‘बंदुक्या’

बंदुक्या, पोलिस्या, पिस्तुल्या, कारतुस्या ही काय नावं असतात काय, असा प्रश्न पांढरपेशी समाजाला नक्कीच पडेल, पण होय ही नावे असतात. हयातभर याच नावाने वावरणार्‍या भारताच्या एकूण क्षेत्रफळातील छोट्याश्या जमिनीच्या तुकड्याचा सातबारा नावे नसणारी ही नावं. जन्मजात ‘गुन्हेगार’ हाच खानदानी शिक्का एकदा कपाळावर बसला की तो पुसता येत नाही कधी. चोरी, दरोडे, अमुकतमुक असे असंख्य गुन्ह्यांचे ‘ओझे’ बिनदिक्कत ज्यांच्या खांद्यावर अगदी कळत्या वयापासून लाधले जाते त्या समुहाची ही प्रातिनिधिक गोष्ट.

भटक्या जमातीतील ‘पारधी’ ही एक जमात. तिचा पूर्वापार इतिहास माहिती नाही. तिच्यात ही उपप्रकार अनेकविध मात्र शिक्का एकच ‘सरकारी पाव्हणे’. वाडी, वस्ती, गाव जिथे कुठे चोरीमारी झाली की यांची पालं शोधून संशयित म्हणून यांना आत टाकायचे. संशयित आरोपी असा जन्मजात शिक्का एकदा माथ्यावर बसला की पुन्हा नव्या सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाकडे जाण्याचे मार्ग अपोआपच बोथट होतात. पोलिसांचे आणि त्यांचे सोयरसंबध असेकी होणार्‍या लेकरांना वरची नावे सरसकट दिली जाई. हे अगदीच इंग्रज अमदानीपासूनच चालू असावे.

लहाणपणापासून गावात मजल दरमजल करुन भटक्यांची मुशाफिरी रजिस्टरमध्ये नोंद घेताना वडिलांना मी पाहत आलोय. पूर्वी पोलीस पाटलांकडे सरकारी दप्तरात एक महत्त्वाचे रजिस्टर असायचे त्याचे नांव ‘मुशाफिरी रजिस्टर’. कदाचित हे इंग्रज काळापासूनच चालत आले असावे. गावात आलेल्या पालावरच्या माणसांची नोंद यात घेणे अनिवार्य असे. नाव काय? अर्थात पत्त्याचा प्रश्नच कुठे होता? मग कुठून आलात? कुठे जाणार? किती दिवस थांबणार? किती लोकं सोबत वगैरे अशी ती नोंद घेतली जाई..मुक्कामाच्या काळात गावाच्या शिवारात कुठे चोरी झाली की, यांना संशयित म्हणून उचलले जाई. पालावरचे संसार उघडे टाकून दोन-तीन रात्री पोलीस ठाण्यात काढून नंतर कोर्टात जामीन वगैरे हा ‘चक्रव्यूह’ नित्याचाच. या प्रक्रियेतून बाहेर येण्यासाठी पुन्हा चोरीमारी करुन पैसा गाठी बांधणे आलेच. याच गर्तेत उभी हयात घातलेली काही माणसं पाहत आलोय. त्यातलेच एक नाव बंदुक्या.

हा बंदुक्या कोण? कुठला?
मूळ नाव काय? बापाचे नाव काय?
गाव काय ? काहीच पत्ता नाही.
परंतु तो कळत्या वयापासून आमच्या पंचक्रोशीतील शिवाराशी प्रामाणिक.
हा ‘बंदुक्या’ काही महिन्यांपूर्वी

सकाळी गावाकडे जाताना शिवारात भेटला. गायीला वेसन घालून गायीच्या पाठीवर शेकडो किलोमीटर प्रवास करणारा हा ‘पारधी’ समूहाचा प्रतिनिधी. भारताच्या स्वातंत्र्याइतके वय त्याचे नक्कीच असेल. भारतात प्रजासत्ताक लोकशाही, कल्याणकारी राज्यव्यवस्था अस्तित्वात येऊन बहात्तर वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला. तरी असे कितीतरी समूह अजून ही या कल्याणाच्या परिघाबाहेर आहेत. परिघातील जातीच्या जातवार गणना झाल्या पाहिजेत; मान्य, मात्र त्यासाठी बोंबलणार्‍यांनो जातीच्या बाहेरच्या अशा सर्वहारासाठी आपण काही केले आहे काय, असा प्रश्नच.

यांची शिरगणती कसी करणार? यांना वाली कोण? यांचा नेता कोण? याचा देव कोण? यांची अस्मिता काय?यांचा झेंडा कोणता? त्याचा रंग कसा? यांना प्रतिनिधित्व देणार की नाही? अशा कैक प्रश्नांची उकल होत नाही.

प्रातिनिधिक लोकशाहीच्या सापळ्यात ही लोकं अजून कशी अडकली नाहीत, यांचा आवाज ‘सबका साथ सबका विकास’या घोषणेपर्यंत कसा पोहचेल वगैरे.

अजूनही भारताच्या नकाशावर यांना झोपण्यापुरती हक्काची जागा आपण देवू शकलो नाही हे सत्य नाही काय?

अन्न,वस्त्र,निवारा आणि शिक्षण,आरोग्य हे लोकशाही राष्ट्रांतील माणसांचे मूलभूत अधिकार. परंतु आजघडीला हाती ‘परात’ घेवून दारोदार भटकंती करीत कोरभार भाकर अन् पसाभार धान्य मागण्याची वेळ ‘बंदुक्या’सारख्या असंख्य लोकांवर येत असेल. तर अब्राहम लिंकन यांचे ‘लोकांचेच, लोकांनी केलेले, लोकांसाठी राज्य’ हे विचार पुस्तकातील सिद्धांत म्हणूनच इथे बरे म्हणावेत का? लिंकनच या संदर्भात म्हणाले होते की, ‘मला गुलाम म्हणून जसे जगण्यास आवडणार नाही, तद्वतच मालक म्हणून राहण्यास आवडणार नाही. माझ्या या उद्गारातूनच लोकशाहीची कल्पना व्यक्त होते.’

ही लिंकनची व्यापक लोकशाहीची कल्पना भारतीय मानसिकता स्वीकारु शकली नाही का? आजही ‘नखावर शाही/तितकीच लोकशाही/असे एखाद्या कवीला का वाटून जावे. सर्वहारा वर्गाचे या लोकशाही-प्रजासत्ताक व्यवस्थेत नेमके काय स्थान आहे? अशा अनेकानेक प्रश्नांचे भुंगे मनाला टोकरत गेले ते बंदुक्या भेटला तेव्हाच. डोक्यात नानाविध विचारांचे थैमान सुरू झाले. कसे आवरणार? ‘पारधी’ जमातीच्या एक दोन कुटुंबाचे ‘तळ’आमच्या शिवारात चारसहा महिने हमखास असायचे. ‘जमनी’ही कर्ती बाई,‘बड्डी’ तिची मुलगी. घनश्या, पौडगीर, रामा, कानफ्या, शिरया, चकन्या, भुर्‍या, मोत्या,गोपी, मुले नातवंडे, उस्मानी, सुभेदार, कुसुम, लता, रेवा लेकीसुना हा सगळाच या कुटुंबाचा विस्तार. शिवारास सोडून चोर्‍या करणे, दिवसभर सुगीच्या काळात खळेदळे मागणे, नाही दिले तर डूक धरुन लुटून आणणे वगैरे हा त्यांचा नित्यक्रम.

पाहतच आलोय..तरी ज्या गावात ‘पाल’टाकले तिथे चोरी करायची नाही हा त्यांचाच वसुल. कायम लक्षात राहिला. मात्र पंचक्रोशीत चोरी कुठेही झाली तरी पोलिसांची गाडी पारध्यांच्या पालावर ठरलेली. पुन्हा चौकशी, लुबाडणूक, अटकेचा तमाशा हे नेहमीचेच. मात्र तेंव्हा याच्याच वाट्याला का, असे प्रश्न कधी मनाला सतावत नव्हते. किंवा ते वयही नव्हते. आज या कुटुंबांचे काय झाले असेल? कोण कुठे परागंदा झाले? काहीच माहिती नाही. कोण गेले? कोण जेलखान्याचे कैदी झाले? कोणाचा खून झाला? वगैरे कपोलकल्पित गोष्टी कधी तरी कानावरून जात असतात.

यांना कोणालाच शिक्षणाचा गंध नव्हता. ना शासकीय सोयीसवलतीचा लाभ, ना आधारकार्ड, कधीच हे रेशनिंगच्या दुकानाच्या लाईनीत दिसले नाहीत. यांच्याही आपसांत मारामार्‍या, भांडण-तंटेही कायमचेच. उस्मानी, सुभेदार, कुसुम या घार्‍या डोळ्याच्या उंच सडसडीत काटक गोर्‍यापान मळकटलेल्या कपड्यातल्या ठसठशीत कपाळ गोंदलेल्या बायका पाठीवर गोणी आणि कडेवर लेकरू घेऊन भाकरी, कपडे मागायच्या. त्यांच्या आकृत्या मात्र आज डोळ्यासमोरून बंदुक्या भेटला तशा तरळून गेल्या.

काळाच्या ओघात हे सगळेच मागे पडले, पण वास्तव काहीच कसे बदलले नाही याची तीव्र जाणीव झाली. ‘बंदुक्या’अनेक दिवसानंतर दिसला. म्हणून चौकशी केली तर समजले की त्याची काळजी वाहणारे ‘गाय’ सोडून कोणीच उरले नाही.

हाणामार्‍या, चोर्‍या यातून सगळेच पांगले. म्हटले तू निराधार योजनेत नाव नोंदवून का घेतले नाही? तर उतरला, ‘माझी ’सर्विस’ झाली, ‘आता काय उरलेय? कसली योजना अन् कसला सरकार? कोण कामाचं? ज्ये मिळलं ते पोटाला मागून खातो, जित्राबाला घालतू, बस् झालं, आता काय उरलं मव्ह.

अधिकृत हाच बंदुक्या ऊर्फ कथित पद्माकर(नाव खरे असेलच याचीही शाश्वती नाही) आहे; असा कोणताच सरकारी पुरावा त्याच्याकडे नसावा,ना घर,ना दार,ना गणगोत.

दोन दिवस वाट पाहण्यात गेले,
दोन दिवस दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला,तारे फुलले,रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली

ही कवी नारायण सुर्वेंनी व्यक्त केलेली अगतिकता त्याला कशी उमजावी, मात्र दुःखाची ही जातकुळी सारखीच ना.

तरीही जगण्याची प्रचंड उर्मी असणारा हा ‘बंदुक्या’ पोटपाणी भरेल इतकेच मागून खातो. शिवार दर शिवार फेरी मारून रात्री उघड्या नागड्या पालावर आपल्या आयुष्याचे उरलेले मळके दिवस मोजत राहतो. ना आधार,ना पॅन, ना पासबुक, ना सातबारा, ना मतदारयादीत काळाशार फोटो,की कुठला मतदारसंघ ‘अंग टाकायला लागेल,तितकी भूमी आणि हे चंद्र,सूर्य तारे व आपल्या हक्काची, गाय हेच जगण्याचे अभिजात साधनं घेऊन जगणारा पद्माकर भाकरीच्या शोधात भटकत राहतो. भेटला तेंव्हा फक्त वीस रुपयाच्या नोटेवर लाखमोलाचे आशीर्वाद देऊन खूश रहा म्हणाला. पुन्हा कधी भेटेल याची शाश्वती नाही. परंतु स्वतःच्या दुःखाचे ‘कड’ पचवून इतरांना खूश रहा म्हणण्या इतपत कुठुन येते ही बुद्धाची करुणा वगैरे.

बंदुक्या नुसता भेटला नाही तर हजार गोळ्या डोक्यात सोडून गेला. स्वातंत्र्याचा सूर्य उगवला त्याला चौर्‍याहत्तर वर्षं लोटली, परंतु अजूनपर्यंत बर्‍याच मोठ्या समुहाचे अस्तित्व या भूमीत जाणवत नसेल तर यांना जबाबदार कोण?..लोकशाही, समाजवाद, प्रजासत्ताक भारताचा पुस्तकी अर्थ यांना कधी उमगणार ही नाही..स्वातंत्र्य, पारतंत्र्य याची पुसटशी जाणीव यांना होणार नाही. संवैधानिक तरतुदींचे त्यांना मोल उमगणार नाही..

कारण अनादी काळापासून चालत आलेल्या व्यवस्थेत आपण असेच आहोत या जीवन जाणिवेतून अनेकांची आयुष्य सरली. बंदुक्या त्यातलाच एक।

अशा पारतंत्र्याच्या बाहूतून यांची सुटका करु शकते ते शिक्षण परंतु ती गंगा यांच्यापर्यंत पोहचेल कशी? त्यासाठी डोक्यावरचे ‘पाल’ जावून दोन हात जमीनीवर त्यांना स्थिर व्हावे लागेल..या स्थैर्यासाठी आम्ही काय करतो आहोत? हाच प्रश्न.. इतक्यात बंदुक्या गायीवर बसून पाठमोरा झाला. मातीत उमटलेल्या गायीच्या खुरांच्या ठशांकडे पाहत मनात विचार आला….

इतकंच काय ते या बंदुक्याचे मागे उरणारे संचित….!