अक्षतांचा अपव्यय!

कुर्यात सदा मंगलम, शुभमंगल सावधान !! असे म्हणून झाले की लागते लग्न अथवा मुंज आणि सर्व जण त्या वधू-वराच्या अथवा मुंज मुलाच्या डोक्यावर वाहतात त्या अक्षता. समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणार्‍या या अक्षतांबाबत सर्व बाजूंचा विचार या लेखाद्वारे करूया. अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्यास तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या अक्षता. या अक्षतांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होताना दिसतो. तांदळापासून भात, भाकरी बनवली जाते. अन्न हे पूर्णब्रम्ह आहे हे लक्षात घेऊन हा अपव्यय टाळायला हवा.

–क्षितिजा खटावकर

हिंदू विवाह पद्धतीत महाराष्ट्रात विवाह लागल्यानंतर तसेच मुलाची मुंज लागल्यानंतर या वाहिल्या जातात. प्राचीन पर्शियन विवाह समारंभात तांदळाचे महत्त्वाचे स्थान आहे. आजही पारशी लोकांत लग्न व नवज्योत याप्रसंगी अक्षता टाकण्याची प्रथा आहे. विविध ठिकाणी आपल्याला असे दिसून येते की देवपूजेला एखादा उपचार नसेल तर त्याऐवजी अक्षता वाहतात. ब्राह्मण आशीर्वादाने मंत्र म्हणून यजमानांना मंत्राक्षदा देतात. अशा पद्धतीने या सत्यनारायण, लग्न समारंभ, मुंज, कोणतेही धार्मिक विधी असो याचा वापर महत्त्वाचा असून मोठ्या प्रमाणात केला जातो.

लग्नामध्ये अक्षता वापरणे हे वधू-वरांच्या डोक्यावर झालेल्या देवतांच्या कृपावर्षाचे प्रतीक आहे. यामुळे देवदेवतांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होऊन त्याचा आशीर्वाद वधूवरांना मिळतो व त्यांचे पुढील आयुष्य हे सुखाचे, समृद्धीचे जावे हाच एक उद्देश असतो, परंतु यासाठी तांदूळच का वापरतात, हे महत्त्वाचे का आहे, हे आपण जाणून घेऊया. कारण असे म्हटले जाते की तांदूळ हे असे धान्य आहे की जे कधीच किडत नाही, म्हणजे आतून त्याला कीड लागत नाही. याचा अर्थ ते शुद्ध असते. तसे आपले मनही शुद्ध व चारित्र्यदेखील शुद्ध असावे, अशी उपमा देऊन तुम्ही तुमचे पुढचे आयुष्य अशा प्रकारे चांगले व शुद्ध जगावे.

तसेच तांदळाचे कधी दोन भाग होत नाही. याचा अर्थ तुमच्या आयुष्याचा संसार दुभंगू नये असे यातून सांगितले जाते. महत्त्वाचे म्हणजे तांदूळ पेरल्यानंतर जे रोप येते ते दुसरीकडे लावले जाते. मग ते बहरते तसेच मुलीचे आहे. ती वाढते आपल्या माहेरी, वडिलांकडे आणि लग्नानंतर म्हणजेच सासरी दुसर्‍या घरी जाते. तिथे तिने असेच बहरत राहावे व आपल्या घराला बहरावे म्हणून तांदळाचा अक्षता म्हणून वापर केला जातो, असे सांगितले जाते.

अशी आपली ही परंपरा आहे. पूर्वीपासूनच या परंपरेचा आपण खूप आदर करतो. ती जाणून घेऊन अमलात आणली जाते आणि असा आदर केलादेखील पाहिजे. यात काही शंका नाही, पण त्याचा वापर करताना माझ्या मनात एक नेहमीच विचार येतो की या अक्षतांचा वापर वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी असतो, पण तो तितकाच होतो का? या तांदळाची नासधूस किती होते? पूर्वी धान्य जेवढ्या प्रमाणात येत होते त्या मानाने लोकसंख्यादेखील कमी होती. आज जर आपण पाहिले तर भारताची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली असून लोकांना अन्न मिळत नाही.

अशा वेळी या तांदळाचा वापर अक्षता म्हणून करताना बर्‍याच ठिकाणी असे दिसून येते की लहान मुले तर हे तांदूळ घेऊन एकमेकांच्या अंगावर फेकत असतात व हा खेळ समजून ते खेळतात आणि लग्नाच्या हॉलमध्ये सर्वत्र या अक्षता पायदळी येतात.

प्रत्येक येणार्‍या व्यक्तीकडे हे तांदूळ वधू-वरांच्या डोक्यावर आशीर्वाद रूपाने टाकायला देतात, परंतु लग्न लागल्यानंतर त्या अक्षता जेव्हा टाकल्या जातात तर त्या वधू-वरांपर्यंत पोहचत तर नाहीच, पण इतर लोकांच्या डोक्यावर त्या पडतात आणि नंतर लोक ते झटकून टाकतात. मग त्या पडतात त्या जमिनीवरच, म्हणजेच परत पायदळी.

मग ही नासधूस कुठेतरी थांबली पाहिजे, असे आपला सर्वांना वाटते की नाही? याचा योग्य तो वापर व्हावा, मग यासाठी काय करता येईल? आपली रुढी-परंपरा बंद न करता आपल्याला यातून योग्य तो मार्ग काढता येईल का? तर नक्कीच काढता येईल, पण त्यासाठी आपण सर्वांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. तरच आपण याचा अपव्यय टाळू शकतो. यासाठी सर्वप्रथम लहान मुले जे तांदळाबरोबर खेळत असतात ते बंद केले पाहिजे. मुलांना त्याचे महत्त्व समजून सांगितले पाहिजे. तसेच त्या पायदळी येणार नाहीत आणि तांदूळदेखील कमी वापरले जातील यासाठी जसे मंत्रपुष्पांजलीसारखं म्हणजेच आपण लोकांच्या हातात फूल देतो.

मंत्रपुष्पांजली म्हणून झाले की एखादा जण गोळा करतो आणि ती सर्व फुलं पुजार्‍याकडे दिली जातात व पुजारी देवाला ती फुले वाहतात. त्याचप्रमाणे सर्वांच्या हातात तांदूळ द्यावे, ते पण थोडे आणि नंतर लग्न किंवा मुंज लागल्यानंतर ते एखाद्या भांड्यात गोळा करावे आणि मग गुरुजींनी ते सर्व एकत्र करून त्यातली चार दाणे वधू-वरांच्या व मुंज मुलाच्या डोक्यावर आशीर्वादरूपाने वाहावे किंवा घरातील मोठी व्यक्ती ही स्टेजवर गेल्यानंतर त्यांच्या डोक्यावर सर्व घरातर्फे आशीर्वाद म्हणून दोन दोन अक्षदा वाहतील, जेणेकरून स्टेजवर जमा झालेल्या अक्षता या गोळा करण्यासाठीदेखील सोप्या जातील.

यातून तांदळाचा वापरदेखील कमी होईल आणि उरलेले तांदूळ एखाद्या आश्रमात दान करावे किंवा गरिबाला द्यावे, जेणेकरून त्या व्यक्तीचे पोटदेखील भरेल व त्याचे पोट भरल्यामुळे त्याने दिलेले आशीर्वाददेखील मोलाचेच असतील. शेवटी या अक्षता डोक्यावर आशीर्वादरूपानेच वाहिल्या जातात, मग हे आशीर्वाद जर एखाद्या गरिबाचे पोट भरल्याने मिळाले तर तेदेखील महत्त्वाचेच आहे. हे तांदूळ व्यवस्थित स्वच्छ करूनदेखील त्याचा वापर करता येईल. किंबहुना असेदेखील करता येईल की तेच तांदूळ परत पुढच्या कार्यक्रमांमध्ये म्हणजे ज्या कार्यालयात कार्यक्रम असेल त्याच कार्यालयाकडून हे तांदूळ अक्षता म्हणून पुढच्या सोहळ्यात वापरता येतील.

खूप ठिकाणी असेदेखील म्हटले जाते की, तांदळाचा वापर करण्यापेक्षा फुलांच्या पाकळ्यांचा वापर करावा, परंतु पाकळ्यांचा वापर केला तरी त्या पाकळ्या पायदळी येणारच. तेदेखील योग्य नाही आणि जर कागदाच्या अक्षता तयार करायच्या म्हटल्या तर यासाठी वापरले जाणारे कागद, यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार, म्हणजेच नैसर्गिकदृष्ठ्या तेही योग्य नाही असे मला वाटते. मग या सर्वातून काहीतरी मार्ग काढणे आज काळाची गरज आहे. मला तरी वाटते की वरील सांगितलेल्या उपायांचा योग्य तो विचार करून त्यामध्ये अजून काही जर आपल्याला कल्पना सुचल्या तर तो विचार सर्वांपुढे आणून आणि आपण आपली परंपरा जपत वापरल्या जाणार्‍या अक्षता म्हणजे तांदूळ याचा अपव्यय होणार नाही याची एक सुजाण नागरिक म्हणून जबाबदारी घेऊया.