घरफिचर्ससारांशराजीनामायण!

राजीनामायण!

Subscribe

टीव्ही लावल्या लावल्या त्याने पाहिलं तर एक नेता दुसर्‍या नेत्याविरूध्द फारच संतापलेला होता.
दुसर्‍या नेत्याचा नैतिक अधिकार बाहेर काढत होता. दुसर्‍या नेत्याने घडलेल्या घटनेबद्दल आधी माहिती घ्यावी म्हणत होता. पापाचे घडे आता भरले आहेत ह्याची ग्वाही देत होता. त्यासाठी जनताजनार्दनाला साक्ष ठेवत होता. येणारा काळ त्यांना योग्य ते उत्तर देईल असं पुन्हा पुन्हा म्हणत होता.

तो आपला आपल्याच घरात बसून मळक्या बनियनवरच टीव्ही बघत होता. मीडिया हा शब्द त्याला कालपरवा माहीत पडला होता आणि मीडिया कळल्यामुळे अपरिहार्यपणे त्याला बाइट हा शब्द माहीत पडला होता. बाइट ह्या शब्दाचा शाळेत शिकवलेला अर्थ त्याला माहीत होता. पण तरीही बदललेल्या काळातल्या बोली भाषेत त्याचा अर्थ बदलला नसेल ना, असा संशय त्याला आला. त्याने म्हणूनच डिक्शनरी काढली आणि डिक्शनरीची जीर्णशीर्ण पानं चाळत बाइट ह्या शब्दाचा अर्थ पाहिला. तो चावा असाच होता. त्याने तो अर्थ पाहिला. डिक्शनरी मिटली आणि टीव्हीवरच्या त्या नेत्याचा बाइट तो पहात राहिला.

- Advertisement -

दुसरा नेता टीव्हीवरच्या त्या चॅनेलला बाइट देतच होता, म्हणत होता, व्यापक जनहितासाठी आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. जनहितासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. पण त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. स्वत:च्या स्वार्थी राजकारणासाठी मायबाप जनतेचा बळी देणार्‍या अशा मग्रुर नेत्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
दुसर्‍या नेत्याचा आवाज खूपच वाढला तेव्हा तो उठला आणि त्याने आपल्या टीव्हीचा आवाज कमी केला. पण तो नेता टीव्हीच्या कॅमेर्‍यासमोर अजून कडकडून चावतच होता. त्याने पुन्हा डिक्शनरी काढली आणि पुन्हा अर्थ तपासला तर चावा ह्या शब्दाच्या बाजूला दंश असाही समानर्थी शब्द लिहिला होता.

दुसर्‍या नेत्याने आपल्या जनताभिमुख उद्विग्न उद्गारांचा समारोप करताना शेवटी पुन्हा एकदा पहिल्या नेत्याचा राजीनामा मागितला. तो बाइट देताना त्या नेत्याभोवती त्याच्या समर्थकांचा आज्ञाधारक कळप होताच. त्या कळपानेही आज्ञाधारकपणे होकारार्थी मान हलवली. बाइट संपताच नेत्याच्या नावाने आसमंत दुमदुमेल अशा घोषणा दिल्या. सोबत राजीनामा द्या, राजीनामा द्या अशी जबरदस्त बोंबाबोंब केली.

- Advertisement -

त्याक्षणी सर्वसामान्य जनतेचा अविभाज्य घटक असलेला आपला बनियनधारी खुर्चीतून अलगद उठला. त्याने अलगद टीव्ही बंद केला आणि मळक्या बनियनवर चौकडीचा शर्ट घालून तो नाक्यावर आला. पानटपरीजवळ येऊन निष्कारण उभा राहिला. पानटपरीवर काही लोक त्याच्याआधीच येऊन दाखल झाले होते. टीव्हीवर आपण आताच जो उद्विग्न बाइट पाहिला त्याबद्दल पानटपरीवरचे एकसोबीस तीनसोवाले काही तरी कुजबुजतील असं बनियनधारीला सारखं वाटत होतं. पण एकही एकसोबीस तीनसोवाला त्याबद्दल फुटकळही प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हता हे बनियनधारीने पाहिलं आणि आपल्या अवतीभोवतीचा समाज सजग नाही ह्याचा त्याला साक्षात्कार झाला.

कुणीतरी कुणाचा राजीनामा स्फोटकपणे मागतो आहे आणि त्याबद्दल कुणालाच कसलीही संवेदना नाही हे पाहून त्याचं मन अतिशय हळहळलं. दोनेक वर्षांपूर्वी ऑफिसमधल्या आपल्या साहेबांचा त्यांच्या साहेबाने राजीनामा मागितला होता तेव्हा अख्खं ऑफिस अख्खा पंधरवडा कुणाचा तरी गावचा नातेवाईक गेल्यासारखं सुन्न होतं हे त्या क्षणी त्याला आठवलं. कशाला, नवी पाईपलाइन टाकताना त्या संपूर्ण प्रक्रियेचा हिशोब नीट दिला नाही म्हणून चाळ कमिटीच्या खजिनदाराकडूनही असाच कुणीतरी राजीनामा मागितला होता ह्याचंही त्याला स्मरण झालं. तेव्हाही अख्खा एरिया गपगार झाला होता ह्याचीही त्याला आठवण झाली.

राजकारणात, समाजजीवनात कुणीही कुणाचा राजीनामा असा काय उगाच मागेल का? राजीनामा मागण्याला लोकशाहीमध्ये काहीतरी अर्थ आहे की नाही? राजीनामा देणं ह्यापेक्षा राजीनामा मागणं हे ह्या व्यवस्थेतलं जास्त प्रभावी अस्त्र आहे का? राजीनामा मागणं ह्यालाच खुर्चीवरून खाली खेचणं म्हणतात का? अशा एक ना अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्यात गर्दी केली. सगळं काही मनोहर असताना त्याचं डोकं भणभणू लागलं.

त्याने आता घराची वाट पकडली. रस्त्यात जाताना जिथे कुठे घोळका दिसला तिथे तिथे त्याने कानोसा घेऊन पाहिला. त्याने ऐकलेल्या त्या स्फोटक राजीनाम्याबद्दल कुणीच काही बोलत नव्हतं. सगळ्यांचे चेहरे चॅनेलवरच्या खाडाबदली अँकरसारखे कोरे होते. कुणीतरी कुणाचा तडाखेबंद राजीनामा मागितला ह्याची तोडकीमोडकी रेघही कुणाच्या चेहर्‍यावर नव्हती.
तो हताश मनाने घरी आला. रिमोट हातात घेऊन त्याने पुन्हा टीव्ही लावला. पुन्हा तोच चॅनल टीव्हीवर शोधला तर त्याच्यावर पुन्हा तीच बातमी आदळली. त्या नेत्याचा तोच बाइट चालू होता. नैतिक आधार वगैरे जडबंबाळ शब्द फेकले जात होते. समर्थक राजीनामा द्या, राजीनामा द्या बोंब ठोकत होते.

हल्ली एखादा नेता पक्ष बदलतो तसा आता त्याने चॅनेल बदलला. दुसर्‍या चॅनेलवर असाच दुसरा कुणीतरी तिसर्‍याच कुणाचा राजीनामा मागत होता. नैतिक अधिकाराची तीच पिपाणी वाजवत होता. मागचे समर्थक अगदी तसेच स्प्रिंग लावल्यासारखे माना हलवत होते.

नंतर तो एकामागून एक चॅनेल बदलत राहिला. आलटून पालटून कुणी ना कुणी कुणाचा तरी राजीनामा मागत होतं. प्रत्येक राजीनाम्याला नैतिक अधिकाराचा तडका देत होतं. आता त्याला कळून चुकलं होतं की जरा कुणाकडून काही खुट् झालं की राजीनामा मागण्याची एक प्रथा असते…आणि ही प्रथापरंपरा राजकारणातले सगळे संस्कृतीसंरक्षक मनोभावे पाळत असतात. राजीनामा मागितला म्हणूनच राजीनामा न देण्याचीही आणखी एक वेगळी प्रथा असते तीही त्याला ह्या निमित्तानेच कळली. त्यालाच क्लिन चीट देणं म्हणतात हे कळून त्याच्या ज्ञानात आणखी भर पडली. आता ह्यापुढे आपलं कशानेही मनोरंजन झालं नाही तरच राजीनाम्याची मागणी बघायची हे मात्र त्याने बघता बघता ठरवून टाकलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -