Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश मी आणि सोन्या बागलाणकर

मी आणि सोन्या बागलाणकर

सोन्या बागलाणकर हे पुलंनी अमर करून ठेवलेलं पात्र! अर्थात अमर करून ठेवलंय म्हटल्यावर ते त्या काळात होतं, तसंच या काळातही असणारच. व्यवस्थेवर सदैव वैतागलेला सोन्या आणि ‘आलिया भोगासी’ चालीवर जीवन जगणारा मी, यांच्यात घडलेला हा संवाद...

Related Story

- Advertisement -

सोन्या बागलाणकर हा आजन्म पीडित आहे. किंबहुना (हा किंबहुना तुम्ही नेहमी ऐकता त्यातला नाही बरं का!) कशामुळे तरी त्रासल्याशिवाय किंवा कोणता तरी अभिनिवेश घेतल्याशिवाय सोन्याला जेवण जात नाही. वास्तविक मी या अभिनिवेश वगैरे प्रकरणांपासून लांबच राहणारा. त्रासाचं म्हणाल, तर कशाकशाचा त्रास करून घ्यायचा! त्यामुळे माझ्या वाटचा त्रास सोन्याच करून घेतो.

तर, सोन्या आणि मी तसे बालमित्रच. बालाचे थोर झालो, तरी मैत्री टिकून आहे आणि ती टिकण्यातला महत्त्वाचा दुवा म्हणजे आमचा रविवारचा अण्णा! माटुंग्याला अनेकविध सौधेंडियन हॉटेलं आहेत, त्यापैकीच एक हॉटेल आमच्या अण्णाचं. खरं तर हा अण्णा आमच्याकडे कधी तोंड वर करून हसत सोडा, बघतही नाही. पण आपलं मराठी मन लगेच दुसर्‍याला ‘आपला’ वगैरे बनवून टाकतं, त्याला आम्ही तरी काय करणार. तर या अण्णाच्या हॉटेलात दोन-चार प्लेटी इडल्या, दोन-चार उलुंडू डोशे गिळल्याशिवाय आमची रविवारची सकाळ उगवत नाही. पण इडलीच्या पहिल्या प्लेटपासून चौथ्या प्लेटीपर्यंत सोन्या अखंड बोलत असतो.

- Advertisement -

असाच रविवारी सोन्या भेटला. या वेळी जरा जास्तच कावला होता. खरं तर पूर्वानुभव लक्षात घेता मी त्याला विचारायला नको होतं. पण आमची अक्कल अशीच पेंड खाते, त्याला काय करणार!
‘काय रे सोन्या, आज एवढा का कावल्यासारखा दिसतोस?’
‘तुम्हाला काय रे! तुम्ही साले गव्हर्नमेंटमध्ये जॉब करणारे. प्रायव्हेटवाल्यांची दु:खं तुम्हाला नाही कळायची’, सोन्या त्याच्या ठेवणीतल्या उपहासात्मक शैलीत बोलता झाला.
‘दो इडली, सांबार अलग से लाना,’ सोन्याच्या उपहासाकडे दुर्लक्ष करून मी टेबलापाशी आलेल्या तंबीला सांगितलं.
‘दो नको, एकच बोलो. दो परवडेगा नहीं’ सोन्याने चमच्याने इडली मोडावी तसा हिंदीचा तुकडा मोडला.
इथे खरं तर ‘मी बिल भरतो’, हे मी म्हणू शकलो असतो. पण सोन्याच्या उपहासाच्या धुरांड्यातून आलेला धूर अजून विरला नव्हता. म्हणून मी ‘बघू रे,’ हे सोन्याला म्हणत तंबीला म्हटलं, ‘तुम दोहीच लेके आव’.
‘सोन्या, दोन प्लेट इडल्या न परवडण्याइतकी हलाखीची परिस्थिती कधीपासून आली रे?’ मी हे विचारताना सोन्या पाणी पित होता, याकडे माझं लक्ष नव्हतं. तो काही बोलायला जाणार, एवढ्यात त्याला ठसका लागला. थोडं सावरल्यावर तो म्हणाला, ‘तारीख काय आज? एप्रिल महिना उजाडला ना. अरे 1 एप्रिलपासून काय काय महागलं याची यादी वाचून दाखवू का?’
‘अरे तसं महाग व्हायला पेट्रोलही महाग होतंच की दर थोड्या दिवसांनी.’ मी आपला बचावात्मक काहीतरी बोलायचं म्हणून एक खडा टाकला.
‘हो. तेच! म्हटलं ना, तुम्हा सरकारी नोकरांना आमच्या झळा कधी कळणारच नाहीत. अरे जवळपास प्रत्येक रस्त्याचा टोल किमान दहा रुपयांनी महागला आहे. विमानप्रवास महागला, 40-50 रुपयांनी महागलेला गॅस सिलिंडर 10 रुपयांनी स्वस्त झाला, टीव्ही-वॉशिंग मशिन अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूदेखील महागल्यात. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही रे.’
हे शेवटचं वाक्य सोन्या एवढा सद्गदित होऊन बोलला की, दोन क्षणांनी त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटतो की काय, अशी शंका मला यायला लागली. पण सोन्या तसा स्पोर्ट आहे. समोरच्या डब्यातला टिश्यूपेपर उचलून त्याने कपाळावरचा घाम खसखसून पुसला आणि पुन्हा आपला मोर्चा त्याने माझ्याकडे वळवला.
‘मला सांग, तुम्हा सरकारी नोकरांना आहे का काही याचं? कोरोना काळात कंपनीने 20 टक्के पगारकपात केली. आता ऑफिसं सुरू झाली, तरी पगारकपात कायम! तुम्ही काय लेको, सरकारचे जावई. एक पैसा तरी कापला गेला का तुमचा? दिवाळीचा बोनस मिळाला असेल, तो वेगळा.’
हे जरा अतीच होत होतं. वास्तविक दर रविवारी अण्णाकडे मी सोन्याला पाकीट काढू देत नाही. गेल्या आठवड्यात त्याच्या ऑफिसमधल्या नीता कोल्हटकरबरोबर डिनरला जायचं, तेव्हा दोन हजाराची नोट मी त्याच्या हाती कोंबली होती. पण भडकल्यावर सोन्याचा बुद्धीनाश होतो, हे अनुभवाअंती मला कळून चुकलं होतं. म्हणून मी फार काही वाटून घेतलं नाही. तरी इथे मला बोलणं क्रमप्राप्त होतं.
‘सोन्या, शब्द मागे घे. अरे जावई कसले! पगार मिळत असेल, पण वाढीव कामं बघतोस की नाही? कोरोनाच्या काळात डिपार्टमेंटमधल्या लोकांना पाठवलं होतं दारोदारी लोकांकडून हेल्थ फॉर्म भरून घ्यायला. निवडणूक, जनगणना वगैरे वेगळ्याच. तुम्ही सुखी. ऑफिसातलं काम सोडलं की, इतर कामाशी संबंध नाही.’
या प्रतिहल्ल्यानंतर सोन्या बावचळल्यासारखा वाटला. म्हणून मी जरा आणखी जोर करून म्हटलं, ‘आणि काय रे सोन्या, तू ज्या वर महागलेल्या गोष्टी म्हणालास, त्या काय फक्त प्रायव्हेटवाल्यांसाठी महागल्या का? सरकारी कर्मचार्‍यांना वेगळी सुट नसते बाबा कुठेच. टोल मलाही भरावा लागतो.’
सोन्याची मुद्रा आता रोदांच्या थिंकर या शिल्पातल्या त्या माणसासारखी झाली. थोडक्यात तो विचारमग्न झाला. ‘म्हणजे, तुमच्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही?’
‘अजिबात नाही. उलट तू आणि मी आपण एकाच वर्गाचे प्रतिनिधी.’
‘कोणता? मध्यमवर्ग?’ सोन्याने विचारलं.
‘छे रे, सांगकाम्या वर्गाचे प्रतिनिधी!’
‘अँ, हा कोणता वर्ग?’ सोन्या चकितसा होऊन म्हणाला.
‘सरकारने सांगितलेल्या गोष्टी मुकाटपणे करणारा वर्ग.’
‘म्हणजे काय?’
‘ऐक, पॅन-आधार लिंक करायला सांगितल्यानंतर सगळ्यात पहिलं कोण धावलं?’ मी.
‘अर्थात तू आणि मी. कोणी कुत्रं नव्हतं तेव्हा तिथे.’ सोन्या.
‘गॅसची सबसिडी सोडा, म्हटल्यावर सर्वात आधी कोणी सोडली?’ मी
‘आपण. अजून अण्णांच्या शिव्या खातोय,’ सोन्या.
‘पेट्रोलच्या किमती कितीही वाढल्या, तरी आपण गाडीत पेट्रोल भरतो की नाही?’ मी.
‘भरतो. न भरून सांगतो कोणाला?’ सोन्या.
‘टॅक्स मुदतीआधी भरतोस की, चुकवतोस?’ मी.
‘भरतो,’ सोन्या.
‘गॅस सिलिंडर महागला तरी घेतो की नाही?’ मी.
‘घेतो आणि त्याच गॅसवर फक्कडसा चहा करून महागाईवर चर्चा करतो,’ सोन्या.
‘बँकेचं कर्ज घेतल्यावर एक तरी हप्ता आपल्याला चुकवता येतो?’ मी.
‘काय बिशाद! असा हप्ता कोण चुकवेल?’ सोन्या.
‘चुकवणारे आहेत. पण तू आणि मी त्यात मोडतो का?’ मी.
‘नाही. आपल्याला शक्यच नाही,’ सोन्या.
‘एवढं करून मतदानाच्या दिवशी विकासाला मत द्यायला आपण पुढे असतो की नाही?’ मी
‘अगदी पहिला नंबर लावून,’ सोन्या.
‘मग दे टाळी आणि मला सांग, तुझ्यात आणि माझ्यात तुलनात्मक फरक आहे का?’
‘अजिबात नाही.’
‘मग मुकाटपणे इडली खा आणि डोश्याची ऑर्डर दे,’ मी सोन्याला खडसावलं.
‘रंड उलुंडू डोशा… जरा कडक भाजनां,’ सोन्याने मोठ्या टेचात ऑर्डर दिली आणि डोळे मिचकावत माझ्याकडे बघत म्हणाला, ‘आज बिल मी भरतो.’
मी तोंडात टाकलेला इडलीचा तुकडा अत्यानंदाने माझ्या घशातच अडकला आणि सोन्या मात्र ‘यम् यम् यम’ असे आवाज करत इडलीचा आनंद लुटत होता.

- Advertisement -