घरफिचर्ससारांशपर्दे में रहने दो...

पर्दे में रहने दो…

Subscribe

पर्दा नेहमीच विरहवेदना वाढवणारा ठरला आहे. नायाब नावाच्या पंकज उधासच्या गाण्यांच्या अल्बममध्ये या पर्दाचा जिक्र वारंवार केला गेलेला आहे. निकलो ना तुम बेनकाब...जमाना खराब है...अशी ही गझल होती. यातला रदिफ ‘जमाना खराब है’ हा आजही शायरासांठी गझल लेखनातील आव्हान म्हणून घेतला जातो. पंकजनं शराबवर जरी अनेक गझलवजा नज्म कव्वाल्या गायल्या असल्या तरी ‘हुस्न’ आणि ‘शबाब’ च्या विरोधात नेहमीच ‘नकाब’ येत असल्याचा आरोप उर्दू हिंदी गझलकार, शायरांनी अनेकदा केलाय. यात ‘शराब’ची बेहोशी आणण्याचं काम जागा तिच्या डोळ्यांनी अर्थातच ‘चष्म’ म्हणजेच नेत्रांनी केलेलं आहे.

हिजाबवरून इराणमध्ये आंदोलन सुरू झाल्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झालेली असतानाच हिंदी पडद्यावर मात्र हिजाब किंवा नकाब हा ‘त्याच्यासाठी’ असलेला ‘तिच्या’ चेहर्‍याच्या ‘रुख्सार’मधला सर्वात मोठा अडथळा म्हणून समोर आणला आहे. चित्रपटाच्या नायकाला नेहमीच ‘हिजाब किंवा नकाब’ हा ‘मोहब्बत किंवा इश्क’च्या मार्गातला मोठा शत्रू असल्याचं सांगणारी कित्येक गाणी हिंदी पडद्यावर आळवली गेलीत. ऐंशीच्या दशकातल्या ‘निकाह’मध्ये चेहरा छुपा लिया है किसी ने हिजाब में…असरानी जरी ही कव्वाली म्हणत असला तरी ती दीपक पराशरनं सलमा आगासाठी लिहिल्याचं स्पष्ट होतं.

‘रुख से जरा नकाब हटादो मेरे हुजूर…’ त्याआधी १९६८ मध्ये या गाण्यातले अखेरचे दोन शब्द या चित्रपटाचही नाव होतं. ही विनंतीवजा याचना रफीच्या मधाळ आवाजात हिंदी पडद्यावर जितेंद्रनं माला सिन्हासाठी केली होती. त्यावेळी चेहर्‍यावरचा नकाब हळूवार हटवणारी माला सिन्हा पहिली अभिनेत्री नाही. रफीनं अनेकींच्या चेहर्‍यावरचे नकाब हटवण्यासाठी केलेली आर्जवं किशोर किंवा मुकेशच्या तुलनेत जास्तच आहेत. अमर अकबर अँथंनीमध्ये, अकबर अलाहाबादी पडद्यावर एस्टाब्लिश्ड करायला हिरव्या जाळीदार पारदर्शक धाग्यांच्या ढगाळ शर्टसोबतच मुघलई पान चघळणारा ऋषी कपूर आठवून पहावा, पर्दा है पर्दा…ही कव्वाली हिंदी पडद्यावरील ‘हुस्न’ आणि इश्कचा गुरुर’ असलेल्या झाडून सगळ्या सौंदयवर्तीं ‘पर्दानशीं’ना बेपर्दा करणारी कव्वाली म्हणावी. यात

- Advertisement -

‘खुदा का शुक्र है
चेहरा नज़र तो आया है…

हया का रंग निगाहों पे फिर भी छाया है…बेपर्दा झालेल्या नायिकेचा चेहरा पाहिल्यावर परमेश्वराचे आभार मानणारा अकबर हिंदीच्या ‘पर्दा’ वर ऋषीनं असा काही साकारला की आजही या अभिनय ऋषीला ‘अकबर’ म्हणूनंच ओळखलं जातं. यात तो पुढंं म्हणतो,

- Advertisement -

किसी की जान जाती है
किसी को शर्म आ शर्म आती है
यही दस्तूर है इनका, सितम मशहूर इनका…

आपल्या देखणेपणानं डोळ्यांनी समोरच्याचा ‘कत्ल’ करणारे हे पर्दानशीं खरंच ‘सितम’ करत असल्याची तक्रारही या गाण्यातून केलेली आहे. अस्सल कव्वाली म्हणून ओळखलं जाणारं हे गाणं आनंद बक्षी साहेबांनी कागदावर उतरवलं होतं, तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल द्वयींचं होतं. ऋषीनं अमर अकबर…मध्ये साकारलेल्या या अकबर इलाहबादी वरून आठवलं. याच नावाचा एक मोठा शायर होऊन गेला. त्यांनी लिहिलेला हा शेर पंकज उदासनं ‘नायाब’मध्ये समोर आणला आहे.

‘बे-पर्दा कल जो आईं नज़र चंद बीबियाँ
अकबर’ ज़मीं में ग़ैरत-ए-क़ौमी से गड़ गया
पूछा जो मैं ने आप का पर्दा वो क्या हुआ
कहने लगीं की अक़्ल पे मर्दों के पड़ गया

गझलेतून हा पर्दा नेहमीच विरहवेदना वाढवणारा ठरला आहे. नायाब नावाच्या पंकज उधासच्या गाण्यांच्या अल्बममध्ये या पर्दाचा जिक्र वारंवार केला गेलेला आहे. निकलो ना तुम बेनकाब…जमाना खराब है…अशी ही गझल होती. यातला रदिफ ‘जमाना खराब है’ हा आजही शायरासांठी गझल लेखनातील आव्हान म्हणून घेतला जातो. पंकजनं शराबवर जरी अनेक गझलवजा नज्म कव्वाल्या गायल्या असल्या तरी ‘हुस्न’ आणि ‘शबाब’ च्या विरोधात नेहमीच ‘नकाब’ येत असल्याचा आरोप उर्दू हिंदी गझलकार, शायरांनी अनेकदा केलाय. यात ‘शराब’ची बेहोशी आणण्याचं काम जागा तिच्या डोळ्यांनी अर्थातच ‘चष्म’ म्हणजेच नेत्रांनी केलेलं आहे. अर्थात इथंही नकाब हा अडथळा आहेच. म्हणूनच तिला अनेकदा ‘चष्मेबद्दूर’ म्हटलं गेलंय. डोळ्यांवर असलेल्या चष्म्याशी याचा चष्मेबद्दूरचा दूरदूरपर्यंत संबंध नाही.

‘आपकी याद आती रही रातभर’
‘चष्म नम मुस्कुराती रही रातभर’

फारुख शेखच्या आठवणीत व्याकूळ झालेलया स्मिता पाटीलची गमनमधली ही गझल आठवावी, सगळी विरहाची रात्र तुझ्या आठवणीत ओले डोळे हसवण्यात गेली, असा आशय असलेल्या या गझलेसाठी छाया गांगुलींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, संगीत होतं जयदेव यांचं…

‘अब मैं समझा तेरे रुख्सार पे तिल का मतलब’
‘दौलते हुस्न पे दरबान बिठा रखा है… ’

कमर मुरादाबादींचा हा शेर मेहदी हसनपासून ते गुलाम अलीपर्यंत अनेकांच्या गझलांमध्ये परंपरेने येत आलेला आहे. प्रियतमेच्या सौंदर्याला नजर लागू नये म्हणून काळा तीळ चेहर्‍यावर असण्याची गरज या शेरातून व्यक्त केली गेलीय. इथं निसर्गानेच तीळ देऊन काजळाचं कायमस्वरुपी काम केल्याचं शायरचं म्हणणं आहे.

‘यह पर्दा हटा दो…जरा मुखडा दिखा दो’
‘हम प्यार करने वाले है कोई गैर नही…’

‘एक फूल दो माली’ रिलिज झाला ते वर्ष होतं १९६९ आणि पर्दा हटवण्याचं हे आर्जव ऋषी आधी संजय खाननं साधनासाठी रफिंच्याच आवाजातून केलं होतं. तेरे चेहरेमें वो जादू है…फिरोजनं हेमासाठी असं म्हटलं खरं पण हेमा धर्मात्माच्या या गाण्यात पर्दानशी नव्हती. तर थेट नव्वदच्या दशकात चेहरा क्या देखते हो…असं नदीमच्या संगीतातून नायकानं नायिकेला ‘सलामी’ दिली. ‘हिजाब’ परिधान केलेल्या, ‘पर्दानशी’ असलेल्या नायिकेला बेपर्दा करण्याचा प्रयत्न नायकांनी केलेल्या आता ‘एक जमाना’ झाला. मात्र एका गाण्याचा उल्लेख झाल्याशिवाय हिंदी पडद्यावरील सुंदर चेहर्‍यांचा हा ‘पर्दा‘ उठणार नाही, चित्रपट होता १९६८ मध्ये आलेला शिकारी आणि हिंदी पडद्यावरच्या यागाण्यात चेहर्‍याचा पडदा न हटवण्याची विनंती आशा पारेख ही आशा भोसलेंच्या आवाजात करत होती.

परदें में रहने दो…
परदा ना उठावो…
पर्दा जो उठ गया तो
भेद खुल जाएगा…

हिंदी पडद्यावरील चेहर्‍यामागच्या सौंदर्याचा हा भेद अजूनही खुललेला नाही. या गाण्यातील दोन्ही ‘आशां’नी हिंदी पडद्यावरच्या नायकांना आणि सिने रसिकांनाही आजही असंच ताटकळंत ‘आशे’वर ठेवलं आहे आणि ते बिचारे तिच्या चेहर्‍यावरील पर्दा हटण्याची वाट पाहात आहेत.

–संजय सोनवणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -