Maharashtra Assembly Election 2024
घरफिचर्ससारांशChildrens Literature : खजिना बालसाहित्याचा!

Childrens Literature : खजिना बालसाहित्याचा!

Subscribe

मुलांच्या भावविश्वात मुलांचे बोट धरल्याशिवाय प्रवेशच मिळत नाही आणि तुमच्या दडलेल्या मुलाची ओळख पटल्याशिवाय मुलं तुमचं बोट धरत नाहीत. मुलांची अभिव्यक्ती ही आपल्याला समजेल अशीच असली पाहिजे असं नाही तर ती आपण मुलांकडून समजून घेतली पाहिजे. १४ नोव्हेंबर रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन. लहान मुलं म्हणजे नेहरूंचा जीव की प्राण! ‘मुलं म्हणजे देवाघरची फुलं’ असं ते कायम म्हणायचे. मुलांवरील त्यांचं अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंती निमित्तानं भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालदिनाच्या निमित्तानं बालसाहित्याचा घेतलेला हा आढावा.

-नारायण गिरप

बालसाहित्याचं प्रयोजन आहे मुलांना दृष्टी देणं आणि मुलांना आनंद देत त्यांच्या विविध संकल्पनांबाबतच्या कक्षा रुंदावत नेणं. बालसाहित्य मुलांना शिकवित नाही तर शिकण्याच्या अनेकानेक पद्धती, विविध पर्याय मुलांसमोर सहज उलगडून ठेवतो. मुलाला त्याच्यातील सुप्तशक्ती व सर्जनशीलता याची जाणीव करून देतं.

- Advertisement -

कारण बालसाहित्याचा पाया मुलांना गृहीत धरणं हा नसून ‘मुलांवरचा अपार विश्वास नि निरपेक्ष प्रेम’ हा आहे. बालवाङ्मयात राजा-राणी, राजकन्या, पर्‍या, देवदूत, बोलणारे प्राणी, जादूगार, राक्षस आणि सद्गुणी-दुर्गुणी माणसं असतात. असे वाङ्मय लिहिणारे जगात अनेक लेखक होऊन गेले. हॅन्स ख्रिश्चन अ‍ॅन्डरसन हा त्या लेखकातला एक प्रख्यात लेखक.

त्याने लिहिलेल्या परिकथांची जगातल्या सर्व भाषांत भाषांतरे झाली आहेत. लेविस कॅरोलचे अलिस इन् वंडर लॅन्ड, मार्क ट्वेनचे ‘टॉम सॉयर’ आणि अ‍ॅडव्हेन्चर्स ऑफ हकर बरी फीन, फिलिपा पिअर्सच मिडनाईट गार्डन इ. शिवाय थोड्या मोठ्या मुलांसाठी हार्डी बॉईज नॅन्सी ड्-यू, हॅरी पॉटर वगैरे पुस्तके जगप्रसिद्ध आहेत. १५ व्या शतकापासून बरेच साहित्य विशेषत: लहान मुलांचे साहित्य लिहिले गेले. ते शैक्षणिक, उपदेशात्मक, नैतिक नि धार्मिक स्वरूपाचे, संदेश देणारे होते. चार्ल्स डार्विन आणि जॉन लॉक यांच्या प्रभावाने अधिक तात्त्विक नि वैज्ञानिक दृष्टिकोनातून बालसाहित्य आकाराला आले.

- Advertisement -

बालसाहित्याला पहिले मुद्रित स्वरूप १८०६ साली मिळाले ते ‘बालबोध मुक्तावली’च्या रूपाने. इसापनीती, पंचतंत्र, हितोपदेश अशी पुस्तके म्हणजे थेट उपदेश करणार्‍या बोधकथा होत्या. बालसाहित्याची संकल्पना ही जागतिक स्तरावरची असली तरी भारतामध्ये विशेषत: महाराष्ट्रात बालमानसशास्त्र आणि बालसाहित्य यांचा गांभीर्यानं विचार सुरू होण्यास ‘मादाम मॉन्टेसरी’ यांची पुणे भेट कारणीभूत आहे असे म्हटले जाते.

19 व्या शतकाच्या प्रारंभी बालभारती स्वतंत्रपणे लिहिलेले, स्वतंत्र पुस्तक रूपात नव्हते. ऋग्वेद, रामायण, महाभारत ते बुद्ध-जैन काळापर्यंतच्या पाच-सहा हजार वर्षातल्या कथा वाङ्मयात दर्जेदार प्राणीकथा, कल्पितकथा, अद्भुतकथा, लोककथा, बुद्धजातक कथा, पंचतंत्र, हितोपदेशक कथा अशी वेळोवेळी भर पडत जाऊन भारतीय कथा वाङ्मय खूप समृद्ध झाले होते. या सर्व कथांचा हेतू सर्वसामान्यांना मनोरंजनातून नीतिशिक्षण देण्याचा होता.

भारतीय कथा वाङ्मयाच्या या विपुल खजिन्यातून मुलांना सांगण्याजोग्या कथा-कहाण्या नेमक्या निवडून मौखिक म्हणजेच कथित बालवाङ्मयाचं पारंपरिक स्वतंत्र दालन घरोघरी आजी-आजोबांनी मोठ्या कौशल्यानं तयार केलं होतं. अनेक कल्पक स्त्री-पुरुषांनी वेळोवेळी या कथित वाङ्मय भांडारात स्वत:च्या गोष्टीची, बालगीतांची भरसुद्धा नक्की घातली असणार.

‘चिमणीचं घर होतं मेणाचं कावळ्याचं घर होतं शेणाचं’ ही पारंपरिक शिशुकथा प्राचीन मराठीत महानुभाव साहित्यात आढळते. ‘आटपाट नगर होते’ अशी सुरुवात असलेल्या कहाण्या वेळोवेळी भर घालून अजूनही सांगितल्या जातात, परंतु मराठी वाङ्मयाला एकदम कलाटणी मिळाली ती मुद्रण कलेच्या उदयामुळे! वासुदेव गोविंद आपटे यांनी आपल्या लेखनात बालसाहित्याच्या विविध पैलूंचे सुरेख दर्शन घडवून बालसाहित्याच्या विकासाचा व क्रांतीचा एक नवा टप्पा निर्माण केला. उत्तम बालसाहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ‘आनंद’ मासिक काढले.

त्यांची रामायणातल्या सोप्या गोष्टी, बालभारत, बालभागवत, वीरांच्या कथा, बालविहारमाला आदी अनेक पुस्तकं मुलांना, पालकांना खिळवून ठेवणारीच होती. याच कालखंडात हॅन्स अँडरसन व ग्रिमबंधूंच्या काही नावाजलेल्या परिकथा मराठीत अनुवादित-रूपांतरित झाल्या.

स्वातंत्र्यपूर्व काळात रवींद्रनाथ टागोर, सत्यजित राय, विष्णुशास्त्री चिपळूणकर, विष्णू जिवाजी पागनीस, मो.ग.लोंढे, छत्रे, दामले, ओक, आपटे, साने गुरुजी, महादेवशास्त्री जोशी, ना.ह.आपटे, रेव्ह.ना.वा. टिळक, त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी), गोपीनाथ तळवलकर, वामनराव चोरघडे, भा.रा.तांबे, साने गुरुजी, मालतीबाई दांडेकर, वि.म.कुलकर्णी, वा.गो.मायदेव, संजीवनी मराठे आदी बर्‍याच साहित्यिकांनी बालसाहित्याचा काव्य-गद्य विभाग नादमधुर, सोप्या शब्दांनी, विषयाच्या सुरेख सुटसुटीत मांडणीने अतिशय आकर्षक तर केलाच पण संपन्नही केला. म.का.कारखानीस, मा.के.काटदरे, कावेरी कर्वे, देवदत्त टिळक, दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ दत्तकवी इ. बालसाहित्यात शिशुगीते, शिशुकथा यांची स्वतंत्र प्रथा सुरू केली.

ताराबाई मोडक यांच्या ‘नदीच्या गोष्टी’तील वाक्ये–
‘मी होते डोंगरावर, डोंगराच्या पोटात थेंब थेंब वाहत होते’

किंवा

‘या या चांदण्यानो अंगणी माझ्या सोबत चंद्राला घेऊन या या, चमकत ठुमकत अंगणी या या’ त्या काळात मराठी शाळापत्रक, बालबोध मेवा, बालसन्मित्र, बालोद्यान, मुलांचे मासिक, खेळगडी, चांदोबा, कुमार आदी नियतकालिकातूनही बालसाहित्य मुलांचे मनोरंजन करीत होतेच. साने गुरुजी यांचे साहित्य स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळात लिहिले गेले. त्यांचे गोड गोष्टी (भाग 1 ते 10), श्यामची आई वाचकांस सुपरिचित आहेत.

यदुनाथ थत्ते (वाळवंटातले झरे), चारुशीला गुप्ते (बाजीप्रभू देशपांडे), भा.द.खेर (आणखी संस्कार कथा, श्रमाचे मोल आणि इतर संस्कार कथा), भा.रा.भागवत (फास्टर फेणे, बिपिन बुकलवार) आदी अनेक साहित्यिक पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, साहसाच्या व शौर्याच्या छोट्या-मोठ्या कथा, कादंबर्‍या लिहून स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात मुलांना आनंद दिला. भारतीय संस्कृतीची ओळखही करून दिली.

साने गुरुजी, वा.गो.मायदेव, भवानीशंकर पंडित, ताराबाई मोडक, गोपीनाथ तळवळकर, शेष नामले, ग.ह.पाटील, संजीवनी मराठे, शांता शेळके, राजा मंगळवेढेकर आदी बर्‍याच साहित्यिकांनी गोड, मुलांना समजतील अशा कविता लिहून बालकाव्याच्या प्रवाहाला हळूहळू कसे वळण लावले ते पुढील ओळींतून लक्षात येईल.

‘कधी कधी मजा वाटे जावे उंच ढगांच्यावर
दो हातांनी रविचंद्राचे हलवावे झुंबर’
असे संजीवनी मराठे लिहितात तर
‘थेंबा थेंबा थांब, दोरी तुझी लांब लांब
आकाशाला पोचली तिथे कशी खोचली’
ताराबाई मोडक आपल्या
‘पाऊस’मध्ये गाताना आढळतात. ‘सदा कदा पहाल तेव्हा, चिंटू आपला चिंतातुर
आभाळाला नाही खांब, चंद्र राहतो लांब लांब
समुद्राला नाही झाकण, कोण करील चांदण्यांची राखण? लहानग्यांसोबत राजा मंगळवेढेकर मग्न होतात.
‘आई जरा ऐक माझं, आत्ताच खाऊ देऊन टाक
दादा लवकर येणार नाही, नको
पाहूस त्याची वाट

आई जरा ऐक माझं, आज शाळेत नाही जात
पोट जरा दुखतंय माझं, तुलाही सोबत हवी घरात’

अशा खोडकर, आर्जवी शब्दांतून सुमती पायगावकर छोटुल्यासोबत रमताना दिसतात. बालकाव्याचा ओघ कल्पनाजगतातून रोजच्या विषयाकडे, वास्तव जगाकडे नि अवघडाकडून सोप्याकडे कसा वळला हे वरील रचनांवरून दिसून येते. सत्तरच्या दशकामध्ये एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू संपुष्टात येऊ लागल्याने नव्या पिढीला आजी-आजोबांच्या गोष्टी दुष्प्राय होऊ लागल्या. काळाची नेमकी गरज म्हणून संस्कारक्षम बालसाहित्याला याच काळात सुगीचे दिवस आले.

सत्तरच्या दशकानंतर बालसाहित्याची मागणी वाढून पिरोज आनंदकर, शंकर सारडा, गंगाधर गाडगीळ, अमरेंद्र गाडगीळ, दुर्गा भागवत, सुधा करमरकर, शांता शेळके, लीला भागवत, सरिता पदकी आदींची पुस्तके याच काळात पुढे आली. शैलजा काळे या एकट्या लेखिकेची बालसाहित्याची शंभर पुस्तके प्रकाशित झाली. भा.रा. भागवतांचीही एकूण प्रसिद्ध पुस्तके साधारणपणे तितकीच असावीत.

ऐंशीच्या दशकापूर्वी व नंतर पु.ल.देशपांडे, अनंत भावे, विजया वाड, वंदना विटणकर, शिरीष पै, सरिता पदकी, वृंदा लिमये, सरोजिनी बाबर, डॉ.वि.म. कुलकर्णी, ग.दि.माडगूळकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, रवींद्र खोत, चंद्रकांत खोत, राजा ढाले, महावीर जोंधळे, राजीव तांबे आदी बर्‍याच साहित्यिकांनी कथा, कविता, गीते, बडबड गीते, अशा सोप्या-सरळ, मनोरंजक बालसाहित्याने मुलांचे विश्व साकारले.

प्र.के.अत्रे (कावळ्यांची शाळा), अनिल अवचट (ओरिगामीची गंमत, सरल तरल), मंगेश पाडगावकर (चांदोमामा, सुट्टी एके सुट्टी, अफाटराव), अनंत भावे (अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी), विंदा करंदीकर (अडम तडम, परी गं परी, राणीची बाग), गिरीजा कीर (इटुकल्या पिटुकल्या गोष्टी, प्रकाशाची दारे), दत्ता टोळ (अंक मोजूया, अच्चा अन् बच्चा, आळशांचा गाव), शैलजा काळे (आजीच्या गोष्टी, ठोंब्या), वसंत बापट (परीच्या राज्यात), गो.नी.दांडेकर (शुभंकरोती), शांताबाई शेळके (मांजरांचा गाव), माधवी पुरंदरे (काकूचे बाळ, चित्रवाचन), एकनाथ आव्हाड (अक्षरांची फुले), नारायण गिरप (रेघोट्या, बुटका सरदार), कैलास दौंड (जाणिवांची फुले) आदी बर्‍याच साहित्यिकांनी बालविश्व समृद्ध नि संस्कारी केलं.

‘सांग सांग भोलानाथ’ नि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ या अनुक्रमे मंगेश पाडगावकर आणि ग.दि. माडगूळकरांची गीते आजही मनात रुंजी घालत आहेत. लहान मुलांच्या लाडक्या आजी शांता शेळके यांनी ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’, ‘विहीणबाई विहीणबाई’ अशा अनेक छान छान बालगीतांनी मुलांचं जीवन आनंदी, उत्साही केलं.

पुरुषोत्तम दारव्हेकरांनी आपल्या ‘रंजन कला मंदिर’ संस्थेतर्फे गणपतीच्या मेळ्यातील संवाद व नाटुकल्यांना हळूहळू व्यावसायिक बालरंगभूमीला योग्य असे रूप दिले. पत्तेनगरी, शेपरीचा शाप इ. गमतीदार नाटुकली लिहून सई परांजपे यांनी खरी बालनाट्ये सादर केली. पु.ल.देशपांडे यांची ‘नवे गोकुळ’, वयंम् मोठंम् खोटम् ही नाटुकलीही फारच सुरेख आहेत तर ‘राजाने चोरले पिठले’, ‘पोपट गेला उडून’ आदी सुमती पायगावकरांची छोटी नाटुकलीदेखील खूपच गाजली.

विजय तेंडुलकरांनी ‘बाबा हरवले’, ‘राजा राणीला घाम हवा’ अशी एक तासाची सुंदर बालनाट्ये लिहिली आणि अविष्कारतर्फे सुलभा देशपांडे यांनी व्यावसायिक रंगभूमीवर त्याचे बरेच प्रयोग केले. सुधा करमरकर, दारव्हेकर, दिनकर देशपांडे, रत्नाकर मतकरी यांची दोन अडीच तासांची बालनाटकेसुद्धा त्यात होती.

सुधा करमरकरांनी १९५९ साली ‘लिट्ल थिएटर’ ही व्यावसायिक बालनाट्य संस्था मुंबईत स्थापन करून कलात्मक,भव्य नेपथ्य रचनेची रंगतदार नि दर्जेदार नाटके सादर केली. रत्नाकर मतकरींनी १९६१ साली मुंबईत ‘बालनाट्य’ ही व्यावसायिक संस्था स्थापून मोठ्यांनी कामे केलेली दोन-अडीच तासांची ‘निम्मा शिम्मा राक्षस’, गाणारी मैना, इंद्राचे आसन, नारदाची शेंडी’ आणि सध्या विक्रमी प्रयोग करणारे ‘अलबत्या गलबत्या’ आदी बरीच नाटके यशस्वीरित्या केली.

वंदना विटणकरांनीही बालनाट्ये लिहिली आहेत, ‘रॉबिन हूड’ हे अडीच तासांचे मोठ्यांनी छोट्यांसाठी केलेले व्यावसायिक नाटक खूपच यशस्वी झाले होते. पुण्याला श्रीधर राजगुरू संचलित ‘शिशुरंजन’ ही संस्थाही बालनाट्याचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन मोठ्या उत्साहात करीत असते. अलीकडच्या काळात अशोक पावसकर, राजू तुलालवार आदी काहीजण बालनाट्य परंपरा सांभाळताना दिसत आहेत. वेगवेगळ्या रम्यकथा, त्याखालील अर्थसूचक वाक्ये, ठळक चित्रे ‘कॉमिक्स’ आजही देत असतात. मुलांना त्यांचं अधिक आकर्षण असल्याचं दिसून येतं.

वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवणीतूनही मुलांच्या मनोरंजनासाठी मजेदार गोष्टी, गीते, कोडी देत असतात, पण अलीकडे त्याचे प्रमाण कमी झालेले दिसते. चंपक, किशोर, ठकठक, मुलांचे मासिक आदी काही मासिकांतून प्रसिद्ध होणार्‍या राजा-राणी, परिकथा, प्राण्यांच्या गोष्टी, विनोदी कविता, संस्कार कथा, उपदेशपर कथा, मनोरंजनात्मक कथा, विज्ञान कथा, कोडी असे वैविध्यपूर्ण नि दर्जेदार साहित्य या मासिकांमधून प्रसिद्ध केलं जातं. बालकुमारांचं, किशोरवयीन मुलांचं विश्व अधिक समृद्ध नि प्रगतीमय करण्यासाठी अशी ही मासिकं आजही झटताना दिसत आहेत, संस्कृती संवर्धनाला हातभार लावत आहेत.

बालसाहित्यकार अमरेंद्र गाडगीळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी १९७५ मध्ये मराठी बालकुमार साहित्य संमेलन या नावाने संस्था स्थापन करून पुढे आजतागायत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलने भरविण्यात आली. त्यात अनेक मान्यवर साहित्यिकांनी अध्यक्षपदे भूषविली आहेत.

मुले ही बीजे आहेत, ज्यातून भविष्यातील झाडे उगवतील, ज्याप्रमाणे एखाद्या नुकत्याच उगवणार्‍या रोपट्याचे पालनपोषण, संगोपन करतो त्याप्रमाणे समाजातील मुलांना योग्य प्रकारचे ज्ञान देणे हे सर्वांचे कर्तव्य असून योग्य प्रकारची सामुग्री मुलांमध्ये सर्जनशीलता वाढविते, ते मुलांना चौकटीबाहेर विचार करण्यास सक्षम करतात आणि निसर्ग नि आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल त्यांची जागरूकता वाढवतात, त्यामुळे बालसाहित्य निर्मिती करणार्‍या लेखकांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेपोटी साहित्य अकादमीने २०१० मध्ये ‘साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारा’ची स्थापना केली आहे.

दरवर्षी २४ भाषांतील उत्कृष्ट नि गुणवंत बालसाहित्याच्या पुस्तकाला पुरस्कार दिला जातो. आजपर्यंत अनिल अवचट, दिलीप प्रभावळकर, बाबा भांड, अनंत भावे, माधवी पुरंदरे, लीलाधर हेगडे, राजीव तांबे, एल.एम.कडू, रत्नाकर मतकरी, सलीम सरदार मुल्ला, एकनाथ आव्हाड आदींना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

किरण केंद्रे, शुभदा चौकर, सुभाष विभुते, प्रा.विद्या सुर्वे-बोरसे, राजीव तांबे, पृथ्वीराज तौर हे बालसाहित्याचा सातत्यपूर्ण अभ्यास करणारे काही समीक्षक-संपादक आहेत. उपक्रमशीलता आणि प्रयोगशीलता यांची सांगड घालून मुलांच्या पुस्तकांचा विचार ही मंडळी मांडत आहेत हे विशेष आहे!

-(लेखक ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -