घरफिचर्ससारांशमाणुसकीला काळीमा...

माणुसकीला काळीमा…

Subscribe

चंद्रपूर जिल्ह्यातील वणी खुर्द या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दोन -तीन महिलांच्या अंगात देवी आल्यानंतर त्यांनी गावातील आठ-नऊ दलित, वृद्ध पुरूष व महिला भानामती करतात असे सांगितले. त्यानंतर संपूर्ण गाव एकत्र झालं. गावातील लोकांनी भर चौकात या लोकांना हातपाय बांधून जबर मारहाण केली. त्यातील सातजण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली. एकविसाव्या शतकातल्या आधुनिक विज्ञान युगात जगत असतानाही, बाराव्या शतकातल्या वर्तनाला लाजवेल असं दुर्वर्तन ही माणसं का करतात ? त्यांना प्रचलित कायद्याचा धाक का वाटत नाही ? पिढ्यानपिढ्या परस्परांच्या सहवासात, सान्निध्यात राहूनही त्यांच्या मनातील वैरभाव संपुष्टात का येत नाही, असे अनेक प्रश्न मनात सतत निर्माण होत असतात.

आदिवासीबहुल भागात अजूनही अंधश्रद्धांचा पगडा मोठा आहे. कोणत्याही शारीरिक-मानसिक आजारांवर वैद्यकीय उपाय, उपचार करून घेण्याअगोदर भगत, देवऋषी तांत्रिक-मांत्रिक त्यांच्याकडे जाण्याची मानसिकता आजही आदिवासी भागातील समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येते. साहजिकच तेथे सर्व प्रकारचे शोषण कमीअधिक प्रमाणात नेहमीच सुरू असते. अशा भोंदूगिरीवर अवलंबून राहिल्याने आजाराचे संकट अधिक भयानक होऊन, ते जीवावर बेतते.परिसरातील लोकांची मर्जी संपादन करण्यासाठी, प्रसिद्धी मिळण्यासाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी हे बदमाश, ढोंगी, भोंदू लोक, त्याच खेड्यापाड्यातील वाडी-वस्तीवरील एखाद्या दुबळ्या महिलेला किंवा पुरुषाला डाकीण, चेटकीण, भुताळीण असल्याचे जाहीर करतात. वास्तविक त्या बिचार्‍या व्यक्तीला यातले काहीही माहीत नसते. ती आपली सहज, सर्वसामान्यांप्रमाणे जगत असते. पण तरीही भगतावर पूर्ण विश्वास असल्याने, संशयी दृष्टीतून भगताने डाकीण, भूताळीण ठरवलेल्या व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबाकडे तेथील लोक पाहत असतात.

चेटकीण ठरवलेल्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीतून, वर्तनातून संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तिच्याबद्दल अफवा पसरवून इतरांची मनं कलुषित केली जातात. भगताने निश्चित केलेली ‘ती ’ व्यक्ती काहीतरी मंत्र-तंत्र, करणी, जादूटोणा, भानामती करते. तिच्यामुळेच गावात, अनेक कुटुंबात आजारपण वाढते, माणसांचे आणि जनावरांचे मृत्यू होतात. अपघात घडतात. विहिरीचे पाणी आटते, दुभत्या जनावरांचे दूध उडते, अशा अनेक वाईट गोष्टी झाल्याचा संशय अशा व्यक्तीं किंवा त्यांच्या कुटुंबांवर घेतला जातो. सदर बदनाम झालेली व्यक्ती किंवा तिचे कुटुंब यांच्याकडे वारंवार त्यादृष्टीने पाहिल्याने, गाव-परिसरात त्यांची विनाकारण बदनामी होत असते. हळूहळू लोक त्यांच्यापासून लांब-लांब जातात. त्यांच्याशी जवळपास सर्वांनीच व्यवहार थांबवलेले असतात. सामुदायिक विहिरीवर, नळावर पाणी भरण्यापासून तर त्यांचा दररोजचा रोजगार, शेती-वाडीची कामे यावर बंधने आणली जातात. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांना मज्जाव केला जातो. त्यांच्याशी कुणी सोयरे-संबंध करणार नाही याची दक्षता घेतली जाते.

- Advertisement -

त्यांच्या कुटुंबातील लग्न झालेल्या मुली त्यांच्या सासरचे लोक पुन्हा माहेरी पाठवून देतात. सून म्हणून घरात आलेली मुलगी पुन्हा तिच्या माहेरी निघून जाते. अशा एक ना अनेक क्रूर गोष्टी डाकीण, भूताळीण ठरवलेल्या व्यक्तीच्या दररोजच्या जीवनात घडत असतात किंवा घडवून आणल्या जातात. एकूणच सर्व सामाजिक-धार्मिक जीवनातून ती व्यक्ती आणि तिचे कुटुंब बहिष्कृत केले जाते. त्यामुळे पीडितांच्या कुटुंबात सतत भीती, दबाव, ताणतणाव असतो. ज्या व्यक्तीला दोषी धरले जाते, त्या कुटुंबाचे किंवा त्या व्यक्तीचे दररोजचे जगणे असह्य होत जाते. अशा वेळी कुणीही मदत करण्यास धजावत नाही. आणि समजा एखाद दुसर्‍याला वाटले की, जे घडते ते अतिशय अन्यायकारक आणि बेकायदेशीर आहे, पुढे होऊन आपण हे थांबवले पाहिजे. पण तरीही स्वतःच्या जीवाच्या भीतीने आणि लोक संतापाला सामोरे जाण्याचे धाडस, हिंमत नसल्याने अशा व्यक्ती एक तर गप्प राहतात किंवा त्या ठिकाणाहून दुसरीकडे गाव सोडून निघून जातात.

अंधश्रद्धेच्या माध्यमातून अनन्वित छळाच्या अशा घटना केवळ आदिवासी भागातच घडतात, असे नाही. आदिवासी भागात त्यांचे प्रमाण नक्कीच अधिक आहे. मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना असाही अनुभव आला आहे की, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात बहुतांश गावांमध्ये किमान एक, दोन कुटुंबांना तरी या डाकीण,चेटकीण, भूताळीण असल्याच्या मानहानीकारक, अनिष्ट रूढीचा सामना करावा लागतो. सगळं गांवच, त्यांना, ‘त्याच’ नजरेने पाहत असते. समजा, अशा डाकीण, भूताळीण ठरवलेल्या व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबाला अगदीच नैसर्गिक मृत्यूने गाठले तरी, तिच्या अंत्यविधीला गावातील लोक जाण्याचे टाळतात. अनेक वेळा नियोजित स्मशानभूमीत अंत्यविधी, दफन करण्यापासून त्यांना रोखले जाते. अंत्यसंस्कारानंतरच्या पुढील धार्मिक विधीलाही अगदी जवळची चारदोन माणसं जीव मुठीत धरून उपस्थित राहतात. ही वस्तुस्थिती आहे.

- Advertisement -

सतत विज्ञानसृष्टीचा फायदा घेणार्‍या, गजबजलेल्या शहरांतदेखील अनेक मध्यमवर्गीय, निम्नस्तरीय वस्तीतील एखाद्या कुटुंबातसुद्धा, एखादी व्यक्ती किंवा त्यातल्या त्यात महिलांना डाकीण, भूताळीण ठरवून, तिला किंवा तिच्या कुटुंबाला दररोजचे जगणेच मुश्कील केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा वेळी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन, अशा घटना सोडवलेल्या आहेत. त्यांचे निराकरण करून, पीडितांना धीर दिला आहे. वेळीप्रसंगी अशा व्यक्तींना आणि तिच्या कुटुंबाला शक्य तेवढी मदत केली आहे. अनाठाई आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्याने सदर व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य जबरदस्त खालावलेले असते. अशावेळी त्यांना मानसोपचारतज्ज्ञांची मदत देखील महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मिळवून दिलेली आहे. आजही हे काम चालूच आहे.

मात्र अशा अन्याय, अत्याचाराच्या फार कमी घटना उघडकीस येतात. कारण संपूर्ण गावाने, जवळच्या लोकांनी एवढी दहशत निर्माण केलेली असते की, ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंब पूर्णपणे भेदरलेले असते. पीडितांपैकी कुणी प्रतिकार करण्याचा,सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर, सार्वजनिक ठिकाणी किंवा घरात घुसून हालहाल करण्यात येतात. अमानुष मारहाण केली जाते. जीवाच्या आकांताने ही माणसं ओरडत असतात.गयावया करत असतात. पण कुणाच्याही काळजाला पाझर फुटत नाही. कारण तेथे जमलेल्या लोकांच्या डोक्यात अंधश्रद्धेचं भूत थैमान घालीत असतं. अशा वेळी कुणीही मदतीसाठी येण्याची शक्यताच नसते. त्यामुळे अन्याय,अत्याचार सहन करत अशी पीडित माणसं आणि त्यांचे कुटुंबीय जगत असतात.

महाराष्ट्र अंनिसच्या सततच्या पाठपुराव्याने, महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा 2013 मध्ये मंजूर केला. मात्र त्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा बळी गेला. प्रचलित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आजही कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या प्रत्येक घटनेत या कायद्याचा योग्य तो कलम लावला की नाही, हे जाणीवपूर्वक जाऊन, पाहावे लागते. त्यासाठी आग्रह धरावा लागतो. तरीही कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये अनेक वेळा हेळसांड केली जाते.

व्यक्तीला वा कुटुंबाला डाकिण भुताळीण, चेटकीण ठरवून त्यांचे दैनंदिन जीवन जगणे मुश्कील करणार्‍या या अघोरी प्रथेला, किमान काही प्रमाणात आळा बसवायचा असेल तर, प्रचलित जादुटोणा कायद्याची कडक अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातील कलमांमध्ये दुरुस्ती आणि त्यामध्ये आणखी नवीन काही कलमांचा, नियमांचा समावेश करणेही गरजेचे आहे. थोडक्यात,तो सर्व समावेशक करणे आवश्यक आहे.

आदिवासी, ग्रामीण भागात गावागावात, वाडी, पाड्यांवर या कायद्याची कडक अंमलबजावणी होण्यासाठी कायद्याचे प्रबोधन करण्याची गरज आहे. महाराष्ट्र अंनिसने मोठ्या प्रमाणात ते स्वखर्चाने केले आहेत. शासनानेही स्वतःहून पुढाकार घेणे आवश्यक आहे. जवळपास सर्वच गावं, वाड्या, पाड्यांवर शाळा आहेत. महसूल यंत्रणेचे कर्मचारी, अधिकारीही सतत तेथे असतात. शिवाय आरोग्याधिकारी, कर्मचार्‍यांचाही अनेक ठिकाणी सतत राबता असतो. या सर्वांनी ठरवले तर, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम, ही सर्व मंडळी मोठ्या प्रमाणात करू शकतात. मात्र त्यांनी तसे ठरवून, मनापासून केले पाहिजे. मात्र हा विषय लोकभावनेशी निगडित आणि अतिशय संवेदनशील असल्याने, इच्छूकांना प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र अंनिससारख्या संघटना अतिशय आवडीने प्रशिक्षण देण्यास नक्कीच साहाय्यभूत ठरतील. प्रसारमाध्यमांनीही हे काम जाणिवपूर्वक, हिरीरीने आणि व्यापक पातळीवर केले तर, त्याचा मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी उपयोग होईल.

अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी योग्य ती ध्येय, उद्दिष्ट ठरवून, त्या दिशेने उचित प्रयत्न केले तर, मर्यादित स्वरूपात का होईना, समाजाच्या डोक्यावरील अंधश्रद्धांचे ओझे, समाज खांद्यापर्यंत नक्की खाली आणतो, हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वस्तुनिष्ठ व कृतिशील अनुभव आहे. अर्थातच त्याला उपयोगी ठरला तो, संत-समाजसुधारकांचा विवेक जागराचा वारसा आणि देशाच्या राज्यघटनेचा आधार !

—कृष्णा चांदगुडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -