घरफिचर्ससारांशन्यूडीटी : अश्लीलता नव्हे अभिव्यक्ती

न्यूडीटी : अश्लीलता नव्हे अभिव्यक्ती

Subscribe

मुळात नग्नतेविषयी स्त्री आणि पुरुष या दोहोंबाबत समाजात बेगडीपणा आढळून येतो. आज रणवीरच्या समर्थनार्थ जितक्या सेलिब्रिटी महिला उतरल्या, तितक्याच एखाद्या अभिनेत्रीसाठी उतरल्या असत्या का? याबाबत शंका आहे. ‘बाकी माझे आयुष्य, माझा अधिकार’ हे तत्त्व फक्तं स्त्रियांचीच मक्तेदारी नाही तर ते पुरुषांनाही तितकंच लागू होतं हे नव्याने यानिमित्ताने समोर आले. कारण इथे मुद्दा स्त्री अथवा पुरुष या संकल्पनेच्या ग्लोरीफिकेशनचा नसून माणूस म्हणून आपल्याला काय वाटतं याचा आहे. पण आपल्याकडे नग्नता नेहमी लिंगाशी जोडली जाते. ज्यामुळे त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा तितकाच संकुचित असणं स्वाभाविक आहे.

एक हम्माम में तब्दील हुई है दुनिया
सब ही नंगे हैं किसे देख के शरमाऊँ मैं

सुलैमान अरीब यांचा हा अत्यंत सुंदर शेर किती मोठा मतितार्थ सांगून जातो. जन्माला आलेलं बाळ कपडे घेऊन जन्म घेत? नग्नता हेच आपल्या जीवनाचे मूळ असताना त्यावर अश्लीलतेचा ठपका ठेवण खेदजनक वाटत. रणवीर सिंग या अतरंगी अभिनेत्याने नुकतेच न्यूड फोटोशूट केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. त्याला मिम्स आणि पोस्टच्या माध्यमातून अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल केले गेले. त्याच्याविरुद्ध स्त्रियांना लाज आणणारे कृत्य म्हणून तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारदारांमध्ये आजवर ऐकिवातही नसलेल्या मनसेच्या शारीरिक सेनेचाही समावेश आहे. रणवीरच्या या न्यूड फोटोशूटचे पडसाद उमटत असताना, सातत्याने एक प्रश्न उपस्थित होताना दिसतोय तो म्हणजे त्या फोटोने अश्लीलता पसरते का? तर अजिबात नाही कारण नग्न होणे हा अश्लीलतेचा निकष असेल तर नागासाधू असणार्‍या प्रत्येकाविरुद्ध तक्रार नोंदविली गेली पाहिजे. आणि जर त्या साधूंना पाहून अश्लीलता वाटत नाही लाज येत नाही तर मग रणवीरच्या फोटोबाबतही हे लागू व्हायला हवे होते, पण तसे घडले नाही म्हणजे खोट तुमच्या मनात आहे. यातून अश्लीलता तुमच्याच डोक्यात आहे त्याशिवाय ती अशी व्यक्तीसापेक्षा बदलली नसती हेच नाही का दिसून येत? आणि या वादाने ‘माझे शरीर माझा हक्क’ हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. सादी बाब आहे रणवीरला फोटोसाठी नग्न होताना अडचण झाली नाही, फोटो काढणार्‍याने आक्षेप घेतला नाही, ना त्याची पत्नी अथवा कुटुंबियांनी टिप्पणी दिली मग तुम्ही आम्ही कोण त्यावर बोलणारे?

- Advertisement -

मुळात नग्नतेविषयी स्त्री आणि पुरुष या दोहोंबाबत समाजात बेगडीपणा आढळून येतो. आज रणवीरच्या समर्थनार्थ जितक्या सेलिब्रिटी महिला उतरल्या, तितक्याच एखाद्या अभिनेत्रीसाठी उतरल्या असत्या का? याबाबत शंका आहे. ‘बाकी माझे आयुष्य, माझा अधिकार’ हे तत्त्व फक्तं स्त्रियांचीच मक्तेदारी नाही तर ते पुरुषांनाही तितकंच लागू होतं हे नव्याने यानिमित्ताने समोर आले. कारण इथे मुद्दा स्त्री अथवा पुरुष या संकल्पनेच्या ग्लोरीफिकेशनचा नसून माणूस म्हणून आपल्याला काय वाटतं याचा आहे. पण आपल्याकडे नग्नता नेहमी लिंगाशी जोडली जाते. ज्यामुळे त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा तितकाच संकुचित असणं स्वाभाविक आहे.

कारण शाळेत असताना किती विद्यार्थ्यांना शरीरशास्त्र शिकवले गेले? आणि शिकवले असेल तर शिकवण्याची पद्धत कशी होती याचा बारकाईने विचार केला तर बरीचशी उत्तरे सापडतील. कारण शरीराकडे केवळ शरीर म्हणून न बघता हे माणसाचे अन् ते बाईचे सांगत असताना शरीरचनेतील भिन्नता मांडणे आवश्यक असते. जी सहसा आपल्याकडे ‘सेक्शुअल ऑब्जेक्ट’ या अत्यंत चुकीच्या संकल्पनेला धरून मांडली जाते ज्याचा परिपाक म्हणून नग्न शरीर म्हटले की लगेच नैतिक अनैतिकतेचे मापदंड आठवू लागतात. एका अभिनेत्याने पब्लिसिटी स्टंट म्हणून देहप्रदर्शन केले अथवा त्याच्या कामाचा भाग म्हणून केलं असेल इतक्या वरपांगीपणे बघून दुर्लक्षित होण्यासारखा हा विषय नाही. जग काय म्हणेल, याचा विचार न करता स्वतःच्या शरीराला आहे तसे स्वीकारण्याची अभिव्यक्ती आहे हे फोटोशूट जरी त्यामागील निमित्त वेगळे असले तरी रणवीरने ते स्वीकारलं हे खूप महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

खरेतर नग्नतेसंदर्भातला हा पहिला वाद नाही. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात नग्नतेचा एक वेगळा पैलू मांडू इच्छिणार्‍या अक्षय माळी नावाच्या तरुण छायाचित्रकाराने आपल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवल्यावर त्यात न्यूड फोटो आहेत म्हणून ते बंद पाडण्यात आल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वीच घडला आहे. ‘न्यूड’सारख्या समाजव्यवस्थेचे वास्तव चित्रण उभे करणार्‍या नितांत सुंदर चित्रपटाला विरोध करण्यात आला तेव्हा फारसे आश्चर्य वाटले नाही. कारण बंद दाराआड अबलांची वस्त्र फेडून मर्दुमकी गाजविणार्‍या या समाजाला स्वतःची नागडी मानसिकता उघडं होईल याची भीती वाटते. डोक्यातच बिभत्सपणा भरुन ठेवलेल्या मानसिकतेला एखाद्याला विवस्त्र पाहून लाज यावी यापेक्षा मोठा विनोद काय असेल. अंगभर कपड्यांनी झाकोळलेलं स्त्री शरीर पाहून उत्तेजीत होणार्‍यांनी उद्या उठून स्त्रियांच्या बाहेर पडण्यावर बंदी आणा आमचा ताबा सुटतो म्हणून तक्रार करू नये म्हणजे मिळवलं. कारण पॉर्न व्हिडिओ बघून बंद दारात उत्तेजित होणार्‍या पुरुषांपेक्षा आपल्या वासनेने वखवखल्या नजरेने बाईची वस्त्रे फेडणारी जमात जास्त भयावह भासते.

स्तनपान मातृत्वातील किती सुखद अनुभव… मात्र तो अनुभवणं सोडून बाळाला दूध पाजताना पदर अथवा ओढणीचा आडोसा धरलेल्या बाईच्या उरुजावरून किती घाणेरड्या नजरा फिरून जातात याच भावनेने ती शरमते. याठिकाणी अमेरिकेच्या ‘फ्री द निप्पल’ अभियानाची प्रकर्षाने आठवण होते. अमेरिकेच्या तीन महिलांवर टॉपलेस फिरण्याबाबत आक्षेप घेतल्यानंतर सुरू झालेला हा कायदेशीर लढा होता. पुरुषांनासुद्धा स्तनाग्रे असतात, मात्र स्त्रियांच्या स्तनाग्रांचा आकार मोठा आहे म्हणून तिला दोषी ठरवत तिच्याकडे संभोगाची वस्तू म्हणून न बघता तिला माणूस म्हणून बघावे आणि पुरुषांप्रमाणे समान अधिकार मिळावेत म्हणून आम्हाला टॉपलेस फिरण्याचा अधिकार द्या, अशी मागणी महिलांनी केली होती ज्यात त्यांचा विजय होऊन पश्चिम अमेरिकेतील कोलोराडो, उताह, कॅनसस, न्यू मॅक्सिको आणि ओक्लाहोमा या सहा राज्यांमधील महिलाही पुरुषांप्रमाणे टॉपलेस फिरू शकतात असा निर्णय कोर्टाने दिला. थोडक्यात काय तर शरीर हा भाग गौण आहे जर तुम्ही समोरच्याला माणूस म्हणून स्वीकारत असाल तर इथे प्रथम स्वतःला आहे तसं स्वीकारण्याचा मुद्दादेखील आवश्यक ठरतो.

आपल्या कलेच्या माध्यमातून न्यूडीटीच्या विविध संकल्पना मांडणार्‍या कलाकारांना संस्कृती द्रोही ठरवून हा भारतीय संस्कृतीचा अपमान आहे अशा सोयीच्या तथ्यहीन बाबी सो कॉल्ड संस्कृती रक्षकांकडून सातत्याने बिंबवल्या जातात. वर हे पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे असा ठपकाही ठेवला जातो. मात्र जर मुद्दा संस्कृतीचा आणि परंपरेचा असेल तर भारताच्या इतिहासात नग्नता ही नवीन नाही, याचे अनेक उल्लेख सापडतील. भारताच्या विविध भागातील आदिवासी जमातींमध्ये टॉपलेस महिला असल्याचे पुरावे आहेत. शिवाय पुरातन लेण्यांमध्ये देखील स्त्री आणि पुरुषाच्या प्रणयाची दृश्ये, स्त्री मूर्ती नग्नच आढळून येतात. हे जसे कलेचे सुंदर नमुने आहेत तशीच चित्रे, फोटो सुद्धा असूच शकतात मग त्यात अश्लीलता का दिसावी? मात्र या गोष्टींचा विचार विरोध करणार्‍यांकडून याठिकाणी केला जाणार नाही का तर रणवीरच्या नग्न फोटोवर चर्चा वाढवली नाही तर देशातील नग्नतेकडे लक्ष जाण्याची शक्यता आहे. जिला सामोरे जाण्याची ताकद कुणाकडेही नाही. देशभरात धार्मिक कट्टरतेचा नंगानाच, महागाई, रोजगार या पोटफाडू विषयांचे विदारक वास्तव व्यवस्थेला नागडे करणारे आहे मात्र ते बघणारी नजर भलतीकडेच हरवून बसलेली दिसते.

याठिकाणी देहप्रदर्शनाचे उदात्तीकरण करण्यात आलेले नाही. कारण एखादा पुरुष सेक्स अपीलच्या दृष्टीने अथवा विकृत मानसिकतेचे दर्शन घडविण्यासाठी अशोभनीय शारीरिक चाळे करत असेल तर ते निश्चितपणे स्त्रियांना लाज आणणारे कृत्य घडू शकते ज्यावर कारवाई सुद्धा होईल. एखाद्या पुरुषाचा नग्न फोटो तो सुद्धा पाहण्याची तुमच्यावर सक्ती नसेल तर महिलांना लाज कशी आणू शकेल? सात वर्षांपूर्वी दीपिका पदुकोण अभिनित ‘माय लाईफ माय चॉईस’ हा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर काही मुलांनी याच धर्तीवर व्हिडिओ बनवून नवीन वर्जन आणले. ज्यावर ते अशा पद्धतीने ट्रोल झाले जणू ते पुरुष आहेत म्हणून त्यांना स्त्रियांप्रमाने आपल्या हक्काबाबत मत व्यक्त करण्याचा अधिकारच नाही.

स्त्री तिच्या अधिकारांबाबत बोलत असताना पुरुषांनी त्यावर बोलू नये कारण ते प्रिव्हिलेज असतात हे गृहितक पूर्णतः चुकीचे आहे. त्यांनाही आपले हक्क आणि मत याबाबत समाज स्पष्टीकरण मागतो हेच रणवीरमुळे पुन्हा लक्षात आले. पुरुषसत्ताक मानसिकतेमुळे पुरुषांना प्रिव्हीलेज आहे खरे, मात्र काही ठिकाणी स्त्री-पुरुष समांतर रेषेला येऊन मिळतात जे उत्तम आहे. रणवीरचा फोटो हाच समान धागा घेऊन आला हे ही नसे थोडके. नग्न दृश्य दिसल्यावर अश्लीलता चाळून येत असेल तर तो दोष आपल्या सडक्या मानसिकतेचा आहे ही बाब लक्षात घेतली पाहिजे. नजरेतली निकोपता जिवंत असेल तर समोर अख्खा माणूस दिसतो केवळ लिंगसापेक्ष शरीर नाही ! मग तो नागडा आहे की वस्त्र परिधान केलेला या बाबींनी फरक पडत नाही.

–प्रतिक्षा पाटील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -