नकळत बुडवणारे अ‍ॅप…

online money fraud india cryptocurrency advertising frauds
online money fraud india cryptocurrency advertising frauds

हॅलो फ्रेण्ड्स, क्या आप अपने नौकरी की वजह से परेशान हो? हररोज सुबह से लेके रात तक कामही काम करने के बाद भी आपको घर खर्चा निभाने में कठिनाई आ रही है? तो अब आप निश्चिंत हो जाओ! क्योंकी अब आप कुछही दिनों में करोडपती बनने जा रहे है… हां…आजही हमारा अ‍ॅप इन्स्टॉल करो, पैसे इनव्हेस्ट करो और उसके बदले में आपको दोगुने ज्यादा पैसे मिलेंगे! काय? नादी लागला ना करोडपती होण्याच्या स्वप्नात? पण थांबा! जागे व्हा! कारण ह्या स्वप्नात बुडता बुडता हे स्वप्न तुम्हाला कधी बुडवेल हे तुम्हालाही कळणार नाही. ह्या अशाच स्वप्न दाखवणार्‍या आकर्षक जाहिरातींनी तरुणांवर मोहिनी घालून लुटण्याचे षड्यंत्र सध्या सायबर गुन्हेगारांनी चालवले आहे.

इंटरनेटवर काही असे अ‍ॅप्लिकेशन्स आहेत जे पैसे दुप्पट करुन देण्याचे दावे करतात. यातील काही अ‍ॅप्स प्रामाणिक असतातही, पण काहींच्या बाबतीतील फसवे वास्तव सध्या समोर येते आहे. अलीकडेच एका फसव्या अ‍ॅपने लोकांना आकर्षक ऑफर्स दाखवून दुप्पट रक्कम देण्याच्या आश्वासनावर काही दिवसांचे टार्गेट ठरवून विशिष्ट रक्कम जमा करण्यास सांगितले. सुरुवातीचे काही दिवस या ग्राहकांना खरोखर पैसे दुप्पट करुन देण्यात आले, आणि विश्वास संपादन केला गेला, परंतु, कालांतराने क्रिप्टोकरन्सीसाठीची मशीनरी जास्त स्पीडसह अपडेट केल्याच्या बहाण्याने रकमेत वाढ केली व ठराविक वेळेत रक्कम दुप्पट होऊन मिळेल असे सांगितले गेले. आधीच्या विश्वास संपादनामुळे कोणतीही शंका उपस्थित न करता ग्राहकांनी पैसे जमा केले. नंतर, अत्यंत निरर्थक कारणांनी विड्रोवल नाकारले गेले आणि ग्राहकांचे पैसे परत न करताच अ‍ॅप एकाएकी बंद करण्यात आले. ह्या अ‍ॅपच्या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती, संपर्क उपलब्ध नाहीत. तसेच, ह्याचे संस्थापक, विकासक अज्ञात आहेत. ज्या सल्लागाराच्या सांगण्यावरून ह्यात तरुणांनी गुंतवणूक केली, त्या व्यक्तीलाही प्रत्यक्षात कुणीही पाहिलेले नाही, किंवा तिची कोणतीही वैयक्तिक माहिती ज्ञात नाही. इतकेच काय, हे अ‍ॅप प्ले स्टोअर अथवा अ‍ॅपल स्टोअरवरही उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही विश्वसनीयतेच्या कसोटीवर हे उतरत नाही.

आजच्या लॉकडाऊनच्या काळातील बेरोजगारीचा फायदा सायबर ठगांकडून उठवला जातो आहे. हाही त्यातलाच प्रकार! बेरोजगारीने ग्रासलेला तरुणवर्ग झटपट पैसे कमावण्याच्या आशेने क्रिप्टोकरन्सीकडे खेचला जातो आहे. पण या इलेक्ट्रॉनिक प्रणालीवर सेंट्रल बँक वा इतर कोणत्याच संस्थेचे नियंत्रण नसल्याने याचा उपयोग अनेकदा फसवेगिरीसाठी केला जातो. वरील अ‍ॅपमध्येही हाच मार्ग वापरला गेला. ह्यात इनव्हेस्ट करण्यासाठी काहींनी तर घरच्यांना अंधारात ठेवत उसने पैसेही घेतले. त्यामुळे, ह्या तरुणांची ‘तेलही गेले, तूपही गेले, अशी परिस्थिती झाली आहे. अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले. खरे तर कोणतेही अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करताना ते प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअरवर आहे की नाही याची खात्री केली जावी. याशिवाय कुठल्याही अनधिकृत पोर्टलवरुन अ‍ॅप डाऊनलोड करु नये. तसे केल्यास ते तुमच्या फोनमधील फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, डॉक्युमेंट्स, कॉल लॉगमधील डाटा, ओटीपी इ. व्यक्तिगत माहिती तुमच्या नकळत डेव्हलपरकडे पोहोचवू शकते व तुमच्या गोपनीयतेचा भंग होऊ शकतो. म्हणून कोणतेही अ‍ॅप गरज असतानाच खरोखर वापर होणार असेल तरंच डाऊनलोड करावे.

अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करताना ही घ्यावी काळजी?

1) कोणतेही अप्लिकेशन डाऊनलोड करताना ते अधिकृत स्त्रोत असेल तिथून डाऊनलोड करावे म्हणजेच गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल स्टोअर.
2) अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करताना ते अ‍ॅप्लिकेशन ज्या लोकांनी वापरले आहे त्यांना ते अ‍ॅप्लिकेशन कसे वाटले आहे त्याचा अभिप्राय त्यांनी रिव्यूमध्ये दिलेला असतो ते वाचणे महत्वाचे आहे.
3) अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करताना तेथेच प्रायव्हसी सेटिंग असते तेथून आपल्याला लक्षात येते की ते अ‍ॅप्लिकेशन जेव्हा आपण वापरणार आहोत तेव्हा ते आपल्या मोबाईलमधील मेमरी कार्ड लोकेशन कॅमेरा एस एम एस कॉल ऑडिओ याच्या वरती अ‍ॅक्सेस मागू शकतात आणि आपल्या कळत अथवा नकळत त्यांच्याकडून त्याचा गैरवापरसुद्धा केला जाऊ शकतो याची शक्यता नाकारता येणार नाही.
4) जे अ‍ॅप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करणार आहात त्याच्याच संदर्भातील किंवा तसेच अ‍ॅप्लिकेशन इतर कुठले आहे हेसुद्धा जर तुम्ही तपासले तर तुमचे काम अधिक चांगल्या प्रकारेसुद्धा होऊ शकते.
5) अ‍ॅप्लिकेशनचा वापर जर तुम्ही करत नसाल तर तुमचा मोबाईल सेफ आणि सुरक्षित राहावा यासाठी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डिसेबल करून ठेवू शकतात.
6) अ‍ॅप्लिकेशन वापरत असताना अ‍ॅड दिसू शकतात, त्या ओपन करायचा प्रयत्न केल्यास तुमचा मोबाईल तुमच्या नकळत हॅक केला जाऊ शकतो.
7) अ‍ॅप्लिकेशनमध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंगची इन्फोर्मेशन अपडेट करण्यास सांगितली जात असेल तर तुम्हाला गरज असेल तरच ती व्हेरिफाय करा. तुमचे काम झाल्यानंतर अ‍ॅप्लिकेशनमध्ये जो डेटा तुमचा सेव्ह झाला असेल तो तेथून डिलीट करा.
8) अ‍ॅप्लिकेशन रेग्युलर अपडेट करत करा.
9) अ‍ॅप्लिकेशनमधील तुमचा जो महत्वाचा डेटा आहे, त्याचा बॅकअप घेऊन तो कोणाच्या हाती लागणार नाही असा सेफ सुरक्षित ठेवा.

( लेखक तन्मय दीक्षित सायबर तज्ज्ञ आहेत.)