घरफिचर्ससारांशगर्दीचा रस्ता सोडा...

गर्दीचा रस्ता सोडा…

Subscribe

नव्या जाणिवात आपण सतत नव्या मार्गाचा व प्रयोगाचा ध्यास धरतो. यात सच्चेपणाला अपार महत्व आहे. इथे आपण आपल्याच मर्यादांच्या पलीकडे जातो. तेही अगदी सहजपणे. अर्थात त्यासाठी गर्दीचा रस्ता आपल्याला सोडावाच लागतो. स्वत:ची कळत नकळत एक वेगळी वाट आकाराला येते. या प्रवासात सच्चेपणा तर हवाच पण आपण जपलेली मूल्ये, आपल्या श्रद्धा तसेच मार्गातील आपल्या शक्यता, यांना आता अपार महत्व यायला लागते. आणि यात कमालीचा आनंद असतो आणि उत्साहही.

हिरे, सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेला आफ्रिका तसा समृद्ध देश, या देशातील एका खेड्यात हाफिज नावाचा शेतकरी प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या शेतीवर गुजराण करायचा. या कामात त्याने स्वत:ला गुंतून घेतले होते. तो खूप आनंदी व समाधानी होता कारण शेती करण्याचे काम तो मोठ्या उत्साहाने करीत असे. एक दिवस त्याच्या शेतीची कीर्ती ऐकून एक पाहुणा त्याच्या घरी आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्या पाहुण्याने हिर्‍याविषयीची माहिती त्याला विचारली. हाफिजला याबद्दल काहीच माहीत नव्हते. मग त्या पाहुण्याने त्याला वरवर माहिती दिली. तुझ्या अंगठ्याच्या मापाचा हिरा तुला जर सापडला तर तू हे अख्खे गाव विकत घेऊ शकशील आणि मुठी एवढा हिरा मिळाला तर या अख्या प्रदेशाचा तू मालक होशील. पाहुण्याने आपले ठिणगी टाकण्याचे काम पूर्ण केले.

पण त्या रात्री हाफिजला झोपच आली नाही. सारखा मनात हिर्‍याबद्दलचेच विचार येत होते. त्याला हिर्‍याच्या स्वप्नाने अक्षशः वेड लावले. त्याचे समाधान, आनंद त्याला सोडून गेले आणि हाफिज हिर्‍याच्या शोधात घराबाहेर पडला. पूर्ण आफ्रिका देश त्याने पिंजून काढला. नंतर तो युरोपमध्ये भटकला. शेवटी निराश होऊन घरी परतला. कालांतराने त्याला वार्धक्याने गाठले. हिरे न सापडल्याने बेचैन झालेल्या हाफीजने शेवटी आत्महत्या केली. पण मधल्या काळात हाफिजचे शेत एकाने विकत घेतले होते. नेहमीप्रमाणे तो माणूस शेताला पाणी देत होता एवढ्यात त्याला सूर्यकिरणात चमकणारी वस्तू दिसली. त्याला ती फार आवडली. आपल्या दिवाणखान्यात ती जास्त शोभून दिसेल म्हणून ती चमकणारी वस्तू त्याने दिवाणखान्यात आणून ठेवली.

- Advertisement -

ती चमकणारी वस्तू म्हणजे मौल्यवान हिरा होता, पण त्याची त्याला काहीही माहिती नव्हती. एक दिवस हाफिजच्या घरी बर्‍याच वर्षापूर्वी आलेला पाहुणा पुन्हा आला. त्याने घरात दिवाणखान्यात ठेवलेला हिरा पाहिला. त्याला खूप बर वाटले. ‘हाफिज कुठे आहे ?’ त्या नवीन मालकाला पाहुण्याने प्रश्न विचारताच त्याच्या निधनाची बातमी त्याला समजली. ‘अरे हा दगड फार मौल्यवान आहे, याला हिरा म्हणतात. याच्याच शोधासाठी हाफिज घराबाहेर पडला होता.’ त्यावर नवीन मालक म्हणाला, ‘हे चमकणारे दगड माझ्या शेतामधल्या ओहोळात आहेत. ते छान चमकतात म्हणून त्यातला एक इथे आणला एवढेच.’ पाहुण्याने मग त्या दगडांचा शोध घेतला. ते हिरेच होते. नवीन मालकाचे नशीब फळफळले हे वेगळे सांगायला नको.

वरील कथेतून हाच अर्थबोध होतो की, संधी आपल्या पायाशी असते, आपण ती ओळखायला कमी पडतो. आपण संधीची वाट पाहत बसलो तर ती कधी येणारच नाही, पण जर शक्यतांचा विचार केला तर नक्कीच आपण आपल्या संधी स्वतः निर्माण सुद्धा करू शकतो.

- Advertisement -

आपले अवलोकन-पाहणे कधी संपूर्णपणाचे नसतेच. आपण नेहमीच एका विशिष्ट दृष्टीने पाहतो. एकूणच भूतकाळात काय घडलेल्या घटना आणि भविष्याची चिंतामध्ये न आणता आपल्याला जे आहे ते पाहता आले पाहिजे, तसे जर आपण पाहू शकलो तर तो अनुभव सर्वस्वी नवा व अपूर्व असेल.

नव्या जाणिवात आपण सतत नव्या मार्गाचा व प्रयोगाचा ध्यास धरतो. यात सच्चेपणाला अपार महत्व आहे. इथे आपण आपल्याच मर्यादांच्या पलीकडे जातो. तेही अगदी सहजपणे. अर्थात त्यासाठी गर्दीचा रस्ता आपल्याला सोडावाच लागतो. स्वत:ची कळत नकळत एक वेगळी वाट आकाराला येते. या प्रवासात सच्चेपणा तर हवाच पण आपण जपलेली मूल्ये, आपल्या श्रद्धा तसेच मार्गातील आपल्या शक्यता, यांना आता अपार महत्व यायला लागते. आणि यात कमालीचा आनंद असतो आणि उत्साहही. हे असं का तर उत्तर सोपं आहे. कारण म्हणजे आपला सत्याशी सामना होतो आणि जगातली आश्चर्य आपल्या नजरेला जाणवायला लागतात. ज्ञाताकडून अज्ञाताकडे आपली वाटचाल सुरू होते. सुरक्षिततेचे आपले घरटे सोडून प्रथमच आपण सागरात, वादळवार्‍यात प्रवासाला निघतो. पण आता मनात भीती नसते. असत्य संपूर्णपणे ओळखून ते सहजपणे आपण नाकारतो.

यासाठी कोलंबसचेच उदारहण घ्या ना, नवीन खंड सापडेल या शोधात निघालेल्या त्या खलाशाने एक नवे जग खरोखरीच शोधून काढले. ज्यामध्ये वादळ- तुफान (संपूर्णपणे अज्ञात असणार्‍या) या समुद्र परिसरात इतर जण जाण्याचेसुद्धा मनात आणत नव्हते, तिथे त्याने आपली नौका सोडली आणि तो यशस्वी झाला. पुढचा इतिहास तर सर्वांना परिचित आहेच. अर्थात यासाठी प्रवास अनिवार्य आहे. इतकेच नव्हे तर या वादळी प्रवासातील वादळ व भटकंतीमुळे वाट्याला येणारे वेड हे आपल्याला क्षणोक्षणी भेटते. पण जो मरणाला आपल्या खांद्यावर टाकून प्रवासाला निघाला आहे त्याला यश तर मिळणारच. पण मुख्य म्हणजे आजवर कोणालाही न गवसणारा मौल्यवान संधीचा खजिना आपल्याला निश्चितच सापडेल…

जेव्हा आपण संपूर्ण भासमयतेला तसेच विचारांनी निर्माण केलेल्या जगताला ठाम नकार देऊ तेव्हाच आपण वास्तवाचा सन्मान खर्‍या अर्थाने करू शकू. एकूणच असत्य नेमकेपणाने ओळखून त्याला ठाम नकार देऊन आपल्या क्षमता विकसित करणे हे यात महत्वाचे आहे. अर्थात ही कणखर मानसिकता व शारीरिक क्षमता ही सद्सद्विवेकातून आकाराला येते. म्हणूनच जन्मजात बुद्धीला आपल्याला परिपक्व करायला हवे. कुठलेही महासंकट आले तरी सद्भाव सोडायचा नाही हे लक्षात ठेवायचे. आपले स्वकर्म आणि सद्भाव यांची बिनशर्त सोबत आपल्या कष्टप्रदतेच्या प्रवासाला उजळून टाकते एवढे मात्र नक्की.

जेव्हा स्व-जागृतीपर्यंत आपण पोहोचतो तेव्हा आपल्यातील भावभावना तसेच विचार हे विकसित झालेले आपल्याला दिसून येतील. मनाची पक्वता वाढलेली असेल. पूर्वी ज्या गोष्टी नजरेला जशा जाणवत होत्या, त्या अगदीच वेगळ्या रुपात आता जाणवतील. खरे तर लहान मुलाची निरागसताही आपल्याकडे असते आणि सच्चेपणाही. इतकेच नव्हे तर संपूर्ण जगाबद्दलची एक अवीट जिज्ञासा त्याला आपल्या परीने खेचत नेते. म्हणजेच तो रस्ताच आपल्याला पुढे पुढे नेत राहतो. मग उरते फक्त पुढे जाणे आणि प्रवासच. मुख्य म्हणजे या प्रवासातच या प्रवासाची सांगता असते. या प्रवासातील आनंदमयता तसेच येणारे अडथळे आपण एका समजूतदार नजरेने बघू शकतो. एके काळी आपण त्याचविषयी तक्रारीचा सूर लावलेला असतो.

खर्‍या लीडरला वाटेतील सर्व अडथळे-अडचणी दिसतात. वस्तुस्थितीचा खरा स्पर्श झालेला लीडर हा नेहमीच संवेदनशील आयुष्य जगत असतो. एकूणच मुक्त झालेल्या मनाने तो समस्येला-वास्तवाला प्रतिसाद देतो. वास्तवातून जगाकडे पाहण्याची त्याची स्वत:ची अशी एक पद्धत असते आणि ती तो काळजीपूर्वक व पूर्ण जाणतेपणाने वापरतो. भलेपणा-चांगुलपणा यांचा एक प्रचंड साठा नेत्याकडे असावा लागतो. अशा लीडरला हे पक्के ठाऊक असते की, समस्येच्या अंतर्भागात सर्वार्थाने विकसित होण्याची संधी दडलेली आहे. समस्येला टाळणे म्हणजे एक प्रकारे विकास-प्रगतीला टाळण्यासारखेच आहे. समस्या आपल्यातील तेज खर्‍या अर्थाने प्रकट करतात. ध्येय प्रवासाची ही ज्योत सतत तेवत ठेवायला हवी, पेटवायला हवी. एकूणच खोल अंतरंगात असलेल्या ध्येयरेखेची सदैव बांधील रहा. आपल्या स्वकर्मावर अधिक लक्ष केंद्रित करणे हे अत्यंत आवश्यक आहे.

जे आपल्या अगदी जवळचे असतात, त्यांनाच आपण अनेकदा गृहीत धरतो. सर्वसाधारणपणे आपण दुसर्‍यालाच सतत दोष देत राहतो. आपण सारखे स्वतःचे आत्मसमर्थन करत असतो. काहीवेळा तर आपण दुसर्‍याच्या मनाचे नानाविध अर्थ काढतो. महत्वाचे म्हणजे, आपल्यातला संघर्ष हा आपल्या वर्तमानाची, जीवनाची नासाडी करतो. पर्यायाने आपल्यातल्या सृजनशीलतेचा र्‍हास व्हायला लागतो. त्यामुळे आयुष्यातील संधी योग्य वेळी ओळखा व स्वत:ला प्रगल्भ बनवा.

–निकिता गांगुर्डे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -