घरफिचर्ससारांशपथ सुरक्षेची धरून कास,सुरक्षित शाळेचा प्रवास

पथ सुरक्षेची धरून कास,सुरक्षित शाळेचा प्रवास

Subscribe

केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यानुसार भारतात दररोज 415 व्यक्तींचे रस्ते अपघातात मृत्यू होतात. इतर सर्व देशांपेक्षा हा सर्वात जास्त आकडा आहे. सोबतच रस्ते अपघातामध्ये 3.14 टक्के जीडीपी इतके आर्थिक नुकसान होते. एका वर्षात देशात 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो तर 3.5 लाख व्यक्ती गंभीर जखमी होतात. यावरून रस्ता सुरक्षा हा किती गंभीर विषय आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. म्हणून आज आता ताबडतोब सर्व पालकांनी मुलांना पथसुरक्षा नियम समजावून सांगावे व त्यांचे पालन करण्याचे वचन घ्यावे जेणेकरून अपघातांपासून मुलांचे संरक्षण होईल. वेळ सांगून येत नाही आणि वेळ गेल्यावर आपल्या हाती उरतो तो फक्त पश्चात्ताप.

शाळेच्या भिंतीभिंतीतून पुन्हा,
चैतन्याचा झरा मुक्त वाहणार,
प्रदीर्घ काळाच्या नंतर शाळा,
ते निरागस बालमुख पाहणार ..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेले लॉकडाऊन तसेच अन्य निर्बंधामुळे बंद असलेल्या राज्यभरातील शाळा तब्बल दीड वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 4 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. मुंबई, पुणे, ठाणेसह राज्यभरातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेेली आहेत. विद्यार्थी व शिक्षकच नव्हे तर शाळेच्या भिंतीसुध्दा आनंदाने न्हाऊन निघाल्या असतील. दीड वर्ष मुलांनी अज्ञातवासासारखी घरात घालवली आहेत. मुलांच्या भविष्याच्या जडणघडणीत शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या शिक्षणावर प्रचंड मर्यादा आल्या. पण म्हणतात ना की, गरज ही शोधाची जननी आहे. त्याप्रमाणे शासन व शाळांनी पुढाकार घेत ऑनलाईन शिक्षणपध्दती विकसित केली. याबद्दल शाळा व शासनाचे खरोखर आभार मानले पाहिजेत. गुगल मिट, गुगल क्लासरूम, झूम किंवा इतर अ‍ॅपची नावेसुध्दा ज्या पिढीने ऐकली नव्हती ते या दीड वर्षात त्याच्या वापरात निष्णात झाले आहेत. याच ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे मुलांच्या शिक्षण हक्काची परिपूर्ती होऊ शकली.

- Advertisement -

मात्र याबरोबरच या पध्दतीचे दुष्परिणामसुध्दा या पिढीला अनुभवास आले. तीन-चार तास छोट्या मुलांनी मोबाईलवर बघत राहणे हे त्यांच्यात दृष्टीदोष निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकेल. तसेच या काळात मुलांची शारीरिक हालचाल खूप कमी झाली आहे, त्याचाही त्यांच्या शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकेल. या व्यतिरिक्त शाळेत जाण्यासाठी प्रवासातील गंमत जंमत, मित्रांना भेटणे व गप्पा टप्पा, सोबत एकमेकांना वाटून जेवणाचा डबा खाणे, खेळणे, शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद, शाळेतील गमतीजमती व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मैदानी खेळ या सर्व गोष्टींना मागील दीड वर्षात मुले मुकली आहेत. त्यामुळे कधी एकदाची शाळा उघडते व आपण शाळेत जातो असे सर्वच बालगोपाळांना झाले होते. या पार्श्वभूमीवर शाळा चालू होणे मुलांसाठी आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधताना ‘माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी’ हा मूलमंत्र दिला. एका सुरक्षित शालेय वातावरणात दर्जेदार शिक्षण घेण्याचा मुलांचा हक्क अबाधित राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शाळेत जाताना व येताना मुलांना रस्त्यावर चालावे लागणार तसेच बस, रिक्षा इत्यादी वाहनांनी प्रवास करावा लागणार आहे. इतका प्रदीर्घ काळ घरात असल्यामुळे या बालकांना परत एकदा अपघात टाळण्यासाठी काय सुरक्षितता पाळली पाहिजे हे त्यांच्या मनावर बिंबवणे अतिशय गरजेचे आहे. इतक्या काळानंतर शाळेत जाण्याचा आनंद व उत्साह यामुळे मुलांचे सुरक्षा नियमाकडे दुर्लक्ष होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या सर्वांना माहीतच असेल की रस्ते अपघात हे 5 ते 14 वर्षांच्या बालकांच्या मृत्यूचे सर्वात प्रमुख कारण आहे. सोबतच आजन्म विकलांगता येण्याचेसुध्दा. रस्ते अपघातामुळे भारतात दररोज 31 बालकांचा मृत्यू होतो, म्हणूनच त्यापासून बालकांचे संरक्षण करणे खूप गरजेचे आहे.

- Advertisement -

केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यानुसार भारतात दररोज 415 व्यक्तींचे रस्ते अपघातात मृत्यू होतात. इतर सर्व देशांपेक्षा हा सर्वात जास्त आकडा आहे. सोबतच रस्ते अपघातामध्ये 3.14 टक्के जीडीपी इतके आर्थिक नुकसान होते. एका वर्षात देशात 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो तर 3.5 लाख व्यक्ती गंभीर जखमी होतात. यावरून रस्ता सुरक्षा हा किती गंभीर विषय आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. म्हणून आज आता ताबडतोब सर्व पालकांनी मुलांना पथसुरक्षा नियम समजावून सांगावे व त्यांचे पालन करण्याचे वचन घ्यावे जेणेकरून अपघातांपासून मुलांचे संरक्षण होईल. वेळ सांगून येत नाही आणि वेळ गेल्यावर आपल्या हाती उरतो तो फक्त पश्चात्ताप.

पथसुरक्षा म्हणजे मुलांनी काय केले पाहिजे हे समजून घेणे गरजेचे आहे. रस्ता ओलांडताना मुलांनी झेब्रा क्रॉसिंगचाच वापर केला पाहिजे हे मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे. मधूनच रस्ता ओलांडणे हे अपघातास आमंत्रण ठरू शकते व प्राणावर बेतू शकते. ‘लक्षात ठेवा, रस्ता ओलांडा झेब्रा क्रॉसिंग वरून, अपघात बसलाय दबा धरून’, हे मुलांना पालकांनी व शिक्षकांनी सतत शिकवणे गरजेचे आहे. रस्ता ओलांडत असताना ड्रायव्हरच्या नजरेस नजर देऊन व सभोवती लक्ष ठेवत रस्ता हळू ओलांडायचा आहे. कधी-कधी मुले रस्त्यावरून पळत जातात. अशावेळी त्यांना रस्त्यावरून पळण्यातील धोका सांगितला पाहिजे. रस्त्यावर मस्तीत चालण्यापेक्षा शिस्तीत चालणे कधीही श्रेयस्कर असते. यासोबतच फुटपाथ असतील तिथे त्यावरून एका रांगेत चालावे. गटागटाने चालणे धोकादायक ठरू शकते. दहा वर्षांआतील मुलांना एकट्याने रस्त्यावर जाऊ देऊ नये. मोठ्यांनी छोट्या मुलांचा हात पकडूनच रस्त्यावरून चालले पाहिजे. थोडा वेळ वाचवण्यासाठी मुलांनी भूमिगत मार्ग व वरील पूल यांचा वापर न करता मधून रस्ता ओलांडला तर अपघात होऊ शकतो. भूमिगत मार्ग व वरील पूल यांचा वापर केला तर अपघात नक्कीच टळतील हे मुलांना सांगितले पाहिजे.

‘लेट जाईन पण थेट जाईन’ ही भूमिका मुलांना शिकवली पाहिजे. ‘शॉर्ट कट मे कट अवर लाइफ इन टू शॉर्ट’ म्हणून शॉर्ट कट न मारण्यातच खरा शहाणपणा आहे. अगोदर उजवीकडे येणार्‍या गाड्या बघणे, गाड्या थांबलेल्या असतील किंवा येत नसतील तर डावीकडे बघणे, गाड्या येत नसतील तर परत एकदा उजवीकडे बघून गाड्या येत नाहीत ना याची खात्री करून घेणे व मग सभोवताली बघत रस्ता ओलांडणे ही अतिशय सुरक्षित पध्दत आहे. एक महत्वाचा मंत्र आपण सर्वांनी मुलांना सांगावा तो म्हणजे लक्ष चहूदिशात, मोबाईल खिशात. रस्त्यावर चालताना मोबाईलचा वापर करणे म्हणजे अपघातास निमंत्रण. रस्त्यावर चालताना फोनवर बोलणे अथवा संदेशांची देवाणघेवाण करणे यामुळे दुर्लक्ष होऊन अपघात घडू शकतो. अग्निशमन दलाचा ट्रक, रुग्णवाहिका अथवा पोलिसांची गाडी सायरन वाजवत येत असेल तर त्यांना आधी रस्ता द्यावा जेणेकरून कुणाचे तरी प्राण वाचतील व आपणास त्याचे समाधान मिळेल. पादचार्‍यांसाठी जो सिग्नल असतो त्यावर लाल रंगात थांबलेल्या माणसाचे चिन्ह असल्यास फुटपाथच्या कोपर्‍यावर थांबावे. हिरव्या रंगात चालणार्‍या माणसाचे चिन्ह असेल तरच रस्ता ओलांडावा. या सर्व नियमांचे पालन केल्यास मुले नक्कीच सुरक्षित होतील.

1 ते 7 ऑक्टोबर हा जागतिक वॉक टू स्कूल सप्ताह म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने चालण्यास प्रोत्साहन दिले जाते. मात्र चालताना सुरक्षित व सावधपणे चालून अपघात टाळणे ही काळाची गरज आहे. काही सामाजिक संस्था शहरातील विद्यार्थ्यांसाठी पादचारी सुरक्षेचे धडे अतिशय बालसुलभ व मनोरंजक पद्धतीने देत आहेत. अशाच प्रकारे प्रत्येक शहरात सामाजिक संस्थांनी या अतिशय आवश्यक विषयावर कार्य केल्यास मुले नक्कीच सुरक्षित होतील. मुल थोडे उशिरा जरी घरी आले तरी आई वडिलांच्या हृदयाची धडधड वाढते. शंकाकुशंकांनी त्यांचे मन हैराण होते. विचार करा ज्यांची मुले अपघातामुळे घरी पोचलीच नाहीत त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्यामाजी लपले रवींद्र, ज्ञानेश्वर, शिवाजी, विकसता प्रगटतील, शेकडो महापुरुष समाजी. उद्याचे महापुरुष व जबाबदार नागरिक हीच मुले बनून हा देश समर्थ करणार आहेत. त्यामुळे त्यांचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी मुलांना पादचारी सुरक्षेचे धडे दिले तर मुलांचे मृत्यू आपण नक्कीच टाळू शकतो. आपल्या मुलांना आपल्याला सेफ कीड म्हणजे एक सुरक्षित मुल बनवायचे असेल तर आजपासूनच सुरक्षेच्या संस्कृतीचे बीज त्यांच्या मनात पेरणे अतिशय गरजेचे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. वेळीच सावध होऊया, मुलांना सुरक्षिततेचे धडे देऊया, कारण प्रतिबंध उपचारापेक्षा नेहमीच श्रेष्ठ.

–मिलिंद गुडदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -