोच जरी उघडली तर काही धसमुसळे युवक लगेच बाइट घ्यायला धावतात, हे हल्ली म्हणे कोंबड्यांनाही कळू लागलं आहे.
काही कोंबड्यांनी तर परवा त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या बैठकीत आपलं निरीक्षण मांडलं. आपण बाइट द्यायचा, काही चुलकोंबड्यांनी तो घरबसल्या ऐकायचा ह्याचा त्यांनी एकमताने निषेध केला.
…पण तरीही बाइट घेणार्‍यांची अजिबात पंचाईत झाली नाही. सकाळी उठल्यावर ज्यांच्या डोक्यात आज दिवसभरात कुणाकुणाचे बाइट घ्यायचे हे घुमतं त्यांना बाइट घेण्याचं दुर्भिक्ष्य कसं भासणार!
अशाच एका बाइटवेड्याच्या घरी एकदा झुंजुमुंजू पहाट झाली. बाइटवेड्याचे डोळे किलकिले झाले न झाले तोच दरवाजाच्या कडीचा पुसटसा आवाज झाला. बाइटवेडा लगबगीने उठला आणि त्याने घराचा दरवाजा उघडला. दरवाजाच्या कडीकडे पाहिलं तर नेहमीची दोन वर्तमानपत्रं कडीला होती. पेपरवाला पोरगा नुकताच येऊन गेल्याचं बाइटवेड्याने तात्काळ ताडलं. तो दरवाजा आत ढकलून पेपरवाल्याच्या मागे धावत सुटला. पेपरवाल्याला गाठलं. त्याला घट्ट पकडलं आणि त्याचा करकचून बाइट घेतला. पेपरवाल्याला त्याने थेट प्रश्न केला, म्हणाला, ‘प्रिन्ट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्यामध्ये तुला काय फरक वाटतो?‘
पेपरवाला पोरगा म्हणाला, ‘जल्ला मेला मला दोन पेप्रातला फरक कळत नाय तिथं मला दोन मीडियातला फरक काय कळणार!’
बाइटवेड्याने त्याच्या बिरादरीच्या प्रथेप्रमाणे त्याला लगेच उपप्रश्न केला, ‘इतकी वर्ष पेपर टाकून समाजप्रबोधनाच्या कार्यात तू आपलं योगदान देत आहेस, असं असूनही ह्या दोन मीडियांमधला फरक जर तुला कळत नसेल तर तुला हे ज्ञान मिळण्यापासून कुणीतरी वंचित ठेवलं आहे असं तुला वाटतं का?‘
बारा डब्याच्या रेल्वेसारखा इतका भलामोठा प्रश्न ऐकला आणि पेपरवाल्या पोराचे दोन्ही हात आपल्या डोळ्यांकडे गेले.
बाइटवेड्याने ते दृष्य पाहिलं आणि त्याने सनसनाटीच्या क्रिएटिव्हिटीचा जबरदस्त नजराणा पेश केला, ‘फक्त आमच्या चॅनेलवरचं हे व्हिज्युअल पहा, गेली कित्येक वर्ष रोजची वर्तमानपत्रं दारोदार टाकणार्‍या ह्या युवकाला प्रिन्ट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक ह्यातला फरक विचारला, पण त्याला तो कळण्यापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे आज हा पेपर वितरक भावुक झाला आहे. माध्यमाची जबाबदारी शिरावर घेणार्‍या माध्यमातल्या शेवटच्या माणसाला माध्यमकर्मींनीच उपेक्षित ठेवल्याचा हा आंखो देखा हाल पहा. पेपरवाल्याचं हे मुसमुसतं दु:ख पहा. फक्त आमच्या चॅनेलवर प्रथमच.’
सनसनाटीचा मोठा पर्वत उभा केल्यानंतर बाइटवेडा पेपरवाल्या पोराकडे वळला, म्हणाला, ‘हे बघ, तू इतका भावूक होऊ नकोस, आमचं संपूर्ण चॅनेल, आमची सगळी टीम तुझ्या पाठीशी उभी आहे, पेपर टाकणार्‍या तुझ्यासारख्या हजारो मुलांवर होणार्‍या ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमचं चॅनेल सदैव कटिबद्ध आहे, पण तू इतका भावुक होऊ नकोस.’
पेपरवाल्या पोराने आपल्या डोळ्यांवरचे हात काढले आणि बाइटवेड्याला कोरडेपणाने विचारलं, ‘भावुक म्हंजे काय?’
पेपरवाल्याच्या प्रश्नाने बाइटवेडा ठार वेडा झाला. पेपरवाल्याच्या डोळ्यात बघत बसला.
पेपरवाला पुन्हा म्हणाला, ‘सांगा ना, भावुक म्हंजे काय?’
‘तसं नाही, मी तुला जो प्रश्न विचारला, तो तुझ्या मनाला लागला असावा म्हणून तुझे हात तुझ्या डोळ्याकडे गेले, खरोखरच मनाला चटका लागावा असा तो क्षण होता, कुणीही गलबलून गेलं असतं त्या क्षणी, इलेक्ट्रॉनिक माध्यमात असे क्षण वेळोवेळी येत असतात, पण तटस्थपणे त्या क्षणाची नोंद घेणं हे आम्हा माध्यमकर्मींचं कर्तव्य असतं,’ बाइटवेड्याने नेहमीची साचेबद्ध लांबी लावली.
पेपरवाल्याने एकटक बाइटवेड्याचं ऐकून घेतलं आणि तो एकटक बाइटवेड्याला म्हणाला, ‘अवं, दुसरा काय नाय, काल हळद होती ना मित्राची आमच्या चाळीत तर थोडं जागरण झालं, म्हणून थोडे डोळेे चोळत होतो, तुम्हाला काय वाटलं, तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर माझ्या डोळ्यात पानी आलं काय? हल्ली जागरण पूर्वीसारखं सहन नाय ना होत?’
बाइटवेड्याने पेपरवाल्याचं म्हणणं ऐकलं आणि त्याचेसुद्धा हात डोळ्याकडे गेले. आता पेपरवाल्याने बाइटवेड्याला विचारलं, ‘तुम्हीबी भावुक झालात काय?’
‘नाही, हल्ली मलासुध्दा जागरण झेपत नाही, माझ्यावरसुद्धा बाइट्सचं रात्रंदिवस ओझं असतं,’ बाइटवेडा म्हणाला.
पेपरवाल्याला नसलं तरी बाइटवेड्याला प्रिन्ट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातला फरक नाही तरी समकालीन साम्य चटकन कळलं….आणि ते कळल्याक्षणी दूर कुठेतरी कोंबडा आरवला.
काही क्षणात शहरात कोंबडा आरवल्याची बातमी झाली…आणि कोंबड्याचा बाइट काही क्षणातच गावखेड्यात पोहोचला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -