– दीपक कुटे
हिंदू आणि जैन लोकांच्या प्रार्थनागृहास मंदिर म्हटले जाते. मंदिर हा संस्कृत शब्द आहे. मंदिर या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख ‘शतपथ ब्राह्मण’ या ग्रंथात झालेला दिसून येतो. महाकाव्य आणि पुराणांमध्ये मंदिर या शब्दाऐवजी बहुतेक वेळेस देवायतन, देवकुल, देवगृह असे शब्द वापरलेले दिसतात. मंदिराला देवालय असेदेखील म्हटले जाते.
देव+आलय ह्या शब्दाची फोड करताना देव म्हणजे ईश्वर, आलय म्हणजे घर. म्हणजेच देवाचे घर. देवाच्या राहण्याची जागा, असा अर्थ सांगता येतो. मंदिराला मराठीमध्ये देऊळ, देवघर, देवालय, देवगृह असे समानार्थी शब्द आहेत. मंदिराला तामिळमध्ये कोवील, तेलुगूमध्ये आलयम, कन्नडमध्ये देवस्थान, मल्याळममध्ये क्षेत्रम म्हणतात.
वैदिक काळाचा विचार करण्याबरोबरच सिंधू संस्कृतीच्या काळात डोकावणेदेखील आवश्यक आहे. कारण इसवी सन १९२२ साली मोहेंजोदडो येथे सिंधू संस्कृतीचे अवशेष प्राप्त होण्याअगोदर वैदिक संस्कृती ही भारताची सर्वात जुनी सभ्यता मानली जात असे. परंतु उत्खननातून मिळालेल्या पुराव्यांचे शास्त्रीय विश्लेषण केले असता सिंधू संस्कृतीचा काळ वैदिक संस्कृतीपेक्षाही जुना असल्याचे लक्षात आले.
सिंधू संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व ३५०० ते इसवी सन पूर्व २००० ग्राह्य धरला जातो. सिंधू संस्कृतीमधील स्थळांचे उत्खनन करताना एकाही मंदिराचे अवशेष सापडले नाहीत. त्यामुळे सिंधू संस्कृतीमध्ये मंदिर नव्हते हे ठामपणे म्हणता येते. सिंधू संस्कृतीच्या र्हासानंतर इसवी सन पूर्व १९०० ते इ. स. पूर्व १७००च्या दरम्यान आर्य लोक भारतात आले. त्यांनी आपल्या सोबत वेद आणले.
इसवी सन पूर्व १९०० ते इसवी सन पूर्व ६०० हा या आर्यांचा काळ ‘वैदिक काळ’ म्हणून ओळखला जातो. आर्य लोक हे मुख्यतः यज्ञपूजक व निसर्गपूजक होते. नैसर्गिक शक्ती जसे वारा, पाणी, अग्नी आणि पशू यांनाच त्यांनी आपले इष्ट मानले होते. इंद्र, वरूण, अग्नी, सूर्य, पूषन आणि ईशान हे प्रमुख वैदिक देव होते. वरील देवतांपैकी ईशान देवतेचे सध्याच्या शिवस्वरूपामध्ये हळूहळू रुपांतरण होत होते. परंतु हे सर्व देव अमूर्त स्वरूपात होते.
यज्ञाद्वारेच या सर्व देवतांना अग्नीच्या माध्यमातून हवी देऊन त्यांची पूजा केली जात असे. वेदांमध्ये वैदिक देवतांच्या मानवी स्वरूपाचे जरी वर्णन केले असले तरी प्रत्यक्षात त्यांना मूर्त स्वरूपात पुजले जात नव्हते. वेदांमधेही कुठेही मूर्ती पूजा सांगितलेली नाही. आर्यांचा ‘यज्ञ’ हाच धर्म असल्यामुळे त्यांना आपल्या इष्ट देवतेची प्रार्थना करण्यासाठी एखाद्या विशिष्ट प्रार्थनागृहाची गरज पडली नाही. पुरातत्वीय उत्खनन आणि शास्त्रीय अभ्यासातून असे ठामपणे म्हणता येते की, इसवी सन पूर्व ६०० सालापर्यंत वैदिक काळापर्यंत ‘मंदिर’ ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती.
वैदिक काळामध्ये यज्ञयाग आणि कर्मकांडामुळे धर्माला एक बोजड स्वरूप प्राप्त झालेले होते. एक प्रकारची जटिलता यज्ञसंस्थेला प्राप्त झालेली होती. यज्ञामध्ये पशुबळी देण्यात येत होते. काही प्रसंगी नरबळीसुद्धा देण्यात येत होते. चातुर्वर्ण्य समाज रचनेच्या उदात्तीकरणामुळे सामान्य जन भरडले जात होते. यज्ञसंस्थेवर एका विशिष्ट वर्गाचे प्रभुत्व होते. तत्कालीन समाजाला आपल्या धार्मिक भावना व्यक्त करण्यासाठी काहीच साधन उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत इसवी सन पूर्व सहाव्या शतकात महाजनपदांच्या काळामध्ये गौतम बुद्ध आणि भगवान महावीर अशा महापुरुषांचा जन्म झाला.
या दोघांनी यज्ञसंस्थेवर कडाडून हल्ला केला व यज्ञांमधील पशुहत्या, कर्मकांड यांना विरोध केला. लोकांना अहिंसा, समता, बंधुता यांची शिकवण दिली. त्यामुळे लोकांनी वैदिक धर्माचा त्याग करून बौद्ध आणि जैन धर्माचा स्वीकार केला. बुद्धाने आपल्या हयातीमध्येच प्रसारासाठी संघ प्रणाली अस्तित्वात आणली होती. या संघामध्ये ४०० ते ५०० बौद्ध भिक्खूंचा समावेश असे. हे बौद्ध भिक्खू संसार पराङमुख असल्यामुळे गुहांच्या आश्रयाला राहत असत.
पुढे इसवी सन पूर्व तिसर्या ते दुसर्या शतकामध्ये मौर्य काळामध्ये बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्यावर या बौद्ध भिक्खूंच्या राहण्याची सोय करण्यासाठी मोठमोठे पहाड खोदले. हे लेण्यांचे प्राथमिक स्वरुप होते. त्यांच्या राहण्याच्या जागेला विहार म्हटले जाई आणि प्रार्थना करायच्या जागेला चैत्यगृह म्हटले जाई. बुद्ध धर्म आणि जैन धर्म आपल्या भरात असताना अशा जवळपास पंधराशे लेण्या खोदल्या गेल्या.
यापैकी निम्म्याहून अधिक लेण्या ह्या आपल्या महाराष्ट्रात आहेत, ही निश्चितच आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. या काळापर्यंत मूर्ती पूजा अजूनही अस्तित्वात नव्हती. प्रतिकांच्या स्वरूपात बुद्धाची पूजा करण्यात येत होती. जसे हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतीक होते, पिंपळवृक्ष बुद्धाच्या केवल ज्ञानाचे प्रतीक होते.
स्तूप हे बुद्धाच्या निर्वाणाचे प्रतीक होते. ही प्रतीके बुद्धापर्यंत पोहोचायची साधनं होती. परंतु काही अनुयायांनी बुद्धाला असाधारण मनुष्य मानले. प्रतिकांऐवजी प्रत्यक्ष बुद्धाची मूर्तीच बनवून बुद्धाची प्रार्थना करण्यात येऊ लागली. बुद्धांच्या मूर्तीसोबतच बुद्धांचा जीवन प्रवास, जातक कथांमधील प्रसंग आणि बौद्ध धर्मातील इतर देवी-देवतांच्या मूर्ती कोरण्यात येऊ लागल्या. तसेच यक्षिणी मूर्तीदेखील प्रकर्षाने दिसत असे. हा साधारण इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन पहिल्या शतकाचा काळ होता.
या काळात महाराष्ट्रातील कार्ले-भाजे लेणी, वेरुळ लेणी, पितळ खोरा लेणी, नाशिकमधील त्रिरश्मी लेणी, इ. लेण्या प्रमुख होत्या. म्हणजेच बुद्धांच्या मूर्ती येण्यासाठी बुद्धानंतर पाचशे वर्षे जावी लागली. हाच आपल्या भारतामध्ये मूर्तीपूजेचा प्रारंभ मानावयास हरकत नाही. विरोधाभास असा की स्वत: बुद्धाने मूर्तीपूजेचे कुठेही समर्थन केलेले नाही. आपल्या तार्किक बुद्धीला पटेल तेच करण्याचा उपदेश केलेला होता, परंतु मूळ उद्देश बाजूला राहून आज जगामध्ये सर्वाधिक मूर्ती या गौतम बुद्धांच्या दिसून येतात.
मौर्य काळानंतर आलेल्या सातवाहन राजांनी, क्षात्रप राजांनीदेखील बौद्ध धर्माला राजाश्रय दिला अणि बौद्ध धर्माचा जोमाने प्रसार केला. त्यासाठी त्यांनी अनेक लेण्या खोदल्या. अशा प्रकारे आता सनातन धर्माच्या देवतांसाठी आवश्यक असलेला मंच तयार होत होता. बौद्ध अणि जैन धर्माच्या विचारसरणीमुळे समाजात अहिंसा, परोपकार यांचे अवास्तव स्तोम माजले होते. क्षात्रतेज लोप पावले होते. वरील राजवंशांच्या पतनानंतर गुप्त साम्राज्याचा उदय झाला. गुप्त राजांनी सनातन धर्माचे पुनरुत्थान केले.
ह्या काळात जुन्या वैदिक देवतांचे महत्त्व कमी होऊन त्रिमूर्ती म्हणजेच ब्रम्हा, विष्णु आणि शिव यांचे महत्त्व वाढीस लागले. शिव ही देवता वैदिक काळातील ईशान देवतेचेच सनातनी रूप आहे. गुप्त राजे शैवपंथीय होते. बौद्ध धर्मालादेखील त्यांनी उदार मनाने आसरा दिलेला होता. इसवी सन तिसर्या ते पाचव्या शतकात शिवाची लिंग स्वरुपात बुद्धाच्या मूर्तीसोबत प्रतिष्ठापना केली जाऊ लागली. इसवी सन २०० ते इसवी सन ३०० च्या दरम्यान अठरा पुराणांपैकी महत्त्वाची पुराणे लिहिली गेली.
रामायण अणि महाभारत ही दोन महाकाव्ये ह्याच दरम्यान लिहिली गेली. आता हिंदू लेण्यांमध्ये ह्या पुराणांमधील आणि महाभारतामधील प्रसंग कोरले जात असत. ह्यात प्रामुख्याने समुद्र-मंथन, विष्णूचे दशावतार, शिवलिंगे, शिवाच्या तीनमुखी मूर्ती (एलिफंटा गुहा) यक्षिणी, अप्सरा, महिषासुरमर्दिनी, गजलक्ष्मी इ. यांचा समावेश होता. अशा प्रकारे या गुहा वास्तूकलेतून मंदिराच्या प्राथमिक अवस्थेचा पाया रचला गेला.
-(लेखक शिल्प आणि वास्तुकलेचे अभ्यासक आहेत)